Thursday, 24 May 2018

लेख क्रमांक 33 संस्कार

बालपणीचे संस्कार

एकविसावे शतक हे ज्याप्रमाणे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते तसे धावपळीचे सुद्धा युग आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे आज मनुष्य काम करीत आहे. आपल्या लेकरांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आई आणि वडील हे दोघेही विविध क्षेत्रात नोकऱ्या करीत आहेत. घरातील चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांही कुटुंबाच्या प्रगतीसाठी घराबाहेर पाऊल ठेवले आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे. परंतु या बदलामुळे घरात काही समस्यांचा देखील जन्म झाला आहे, हे विसरून चालणार नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमधील दोघेही नवरा बायको नोकरी करणाऱ्या कुटुंबात तणावाचे वातावरण दिसून येते. जिथे योग्य समायोजन होते तेथे शांतता सुद्धा दिसून येते. परंतु ती शांतता अल्पकाळासाठी टिकून राहते. कामाच्या व्यापात मुलांवर संस्कार करायचे राहून चालले आहे. पैशाच्या बळावर सर्वकाही मिळविता येईल परंतु संस्कार मिळविता येणार नाहीत. संस्कार हा जीवनाचा अनमोल ठेवा आहे. बालपणी मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील या बाबीकडे प्रत्येक पालकाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपले पारंपरिक सण किंवा उत्सव साजरे करताना त्यातून मुलावर संस्कार कसे टाकता येतील ? याचा विचार करून कार्यक्रम साजरे केल्यास तेथे एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. त्याचप्रमाणे मुलांना याच वयात स्वावलंबनाची ही शिकवण द्यायला हवी. लहान वयापासून दिलेले हे स्वावलंबनाचे धडे मुलांना भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतील. लहान वयात मुलांवर योग्य संस्कार करणे ही एक प्रकारे हिऱ्याच्या खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे त्यांचे जीवन हे हिर्‍याप्रमाणे प्रकाशमान होऊन चमकत रहाते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला

शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला

मुलांनो, तुम्ही शाळेत कशासाठी जाता ? असा प्रश्न जर कोणी विचारला असता, मुले उत्तर देतात की,  शिकण्यासाठी तर कोणी म्हणतो की ज्ञान मिळवण्यासाठी. मग शिक्षण किंवा ज्ञान आपणाला फक्त शाळेतूनच मिळते काय ? प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. शाळेतून फक्त आपणाला अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान मिळते, तर समाजात वावरताना जे अनुभवाचे ज्ञान मिळते त्यावर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणूनच आचार्य विनोबा भावे म्हणतात की, यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. मानवाच्या आयुष्याचा शिक्षणाशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणूनच ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले आहे. शाळेतून आपणाला अक्षर किंवा संख्येची ओळख तर दिली जातेच शिवाय समाजात कसे राहावे ? कसे वागावे ? याचेही ज्ञान विविध उपक्रमाद्वारे दिले जाते. उपक्रमाशिवाय शाळा म्हणजे देवाविना मंदिर असल्यासारखे होय. त्यास्तव प्राथमिक शाळांमधून जास्तीत जास्त उपक्रम सर्वत्रच राबविले जातात. आपणाला जर उत्तम शिक्षण मिळवायचे असेल तर केथराल यांनी सांगितलेल्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बारीक निरीक्षण करणे, खूप अनुभव घेणे आणि खूप अभ्यास करणे ह्या तीन गोष्टी मुळे आपले शिक्षण नक्कीच परिपक्व होऊ शकते. जे शिक्षण उपजीविकेचे साधन असते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन असते ती विद्या असते असे स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी म्हटले आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जे साहस वा शक्ती मिळते ती या शिक्षणातूनच मिळते. शिक्षण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपणाला अवघड किंवा माहीत नसलेली बाब कळणे व लक्षात येणे. यावरून शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते असे जे लोक म्हणतात ते याच अर्थाने. शिक्षणाचा मूळ अर्थ आहे विचार करणे. खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. चांगला विचार करून चांगला आचार केला नाही तर अजून आपणाला शिक्षणाची गरज आहे असे समजण्यास हरकत नसावी.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

मी गरीब नाही

मी गरीब नाही

इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जाते. याचा अर्थ येथील सर्वच लोक श्रीमंत होते असा अर्थ  काढण्यास हरकत नसावी. मात्र इंग्रज लोकांनी जवळपास दीडशे वर्षे भारतावर राज्य करून या देशाला पूर्णपणे पिळून काढले आणि भारत देश गरीब झाला, असेही म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर भारत स्वतःच्या कर्तुत्वावर आज जगात महत्त्वाच्या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे, हे निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, तरीही देशातील लोकांची स्थिती जर बघितली तर एकीकडे खूप श्रीमंत लोक दिसतात तर दुसरीकडे अत्यंत गरीब लोक बघायला मिळतात. दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे स्वतःला गरीब म्हणवून घेणाऱ्याची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. सरकारच्या योजना मिळविण्यासाठी बरीच मध्यमवर्गीय मंडळीसुद्धा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात समाविष्ट होण्याचा खटाटोप करतात, हे अत्यंत क्लेशदायक वाटते. याविषयी प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांचे म्हणणे योग्य वाटते. ते म्हणतात की गरिबीचे प्रदर्शन करणे हे गरीबीचे दुःख भोगण्यापेक्षा ही अधिक कष्टदायक आहे. मुळात जी व्यक्ती मी गरीब आहे असे वारंवार लोकांना सांगते ती व्यक्ती गरीब नसतेच मुळी. कारण जोपर्यंत त्यांच्या बाहूत शक्ती आहे आणि पायात बळ आहे तो या दोन गोष्टींच्या हिमतीवर गरीबीला पळवून लावू शकतो. मात्र मुळात आपण याच दोन गोष्टीचा वापर न करता गरिबाला मदत करा म्हणून इतरांपुढे हात पसरतो. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपल्या शक्ती व बळाचा वापर केल्यामुळेच श्रीमंत होऊ शकले. विद्यार्थी आयुष्यभर गरीब राहू नये म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी युवकांमध्ये " कमवा व शिका " हा मंत्र दिला. पैसा नाही म्हणून कोणी गरीब समजले जात नाही, याविषयी महात्मा गांधी म्हणतात की, धनवान असुन देखील ज्यांची धनाची लालसा कमी होत नाही ते सर्वात अधिक गरीब आहेत. स्वतःला गरीब समजणे म्हणजे आपला आपल्यावरचा आत्मविश्वास कमी असणे होय. जे स्वतःला गरीब समजतात तेच लोक गरीब असतात वास्तविक गरिबी स्वतःला गरीब समजण्यात असते असे इमर्सन ने म्हटले आहे, ते सत्यच आहे. त्यास्तव स्वतःला गरीब म्हणत रडण्यापेक्षा आपले भाग्य आपल्या शक्ती व बळाने बदलविण्याचा विचार करून मी गरीब नाही हे आपल्या मनाला ठासून सांगितले पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

Tuesday, 22 May 2018

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी

मुलांनो, परमेश्वराने सर्वांनाच दोन डोळे व विचार करण्यासाठी बुद्धी दिली. मात्र प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे एक समान नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार एकसारखे असूच शकत नाही. रोमा रोला यांनी म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही वस्तूचे सौंदर्य हे पाहणार्‍याच्या दृष्टीमध्ये असते. म्हणूनच दृष्टी तशी सृष्टी असे म्हटले जाते. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूचे उत्तम सौंदर्य दिसावे असे वाटत असेल तर आपली दृष्टी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपले ज्ञान आहे. सदगुणाशिवाय आपणाला सौंदर्य दिसत नाही आणि ते प्राप्त सुद्धा होत नाही. जर आपणाला खरच सौंदर्य मिळावे असे वाटत असेल तर पहिल्यांदा आपण सुंदर व्हायला शिकायला पाहिजे असे कवि कलापी याने म्हटले आहे. जेम्स रोस म्हणतात की,  ज्या माणसाच्या अंगी सत्य, सदाचार, शील, आणि सहिष्णुता असते ती व्यक्ती सौंदर्य प्राप्त करते. याच संदर्भात संत चोखामेळा यांनी खूप सुंदर दृष्टांत देताना म्हटले आहे की, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा ? एखाद्याचे बाह्य सौंदर्य पाहून त्याची प्रशंसा वा स्तुती करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी मिळविता येणे फार चांगले. दुरून डोंगर साजरे किंवा दिसतं तसं नसतं या म्हणीप्रमाणे वरवरच्या गोष्टीला भुलून न जाता त्याविषयी सखोल ज्ञान माहिती मिळविल्यास आपणास खरी दृष्टी लाभते आणि तेव्हाच उत्तम दृष्टी व सौंदर्य पाहण्यास मिळते. आचार्य प्र. के. अत्रे यांची दृष्टी खूपच महान होती त्यामुळे त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य तयार झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीचे सौंदर्य म्हणजे त्यांचे सामर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य म्हणजेच सौंदर्य आहे. यासंदर्भात धूमकेतू यांचे विचार ही लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणतात की, सौंदर्य जर तुमच्या अंतरंगात नसेल तर सौंदर्याचा शोध घेण्यासाठी सर्व पृथ्वी पालथी घातली तरी ती तुमच्या हाती लागणार नाही. म्हणूनच मनाचे पावित्र्य राखा म्हणजे तुम्हाला सर्वच सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडेल अशी महात्मा गांधीजींचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लोभाचे फळ

*लोभाचे फळ*

मुलांनो, आपणाला सोन्याचे अंडे देणार्‍या एका कोंबडीची गोष्ट माहीत असेलच. एका माणसाजवळ सोन्याचे अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज नित्यनेमाने सकाळी सोन्याचे अंडे देत होती. त्यामुळे त्या माणसाचे दारिद्र्य दूर झाले आणि तो चैनीत व ऐषोआरामात दिवस घालवीत होता. मात्र तो समाधानी नव्हता. त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. लवकर श्रीमंत व्हावे ह्या लोभापायी त्याने विचार केला की रोज एक सोन्याचे अंडे घेण्यापेक्षा कोंबडीला कापून तिच्या पोटातील सर्वच्या सर्व सोन्याची अंडी एकदाच मिळवावी आणि खूप श्रीमंत व्हावे. म्हणून त्यांने ती कोंबडी कापली. तेव्हा त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट रोजचे अंडीसुद्धा कोंबडीसोबत संपले. हे असे का झाले ? अति लोभामुळे झाले. वेदव्यास ऋषी म्हणतात की, पाण्याने तुडुंब भरलेली नदी समुद्रास मिळते तरी त्याचे समाधान कधीच होत नाही. तेंव्हा आपणाजवळ जे काही उपलब्ध असेल तर त्याच उपलब्धतेवर समाधानी असणे अत्यावश्यक आहे. जेव्हा केव्हा आपण एकाचे दोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात लोभ निर्माण होतो. त्यासाठी शेख सादिक यांनी सांगितले वचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणतात की, मनुष्य जर लोभाला धुडकावून लावेल तर सम्राटापेक्षाही उच्च दर्जा त्याला प्राप्त होईल. समाधानी मनुष्यच समाजात ताठ मान करून वावरत असतो. आजपर्यंत जे कोणी महात्मा किंवा महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या जीवनात लोभाला शून्य महत्त्व होते. ते जर लोभाच्या आहारी गेले असते तर समाजात ते ताठ मानेने राहू शकले नसते. जीवन जगत असताना पदोपदी आपणाला लोभ निर्माण होतील असे प्रसंग घडतात. लॉटरी लागेल म्हणून मनुष्य रोज शंभर रुपयांचे तिकीट खरेदी करतो. झटपट श्रीमंत व्हावे म्हणून आपली कमाई लॉटरीच्या तिकिटात खर्च करणारा लवकरच कंगाल बनतो. म्हणून अश्या मोठमोठ्या स्वप्न दाखविणाऱ्या बाबीकडे दुर्लक्ष केलेले केंव्हाही बरे. फुकटच्या गुलाबजामुन पेक्षा कष्टाची चटणी भाकर केंव्हाही गोड लागते. अनेक वेळा आपणास लोभाचे आमिष दाखविल्या जाते. मात्र वेळीच आपण सावध होणे गरजेचे आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावू नये या अर्थाची म्हण सुद्धा आपणाला लोभापासून वाचून राहा असे सांगते. संस्कृत सुभाषितांमध्ये म्हटले आहे की लोभी माणसाला कोणी मित्र असत नाही किंवा कोणी गुरूही असत नाही. कारण तो सदानकदा एकटा जीव सदाशिव प्रमाणे एकलकोंडा बनतो आणि त्याच्या मनाला सदोदित लोभांचे विचार चालू असतात. दिलदार मनुष्य अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो तर कंजूष अर्थात लोभी मनुष्य शेवटपर्यंत दुःखी असतो असे कैसे बिनइल खतीम यांनी सांगून ठेवले आहे. त्यास्तव नेहमी आनंदी राहण्यासाठी समाधानी राहायला शिकावे व लोभापासून शक्यतो दूरच राहावे. कारण लोभाचे फळ आज नाहीतर उद्या दुःखातच परिवर्तित होणार आहे याची जाणीव ठेवावी.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday, 21 May 2018

खेळाकडे ही लक्ष द्यायला हवे

*खेळांकडे ही लक्ष द्यायला हवे*
चित्र - विनायक काकुळते, नाशिक

राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध करून द्यायला हवे. तर काही मैदानांना हेरिटेजचे स्वरूप आले आहेत. खेळाचा प्रसार होण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळाचा स्वतंत्र विषय म्हणून समावेश करावा. मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसते तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय ने आपले विचार बदलले तरच आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे मित्रासोबत वेळ घालवणे दंगा करणे तितकेच आवश्यक आहे. आपली शक्ती योग्य गोष्टींमध्ये आपण गुंतवायला हवे असे परखड मत भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अँड फिट इंडियाच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल तसेच स्वतःच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारखे अनेक भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर आपले नाव तर प्रसिद्ध केलेच त्याशिवाय भारताचे नाव देखील जगजाहीर केले.
तसे पाहिले तर मुलांना खेळ हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळ असा शब्द जरी मुलांसमोर उच्चारला गेला तरी मुलांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. खेळाची आवड नसलेली मुलं शोधून काढणे फार मोठे अवघड काम आहे. वास्तविक पाहता आपल्या शरीरासाठी खेळ सर्वात महत्त्वाचे आहे. करण्यामुळे शारीरिक हालचाल होते आणि आपण सुदृढ व तंदुरुस्त बनतो. आपले शरीर चांगले असेल तर आपली बुद्धी सुद्धा चांगली असते. Sound in Body is Sound in Mind असे इंग्रजीत म्हटले आहे ते या अर्थानेच. आपले शरीर निरोगी व बळकट ठेवण्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. म्हणून सदानकदा खेळत राहणे हे सुद्धा वाईट आहे. शाळेत जाणाऱ्या बहुतांश मुलांना खेळायला वेळच मिळत नाही अशी तक्रार ही मुले करतात, तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटणारच. पण त्यांचे वेळापत्रक जवळून निरखून तपासून पाहिल्यास त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटते. बहुतांश मुलांना सकाळच्या अगदी सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर शिकवणीला जावे लागते. त्यानंतर शाळेची तयारी करून शाळेला जाणे आणि शाळेत खेळासाठी अर्ध्या तासाची फक्त एकच तासिका असते त्यात कधी खेळायला मिळते तर कधी वर्गातच बसून राहावे लागते. सायंकाळी घरी गेल्यावर गृहपाठ करण्यात तासभर निघून जातो तोच सायंकाळच्या शिकवण्याची वेळ होते. रात्री नऊ किंवा दहा वाजता शिकवणी संपून घरी आले की जेवण करा आणि झोपी जा. अशा वेळापत्रकात त्यांना फार कमी वेळा खेळायला मिळते. त्यामुळे आजची मुले आरोग्याच्या बाबतीत फारच कमकुवत निघत आहेत. मोबाईलवरील किंवा संगणकावरील गेम खेळायचा प्रचंड नाद मुलांना लागत आहे, ही वाईट सवय आहे. सर्वात पहिल्यांदा आई-बाबांची किंवा भाऊ-बहिणीच्या मोबाईलला अजिबात हात न लावण्याची शपथ घ्यावी व त्याची अंमलबजावणी करावी. त्यापेक्षा बाहेर सायकल फिरवणे, मित्रांसोबत उड्या मारणे व गप्पा मारणे केव्हाही चांगले हे आपल्या शरीराला तारक आहे. मात्र मोबाईल किंवा संगणक आपणासाठी मारकच ठरतात. त्यामुळे ऋतुमानानुसार खेळल्या जाणाऱ्या खेळाकडे लक्ष द्या. अभ्यासासाठी जसे वेळ देता तसे खेळासाठी सुद्धा वेळ राखून ठेवा म्हणजे अभ्यास करताना ताजेतवाने वाटते. अन्यथा ऐन परीक्षेच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 12 मुख्याध्यापक

* शाळेचा कणा : मुख्याध्यापक *

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हांला करावे लागते. परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते आणि हे ज्ञान शिक्षणातून मिळते. म्हणूनच म्हटले जाते की, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन डोळ्यांनी फक्त दृश्यचित्र बघितल्या जाते. परंतु आपण शिक्षण घेऊन ज्ञानी झाला असाल तरच जे बघतो त्याची इत्यभुत माहिती आपल्या मेंदूकडे पाठवितो. अन्यथा नुसते चित्रच मेंदूकडे जाते आणि नुसते चित्र जास्त काळ स्मरणात राहत नाही. याबाबतीत प्रसिद्ध विचारवंत म्हणतो की, विस्मरण झालेल्या वस्तुची स्मृती म्हणजेच ज्ञान होय. अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीला विविध माध्यमातून ज्ञान मिळत राहते आणि व्यक्ती त्या मिळविलेल्या ज्ञानाच्या बळावर समृद्ध होतो, प्रगल्भ होतो आणि समजूतदार सुध्दा होतो. त्यातल्या त्यात लहान मुलांना एका चांगल्या दिशेने ज्ञान मिळावे यांसाठी शाळेतून शिक्षण देण्याचा पर्याय निवडला जातो. 
लहान मुलांची कुटुंब ही जरी पहिली शाळा असली तरी शाळा असॆ ठिकाण आहे ज्या ठिकाणी मुलांना अक्षर आणि अंक ज्ञानासोबत विविध विषयाचे ज्ञान दिल्या जाते. 
शाळेला विद्यालय किंवा विद्येचे घर म्हटले जाते. शाळा हे संस्काराचे महत्वाचे केंद्र आहे. अगदी कोवळ्या वयात म्हणजे सहा वर्षे पूर्ण झाल्यावर ते शाळेत येतात आणि 14 व्या वर्षी प्रगल्भ आणि हुशार होऊन बाहेर पडतात. विनोबा भावे म्हणतात की, शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. कारण संपूर्ण शिक्षण प्रणाली ही प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असते. पायाच जर कच्चा राहिला तर त्यावरील सर्व इमारती कमकुवत ठरतात. प्राथमिक शाळेत तीन घटक महत्वाची भूमिका बजावतात. पहिले म्हणजे विद्यार्थी, दूसरे म्हणजे शिक्षक आणि तिसरे ज्याची फारच महत्वाची भुमिका असते शाळेमध्ये तो म्हणजे मुख्याध्यापक. मुख्याध्यापक हा कोणत्याही शाळेचा कणाच  असतो. शाळेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मुख्याध्यापक. पायलटविना विमान उडविता येत नाही, ड्रायव्हरशिवाय गाडी चालविता येत नाही. अगदी तसेच मुख्याध्यापकाविना शाळा चालविताच येत नाही. त्यामुळेच शाळेच्या विकासामध्ये मुख्याध्यापकाची भुमिका अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे. आज ज्या शाळेवर मुख्याध्यापक नाहीत किंवा मुख्याध्यापकाची पदे इतर शिक्षकाकडे सोपविण्यात येते तेंव्हा त्या शाळांची अवकळा पाहताक्षणी ओळखू येते. एखाद्या घरात कुटुंब प्रमुखावर जी जबाबदारी असते, तीच जबाबदारी मुख्याध्यापक पदावर असते. कुटूंबाचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी कुटुंबप्रमुखाला जास्त त्रास सहन करावा लागतो. पण जेंव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती यशस्वी होते किंवा प्रसिध्दी मिळविते त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबप्रमुखाचे नावसुध्दा प्रसिध्दीस येते. असेच जवळपास शाळा आणि मुख्याध्यापकाचे आहे. सांघिक खेळात सर्व खेळाडूंच्या खेळण्याचा संघावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम बघायला मिळतात. खेळ चांगला झाला की वाईट यांस संपूर्णपणे कर्णधारावर जबाबदारी टाकली जाते. कर्णधार संघाचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला तर सामन्यात विजय मिळतो. मुख्याध्यापकाची सुध्दा जवळपास या कर्णधारासारखी अवस्था आहे. शाळेचा विकास साधणे ही सांघिक कामगिरी आहे. त्यात एकटा मुख्याध्यापक किंवा शिक्षक काहीच करू शकत नाही. शाळेच्या विकासात मुख्याध्यापक हा महत्वाचा घटक आहे. शाळेला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा मुख्याध्यापक पद शाळेत रिक्त असता कामा नये आणि कार्यरत मुख्याध्यापक हा उपक्रमशील, उद्योगी, आणि हुशार असायलाच हवे. कारण शाळेतील मुलांना घडविण्यासाठी काय करता येईल ? याचे एक नियोजन मुख्याध्यापकाच्या डोक्यात असणे आवश्यक आहे. संपूर्ण शाळा मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली तयार होत असते. कल्पक बुध्दिमत्ता, उपक्रमशील आणि वर्षभरातील सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून मुलांमध्ये शाळेविषयी आकर्षण तयार केल्यास त्या मुख्याध्यापकाला नक्कीच यश मिळते. त्याऐवजी मुख्याध्यापकाने कसल्याच प्रकारचे नियोजन केले नाही तर ती शाळा थोड्याच दिवसांत रसातळाला गेलेले दिसून येते. कितीही प्रयत्न केले तरी त्या शाळेला गतवैभव परत मिळणे कठीण बनते. निष्क्रिय मुख्याध्यापक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होय.
शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत नैतिक मूल्यांची शिकवण मिळणेसुध्दा गरजेचे आहे. पुस्तकं मुलांना ज्ञानी बनवितात तर नैतिक मूल्ये त्यांना माणूस घडवितात. देशाचे भविष्य शाळेत घडविले जाते. याठिकाणी त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. जाणूनबुझुन किंवा शिकविल्याने कोणावर संस्कार करता येत नाही, ती विकत घेण्यासारखी वस्तु ही नाही. ती नकळतपणे रोजच्या चालण्याबोलण्यातून होत असते. त्यासाठी शाळेची काही नियमावली तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अर्थातच मुख्याध्यापकाचे असते. संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेची काळजी शाळेचा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाना घ्यावीच लागते. त्यातल्या त्यात शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेची धुरा सांभाळणार कोण ? हा प्रश्न उपस्थित होतो.
या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळातून आज मोठ्या संख्येने गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर, कष्टकऱ्याची मुले शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत पाचशे ते हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि वीस ते चाळीस शिक्षक शिकविण्याचे काम करीत असतात. या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कार्यक्षम मुख्याध्यापकाची अत्यंत गरज असते. शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेचे व्यवस्थापन सुरळीत कसे चालणार व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल ?
राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 356 माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी 299 शाळा मराठवाडा मध्ये आहेत. त्यात जिल्हानिहाय दिलेले राजपत्रित मुख्याध्यापक पद रिक्त असल्याचे आकडे आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात 52 पदे मंजूर असून फक्त 3 पद कार्यरत आहेत, जालना मध्ये 29 पैकी 2, हिंगोली 18 पैकी 4, नांदेड 48 पैकी 3, उस्मानाबाद 46 पैकी 3, बीड 32 पैकी 4, लातूर 45 पैकी 1 आणि परभणी जिल्ह्यात 29 मुख्याध्यापक पदापैकी एकही पद भरण्यात आले नाही, असॆ 299 पैकी 20 पदेच एकूण मराठवाडा मध्ये भरण्यात आल्याची माहिती शिक्षक आ. विक्रम काळे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमांतून प्रश्न उपस्थित करून या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष दिली वेधले. त्यावर शालेय शिक्षणमंत्री मा. ना. विनोद तावडे यांनी पुढील शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी राजपत्रित मुख्याध्यापकाची पदे भरण्यात येईल असॆ उत्तर दिले. पण खरोखरच सरकारला या माध्यमिक शाळांची काळजी असेल तर येत्या शैक्षणिक वर्ष माध्यमिक शाळासाठी अच्छे दिन घेऊन येईल ? अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे होईल अशी शंका निर्माण होते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद 
  09423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...