Wednesday, 28 March 2018

परीक्षा आणि शाळा

*परीक्षा संपल्यावर ही शाळा*

मार्च आणि एप्रिल महिना हा शक्यतो परीक्षेचा असतो. परीक्षा संपल्या की मुलांना सुट्टयाचे वेध लागतात. त्यामुळे मुले नेहमी शिक्षकांना विचारतात की, परीक्षा कधी आहे ? पण यावर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही एक मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने नुकतेच दिले आहेत. सरासरी एप्रिल महिन्याच्या १५ ते १६ तारखेपर्यंत परीक्षा संपतात मात्र संचालकांच्या या पत्राअन्वये पुन्हा पंधरा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे. शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांतून परिपूर्ण विद्यार्थी घडत असतो. श्रीमंत पालकांच्या लेकरांना शाळेतील परीक्षा संपल्यानंतर विविध शिबीर वर्गात प्रवेश दिला जातो. ज्यामुळे मुलांचे अंगभूत कौशल्याची जपणूक केली जाते. मात्र गरीब पालक आपल्या मुलांना असे कोणते शिबीर वर्गात प्रवेश देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही मुले या दिवसात काही करत नसलेले दिसून येते. याच अनुषंगाने विद्या प्राधिकरण विभागाने परिपत्रक काढले आहे तो एक स्तुत्य उपक्रम होऊ शकतो. कारण या माध्यमातून मुलांना विविध कला कौशल्याची माहिती मिळू शकते. यात गाणी, गोष्टी, गप्पा, नाटक इत्यादी करवून घेता येतील. अवांतर पुस्तक वाचन करणे, चित्राचे पुस्तक वाचन करणे याबाबी करवून घेता येतील. शिक्षकांच्या डोक्यातील अनेक कल्पना आणि उपक्रमामुळे मुले शाळेत काही वेळ तरी नक्की थांबतील असा विश्वास वाटतो. मुलाकडून वेगवेगळे चित्र काढून घेणे आणि चित्र रंगभरण करणे यासारख्या उपक्रमामुळे मुलांना करमणूक होते. त्याचबरोबर रद्दी पेपरमधल्या विविध माहिती आणि चित्रांचे कात्रण करून वहीमध्ये चिकटविणे हा उपक्रम देखील मुलांना बरच काही माहिती देऊन जातो. तयार केलेली चिकटवही एकमेकांना देऊन त्याचे वाचन करताना मुलांना खूप मजा येते. परिसरातील प्राणी, वनस्पती, पक्षी त्याचे घर आणि ठिकाण याची माहिती गोळा करणे, स्थानिक कारागीरची मदतीने हस्तकला आणि चित्रकलेची माहिती मिळविणे, शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार असलेले चित्रपट दाखविणे असे पंधरा ते वीस दिवसाचा वेळापत्रक सोमवार ते शनिवार तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यास परीक्षा संपल्यावर देखील मुले शाळेत राहतील अशी आशा वाटते. जसे की सोमवारी गाणे म्हणणे ज्यात देशभक्ती गीत, भावगीत, भक्तीगीत, कविता आणि मुलाना काही गाणे करा ओके वर म्हणायला लावणे करता येईल. मंगळवारी गोष्टीचे पुस्तक वाचून इतरांना तीच गोष्ट सांगणे. त्याच सोबत मुलांना यु ट्यूब वरील ड्रॅमा देखील दाखविता येऊ शकेल. बुधवार रोजी रद्दी पेपरमधील चित्र, माहिती याचे कात्रण करणे आणि चिकटविणे, गुरुवारी चित्र काढणे आणि चित्रात रंग भरणे या अनुषंगाने काम करता येते. शुक्रवारी मुलांना प्रेरणा देणारे चित्रपट दाखविणे. आणि शनिवारी आठवड्यातील शेवटच्या दिवशी बैठे खेळ खेळणे जसे की करम, लुडो, आष्टा चमक असे विविध खेळ खेळता येऊ शकतात. याठिकाणी शासनाने आदेश काढले म्हणून नाही तर गरिबांच्या लेकरांसाठी आदेश नसताना ही जे शिक्षक मन लावून काम करतात तेच विद्यार्थ्यांचे गळ्यातील ताईत बनू शकतात. मात्र एकदा वार्षिक परीक्षा संपली की, निकालाच्या दिवशीच शाळेत येण्याची काही विद्यार्थ्यांची मानसिकता असते. अशा परिस्थितीमध्ये किती विद्यार्थी नियमित वर्गात येतात आणि खरोखरच शाळा एक मे पर्यंत सुरू राहणार का याविषयी राहून राहून मनात शंका देखील निर्माण होत असताना शालेय शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांनी तो आदेश मागे घेतल्याचे लगेच जाहीर केले. पण निर्णय विद्यार्थी हिताचा होता हे मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Tuesday, 27 March 2018

* शाळेचा कणा : मुख्याध्यापक *

* शाळेचा कणा : मुख्याध्यापक *

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हांला करावे लागते. परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते आणि हे ज्ञान शिक्षणातून मिळते. म्हणूनच म्हटले जाते की, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन डोळ्यांनी फक्त दृश्यचित्र बघितल्या जाते. परंतु आपण शिक्षण घेऊन ज्ञानी झाला असाल तरच जे बघतो त्याची इत्यभुत माहिती आपल्या मेंदूकडे पाठवितो. अन्यथा नुसते चित्रच मेंदूकडे जाते आणि नुसते चित्र जास्त काळ स्मरणात राहत नाही. याबाबतीत प्रसिद्ध विचारवंत म्हणतो की, विस्मरण झालेल्या वस्तुची स्मृती म्हणजेच ज्ञान होय. अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीला विविध माध्यमातून ज्ञान मिळत राहते आणि व्यक्ती त्या मिळविलेल्या ज्ञानाच्या बळावर समृद्ध होतो, प्रगल्भ होतो आणि समजूतदार सुध्दा होतो. त्यातल्या त्यात लहान मुलांना एका चांगल्या दिशेने ज्ञान मिळावे यांसाठी शाळेतून शिक्षण देण्याचा पर्याय निवडला जातो. 
लहान मुलांची कुटुंब ही जरी पहिली शाळा असली तरी शाळा असॆ ठिकाण आहे ज्या ठिकाणी मुलांना अक्षर आणि अंक ज्ञानासोबत विविध विषयाचे ज्ञान दिल्या जाते. 
शाळेला विद्यालय किंवा विद्येचे घर म्हटले जाते. शाळा हे संस्काराचे महत्वाचे केंद्र आहे. अगदी कोवळ्या वयात म्हणजे सहा वर्षे पूर्ण झाल्यावर ते शाळेत येतात आणि 14 व्या वर्षी प्रगल्भ आणि हुशार होऊन बाहेर पडतात. विनोबा भावे म्हणतात की, शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. कारण संपूर्ण शिक्षण प्रणाली ही प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असते. पायाच जर कच्चा राहिला तर त्यावरील सर्व इमारती कमकुवत ठरतात. प्राथमिक शाळेत तीन घटक महत्वाची भूमिका बजावतात. पहिले म्हणजे विद्यार्थी, दूसरे म्हणजे शिक्षक आणि तिसरे ज्याची फारच महत्वाची भुमिका असते शाळेमध्ये तो म्हणजे मुख्याध्यापक. मुख्याध्यापक हा कोणत्याही शाळेचा कणाच  असतो. शाळेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मुख्याध्यापक. पायलटविना विमान उडविता येत नाही, ड्रायव्हरशिवाय गाडी चालविता येत नाही. अगदी तसेच मुख्याध्यापकाविना शाळा चालविताच येत नाही. त्यामुळेच शाळेच्या विकासामध्ये मुख्याध्यापकाची भुमिका अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे. आज ज्या शाळेवर मुख्याध्यापक नाहीत किंवा मुख्याध्यापकाची पदे इतर शिक्षकाकडे सोपविण्यात येते तेंव्हा त्या शाळांची अवकळा पाहताक्षणी ओळखू येते. एखाद्या घरात कुटुंब प्रमुखावर जी जबाबदारी असते, तीच जबाबदारी मुख्याध्यापक पदावर असते. कुटूंबाचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी कुटुंबप्रमुखाला जास्त त्रास सहन करावा लागतो. पण जेंव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती यशस्वी होते किंवा प्रसिध्दी मिळविते त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबप्रमुखाचे नावसुध्दा प्रसिध्दीस येते. असेच जवळपास शाळा आणि मुख्याध्यापकाचे आहे. सांघिक खेळात सर्व खेळाडूंच्या खेळण्याचा संघावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम बघायला मिळतात. खेळ चांगला झाला की वाईट यांस संपूर्णपणे कर्णधारावर जबाबदारी टाकली जाते. कर्णधार संघाचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला तर सामन्यात विजय मिळतो. मुख्याध्यापकाची सुध्दा जवळपास या कर्णधारासारखी अवस्था आहे. शाळेचा विकास साधणे ही सांघिक कामगिरी आहे. त्यात एकटा मुख्याध्यापक किंवा शिक्षक काहीच करू शकत नाही. शाळेच्या विकासात मुख्याध्यापक हा महत्वाचा घटक आहे. शाळेला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा मुख्याध्यापक पद शाळेत रिक्त असता कामा नये आणि कार्यरत मुख्याध्यापक हा उपक्रमशील, उद्योगी, आणि हुशार असायलाच हवे. कारण शाळेतील मुलांना घडविण्यासाठी काय करता येईल ? याचे एक नियोजन मुख्याध्यापकाच्या डोक्यात असणे आवश्यक आहे. संपूर्ण शाळा मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली तयार होत असते. कल्पक बुध्दिमत्ता, उपक्रमशील आणि वर्षभरातील सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून मुलांमध्ये शाळेविषयी आकर्षण तयार केल्यास त्या मुख्याध्यापकाला नक्कीच यश मिळते. त्याऐवजी मुख्याध्यापकाने कसल्याच प्रकारचे नियोजन केले नाही तर ती शाळा थोड्याच दिवसांत रसातळाला गेलेले दिसून येते. कितीही प्रयत्न केले तरी त्या शाळेला गतवैभव परत मिळणे कठीण बनते. निष्क्रिय मुख्याध्यापक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होय.
शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत नैतिक मूल्यांची शिकवण मिळणेसुध्दा गरजेचे आहे. पुस्तकं मुलांना ज्ञानी बनवितात तर नैतिक मूल्ये त्यांना माणूस घडवितात. देशाचे भविष्य शाळेत घडविले जाते. याठिकाणी त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. जाणूनबुझुन किंवा शिकविल्याने कोणावर संस्कार करता येत नाही, ती विकत घेण्यासारखी वस्तु ही नाही. ती नकळतपणे रोजच्या चालण्याबोलण्यातून होत असते. त्यासाठी शाळेची काही नियमावली तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अर्थातच मुख्याध्यापकाचे असते. संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेची काळजी शाळेचा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाना घ्यावीच लागते. त्यातल्या त्यात शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेची धुरा सांभाळणार कोण ? हा प्रश्न उपस्थित होतो.
या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळातून आज मोठ्या संख्येने गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर, कष्टकऱ्याची मुले शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत पाचशे ते हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि वीस ते चाळीस शिक्षक शिकविण्याचे काम करीत असतात. या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कार्यक्षम मुख्याध्यापकाची अत्यंत गरज असते. शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेचे व्यवस्थापन सुरळीत कसे चालणार व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल ?
राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 356 माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी 299 शाळा मराठवाडा मध्ये आहेत. त्यात जिल्हानिहाय दिलेले राजपत्रित मुख्याध्यापक पद रिक्त असल्याचे आकडे आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात 52 पदे मंजूर असून फक्त 3 पद कार्यरत आहेत, जालना मध्ये 29 पैकी 2, हिंगोली 18 पैकी 4, नांदेड 48 पैकी 3, उस्मानाबाद 46 पैकी 3, बीड 32 पैकी 4, लातूर 45 पैकी 1 आणि परभणी जिल्ह्यात 29 मुख्याध्यापक पदापैकी एकही पद भरण्यात आले नाही, असॆ 299 पैकी 20 पदेच एकूण मराठवाडा मध्ये भरण्यात आल्याची माहिती शिक्षक आ. विक्रम काळे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमांतून प्रश्न उपस्थित करून या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. पण खरोखरच सरकारला या माध्यमिक शाळांची काळजी आहे का ? जर काळजी असेल तरच येणारे शैक्षणिक वर्ष माध्यमिक शाळासाठी अच्छे दिन घेऊन येईल ? अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे होईल अशी शंका निर्माण होते.

- नागोराव सा. येवतीकर 
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
  मु. येवती ता. धर्माबाद 
  09423625769

दुर्दैवी शेतकरी

* शेतीप्रधान देशांतील दुर्दैवी शेतकरी *

आज काही कामानिमित्त शहराच्या मोंढ्यात जाणे झाले. कामास थोडा अवकाश होता म्हणून इकडेतिकडे नजर फिरवली. वास्तविक पाहता सकाळचे अकरा ही वाजले नव्हते पण दुपार झाल्याची जाणिव होत होती. दुकानाचे मालक जे की " सावकार " या नावानेच ओळखले जातात ते नुकतेच आपल्या मऊशार मुलायम गादीवर विराजमान झाले होते. दुकानाचा कारकून जो पूर्ण लिखापढी हिशेब सांभाळतो ज्यास सर्वजण मुनिम या नावाने हाक मारतात ते आपल्या नाकावरचा चष्मा डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करीत लिहिण्यात गुंग होते. उन्हाचा तडका वाढत चालला होता तसा वरच्या पंखांचा वारा गरम फेकत होता. या मोंढ्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे येथे काम करणारे बाया, माणसे मजूरदार ज्यांना याठिकाणी हमाल या नावाने पुकारल्या जाते, ते दुकानात प्रवेश केल्या केल्या आपल्या कामास गपगुमानपणे सुरुवात केली. हे मजूरदार कोणाला काही बोलत नव्हते, फक्त काम करण्यावरच त्याचा पूर्ण लक्ष होते. कोणी गोणी उचलत होते आणि ढकल गाड्यांवर टाकीत होते. बाया बाहेरच्या बाजूला झाडलोट करून सर्व धान्य एकत्र करण्यात गुंग होती. बाजूलाच झाडांच्या सावलीत दोन माणसे रिकामे पोते झटकून साफ करीत असताना चांगले पोते एका बाजूला आणि थोडेसे खराब पोते एका बाजूला करीत होते. चांगल्या पोत्याचा गाठ बांधून बाजूला ठेवण्यात येत होती आणि छिद्र असलेल्या पोत्याला टाके सुध्दा मारण्यात येऊन त्यांचे वेगळे गाठी तयार होत होते. हे करताना त्यांच्यात अजिबात बातचीत होत नव्हती . अगदी शांतपणे जो तो आपले काम करण्यात व्यस्त होता. हे चित्र रोजचे होते. यांत काही बदल होणार नाही. पूर्वी बैलगाड्यामधून शेतकरी आपला माल आणित असत मात्र आज येथे ना बैल दिसत होते ना बैलगाड्या. सध्या टेंपो, ऑटो आणि इतर गाड्यामधून माल आणल्या जात होते आणि तेथील हमाल सर्व माल उतरवून मध्ये ठेवत होते. हमाल लोकांची माल उतरवण्याचे बाबतीत पूर्वीच बोलणे झालेले असते त्यामूळे कसल्याच प्रकारची झिगझिग याठिकाणी दिसत नव्हती. हे चित्र मनाला दिलासा देऊन गेला परंतु या उठाठेवची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावे लागते हे समजल्यावर खूपच दुःख वाटले. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असते मात्र याठिकाणी त्यांना सर्वच जण लुबाडतात आणि त्यांना नागवुन सोडतात असे आमच्या एका शेतकरी चळवळीतील मित्राकडून कळल्यावर थोडं अस्वस्थ वाटलं आणि शून्य मनाने विचार करीत असताना बाजूला असलेल्या वर्तमानपत्रावरील " बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या " व आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघे जणाची आत्महत्या अश्या दोन बातम्या वाचण्यात आल्या आणि मन सुन्न झाले. डोक्यावर असलेल्या कर्जापायी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असे त्या वृतांत म्हटले होते.
शेतकऱ्यांच्या होत आत्महत्या असलेल्या बातम्या आज रोजच प्रकाशित होत आहेत. गेल्या दोन तीन वर्षापासून पाऊसपाणी योग्य न पडल्यामुळे शेतकरी शेतात टाकलेली मुद्द्ल सुध्दा काढू शकला नाही. एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे सुलतानी. प्रशासन सुध्दा आपल्या कागदपत्रावर आधारित काम करताना शेतकऱ्यांच्या काळजात घुसून न पाहिल्यामुळे हे आत्महत्या सत्र काही केल्या थांबता थांबत नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हे प्रश्न नक्कीच सुटणार नाही. यांसाठी खरी गरज शेतकऱ्यांना जेंव्हा गरज असते तेंव्हाच त्यांना मदत करण्याची. पण तसे होत नाही आणि त्याचा फायदा ही सावकार मंडळी उचलतात. सावकार कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनावर डोळा ठेवतात आणि अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांकडून माल घेतला जातो. निरक्षर व अडाणी असलेला शेतकरी नकळत या सावकाराकडून छळल्या जातो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांना सुगीच्या काळात मदतीचा हात दिल्यास ते नक्कीच या संकटातून सावरतील.
शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबतो आणि आपल्या कष्टाची सर्व उत्पादने या सिमेंटच्या जंगलातील गोडाउन मध्ये आणून टाकतो. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला माल सावकार मंडळी जास्त भावात विकून थोड्याच दिवसांत श्रीमंत होतात. म्हणजे काम करून उत्पादन तयार करणारा जगाचा पोशिंदा दरवर्षी याच पध्दतीने लुबाडल्या जातो. शेतकऱ्यांच्या शेतात जेंव्हा माल असतो तेंव्हा त्याच्या मालास काहीच किंमत नसते आणि सावकारकडे साठा असेल तर तोच माल तिप्पट किंवा चौपट भावाने विक्री केल्या जाते. उत्पादकालाच या देशांत एका आण्याची किंमत दिली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर याच शेतकऱ्यांने उद्या शेती कसायाची नाही असा निर्धार करून राहिले, शेतातून काही उत्पन्न निघाले नाही तर खरंच आपण सर्व जगू शकतो का ? याचं कुणीतरी एकदा तरी विचार केलाय का ? जे या बाबींचा विचार करतील तेच शेतकऱ्यांकडे सहानभूतीपूर्वक पाहतील.
वास्तविक पाहता अन्नधान्य उत्पादनात भारत पाहिल्या क्रमांकावर आहे. मात्र योग्य प्रकारचे शेतकऱ्यांचे नियोजन आणि प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत, याच विचारांच्या तंद्रीत मोंढ्याच्या बाहेर पडलो. शेतीप्रधान देशांत शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयी जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे असे वाटते. 

- ना . सा . येवतीकर, धर्माबाद

Monday, 26 March 2018

सैनिक


सैनिक : देशाचा संरक्षक

देशाची संपूर्ण सुरक्षा ही त्या देशातील सैनिकांवर अवलंबून असते. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक मंडळी डोळ्यात तेल घालून काम करीत असतात. अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते. जेंव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेंव्हा सैनिक जागरण करीत असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे देशात कोणताही शत्रू प्रवेश करू शकत नाही. जम्मू काश्मीर आणि चीनच्या सीमेजवळ अनेक वेळा सैनिकांना शत्रूशी चार हात करावे लागते. या धुमश्चक्रीमध्ये भारतीय जवान शहीद होतात. भारताच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशी महत्वाकांक्षा ज्यांच्या मनात निर्माण होते तेच सैनिक होऊ शकतात. एक वेळ सैनिकांच्या संख्येवर लक्ष दिल्यास आपणास दिसून येईल की पंजाब राज्यातील बहुतांश युवक सैनिकांमध्ये सहभागी होतात. सहसा असे म्हटले जाते की, देशाचा सैनिक हा आपल्या बाजूच्या घरातला असावा असे वाटते. आपल्या घरातील मुलगा हा चांगल्या नोकरीला लागावा, भरपूर पैसा कमवावे असे वाटते मात्र सैनिकांमध्ये जावा असे कोणत्याच पालकांना किंवा युवकांना वाटत नाही. त्याचे काय कारण असू शकते ? आपण ज्या देशात राहतो त्या देशाविषयी आपल्या मनात देशप्रेम किंवा देशभक्ती नसणे किंवा कमी असणे खरोखरच देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम किंवा देशभक्ती जागे करण्यासाठी शालेय जीवनापासून काही उपाय करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसापुरते आपले देशप्रेम किंवा देशभक्ती उचंबळून येण्या ऐवजी रोज आपल्या मनात देशाविषयी तळमळ असणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्य मिळवायचे आहे म्हणून जो तो आपले देशप्रेम किंवा देशभक्ती टिकवून होते. त्या पारतंत्र्याच्या काळात वंदे मातरम किंवा जय हिंद म्हटले तर इंग्रज सरकार त्यांना गोळ्या झाडत होते. तरी सुद्धा शिरीषकुमार सारखा शालेय विद्यार्थी जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणून गोळ्या झेलतो. आज आपणास लोकशाही देशात जय हिंद किंवा वंदे मातरम वरून लोकं राजकारण करतात. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे गुणगान करायचे नसेल किंवा करणे उचित वाटत नसेल तर त्या देशात राहायचे तरी कशाला ? असा एक प्रश्न स्वतःला विचारून पाहावे. क्षणोक्षणी प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाविषयी अभिमान जागृती करण्यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न व्हायालाच व्हावे. देशाप्रेमावर आधारित एक चित्रपट दरमहा शाळेत दाखवायला हवे. ज्यातून मुलांच्या मनात नकळत देशप्रेम किंवा देशभक्ती जागे करता येऊ शकेल. स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक।दिनी नुसते झेंडावंदन करण्यापेक्षा त्या दिवशी दिवसभर काही कार्यक्रम आयोजित करता येतील काय याकडे लक्ष द्यावे. यादिवशी झेंडावंदन साठी शाळेतील मुले, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि पदाधिकारी व काही तुरळक नागरिक उपस्थित राहतात. गावातील सर्वांच्या सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थिती राहायला पाहिजे पण तसे दिसत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे. निदान या दिवशी तरी आपल्या मनातील देशप्रेम किंवा देशभक्ती लोकांना दाखवू या. शाळेत NCC किंवा MCC सारख्या उपक्रमात सर्व मुलां-मुलींना सहभागी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत होणार नाही. देश माझ्यासाठी आहे की मी देशासाठी हे पहिले ठरवायला पाहिजे. म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, देशासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? नक्कीच आपण सर्वांनी यावर एक वेळा तरी विचार करायला हवे. देशात दोन व्यक्ती आपल्या सर्वासाठी महान आहेत एक म्हणजे किसान आणि दुसरा जवान. किसान आपणास अन्न पुरवठा करतो तर जवान आपली सुरक्षा करतो. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान हा नारा दिला. दोघांचे देखील सन्मान करणे गरजेचे आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे घुसखोरी करणारे आतंकवादी दररोज आपल्या आपल्या सैनिकांना मारत आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या व्यक्तीचे घर-संसार वाऱ्यावर येत आहे. म्हणून यासाठी सैनिक कल्याण निधीला आपण सर्वतोपरी मदत करायला हवे. कारण या पैशातून सरकार त्यांचे वाऱ्यावर येत असलेल्या संसाराला कुठे आधार देऊ शकतात. जे आपल्या मुलांना सैनिकांत पाठवू शकत नाहीत त्यांनी निदान या निधीमध्ये सढळ हाताने, गुप्तपणे आर्थिक मदत देत राहावे, म्हणजेच त्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल. रोजच आपण जवान शहीद झाल्याची बातमी वाचतो आणि सोडून देतो. काही क्षणासाठी अरेरे ! असे उद्गार काढतोत आणि आपल्या कामाला लागतो. पण ज्यांच्या घरावर हे संकट कोसळले असेल त्या घराची काय स्थिती असेल. वास्तविक पाहता ते घरावर तुळशीपत्र ठेवूनच सैनिकांत दाखल होतात. जिवंत परत येण्याची खात्री त्यांना पण नसते. म्हणून आपण देखील त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी दरमहा काही रक्कम बाजूला काढत जावे आणि त्या निधीत गोळा करावी. त्याच बरोबर युद्धाच्या प्रसंगी सैनिकांना रक्ताची फार गरज भासते म्हणून वर्षातून एकदा प्रत्येकाने रक्तदान करावे म्हणजे सैनिकांची ही गरज तात्काळ पूर्ण होईल. काही वेळा सैनिकांना मानवी शरीराची गरज भासते मात्र ते पूर्ण होऊ शकत नाही. पण आपण देहदान करण्याचा संकल्प करून आपले अवयव दान केल्यास अनेक सैनिकांना युद्धाच्या प्रसंगी निकामी झालेले अवयव परत प्रत्यारोपण होऊ शकते. हे कार्य देखील आपली खरी देशप्रेम किंवा देशभक्ती दाखवून देण्यास मदतगार ठरू शकेल असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...