* शाळेचा कणा : मुख्याध्यापक *
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हांला करावे लागते. परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते आणि हे ज्ञान शिक्षणातून मिळते. म्हणूनच म्हटले जाते की, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन डोळ्यांनी फक्त दृश्यचित्र बघितल्या जाते. परंतु आपण शिक्षण घेऊन ज्ञानी झाला असाल तरच जे बघतो त्याची इत्यभुत माहिती आपल्या मेंदूकडे पाठवितो. अन्यथा नुसते चित्रच मेंदूकडे जाते आणि नुसते चित्र जास्त काळ स्मरणात राहत नाही. याबाबतीत प्रसिद्ध विचारवंत म्हणतो की, विस्मरण झालेल्या वस्तुची स्मृती म्हणजेच ज्ञान होय. अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीला विविध माध्यमातून ज्ञान मिळत राहते आणि व्यक्ती त्या मिळविलेल्या ज्ञानाच्या बळावर समृद्ध होतो, प्रगल्भ होतो आणि समजूतदार सुध्दा होतो. त्यातल्या त्यात लहान मुलांना एका चांगल्या दिशेने ज्ञान मिळावे यांसाठी शाळेतून शिक्षण देण्याचा पर्याय निवडला जातो.
लहान मुलांची कुटुंब ही जरी पहिली शाळा असली तरी शाळा असॆ ठिकाण आहे ज्या ठिकाणी मुलांना अक्षर आणि अंक ज्ञानासोबत विविध विषयाचे ज्ञान दिल्या जाते.
शाळेला विद्यालय किंवा विद्येचे घर म्हटले जाते. शाळा हे संस्काराचे महत्वाचे केंद्र आहे. अगदी कोवळ्या वयात म्हणजे सहा वर्षे पूर्ण झाल्यावर ते शाळेत येतात आणि 14 व्या वर्षी प्रगल्भ आणि हुशार होऊन बाहेर पडतात. विनोबा भावे म्हणतात की, शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. कारण संपूर्ण शिक्षण प्रणाली ही प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असते. पायाच जर कच्चा राहिला तर त्यावरील सर्व इमारती कमकुवत ठरतात. प्राथमिक शाळेत तीन घटक महत्वाची भूमिका बजावतात. पहिले म्हणजे विद्यार्थी, दूसरे म्हणजे शिक्षक आणि तिसरे ज्याची फारच महत्वाची भुमिका असते शाळेमध्ये तो म्हणजे मुख्याध्यापक. मुख्याध्यापक हा कोणत्याही शाळेचा कणाच असतो. शाळेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मुख्याध्यापक. पायलटविना विमान उडविता येत नाही, ड्रायव्हरशिवाय गाडी चालविता येत नाही. अगदी तसेच मुख्याध्यापकाविना शाळा चालविताच येत नाही. त्यामुळेच शाळेच्या विकासामध्ये मुख्याध्यापकाची भुमिका अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे. आज ज्या शाळेवर मुख्याध्यापक नाहीत किंवा मुख्याध्यापकाची पदे इतर शिक्षकाकडे सोपविण्यात येते तेंव्हा त्या शाळांची अवकळा पाहताक्षणी ओळखू येते. एखाद्या घरात कुटुंब प्रमुखावर जी जबाबदारी असते, तीच जबाबदारी मुख्याध्यापक पदावर असते. कुटूंबाचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी कुटुंबप्रमुखाला जास्त त्रास सहन करावा लागतो. पण जेंव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती यशस्वी होते किंवा प्रसिध्दी मिळविते त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबप्रमुखाचे नावसुध्दा प्रसिध्दीस येते. असेच जवळपास शाळा आणि मुख्याध्यापकाचे आहे. सांघिक खेळात सर्व खेळाडूंच्या खेळण्याचा संघावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम बघायला मिळतात. खेळ चांगला झाला की वाईट यांस संपूर्णपणे कर्णधारावर जबाबदारी टाकली जाते. कर्णधार संघाचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला तर सामन्यात विजय मिळतो. मुख्याध्यापकाची सुध्दा जवळपास या कर्णधारासारखी अवस्था आहे. शाळेचा विकास साधणे ही सांघिक कामगिरी आहे. त्यात एकटा मुख्याध्यापक किंवा शिक्षक काहीच करू शकत नाही. शाळेच्या विकासात मुख्याध्यापक हा महत्वाचा घटक आहे. शाळेला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा मुख्याध्यापक पद शाळेत रिक्त असता कामा नये आणि कार्यरत मुख्याध्यापक हा उपक्रमशील, उद्योगी, आणि हुशार असायलाच हवे. कारण शाळेतील मुलांना घडविण्यासाठी काय करता येईल ? याचे एक नियोजन मुख्याध्यापकाच्या डोक्यात असणे आवश्यक आहे. संपूर्ण शाळा मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली तयार होत असते. कल्पक बुध्दिमत्ता, उपक्रमशील आणि वर्षभरातील सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून मुलांमध्ये शाळेविषयी आकर्षण तयार केल्यास त्या मुख्याध्यापकाला नक्कीच यश मिळते. त्याऐवजी मुख्याध्यापकाने कसल्याच प्रकारचे नियोजन केले नाही तर ती शाळा थोड्याच दिवसांत रसातळाला गेलेले दिसून येते. कितीही प्रयत्न केले तरी त्या शाळेला गतवैभव परत मिळणे कठीण बनते. निष्क्रिय मुख्याध्यापक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होय.
शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत नैतिक मूल्यांची शिकवण मिळणेसुध्दा गरजेचे आहे. पुस्तकं मुलांना ज्ञानी बनवितात तर नैतिक मूल्ये त्यांना माणूस घडवितात. देशाचे भविष्य शाळेत घडविले जाते. याठिकाणी त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. जाणूनबुझुन किंवा शिकविल्याने कोणावर संस्कार करता येत नाही, ती विकत घेण्यासारखी वस्तु ही नाही. ती नकळतपणे रोजच्या चालण्याबोलण्यातून होत असते. त्यासाठी शाळेची काही नियमावली तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अर्थातच मुख्याध्यापकाचे असते. संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेची काळजी शाळेचा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाना घ्यावीच लागते. त्यातल्या त्यात शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेची धुरा सांभाळणार कोण ? हा प्रश्न उपस्थित होतो.
या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळातून आज मोठ्या संख्येने गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर, कष्टकऱ्याची मुले शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत पाचशे ते हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि वीस ते चाळीस शिक्षक शिकविण्याचे काम करीत असतात. या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कार्यक्षम मुख्याध्यापकाची अत्यंत गरज असते. शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर त्या शाळेचे व्यवस्थापन सुरळीत कसे चालणार व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल ?
राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 356 माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी 299 शाळा मराठवाडा मध्ये आहेत. त्यात जिल्हानिहाय दिलेले राजपत्रित मुख्याध्यापक पद रिक्त असल्याचे आकडे आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात 52 पदे मंजूर असून फक्त 3 पद कार्यरत आहेत, जालना मध्ये 29 पैकी 2, हिंगोली 18 पैकी 4, नांदेड 48 पैकी 3, उस्मानाबाद 46 पैकी 3, बीड 32 पैकी 4, लातूर 45 पैकी 1 आणि परभणी जिल्ह्यात 29 मुख्याध्यापक पदापैकी एकही पद भरण्यात आले नाही, असॆ 299 पैकी 20 पदेच एकूण मराठवाडा मध्ये भरण्यात आल्याची माहिती शिक्षक आ. विक्रम काळे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमांतून प्रश्न उपस्थित करून या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. पण खरोखरच सरकारला या माध्यमिक शाळांची काळजी आहे का ? जर काळजी असेल तरच येणारे शैक्षणिक वर्ष माध्यमिक शाळासाठी अच्छे दिन घेऊन येईल ? अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे होईल अशी शंका निर्माण होते.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
वाचनीय व चिंतनशील लेख:"शाळेचा कणा-मुख्याध्यापक"आवडला.शिक्षकानी आपली मानसिकता बदलायला हवी.
ReplyDelete