Saturday 31 March 2018

आपली कामे आणि आपण

आपली कामे आणि आपण

मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाची विभागणी करून घेते. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींनी वेळ मिळेल तशी आवर्जून करावीत. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण मुळात करूच नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय लहानपणापासून लावून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी उदाहरण म्हणू आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचल्यास आपली कामे आपण का करावीत याचे महत्व कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच आपण आपली कामे करायला सुरुवात करू या.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...