Saturday, 31 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 17

मित्रावरुन आपली ओळख

मित्रानो,तुमचा स्वभाव कसा आहे ? हे तुमच्या मित्रमंडळी वरून सहजपणे ओळखता येते. ज्या प्रकारचे आपले मित्र असतील अगदी त्याच प्रकारचा आपला स्वभाव असतो. मानसशास्त्राने हे सिद्ध करून दाखवले आहे. जीवनात आई, वडील, भाऊ, बहिण इत्यादी नातेसंबंध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच मित्रांचे नातेसुद्धा महत्त्वाचे आहे. एखादा चांगला मित्र मिळविणे म्हणजे जीवनातील ती एक कसोटीच ठरते. संपूर्ण आयुष्यात आपण एकही मित्र बनविण्यात अयशस्वी झालो तर आपले जीवन व्यर्थ आहे, असे वाटायला लागते. मित्र कोणाला म्हणायचे, तर खूप पूर्वीपासून याची व्याख्या अशी केली आहे संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र. शालेय जीवनापासून ते व्हाया कॉलेजचे जीवन संपवून जेंव्हा  आपल्या आयुष्याला खरी सुरुवात होते तेव्हा फार कमी मित्र आपल्या वाट्यास येतात आणि मग हेच मित्र संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतात. अगदी लहानपणापासून आपल्यासोबत खेळलेले, नाचलेले, बागडलेले असे लंगोटीयार असो पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर वर्गात आजूबाजूला बसलेले पाटीमित्र असो, त्यांचे विस्मरण सहसा होत नाही.
शालेय जीवनात कळते वय झाल्यानंतर मात्र आपण वर्गातील सर्वच मुलांना मित्र करीत नाही, तर ज्याच्यासोबत आपले सुत जुळते, आपले विचार जुळतात अशा निवडक मुलांसोबतच मैत्री करतो. याच ठिकाणी आपली खरी कसोटी प्रारंभ होते. निव्वळ स्तुती करणारे मित्र म्हणजे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी जे अलंकार वापरले जातात त्याप्रमाणे असतात. असे मित्र फक्त स्वार्थ साधतात. कामापुरता मामा करून ते आपल्यापासून दूर होतात. वाईट विचारांच्या किंवा व्यसनी मित्रापासून नेहमीच अंतर ठेवून रहावे. संतानी ज्याप्रकारे म्हटले आहे सुसंगती सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो ।। त्यामुळे नेहमी चांगल्या मित्राच्या संगतीत राहिल्याने आपले चांगलेच होते. समाजात सुद्धा आपली चांगली ओळख होते. आरशात ज्याप्रकारे आपली जशास तशी प्रतिमा दिसते त्यावरून आपण ठरवितो की मी कसा दिसतो ? तसेच काम मित्राचे असते. आपल्यातील नुसते गुणच नाही तर दोष सुद्धा दाखविण्याचे काम मित्र करतात. म्हणूनच मित्रांना जीवनप्रवाहाला वळण लावणारे तट असे म्हणतात. नदीच्या प्रवाहाप्रमाणे मित्र आपल्या जीवनाला वळण देणारे असावेत याचा शोध घ्या आणि अशा मित्रांच्या सहवासात नियमित राहण्याचा प्रयत्न करा

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...