" आई - वडील हेच खरे दौलत "
एका कवितेत घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे वाचले आहे. खरोखरच आई वडीलांची आपल्या लेकरांबाबतची माया निराळीच असते. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई वडील मुलांची देखभाल करतात, त्यांना मोठी करतात. आजच्या काळात मात्र मुले मोठी झाल्यावर आपल्या जन्मदात्यालाच विसरतात. ज्यांनी आपणाला या सुंदर अश्या पृथ्वीवर आणले, त्यांना वृध्दाश्रमात धाडण्यास सुध्दा मागे पुढे पहात नाहीत. ज्या आई वडिलांनी आपणाला लहानाचे मोठे केले त्यांच्याप्रति आपले काहीच कर्तव्य नाहीत काय ? त्यांच्यावर आपण एवढा अन्याय का करावा ? आजच्या विभक्त कुटुंब पध्दती मुळे नातवंडाना आजोबांची कथा आणि आजीचे गाणी ऐकायलाच मिळत नाहीत.आजी - आजोबांचे प्रेम कसे असते हे फक्त चित्रपटातून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या नातवंडाचे किती दुर्भाग्य ! अशा घटनांना सर्वस्वी ही मुलेच जबाबदार आहेत असे मला वाटते.
काही कुटुंबात भावाभावाचे वाद होतात. काही वेळा बायकोच्या कटकटीमुळे ईच्छा असूनही मुलांना आई वडिलांपासून दूर रहावे लागते. अशा वेळी घरातील चिमुकल्याचे खूप नुकसान होते. दिवसेंदिवस समाजातील नितिमत्ता खालवली जात आहे. घरातील थोरासाठी ज्या काळात वृध्दाश्रमाची सोय झाली, त्याच काळात नितिमत्ता लयास जाण्यास सुरुवात झाली. मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, असे म्हणताना आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपले पोट भरविले या गोष्टीची आठवण मुलांनी एकदा तरी ठेवायला हवी. रोज सकाळी उठून देवपूजा करते, देवाला गोडधोड नेवैद्य देते, पण सासू सासऱ्याच्या तब्येतीबद्दल न विचारणाऱ्या सुनेला आयुष्यभर देव कळणार नाही. आजकाल माहेरच्या सांगण्यावरून किंवा कुठल्याही कारणावरून " आम्ही दोघे राजा राणी, घरात नको परका कोणी " अशीच संसाराची पध्दत नवीन मुलींच्या मनात रूढ होऊ पाहत आहे. संकृतमध्ये एक श्लोक आहे मातृ देवो भव, पितृ देवो भव अर्थात आई वडिलांना देव माना व त्यांचा आदर करा, सेवा करा, यांतच मुलांची पुण्याई आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री ठिकाणी भेट दिल्याने जे पुण्य मिळविता येते असे वाटते त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांच्या सेवेतून मिळते. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर वृध्दाश्रमात पाठवित असाल तर उद्या तुम्हांला सुध्दा याच वृध्दाश्रमात तुमची मुलं तुम्हांला पाठवणार नाहीत कश्यावरून. कारण जसे पेराल तसे उगवणार ते तर ठरलेलेच आहे. तेंव्हा प्रत्येक मुलाने " वृध्दाश्रम कश्यासाठी " यावर सखोल चिंतन करून आपल्या आई वडीलांची आजन्म सेवा करावी ते आपले परम कर्तव्य आहे
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
No comments:
Post a Comment