नशिबाचे दुसरे नाव विचार
मुलांनो, तुम्ही कधी विचार करता का ? बहुतांश मुले या प्रश्नाचे उत्तर होय असे देतात. कारण विचार केला नसता तर तुमची प्रगती झाली नसती. सजीवांमध्ये मानवाला वगळता अन्य कुण्या सजीवांना विचार करता येत नाही. कारण विचार करण्यासाठी ज्या बुद्धीची आवश्यकता आहे ती परमेश्वराने फक्त मानवालाच दिली आहे. त्याचमुळे इतरांपेक्षा मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर प्रगल्भ विचार करून लक्षणीय प्रगती केली. कुठे अश्मयुगीन काळातील मानवाने कुठे आधुनिक काळातील मानव ! आपली विचार करण्याची क्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचे विचार प्रक्रिया चालूच राहते. विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनेल, असे विनोबा भावे म्हणतात. त्यामुळे नेहमी विचारात गढुन राहावे. विशेषकरून शालेय जीवनातील वयात विचारांची प्रक्रिया सतत चालू असावी. विचार न करणारी मुले मंदबुद्धी किंवा ढ समजली जातात. ऍझक टेलर यांनी फार सुंदर विवेचन केले आहे, ते म्हणत की मनुष्याची वाढ ही अवयवांनी होत नाही, तर विचारांनीच होते. विचारांना वाचनाने सहज सहकार्य मिळते. वाचन केले नाही तर आपल्या मनात नवनवीन विचार कसे निर्माण होतील ? त्यामुळे नित्य काहीतरी वाचन करण्याची सवय आपणाला असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके तर वाचावीच लागतात याशिवाय वृत्तपत्रे, मासिके, गोष्टींची पुस्तके ही नियमित कशी वाचता येतील ? याचा विचार जरूर करावा. महात्मा गांधीजींची लिहिण्याच्या किंवा बोलण्याचा शक्तीपेक्षा वैचारिक शक्तीवर अधिक श्रद्धा होती. म्हणूनच वैचारिक पातळीवर गांधीजी खूप श्रेष्ठ महात्मा होते. खूप वाचन करून चिंतन व मनन केल्यानेच वैचारिक पातळीत काहीतरी सुधारणा होते, अन्यथा नाही. स्वामी विवेकानंद सांगतात की, वाईट संस्कारापासून दूर राहण्यासाठी पवित्र विचारांचे नेहमी चिंतन व मनन केले पाहिजे. जगात सर्वच सुंदर आहे तशी विचार करण्याची दृष्टी आपणाला मिळाली पाहिजे. आपले विचारच आपले भवितव्य ठरवतात. म्हणूनच स्वामी रामतीर्थ म्हणतात की, नशिबाचे दुसरे नाव विचार आहे.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
No comments:
Post a Comment