Sunday, 25 March 2018

एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!

एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!

स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते. म्हणून लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी दोन वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे बालदिनी देशात बाल स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत 2019 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बालस्वच्छता मोहीम अधिक व्यापक करण्याची गरज तज्ज्ञांमधून आज व्यक्त होत आहे. कारण दोन वर्षे झाली मोहीम सुरू होऊन पण अजूनही शाळेतील मुले, शिक्षक आणि जनता याबाबतीत जागृत झाले नाहीत. स्वच्छतेचे बीज लहान मुलांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण चालू असतानाच रुजवले पाहिजे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्य विषयक त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठच्यावेळी आवर्जून सांगायला हवे. आठवड्यातून एक दिवस मुलांच्या स्वच्छतेविषयी तपासणी व्हायलाच हवे. मुलांची नखे पाहणे, दात पाहणे, त्याचा पोशाख या सर्व बाबी सप्ताहातून एक दिवस पाहत गेल्यास मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजल्या जातील. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकामधील  उपक्रमांमधून लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे शक्य आहे आणि शिक्षक मंडळी हे करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अहवालानुसार हात स्वच्छ धुवून जेवण केल्यानंतर मुलांच्या आरोग्यात 60% सुधारणा होते. जेवण्यापुर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे. कारण जेवण्याच्या पूर्वी आपले हात कोणत्या कोणत्या बाबीशी संपर्कात आले याची आपणास कल्पना नसते. काही बाबी मुलांना सांगत असताना पालकांनी आणि शिक्षकांनी त्याचे पालन स्वतः करायला पाहिजे अन्यथा त्या बोलण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम होणार नाही. स्वछतागृहाचा नियमित वापर करणे आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात पाय स्वछ धुण्याची सवय मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचबरोबर ही सवय योग्य असल्याचे मुलांच्या मनावर बिंबवणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य या बाबतचे धडे त्यांना सांगणे गरजेचे आहे. स्वच्छतेची ही गोष्ट तळागळातील मुलांमध्ये रुजविण्यासाठी गावापासून जिल्हास्तरापर्यंत विविध कार्यक्रम घेऊन स्वच्छतेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. स्वच्छता आणि आरोग्य विषयक संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसिद्धी माध्यम किंवा सोशल मीडियाचा वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वात पहिल्यांदा माझ्यात बदल केला पाहिजे आणि नंतर दुसऱ्यांना सांगितले पाहिजे. आपली विचारधारा बदलली की समोरच्याची आपोआप बदलत असते. म्हणून ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलांना घर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करतात त्याचप्रमाणे आपला परिसर, आपली शाळा, आपले गाव, आपले शहर, राज्य, आणि आपला देश स्वच्छ ठेवण्याचेही शिक्षण बालवयात देणे अत्यंत गरजेचे आहे.  स्वच्छ भारत संकल्प साकार करण्यासाठी बाल स्वच्छतेसह स्वच्छ किल्ले, स्वच्छ शहर आणि स्वच्छ परिसर त्या त्या स्तरावर करणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे हे ध्येय गाठण्यासाठी देशातील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे की, आपला देश स्वच्छ असायला हवे. कुण्या एकट्याने जागे होऊन चालणार नाही तर एकाने दुसऱ्याला सांगून आपण सर्वजण स्वच्छतेचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे. देशात युवावर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी जरूर पुढाकार घ्यावा कारण युवकांमध्ये जी शक्ती असते किंवा धमक असते ते अन्य कोणा मध्ये दिसून येत नाही. चला तर मग लहान लहान चिमुकल्या मुलांसह, शिक्षक, पालक, जेष्ठ नागरिक आणि युवकांनी स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे टाकू या. एक पाऊल स्वच्छतेसाठी ....!

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...