Friday, 18 May 2018

लेख क्रमांक 06 युवा आरोपी

लेख क्रमांक 06

*युवा आरोपींचे पुनर्वसन आवश्यक*

कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलीस लॉकअपमधून चार कैदी पसार झाल्याची आजची बातमी वाचण्यात आली. नेहमीप्रमाणे ही देखील बातमी म्हणून नजरेआड टाकली मात्र त्या चार आरोपीचे फोटो मला।बातमी वाचण्यास प्रवृत्त करीत होते म्हणून ती बातमी पूर्ण वाचली. तेंव्हा मनाला एक धक्का बसला कारण ती चार ही आरोपी विशी च्या आतले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नुकतेच मिसरूड फुटू लागले होते. त्यांच्या पुढे खूप मोठे आयुष्य पडून आहे आणि एवढ्या लहान वयात ते चार ही मुलांवर घरफोडी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल झालेली आहेत. खरोखरच ही बाब देशाच्या विकासासाठी घातक नाही काय ? ज्या युवकांचे हात देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी आवश्यक आहेत तेच हात दरोडा आणि घरफोडीसाठी वापरले जात आहेत. आज देशात असे किती तरी युवक आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते वाम मार्गाला लागले आहेत. काही युवक व्यसनाधीन झाले आहेत आणि आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी ते कोणता ही मार्ग स्वीकारण्यास तयार असतात. त्यांना त्याचे काही देणे घेणे नसते. काही ठिकाणी तर अश्याच युवकांच्या हातून पैशासाठी खून सुद्धा घडले आहेत. भारत देश हा सर्वात तरुण लोकांचा देश आहे असे म्हणताना छाती फुलून येते आणि त्याचवेळी सर्वात जास्त बेकारी असलेला देश म्हणताना लगेच गळून पडते. दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या लाखों च्या पटीत वाढत आहे आणि रोजगार मात्र हातच्या बोटावर मोजता येतील असे निर्माण होत आहे. एका जागेच्या नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत अर्ज येत आहेत. यावरून देशातील बेरोजगारी लक्षात येते. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विभागात 72 हजार पदे भरणार असल्याचे जाहीर केले. ही बातमी ऐकून बेरोजगार युवकांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या असतील यात शंका नाही. मात्र देशात वीस ते पंचवीस वर्षाच्या आत असलेल्या आरोपीना समुपदेशन करून अश्या युवकांच्या हाताला काम दिल्यास ते भविष्यात काही चांगले कार्य करू शकतील अन्यथा त्यांची पिढी तर वाया जाणारच सोबत त्यांच्या नंतर येणारी पिढी सुद्धा वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाढत्या वयात नकळत आरोपी झालेल्या युवकांचे पुनर्वसन आवश्यक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...