ठेविले अनंते तैसेचि राहावे
व्यक्तीचा स्वभाव जन्मल्यापासून मरेपर्यंत वयापरत्वे सारखे बदलत राहते. लहानाचे मोठे होत असताना अनुभवाची शिदोरी घेत घेत व्यक्ती मोठा होतो. काही लोकांचा स्वभाव सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या उक्तीप्रमाणे नेहमी तशीच राहते. " ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान " असे संत तुकाराम महाराजांनी लोकांना उपदेशपर सांगितले आहे. त्याचाही काही जणांवर निश्चितपणे प्रभाव जाणवतो. काही व्यक्ती मात्र जीवनात आलेल्या कटू अनुभवातून काहीतरी तथ्य शिकून आपल्या स्वभावात थोडा फार बदल करतात. ते लोक एका अर्थी परिस्थितीशी जुळवून घेतात. ज्यांचे स्वभाव बदलतात तेच कोणत्याही परिस्थितीशी समायोजन करू शकतात. ज्यांचा मूळ स्वभाव कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडेच अशी राहते ते जीवनात हेकेखोर, तापट, रागीट स्वभावाची व्यक्ती बनतात. समाजात अशी त्यांची ओळख होते ती कायमस्वरूपी राहते.
अगदी लहानपणापासूनच व्यक्तीचा स्वभाव पदोपदी अनुभवाला येत असतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा वापर या स्वभावावरूनच केल्या जाते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक लहान मुलांमध्ये एक सहज स्वभाव आढळून येतो ते म्हणजे नको म्हटलेले करून पाहणे. आई-वडीलांनी हे करू नका असे म्हटले की केले तर काय होते ? याची उत्सुकता व जिज्ञासेमुळे नको म्हटलेले तो नक्की करून पाहतो. हुशार असलेले पालक मुलांच्या या उत्सुकता व जिज्ञासेचा फायदा उचलत नको-नको म्हणत त्यांच्याकडून हव्या त्या क्रिया सहजरीत्या करून घेतात. आज जेवण करू नको असं म्हटलं की त्या दिवशी तो थोडा जास्तच जेवण करणार हे ठरलेलं गणित आहे. तेथे पालकांची कल्पकता फारच कामाला येते.
असंच बालपण सरताना काही गोष्टींची जाणीव होत जाते तसा तो तारुण्यात पदार्पण करतो. या वयात अतिआत्मविश्वास हा स्वभाव सरसकट सगळ्याच तरुणांमध्ये दिसून येतो. गोष्ट पूर्ण करण्यापूर्वी मी ते सहजरित्या करू शकतो. आत्मविश्वासाने विविध स्वप्न रंगविण्याचे काम या वयातील सर्व युवकांचे बनलेले असते. यात त्यांचा मुळीच दोष नसतो, याठिकाणी दोष आहे तो त्या वयातील स्वभावाचा. जे युवक अशा वयात आपल्या स्वभावावर संयम ठेवून वागतात त्यांचे स्वप्नभंग होत नाही आणि तो जीवनात यशस्वी होतो. या वयातील युवक " डर के आगे जीत है " या आशेने भन्नाट काम करू इच्छितात. परंतु यात सर्वांनाच विजय मिळत नाही हेही तेवढेच खरे आहे.
तारुण्यातून व्यक्ती जेव्हा संसारात पडतो तेव्हा अनुभवाच्या शिदोरीवर त्याचे स्वभाव बदलत राहतात. विवाह म्हणजे फक्त महिलांसाठी दुसरे जन्म नसून पुरुषांचा सुद्धा आहे. विवाहानंतर दोघांनाही आपापल्या स्वभावाशी जुळवून घ्यावेच लागते. संसारात लहान-सहान गोष्टी नेहमी घडतात ज्यामुळे कुरबुर होत राहते. अशा वेळेसच स्वभावाची कसोटी लागते. घरात माहेराकडील मंडळी आली की आपली सौ. लगबगीने कामाला लागते आणि श्री थोडासा हिरमुसला होतो. याउलट सासरकडील मंडळी आली की उलट चित्र बघायला मिळते. असे प्रत्येक श्री आणि सौ यांच्या संसारात निदान एकदा तरी पाहायला मिळते. स्वभाव बदलला नाही किंवा परिस्थितीशी दोघांनीही जुळवून घेतले नाही तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. संसार म्हणजे एका रथासारखे आहे. रथाचे दोन्ही चाक व्यवस्थित असतील तरच रथ चालू शकतो अन्यथा फसून बसतो. आज ज्यांचे संसार वार्यावर हवेत गिरक्या खात आहेत त्यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांचा संसार असे होण्यामागे श्री किंवा सौ यापैकी कुणाचा तरी एकाच्या स्वभावामुळे असे झाले हे लक्षात येते.
स्ववभावच्या बाबतीत वृद्धापकाळाकडे जरासं लक्ष दिले तरी एक बाब प्रकर्षाने जाणवते घरातील मुख्य असलेले व्यक्ती आज गौण झाल्याचे त्यांना दुःख मनामध्ये सलते. त्याना वाटते की आपण पूर्वीप्रमाणे सर्वकाही करावे. वय वाढले तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्यांचा त्यांना जेवढा त्रास होतो तेवढाच कुटुंबातील इतर सर्वांना सुद्धा होतो. वयापरत्वे काम आणि जबाबदारी बदलत असतात. त्या बदलानुसार त्यांनी आपला स्वभाव बदलला तर निश्चितपणे कोणालाही त्रास होणार नाही. आश्रमात राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत ही खरोखरच दुःखद बाब आहे. वृद्धाश्रमातील ही वाढत चाललेल्या संख्येमागे अन्य अनेक कारणे असू शकतील त्यात त्यांचा स्वतःचा न बदललेला स्वभाव काही अंशी तरी नक्की असतोच याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा लागेल.
व्यक्तीचा स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या सभोवताली असणाऱ्या परिसरावर, कुटुंबावर आणि मित्रांवर सुद्धा अवलंबून असतो. कुटुंबात ज्या प्रकारचे वातावरण असते त्यानुसार कुटुंबातील व्यक्तींचा स्वभाव बनत जातो. जन्मत:च कोणी सोबत स्वभाव घेऊन जन्माला येत नाही असे म्हटले जाते मात्र अनुवंशिक गुणानुसार व्यक्तीला जन्मतः काही गुण मिळतात त्यात स्वभावाचाही समावेश होतो. परंतु खरोखरच व्यक्तीचा स्वभाव चांगला व्हावा असे वाटत असल्यास जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास तसे होऊ शकते. नेहमी चांगल्या परिसरात राहावं म्हणून आपण त्याच परिसरातील घर निवडतो ज्या ठिकाणी चांगल्या स्वभावाची लोकं राहतात. कारण आपल्या व कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर स्वभावाचा फरक दिसून येतो तसेच शालेय आणि कॉलेज जीवनात चांगल्या स्वभावाचा मित्रांचा सहवास मिळणे प्रत्येकांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सुसंगती सदा घडो या संत रामदासांच्या उक्तीची याठिकाणी खास करून आठवण येते. वाईट स्वभावाच्या मित्रांच्या संगतीने आपलं आयुष्य वाईट होते याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असते. शेवटी एक सारख्या स्वभावाच्या व्यक्तीची जुळवणी फार लवकर होते.
आपल्या स्वभावात अनुकूल बदल करण्यासाठी स्वतः जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास आपले आयुष्य अजून सुंदर होऊ शकते त्यास्तव प्रत्येकाने ठेविले अनंते तैसेची रहावे काय ? याचा जरूर विचार करावा.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment