Saturday 24 June 2017

शाळा उरल्या फक्त नावनोंदणीसाठी

शाळा उरल्या फक्त नावनोंदणीसाठी

नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. जे विद्यार्थी या परीक्षेत लक्षणीय यश मिळविले आहे त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करणे गरजेचे आहे कारण त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना आज मिळाले असे म्हणायला काही हरकत नाही. आई वडिलांचे जे स्वप्न होते ते सुध्दा त्यांनी सत्यात उतरविले त्यामुळे ते ही कृतार्थ झाले असतील यात शंकाच नाही. प्राथमिक वर्गापासून पालक आणि विद्यार्थी यांनी घेतलेली मेहनत आणि कष्ट याचे आजच्या निकालानंतर चीज झाले आहे.  मात्र एक बाब दरवर्षी मनाला खटकत असते, ते म्हणजे मेहनत एकाची आणि श्रेय मात्र दुसरेच घेत असतात असे का होते ? निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्र बातम्या ऐवजी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीने भरून जातात. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना क्लासेसचे संचालक अभिनंदन करतानाचे फोटो घेतात आणि त्याद्वारे पुढील मुलांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरात करतात. वास्तविक पाहता कोचिंग क्लास घेणारे विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात फीस घेतात तर मग पालकानी त्यांना फुकटामध्ये जाहिरात करण्याची परवानगी तरी का द्यावे ? याचा कोणी पालक विचार करीत नाही. खरोखर क्लासेसवाले जर फुकटामध्ये शिकवण दिली असेल तर त्यांना आपला फोटो देऊन जाहिरात करू द्यायला काही हरकत नाही. मात्र ज्यानी हजारो रुपये घेऊन आपल्या मुलाला शिकविले असेल तर त्यांना फुकटात असे जाहिरात करण्याची पालकानी परवानगी देऊ नये कारण याचा त्यांना परत फायदा होणार असतो. म्हणून त्याचा फायदा आपल्याला देखील होणे गरजेचे आहे असे वाटत नाही काय ?
हे झाले कोचिंगच्या बाबतीत पण शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयाकडून कोठे जाहिरात दिसते का ? कोचिंग क्लासमधून झळकलेले विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या शाळेचे किंवा महाविद्यालयाचे विद्यार्थी असतीलच ना ! पण ते याबाबतीत कसल्याच प्रकारची जाहिरात करताना दिसून येत नाहीत. कारण मुलांच्या या यशात त्यांचा काहीच वाटा नसेल काय ? शाळा, विद्यालय आज फक्त प्रमाणपत्रासाठी शिल्लक राहिले आहेत की काय अशी ही शंका कधी कधी राहून राहून मनात येत असते. कोचिंग क्लासवाले सर्व विषय आणि सर्व काही मुलांना शिकवित असतील तर शाळा आणि विद्यालयाचे काम उरले ते काय ? कोचिंग क्लास संचालकाना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देता येत नाहीत तर ह्या शाळा आणि विद्यालय बंदच पडले असते. कोचिंग क्लासमुळे शाळेतील शिक्षकांना खुप आराम मिळत आहे. कारण शेवटी निकाल शाळेचा वाढत आहे. गुरुजींनी कसल्याही प्रकारची मेहनत न घेता त्यांच्या विषयाचा निकाल 80 टक्केच्या वर लागत आहे. यामुळे शाळेतील शिक्षकांना आत्ता वर्गावर फक्त शिकविल्यासारखे करायचे आहे. पालक सुद्धा तक्रार करणार नाहीत कारण त्यांच्या मुलाना सर्व काही येते तर मग शिक्षक शिकवित नाही असे ते म्हणूच शकत नाही. तेरी भी चुप मेरी भी चुप असा काहीसा प्रकार घडत आहे. आत्ता शाळा ह्या फक्त नावनोंदणीसाठी उरल्या आहेत, असे वाटते. मुलांचे नाव कोणत्या तरी शाळेत टाकायचे आणि शहरात क्लास करीत बसायचे असा प्रकार ही आज बघायला मिळत आहे. या सर्व प्रकारात गरीब पालकांच्या मुलांचे खुप हाल होत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे ती मुले खाजगी कोचिंग क्लास लावू शकत नाहीत आणि वर्गात शिक्षक तेवढे मन लावून शिकवित नाहीत. काही तरी थातुर मातुर बोलून वेळ मारुन नेतात. याचा सर्वात जास्त त्रास अर्थात या गरीब मुलांना होतो. याचा एक अर्थ असा ही निघतो की आजचे शिक्षण गरीबासाठी आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. त्यामुळे गरीबांची मुले जे की मागेच राहत आहेत. यावर काय उपाय करता येईल याची चर्चा होणे आवश्यक आहे. इकडे शाळेत एका वर्गातल्या एका तुकडीत किती विद्यार्थी असावेत हे प्रशासन पाहत असते. तसे एका कोचिंग क्लासच्या वर्गात किती विद्यार्थी असावेत याचा काही नेम नाही. त्यावर कोणाचेच बंधन नाही. हे कुठे तरी बदल व्ह्ययला हवे. राज्यात बेरोजगार मुले भरपूर आहेत तेंव्हा सर्वाना यात संधी मिळायला हवी. एकाच कोचिंगमध्ये मेंढरं भरल्यासारखे विद्यार्थी बसविले जातात असे चित्र बघायला मिळते. पालकाकडून कोचिंगच्या नावाखाली भरपूर पैसा उकळला जातो. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट केली जाते. शहरात जिकडे पहावे तिकडे ह्या कोचिंग क्लास जाहिरातीचे फ्लेक्स बैनर बघायला मिळतात. यावरून एकच निष्कर्ष निघतो की आजच्या शाळा ह्या फक्त नावनोंदणी साठी उरल्या आहेत. भविष्यात असेच चालू राहिले तर शाळा आणि विद्यालयाला खुप धोका असू शकतो. त्यामुळे वेळीच सावध होणे अत्यावश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयानी देखील आपल्या शाळेतील यशस्वी मुलांची जाहिरात करणे आवश्यक आहे असे वाटते.

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...