Saturday 24 June 2017

*पावसाळ्यात शिक्षकांची परीक्षा*

*पावसाळ्यात शिक्षकांची परीक्षा*

वादळ वारे आणि क्षणात जोराचा पाऊस यामुळे शाळेवरील टीन उडाले, 15 मिनीटा पूर्वी शाळा सुटल्याने शिक्षकांसह विद्यार्थी बालंबाल बचावले अश्या आशयाची एक बातमी वाचण्यात आली आणि काही काळ तरी अंगावर शहारे उभे राहिले. शाळेवर असलेले टीन वाऱ्यांने उडून गेले आणि पूर्ण शाळा उजाड झाली. होत्याचे नव्हते झाले. खरोखरच शाळा चालू असती आणि असा प्रकार जर घडला तर विद्यार्थी आणि शिक्षक अडचणीत येऊ शकले असते. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात मुख्याध्यापक आणि शिक्षकांची एक प्रकारे परीक्षाच असते असे म्हणणे चुकीचे वाटत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराची जशी काळजी घेतो आणि घराची डागडुजी करतो तशी शाळेची देखील आवश्यक नाही काय ? पालक आपले पाल्य सहा तासासाठी शिक्षकांच्या हवाली करतात. तेंव्हा त्यांच्या सुरक्षेची काळजी अर्थात शिक्षकांवर येऊन पडते यात शंका नाही. तसे तर शाळेच्या वेळात मुलांना काही जरी झाले तरी त्यास पूर्णतः शिक्षकच जबाबदार असतो असे सरळ सरळ बोलले जाते. शाळेतून घरी जाताना रस्त्यात ठोकर लागून जरी पडला तरी त्यास शिक्षकांस जबाबदार धरले जाते. त्यामुळे शिक्षकास प्रत्येक वेळी खुप जागरूकपणे वागावे लागते.
पावसाळ्याच्या दिवसात खास करून जेथे पक्की शालेय ईमारत नसेल तेथील शिक्षकांनी काही अपघात होऊ नये याची काळजी घेणे सर्वासाठी चांगले असते. ईमारत शाळा भरण्यायोग्य नसेल तर तात्काळ मुख्य कार्यालयास तसे कळविणे आवश्यक आहे. आपण वरिष्ठ कार्यलयास न कळविता त्या धोकादायक वर्ग खोलीत बसणे म्हणजे शेखचिल्लीच्या कामासारखी आपली गत होय. मुलांच्या जीवाशी खेळ न करता वरिष्ठानी देखील या संबंधित शाळेतील धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचे आदेश देऊन त्या ठिकाणी नविन खोली बांधकाम केल्यास सोईचे होते. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा 30-40 वर्षापूर्वीचे बांधकाम केलेले आहेत. त्यांचे आयुष्य देखील संपले आहेत असे ईमारत पाडणे आवश्यक आहे.
शाळेच्या जवळ नाला किंवा नदी असेल तर पुराचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवणे संयुक्तिक वाटते. जर पावसाचा जोर जास्त असेल आणि नदी किंवा नाल्यास पूर येण्याची शक्यता असल्यास कोणाची पर्वा न करता मुलांना शाळेतून लवकर सोडण्याची हिम्मत शिक्षकांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यास गावकरी विशेष करून साथ द्यावे. येथे सुद्धा शिक्षकांना दोषी ठरविले जाते आणि त्यांचा हकनाक बळी दिला जातो. शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत त्याठिकाणी मुलांना बसविणे धोक्याची असल्याची माहिती मुख्याध्यापक मंडळीकडून वरिष्ठ कार्यालयास कळविले जाते मात्र त्या कार्यलयाकडून कसल्याच प्रकारची हालचाल होत नाही ही वस्तूस्थिती आहे. शिक्षण विभाग किती मोठा आहे आणि त्या विभागात अभियंते कार्यरत नाहीत. त्यांना इतर विभागातील अभियंत्या वर अवलंबून रहावे लागते. जे आहेत ते फार कमी आहेत. त्यामुळे आज अनेक शाळेतील मुले धोकादायक वर्गखोलीत आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. अश्या ठिकाणी काही अपघात झाल्यास फक्त एकट्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांस जबाबदार न धरता सर्वाना दोषी धरावे. त्या शिवाय ही यंत्रणा या बाबी गंभीर्याने घेत नाहीत. दूसरी बाब शाळा लवकर सोडणे याविषयी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकाना नाही. वेळ आणि प्रसंग पाहून सुट्टी दिल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते यामुळे कधी कधी शिक्षक निर्णय घेऊ शकत नाही. अश्या बाबीची स्पष्टता अधिकारी लोकांनी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना दिली तर ते आत्मविश्वासाने काम करू शकतात. पावसाळ्याच्या दिवसात शाळेत काही विपरीत प्रसंग घडू नये आणि काही झाल्यास त्यावरील सर्व उपाययोजनाची तयारी सर्व शाळा प्रमुखानी करून घेणे आवश्यक आहे असे वाटते. जसे की जवळपास असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फोन क्रमांक, एखाद्या खाजगी वाहन चालकांचा फोन क्रमांक, शाळेच्या शेजारील व्यक्तीशी चांगली ओळख आणि त्याचा ही फोन क्रमांक, पावसाळ्याच्या दिवसात विंचु, कीडे, साप खोलीत निघण्याची शक्यता ओळखून परिसरातील सर्पमित्र असलेल्या व्यक्तीचा क्रमांक आपल्या दप्तरी असणे केव्हाही योग्य राहते. शाळेत आलेली सर्व मुले आपली लेकरे आहेत ही भावना मनात ठेवून शिक्षकांना कार्य करावे लागते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...