Monday, 30 November 2015

** . .  मुझे पीने का शौक नहीँ . . **
केरळ पाठोपाठ बिहार राज्यात दारूबंदी होत आहे आणि महाराष्ट्रात मात्र तसे होऊ शकत नाही असे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे दारूप्रेमी लोकांना हायसे वाटले असेल यात शंका नाही. आज शासनाला या दारू विक्री वर कोट्यावधी रूपयाचा महसूल मिळतो ज्यावर सरकार आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळत आहे. सरकार समोर आज भरपूर प्रश्न तोंड वासुन उभे आहेत आणि सर्व समस्याची सोडवणूक अर्थातच पैश्यानेच करावी लागते. सगळ्या प्रकारची सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. वास्तविक पाहता बंदी करुच नये. कोणत्याही गोष्टीवर बंदी टाकली की जनता त्याच गोष्टी वापरण्यावर जास्त भर टाकतात. आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे जेथे मनाई किंवा बंदी असते नेमके त्याच ठिकाणी घाई करतात. गेल्या दोन वर्षापासून गुटखा विक्री वर बंदी टाकण्यात आली पण खरोखरच गुटखा विक्री बंद आहे का ? तर नाही उलट फार मोठ्या प्रमाणावर या गुटख्याची तस्करी चालू आहे. या बंदीमुळे काही लोकांची चांदी होत आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विक्री करणाऱ्या लोकांना होतो. असंच काही या दारूबंदी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा एक वर्षापूर्वी  महाराष्ट्र लगतच्या आंध्रप्रदेश सरकारने दारूवर बंदी आणली होती तेव्हा सीमावर्ती भागात दारूचा महापूर पसरला होता. जागोजागी परमीट रूम उघडण्यात आले होते. बऱ्याच लोकांची चांदी झाली या बंदीमुळे मात्र दारू पिणे आवश्यक असलेल्या लोकांचे  खूपच हाल झाले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. दारू बंदी करण्याऐवजी त्यांची विक्री आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास याचे चांगले परिणाम बघायला मिळतील
जसे की दारू विक्री च्या वेळेचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष ठेवावे. दारू विक्री ज्या दिवशी बंद असते त्यादिवशी विशेष पथक ठेवण्यात यावे. सर्व प्रकारच्या दारूच्या किमतींचे फलक दुकानात  दर्शनी भागावर लावण्यात यावे आणि ज्या व्यक्ती जवळ दारू पिण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीलाच दारू विक्री करण्यात यावी. परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री होत असेल तर त्या दुकानांस तत्काळ सील ठोकण्यात यावे. प्रत्येक नागरिक ज्यांना दारू पिण्याची हौस आहे त्यांनी परवाना घेणे बंधनकारक केल्यास या दारू चे सध्या जे दुष्परिणाम दिसत आहेत ते नक्कीच कमी होतील. आजची परिस्थिती अशी आहे की दारू विक्री वर कोणाचे बंधन नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीवर सुध्दा नाही.  दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्या व्यक्तींना एकदा तुरुंगवास भोगायला लावले की अश्या लोकांची संख्या आपोआप कमी होते. दारू पिऊन घरात गोंधळ घालणे, कुटुंबातील सदस्याना मारझोड करणे, रस्त्याने मोठ्याने ओरडत फिरणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यपूर्वक घेतल्यास या दारूचा त्रास नक्कीच कमी होतो. शासनाने दारूविक्री बंदी करण्यापेक्षा यावर कडक अंमलबजावणी केल्यास जनता सुखात राहू शकेल अन्यथा दारू बंदी करून ही त्याचा काही फायदा होणार नाही.
मुझे पीने का शौक नहीँ, पिता हूँ गम भूलाने को चित्रपटातील या गीताप्रमाणे बऱ्याच लोकांची अवस्था असते. दारू पिल्यामुळे थोडीशी झिंग येते आणि काही काळासाठी तो वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. यामूळे सर्व दुःख, वेदना आणि त्रास विस्मृतीत जाते मात्र कायमचे नष्ट होत नाही. जेंव्हा नशा संपते आणि माणूस पूर्व पदावर येतो त्यावेळी पुन्हा तोच त्रास जाणवतो आणि त्यासाठी परत दारूची मदत घेतली जाते. काही लोक आनंदात दारू पितात. असे करता करता दारू कधी त्याच्या घरात प्रवेश केला हे त्याला देखील समजत नाही. काही लोक डॉक्टर लोकांचा हवाला देऊन म्हणतात की  दारू शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. परंतु काही मर्यादेत कदाचित ते शरीरासाठी आवश्यक आणि चांगला घटक असेल ही. आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. आज त्याचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत. जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जे रॅली काढली जाते त्यात नाचणारे बहुतांश जण दारुने झिंगलेले असतात. त्यांना त्या कार्यक्रमाशी काही देणे-घेणे नसते. यामूळे कित्येक लोकांच्या रोजच्या राहणीमानावर परिणाम पडतो, याचे जरासुध्दा भान ठेवत नाहीत.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकांतून सुधाकर चे चित्र समाजासमोर खूपच चांगल्या पध्दतीने मांडले होते त्याचा किती परिणाम झाला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. दारूमुळे आज कित्येक संसार उघड्यावर आलेली आहेत. काही लोकांना दारू पिऊन गाडी चालविण्याची सवय आहे. मात्र दारू पिऊन गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. रोज सरासरी दोन तरी अपघात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात आणि चार - पाच जिवांना हकनाक मुकावे लागते. या अपघातात मरण पावलेल्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते. त्याच्या कुटुंबातील सदस्याचे खूपच हाल होतात. संपूर्ण कुटुंबच भेदरलेले आणि विस्कळीत असते.
काल शाळेत का आला नाहीस ? या प्रश्नाचे उत्तर कधी कधी शाळेतील चिमुकल्या मुलांच्या तोंडून ऐकण्यात आलं की " काल माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं आणि शिव्या दिलं म्हणून माझ्या आईसोबत मी गावी गेलो होतो. " तेवढ्यात बाजूची पोरं जोरात ओरडून सांगतात " सर याचे बाबा रोज दारू पिऊन घरात भांडण करतात आणि ह्याच्या आई सोबत ह्याला सुध्दा मारतात " तेंव्हा त्या मुलाचा चेहरा उदास आणि काहीसा गडबडलेल्या अवस्थेत असतो. शाळेतून त्याच्यावर खूप काही चांगले संस्कार होत असतील, तो शाळेत कदाचित हुशार ही असेल परंतु कुटुंबाची वाताहत त्याला त्या असंस्कृत वातावरणात परफटत घेऊन जाते. अश्या प्रकारांवर कुठे तरी आळा बसायला हवे
दारूचे दुष्परिणाम सांगून लोकांवर काही फरक पडत नाही. शंभरातून एखादा व्यक्तीच हे समजून घेवू शकतो. बाकीच्या लोकांना कायद्याच्या भाषेतूनच सांगावे लागते. देशात शांतता व सुव्यवस्था रहावी यांसाठी कायद्याची निर्मीती आहे म्हणून त्याचा योग्य वापर होणे हे पुढील काळाची खरी गरज आहे. आज समाजात एक चांगला संदेश पाठविले तर त्याचे चित्रे पुढील काळात नक्कीच चांगले पहायला मिळेल. तेंव्हा आपण एक जागरूक नागरिक असाल तर याविषयी नक्की लढा उभारू या.
                            -  नागोराव सा. येवतीकर
                                मु. येवती ता. धर्माबाद
                                9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...