Sunday 29 November 2015

हसा आणि हसवा



** . .  हसा आणि हसवा . . **

माणसाचे जीवन निरोगी राखायचे असेल तर जीवनात हास्याला मोलाचे स्थान आहे. गंभीर चेहऱ्याचा आणि कधीच न हसणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुध्दा मानसिकरित्या आजारी पडते. तर विनोदी हसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीला सुध्दा थोडा वेळ का होईना बरे वाटते. राजेश खन्ना अभिनीत आनंद चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की, खरोखरच आपल्या जीवनात हास्य राहिले नसते तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकलो नसतो.  हसण्यामुळे मनावरचा ताण क्षणभर नाहीसा होतो आणि मनाला, मेंदूला ताजेतवाने वाटते अन् मोठ्या जोमाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेता येते.
कोणतेही काम आत्मिक आनंदाने केले नाही तर त्या केलेल्या कामात काही रुची, चव राहत नाही. मग ते स्वयंपाक असो की, घरकाम असो वा कार्यालयीन काम. विनोदाच्या चार ओळीच  दिवसभरातील शीण दूर करतात. समर्थ रामदास स्वामी " टवाळा आवडे विनोद " असे म्हणतात. कारण आज आपण आत्मिक पध्दतीने न हसता इतरांच्या फजितीवर किंवा त्यांची फसवणूक झाल्यावर हसतो. वास्तविक पाहता असे हसणे क्षणिक असावे. आपल्या हसण्याने इतरांना त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून विनोद करणे केंव्हाही चांगले. विनोदात शब्द हे खूप मोठे कार्य करतात. शाब्दिक कोट्यावरून भरपूर विनोद तयार केले जातात आणि कधी कधी सहजच विनोद तयार होतात. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे शब्द हे शस्त्र आहेत जरा जपून वापरा. शब्दाचे घाव इतर घावापेक्षा खोल असतात. त्यामूळे योग्य शब्दाचा योग्य वापर करून विनोद निर्माण करणे आपल्यासाठी आणि समाजांसाठी सुध्दा चांगले असते.  जीवनात हसण्याचे  प्रसंग बहुतेक वेळा येतात. साध्या साध्या घटनेतून आपण विनोद निर्माण करीत राहिलो तर कुटुंबातील वातावरण हसरे व निकोप राहील. सब टी व्ही वरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रत्येक कुटुंबातील लहान मोठ्या सर्व प्रकारच्या प्रसंगाना विनोदबुध्दीने संकटाना कसे तोंड द्यायचे याचे नमुनेदार प्रसंग दाखवून सर्वांना नेहमी खळखळून हसविण्याचे काम करीत असते. आपण ही त्या पात्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न kका करू नये ! 
आचार्य अत्रे यांना विनोदाचा बादशहा असे म्हणतात त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला विनोदबुध्दीने तोंड दिले चार्ली चप्लीन या जगप्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण जगाला हसविले म्हणून आपण आज ही त्यांना विसरू शकत नाही चित्रपटात असे भरपूर कलाकार झाले आहेत ज्याना फक्त आपणाला हसविण्याचे काम केले म्हणून आपण त्यांना आठवण करतो. जसे की जुन्या काळातील  जॉनी वॉकर, असराणी, महेमुद, जगदीप, जॉनी लिव्हर, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे इत्यादी. आज टी व्ही वर श्रोत्यांना हसविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाची रेलचेल आहे. ज्याद्वारे आपण खूप हसू शकतो.  जगज्जेता सिकंदर सर्व जग जिंकला, पण रिकाम्या हाताने परतला. आपण सुध्दा असेच एके दिवशी रिकाम्या हाताने परत जाणार आहोत. तत्पूर्वी काही चांगले काम म्हणजे सर्वांना हसत खेळत ठेवण्याचे काम केलेले बरे ! आपण सर्वजण विदूषकाच्या गमती जमती पाहण्यासाठी सर्कशीला जातो सर्कस पाहुन आपण खूप हसतो त्याला पोट धरून हसणे असे म्हणतात हे कदाचित तिथे कळते. या हसण्यामुळे मनाला आनंद मिळतो. हसण्यामुळे आपल्या शरीरातील सर्वांगाचा व्यायाम होतो. त्यामूळे हसण्याचे जीवनात फारच महत्वाचे आहे. म्हणून कोठेही आणि कसेही हसता येत नाही. आपण मोठमोठ्याने हसलो तर आजूबाजूचे सर्वांचे लक्ष आपल्याकडे जाते त्यामुळे हसताना वेळ आणि जागा याचेही भान असू द्यावे. मुलींनी आणि महिलांनी फारच सांभाळून हसावे लागते. आपल्या हसण्यात सुध्दा सौंदर्य लपलेले असते. खूपच गंभीर वातावरणात थोडसं विनोद सुध्दा संपूर्ण वातावरण बदलवुन टाकू शकते. 
मोठ्या शहरात रोजची धावपळ आणि धकाधकीमुळे त्याचे हास्य लोप पावत आहे असे वाटते. त्यामूळे लॉफिंग क्लब उघडण्याची नामुश्की आली आहे. हसनारे बाळ आणि हसरे व्यक्ती आपणा सर्वांना हवेहवेसे वाटतात. पण नुसतेच लटके हसणे, तोंडावरच उसने हसू इतरांच्या मनाला समाधान देवू शकत नाही. त्यासाठी मनातून हसले तरच कोणीतरी आपणाला खरी दाद देतील.
हजरजवाबीपणा आणि चातुर्य विनोद अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तर भारतातील बादशहाच्या दरबारातील बिरबल आणि दक्षिण राज्यातील चतुर तेनालीराम यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. त्यातून आपणांस त्यांची विनोदबुध्दी स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर पुढील काळात मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव विनोदाच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतला जातो. त्यांचीच परंपरा पुढे पु ल देशपांडे यांनी चालविली. त्याचे साहित्य आज ही वाचकांना खळखळून हसविते. चला तर मग असेच काही मजेशीर विनोद वाचू या आणि दिवसाची सुरुवात हसण्याने करू या
**
बंड्याला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली, पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,

" बंड्या, रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
बंड्या म्हणाला ''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता. सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या...( हसा )
**
 बंड्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार
समजून घेतल्यावर बंड्याने चहा मागविण्यासाठी फोन
लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
बंड्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस ते ? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
बंड्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून
बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
बंड्या : वाचलो (बंड्याने फोन आदळला ) . . . . ( हसा )
**
बंड्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून बंड्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. 
बंड्या : काय ओळखू येत नाय. 

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

बंड्या : माझे पाय बघा आणि तुमीच सांगा. . . . . ( हसा )
**
बंड्या आरसा बघून विचार करायला लागला कि ह्याला कुठे तरी बघितलंय आणि थोड्यावेळाने जोराने ओरडला..
..
..
..
..
... ... ..
..
..
..
..
..
..
..
आयला.. हा तर परवा माझ्याबरोबर केसं कापत होता
( हसा ) 
***
बंड्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो..
( हसा )
***
 बंड्या पहिल्यांदाच आपल्या
सासरी गेला ! 
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू : जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
.
.
.
..
.
.
.
बंड्या : टाटा स्काय डिश 
( हसा )

-  नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...