Saturday 17 October 2015

** आधी वंदू तुज मोरया . . .



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा

मुलांनो,आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला तुम्ही तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...