Saturday 17 October 2015

** प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे ** 

* उपक्रमाची प्रस्तावना -
प्रश्न म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या  पडतात. प्रश्नाचे उत्तर देतांना अनेकांच्या नाकी नऊ येते. प्रश्नाचे उत्तर आठवत नसले की, मन कसे अस्वस्थ होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते, याबाबतीत जे जाणकार किंवा तज्ञ असतील अश्या काही मित्रांना या प्रश्नांच्या उत्तराबाबत चौकशी केली जाते. बहुतांश वेळा विद्यार्थ्याना पाठ समजलेला असतो मात्र प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळे लिहिता येत नाही ही समस्या प्राथमिक शाळेत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विद्यार्थ्याची ही समस्या कशी  सोडविता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर चटकन कसे सांगतील आणि लिहितिल यांसाठी मी सातव्या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्याना डोळ्यासमोर ठेवून सदरील उपक्रमाची निवड केली.

** उपक्रमाचे नाव : -  प्रश्न आमचे - उत्तर ही आमचे
या उपक्रमाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्याना या उपक्रमाची तोंडओळख द्यावी जेणेकरून विद्यार्थ्याना याची संपूर्ण माहिती होईल. उपक्रमाची ओळख झाली तरच उपक्रम यशस्वी होते अन्यथा हा उपक्रम फक्त हुशार विद्यार्थ्यानाच फायदेशीर ठरेल.
सर्वप्रथम विद्यार्थ्याना पाठाचे अध्यापन करावे आणि पाठातील छोट्या छोट्या प्रश्नांची ओळख द्यावी. प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्याच्या वहीत लिहिण्यास सांगावे. पाठ पूर्ण संपल्यावर सर्व प्रश्न एकत्र करावे आणि ते सर्व प्रश्न परत एकदा वर्गात सर्वाना विचारून उत्तराचा सराव करावा. यामूळे विद्यार्थ्याना प्रश्न आणि उत्तराची पूर्ण ओळख होईल. या प्रक्रियेनंतर मग या उपक्रमाला सुरुवात करावयाचे आहे.

*** उपक्रमाची कृती : -
पाठ शिकविणे पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रश्नांची आपण यादी केली किंवा विद्यार्थ्याना वहीत लिहिण्यासाठी सांगितलेले ते सर्व प्रश्न जाड कागदावर खालीलप्रमाणे लिहावे. यांसाठी लग्नपत्रिकाचा वापर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करता येईल. मराठीसाठी M, पाठ पहिला म्हणून 1 आणि या पाठातील प्रश्नांचे अनुक्रमांक 1 ते पुढील . . . . . असे वरच्या भागावर नमूद करून प्रश्न पट्टी तयार करावी. उदा.
---------------------------------------------------------------------
l M/1/1
l कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन कोण करीत असत ?                               
उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर
---------------------------------------------------------------------

त्या पाठातील एकूण अश्या प्रश्न पट्टी तयार कराव्यात.  विद्यार्थ्याना ते प्रश्न क्रमाक्रमाने विचारावेत.
* पहिल्यांदा पाच प्रश्न सलगपणे वर्गातील हुशार विद्यार्थ्यास विचारावे.
* हुशार, मध्यम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याना याच क्रमाने प्रश्न विचारावे.
* संपूर्ण वर्गात या पध्दतीने प्रश्न विचारले तर सर्व विद्यार्थ्याना त्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होऊन जातील.
* आत्ता आपण हा उपक्रम खेळाच्या स्वरूपात मुलांसमोर घेऊन जाण्यास तयार आहोत.
* एक डबा घ्यावा त्यावर दर्शनी भागावर  विषयाचे नाव " मराठी " असे लिहावे. त्यात सर्व प्रश्न पट्टी टाकाव्यात एक मुलगा आणि एक मुलगी या क्रमाने विद्यार्थ्याना समोर बोलाविले जाऊन त्याना प्रश्न पट्टी उचलण्यास सांगावे.
* सुरुवातीला ती प्रश्न पट्टीचे शिक्षक वाचन करतील आणि विद्यार्थ्याना उत्तरे सांगण्यास प्रोत्साहित करतील
* यात पुढे बदल करून जो विद्यार्थी प्रश्न पट्टी उचलण्यास समोर येईल तो वर्गातील सर्व विद्यार्थ्याना प्रश्न विचारेल.
* प्रश्नपट्टी वर उत्तर लिहिलेले असल्यामुळे समोर आलेल्या विद्यार्थ्याना उत्तर माहीत असेल. मुलांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली असेल तर हे उत्तर बरोबर आहे असे सांगून विद्यार्थी जागेवर बसतील.
* या क्रमाने संपूर्ण वर्गाला एक प्रश्न विचारण्यास संधी मिळते आणि विद्यार्थ्याना प्रश्न उत्तराचा सराव होऊन सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ होतात.
* प्रश्नांची उत्तरे सांगता आली की विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी आत्ता विद्यार्थ्याना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे.
* यांसाठी डब्यातुन शिक्षकांनी प्रश्नपट्टी उचलावी त्याचे वाचन करावे आणि मुलांना फक्त उत्तरे लिहिण्यास सांगावे.
* एका वेळी पाच प्रश्न देऊन त्याचे उत्तर विद्यार्थ्याना आपापसात वही बदलून तपासून घेण्याची सूचना द्यावी.
* त्या पाच प्रश्नांची उत्तरे परत एकदा शिक्षकांनी सांगावे.
* ज्या विद्यार्थ्याचे पाचही उत्तरे बरोबर आली त्या विद्यार्थ्याची वर्गात सर्वांसमक्ष अभिनंदन करावे.
* अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्याचे पाचपैकी एक जरी बरोबर आले असेल तरी त्यांचे अभिनंदन करावे आणि प्रोत्साहन द्यावे, शाबासकी द्यावी.
* यापुढील पायरी म्हणजे याच प्रश्नांवर आधारित 20 गुणांची सराव परीक्षा घेण्यात यावी आणि त्याना किती प्रश्न परीक्षेत आठवतात यांची चाचपणी करावी.
* शक्यतो हा उपक्रम दिवसाच्या शेवटच्या दोन तासिकेत घ्यावे. म्हणजे विद्यार्थ्याना मनोरंजनासोबत अभ्यास ही होईल.
* ज्या दिवशी विषय शिक्षक उपस्थित नसेल त्या दिवशी इतर शिक्षकाची त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाते.
* त्या शिक्षकांना प्रश्न पडतो की काय शिकवावे ?
* पण या उपक्रमाने त्यांचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. प्रश्न पट्टीवर प्रश्न आणि उत्तर लिहील्यामुळे कोणालाही हा उपक्रम अगदी सहजरित्या घेता येऊ शकेल.
* य उपक्रमाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याना पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे चटकन आठवण येतात आणि त्यांच्या आकलनशक्तित वाढ होते. प्रश्नांची उत्तरे आल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी सुध्दा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करतात
* या उपक्रमांत एकच उणीव किंवा त्रुटी दिसून येते ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना वेळ खूप लागतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असते.
* मात्र विद्यार्थ्याना या खेळात खूपच मजा येते. विद्यार्थी वारंवार हे उपक्रम घेण्याबाबत हट्ट करतात यावरून या उपक्रमाची सफलता नक्की दिसून येते.
*** प्रतिसाद . . . . . . . . .
आपण ही हा उपक्रम आपल्या शाळेत सुरू करावा आणि आपणांस काय वाटले ? विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा मिळाला ? विद्यार्थ्याची प्रगती झाली का ? किंवा या उपक्रमात काही बदल करावा असे आपणांस वाटत असेल तर आपले अभिप्राय नक्की कळवावे.

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड
nagorao26@gmail.com
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...