नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना “लोकहितवादी” या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अन्यायकारक प्रथा यांच्यावर कठोर टीका करून समाजजागृतीचे कार्य केले.
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुण्यात एका वतनदार घराण्यात जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते, तर घराण्यातील वतनामुळे 'देशमुख' हे नाव प्रचलित झाले. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. ते स्वभावाने प्रखर बुद्धिमान व चिकित्सक वृत्तीचे होते. समाजातील दोष दूर करून लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लिहिलेल्या 'शतपत्रां' द्वारे तत्कालीन भारतीय समाजातील जातिभेद, बालविवाह, बहुपत्नीत्व अशा अनिष्ट रूढींवर कठोर टीका केली. या पत्रांमुळे त्यांना 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात समाजात प्रचलित असलेल्या अनेक चुकीच्या समजुतींवर त्यांनी तर्कशुद्ध विचार मांडले. त्यामुळे काही लोकांनी त्यांचा विरोधही केला; परंतु त्यांनी आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही.
गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्यांच्या लेखनामुळे समाजात नवीन विचारांची जागृती झाली.
वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. पुढे त्यांनी न्यायाधीश म्हणूनही प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले.
त्यांनी पानिपतचा युद्ध, कलयुग, जातिभेद, लंकेचा इतिहास यांसारखी पुस्तके लिहिली. ते केवळ लेखक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते.
गोपाळ हरी देशमुख यांचे ९ ऑक्टोबर १८९२ रोजी निधन झाले. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील समाजसुधारकांवरही पडला. त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवली.
अशा या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील.
आज गोपाळ हरी देशमुख यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते.
दुसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या भाषेचे ज्ञान होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते
तिसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते.
चौथा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लेखन केले.
शेवटचा पाचवा प्रश्न - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
बरोबर उत्तर आहे - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक गोपाळ हरी देशमुख आहेत.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769