Saturday, 13 March 2021

14/03/2021


चित्रकाव्य - बोलका वृक्ष
थांबा काका थांबा काका
मी सांगतो ते जरा ऐका
असे कुऱ्हाड चालवून
माझं आयुष्य संपवू नका

मी देतो सर्वाना सावली
माझे महत्त्व समजून घ्या
कुणात अंतर नाही केली
माझे उपकार जाणून घ्या


फुलं देतो नि फळं देतो
पशु-पक्ष्यांना देतो आसरा
मी कधी काही मागलो नाही
रुसून धरलो नाही कोपरा

नेहमी येतो तुमच्या कामाला
विचार करा एकदा पुन्हा पुन्हा
माझ्याकडून त्रास नाही कोणाला
वृक्षतोडीचा करू नका गुन्हा

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Friday, 12 March 2021

13/03/2021

आज विचार सुद्धा करवत नाही
प्रेक्षकाविना कसा होईल सामना
घरीच सामन्याचा घ्यावा आनंद
कोरोनाची भीती आहे सर्वाना 

मैदानात कोण चिअर्स करतील 
आनंदात उड्या कोण मारतील
विनाप्रेक्षक खेळ कठीणच आहे
खेळाडूंना प्रोत्साहन कोण देतील

- नासा येवतीकर

कविता

नोकरी व कोरोना

नोकरीसाठी कित्येकजण
करतात जीवाचा आटापिटा
मुलांच्या परीक्षेच्या तयारीसाठी
आईबाप पोटाला देई चिमटा

परीक्षा डोळ्यासमोर ठेवून
मुलं रात्रंदिवस करती अभ्यास
पास होऊन नोकरी लागेल
सुखी जीवन जगण्याचा ध्यास

परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीने
सारे परीक्षार्थी झाले हैराण
केलेला अभ्यास वाया जाईल
पालकांसह मुले झाली परेशान

निवडणूका कार्यक्रम सोहळे
सर्व काही निर्विघ्न संपन्न झाले
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेस
कोरोना कसे क्रियाशील झाले

कोरोनाने सर्वानाच केले हतबल
आत्मनिर्भर देखील गळून पडले
कोणाची प्रगती रोकायची असेल
तर कोरोना कामी येऊ लागले

- नासा येवतीकर, धर्माबाद

तुझ्या आठवणीने बघ
वणवा लागलंय मनात
विसरण्याचा प्रयत्न केला
तरीही राहते स्मरणात

विसरून गेलीस कदाचित
माझ्यासंगे घालविलेला वेळ
आठवणीत झुरतो आहे
जीवनाचा नाही ताळमेळ

आनंदाचे दिवस संपले
नाही कोणी साथीदार
एकटा जीव सदाशिव
नाही मला घरदार

आजही तुझी प्रतीक्षा
वाट पाहतो आहे
येणार एक दिवस
मन सांगतो आहे

- नासा येवतीकर

Thursday, 11 March 2021

jeevan saar

जीवनाचे सार

आपले जीवन आहे क्षणभंगूर
त्यात असतो इतरांचाही वाटा
समाजप्रिय झालेला आहे माणूस
मग कसा जगू शकेल तो एकटा

मदत करावे सख्या जीवलगांना
कसलाही स्वार्थ न ठेवता मनात
मदत करण्याचा हेतू असावा स्वच्छ
कुठलेच गैरसमज नसावे परस्परांत

समजूतदार आपली माणसं नेहमी
सर्वच गोष्टी समजून घेत असतात
काहीजण समजून उमजून न घेता
बारीक त्याचे कीस पाडतात

नात्यांच्या धाग्यात इथे आहे मेख
गैरसमजुतीने स्वकीयांना दुखावतो
अविवेकीपणे बोलतो घालून पाडून
आपुलकी संपते मग दुरावा निर्माण होतो

हल्ली तर सर्व नाते पैशात अडकलेली
गरिबांच्या घराकडे कुणी पाहतही नाही
छोट्या छोट्या गोष्टीवरून मानापमान
मनात राग ठेवून अपमान करत राही

आजकाल कुंटुबातील प्रेम नि जिव्हाळा
सगळं काही विरळ होत चाललंय
हसत हसत बोलण्याची जुनी पद्धत
कुटुंबातून आता लुप्त होत चाललंय

किती दिवस जगणार नाही याची शाश्वती
सोबत काय घेऊन जाणार माहीत नाही
तरी प्रत्येकजण धावतो आहे पैश्यामागे
कोणावर कोणाचे कसलेही बंधन नाही

रोज एक दिवस संपतो आयुष्यातील
वाढदिवसागणिक आयुष्य संपत जाते
आपले वय वाढते तसे चिंताही वाढते
कुटुंबाची घराची काळजीने मन खंगत जाते

आयुष्य म्हणजे नुसते पळणे नाही
बांधून घ्यावी अनुभवाची शिदोरी
मिळवावे प्रेम, आदर नि सन्मान
आनंदच आनंद करू मग जगण्यावरी

जीवनात सुख दुःखाचे रंग हवेत
पाण्याच्या प्रवाहासारखे मुक्त जगावं
निराशेमध्ये असते लपलेली आशा
त्याच आशेच्या ऊर्जेची वाट बघावं

आपली माणसं असावी जवळ
दुःखात डोळ्यांत अश्रू घेऊन पाहणारी
जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होतांना
आनंदाच्या क्षणी डोळे भरून बघणारी

पैसा समृद्धी भरभराट झाली खूप
पण पाहायला नसतील माणसं आपली
त्याच्यासारखा दरिद्री तोच असेल
ज्याच्या नसेल कोणी आपला वाली

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

12/03/2021

चारोळी

दुसऱ्याच्या यशात ज्यांना 
स्वतःचा कमीपणा दिसतो 
तोच यशस्वी होईल 
जो असा विचार करतो

नकळत सारे घडत गेले
एकेक क्षण जुळत गेले
केली गोळा बेरीज सर्वांची
तेंव्हा फक्त आठवणी उरले 

आम्हांला माहीत ही नव्हतं
काय चीज असते हे प्रेम
एकवेळ भेट काय झाली 
जगण्याचा राहिला नाही नेम

आठवणीने भरून आहे
माझे हृदयाचे कपाट
कोणालाही नाही संधी
तुझाच असेल थाटमाट


संपली पहा महाशिवरात्री
आता वेध लागले होळीचे
आकर्षण निसर्गात असलेल्या
लाल पिवळ्या पळस फुलांचे


कविता

कोरोना

कोरोनाच्या विचाराने रात्रभर
त्याला झोप लागलीच नाही
नुसता खोकला लागला तरी
मन अस्वस्थ होऊन जाई

अनेक रोग आले गेले पण
कोण्या रोगाची नव्हती भीती
नुसतं कोरोनाचं नाव ऐकलं 
तरी धडधड करतंय छाती

आपले हात वारंवार धुवून
वैयक्तिक स्वछता पाळू या
तोंडाला स्वच्छ रुमाल बांधून
कोरोना रोग टाळू या

कोरोना व्हायरसने मृत्यूची
भीती मनातून काढून टाकू
आलेल्या संकटाला तोंड देत
निरोगी सुखदायी जीवन जगू

नासा येवतीकर

Friday, 26 February 2021

मराठी भाषा गौरव दिन


।।  मराठी भाषा दिवस ।।

मी वाचतो मराठी
मी जगतो मराठी
माझ्याच डोळ्यादेखत
संपताना पाहतो मराठी

मी हसतो मराठी
मी रडतो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
अश्रू गाळतो मराठी

मी चालतो मराठी
मी पळतो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
असहाय होतो मराठी

मी बोलतो मराठी
मी लिहितो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
अडखळतो मराठी

माझ्या नसानसात मराठी
माझ्या मनामनात मराठी
माझ्या डोळ्यादेखत
तरीही दुबळा ठरतो मराठी

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

।। मातृभाषा ।।

मला आवडते माझ्या
आईची बोली भाषा
कुठेच कठीण वाटत नाही
साधी सोपी असते मातृभाषा

घरात जे बोलली जाते
तीच समाजात बोलली जाते
नेहमी शब्द कानावर येती
बोलतांना सहज शब्द आठवते

मनातल्या कल्पना नि भाव
माझ्या भाषेत मांडता येते
पाठांतराची काय गरज
बोलले ते सर्व समजून जाते

दुसरी भाषा शिकायला
लागतात विशेष कष्ट
स्वभाषेतूनच शिकावं अन्यथा
 स्वतःची भाषा होते नष्ट

- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे

शाळेतील मुलांना दोन विषयाची खुप भीती वाटते. एक म्हणजे गणित आणि दुसरे म्हणजे इंग्रजी. पालकाना देखील या विषयाच्या बाबतीत काळजी लागलेली असते. कसे ही करून या विषयात आपली मुले प्रावीण्य व्हावेत म्हणून जीवाचा आटापिटा करताना पालक दिसून येतात. मुळात या विषयाची एकप्रकारे धसकीच घेतलेली असते. वास्तविक इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क व्हावा आणि त्यांचा संवाद व्हावा या उद्देश्याने याचा स्विकार केला गेला. तसे इंग्रजीने प्रत्येक देशात शिरकाव केलेला आहे. असे एक ही देश शोधून ही सापडणार नाही जेथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. भारतात सुध्दा इंग्रजी ही भाषा बोलली जाते. त्यास तृतीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मातृभाषेला प्रथम तर हिंदी भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत देशात कुठे गेल्यावर संवाद करण्याची समस्या येऊ नये यासाठी मातृभाषेनंतर हिंदी आणि इंग्रजी ही भाषा वापरली जाते. समाजात वावरत असताना बोलण्याच्या बाबतीत समस्या येऊ नये यासाठी भाषेचा वापर केला जातो. सांकेतिक खुणाच्या आधारावर संवादाची प्रक्रिया पूर्ण होणे कठिण आहे. याबाबीचा जर विचार केला तर आपण इंग्रजीला अवास्तव महत्त्व देत नाही काय ? किंवा नको तितकी काळजी करून मनात भीती निर्माण करून घेत नाही काय ? अशी शंका मनात निर्माण होते. आज राज्यातील प्राथमिक शिक्षणाकडे एक वार नजर फिरविली तर लक्षात येते की, आपली मातृभाषा मराठी आणि जेथे मराठीतून अध्यापन केले जाते अश्या शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना भविष्यात इंग्रजी चांगली यावी म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश करीत आहेत. 10-15 वर्षापूर्वी फक्त शहरापुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. खेड्यातील शेती काम करून आपले घर चालविणारे शेतकरी मंडळी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत. आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवावे असा प्रश्न आपल्या समोर पडला असेल आणि त्याच वेळी कुणी तरी सांगतो खुप हुशार आहे मुलगा टाक त्यास इंग्रजी शाळेत. दुसऱ्यांचे ऐकून आणि पाहून ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतात. दोन-तीन वर्षानंतर डोळे उघडतात, त्या शाळेची फी परवडत नाही किंवा मुलांना ते शिक्षण झेपत नाही आणि त्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी माध्यमात प्रवेश देतात. मात्र या परिस्थितीमध्ये मुलांची काय स्थिती होते याचा कोणी ही विचार करीत नाही. 
पण एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.
वास्तविक पाहता विषयाचे ज्ञान एकदा कळाले तर त्याला कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. म्हणजेच बुध्दीचा विकास हे खुप महत्वाचे आहे आणि ते मातृभाषेतून शक्य आहे. इंग्रजी भाषेतुन शिक्षण म्हणजे सर्कसमधील रिंगमास्टर ज्याप्रकारे प्राण्याला धडे शिकवितो अगदी त्याच प्रकारे ही मुले वागतात. स्वतःचे डोके किंवा कल्पकता याचा वापर करीत नाहीत. ही मुले हुशार असतीलही परंतु जी नवनिर्मिती करायला हवी ती करत नाहीत. म्हणजे त्यांचे ज्ञान फक्त परिक्षेपुरते मर्यादित असते. कोणत्या भागाला किती गुण आहेत ? यावर त्यांचा अभ्यास चालत असतो तेंव्हा भविष्यात ही मुले यशस्वी होतील असे वाटते काय ? संस्कार नावाची वस्तू शालेय शिक्षणातून मिळावी अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे. पूर्वीच्या शिक्षणातून तसे संस्कार जाणीवपूर्वक होत असत मग आज समाजातील नैतिकता रसातळाला का गेली आहे ? आजची संस्कृती कुठे चालली आहे ? याचे उत्तर कोठे मिळेल. अर्थातच आजच्या शिक्षण पध्दतीकडे पाहिल्यावर तेथेच याचे उत्तर मिळते. पूर्वीसारखे शिक्षण आणि पूर्वीसारख्या पध्दती आज आस्तित्वात नाहीत. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे ही एक कारण असू शकते. मातृभाषेतुन शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे तरी त्यांच्यावर संस्कार केलेले दिसून येतील मात्र इंग्रजी भाषेत शिकणारी मुले त्यांना संस्कृतीची ओळख होत नाही. त्यांच्यावर वेगळ्याप्रकारचे संस्कार टाकले जातात हे ही एक महत्वाची बाब आहे. परंतु आजपर्यंत या बाबीकडे कुणी गंभीर्याने पाहिले नाही. जे आपल्या मराठी शाळेत चालते ते त्या शाळेत चालत नाही. अश्या फार कमी शाळा आहेत जेथे आपल्या संस्कृती नुसार शिक्षण दिल्या जाते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणची भाषा आहे हे मान्य परंतु त्या अगोदर आपल्या समाजात आपल्या लोकांशी जो व्यवहार करायचे आहे ते आपल्याच भाषेत करावे लागेल हे मात्र खरे आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलाने घरात काही प्रश्न विचारले तर पालकांना त्याचे उत्तर देता येत नाही. उद्या तुझ्या गुरुजींना विचार असे पालकांचे उत्तर असते. त्यासाठी इंग्रजी भाषेचे जे अवास्तव महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्याची भीती देखील त्याविषयी पालकानी जागरूक होऊन विचार करणे आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याविषयी अग्रक्रमाने विचार करणे देखील योग्य आहे, असे वाटते. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिवस त्यानिमित्ताने प्रत्येक पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवू या की, आपल्या मुलांना निदान प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून द्या. 

- नागोराव सा. येवतीकर, 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत विषय शिक्षक आहेत )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*।। आम्ही मराठी ।।*

आम्ही ऐकतो मराठी
आम्ही बोलतो मराठी
आम्ही वाचतो मराठी
आम्ही लिहितो मराठी

मराठी आमची मातृभाषा
मराठी आमची बोलीभाषा
मराठी आमची ज्ञानभाषा
मराठी आमची राजभाषा

मराठी आहे आमची शान
मराठीचा जगात मान
मराठीचा आम्हां अभिमान
मराठी हेच आमचे स्वाभिमान

तुकारामांची गाथा मराठी
एकनाथांची भारुडे मराठी
बहिणाबाईची कवने मराठी
शाहिरांचा पोवाडा मराठी

मनामनात दिसे मराठी
घराघरांत बोले मराठी
क्षणाक्षणात भेटे मराठी
प्रत्येकांच्या हृदयात मराठी

आम्ही मराठी तुम्ही मराठी
बोलणारे आम्ही सारे मराठी

- नासा येवतीकर, ९४२३६२५७६९
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रासंगिक लेख

मराठीचा विकास आपल्याच हाती

मराठी ही महाराष्‍ट्राची राजभाषा आहे. मात्र आपल्‍याच राज्‍यात आपण आपल्‍या मराठी भाषेला पदोपदी ठार करीत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करीत असतो, त्‍यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्‍यांना भाषेच्या प्रत्‍येक शब्‍दांत असलेल्या  सौंदर्य आणि सामर्थ्‍यांची जाणीव नसते, त्‍यांना वाक्‍यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते. अशा लोकांच्‍या भाषेमूळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. आज प्रत्‍येकजण आपल्‍या पाल्‍यांना मराठीच्‍या शाळेत शिकविण्‍या ऐवजी इंग्रजी मिशनरीच्‍या शाळेत शिकविण्‍याकडे जास्‍त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणा-यांची संख्‍या  सर्वात जास्‍त आहे.  इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या  स्‍पधेत टिकू शकतो. माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्‍हणून त्‍याला K.G. पासून इंग्रजीचे धडे शिकविण्‍यास प्रारंभ केल्‍या जाते. सध्‍या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे. की, प्राथमिक  शिक्षण  इंग्रजी माध्‍यमातून झाले की त्‍याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही.परंतु वास्‍तव काही अलट आहे.मातृ भाषेतून शिक्षण घेतल्‍यामूळे मुलांची संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होतात. त्‍यास घोकंपटटी किंवा वारंवार अभ्‍यास करावे लागत नाही. विषयाची  संकल्‍पना मुलांना कळाली तर ते अगदी बिनधास्‍त पणे व्‍यक्‍त करू शकतात आणि त्‍यासाठी मातृभाषेतील  टापटीपपणा आणि होमवर्क पूर्ण करण्‍याची पध्‍दत एवढे दोनच बाबी कोटेकोरपणे पाळले जातात. शिकविणारी तज्ञमंडळी उपलब्‍ध नसल्‍यामूळे थातूर मातूर शिकविले जाते याकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्‍या जाते. पालकांकडून भरपूर प्रमाणात फिस च्‍या स्‍वरूपात पैसा उकळणे आणि त्‍या बदल्‍यात मात्र त्‍या मुलांना काहीच मिळत नाही. हे वास्‍तव चित्र आहे. याउलट एखादी इंग्रजी शाळा असू  शकते जे की पालक व विद्यार्थ्‍यांच्‍या सर्व आशा  पूर्ण करू शकेल. मात्र  याबाबीमूळे मुलांवर अपण अन्‍याय करीत नाही का ? याबाबीचा विचार कोणताही पालक करतांना आढळून येत नाही. या बाबतीत समाजातील काही शिक्षणतंज्ञ किंवा जाणकार लोकांनी पालकांचे योग्य मार्गदर्शन करून त्‍यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्‍यमात शिकणा-या मराठी मुलाची भाषा जर ऐकायला मिळाली तर त्‍याची फारच कीव येते कारण त्‍यांना मराठी  शब्‍दांचे अर्थ नीट  कळत नाहीच शिवाय अक्षरांचे लेखन सुध्‍दा नियमानुसार करीत नाहीत. 
पालक वर्ग नेहमी शेजा-यांशीच तुलना करत असतात. संत तुकाराम महाराज यांनी शेजा-यावर प्रेम करा असा संदेश दिला आहे. मात्र ही मंडळी शेजा-यांशी नेहमी तुलनात्‍मक दृष्‍टीने पाहतात. शेजा-याचा मुलगा इंग्रजी माध्‍यमात शिकत असेल आणि रेन रेन कम अगेन म्‍हणत असेल तर आपले मूल सुध्‍दा असे गीत म्‍हणावे असे त्‍यांना वाटते परंतू त्‍या इंग्रजीच्‍या मुलांना रेन  रेन कम अगेन चा अर्थ कळत नाही तो फक्‍त यांत्रिक पध्‍दतीने गात असतो परंतू आपला मराठी शाळेतील मुलगा ‘ येरे येरे पावसा ’म्‍हणताना त्‍याच्‍या चेह-यावरचे भाव स्‍पष्‍ट दिसतात. कारण त्‍याचा अर्थ त्‍याला कळालेला असतो. लहान वयात जी भावना, संकल्‍पना स्‍पष्‍ट होते ती आयूष्‍यभर सोबत राहते तसेच संकल्‍पना समजून घेण्‍यासाठी मातृभाषा कधीच ओझे वाटत नाही इंग्रजी सारखी. इकडे मराठी माध्‍यमाच्‍या शाळांतील मुलांची स्थिती खुपच चांगली आहे, असेही छाती ठोकून सांगता येत नाही. कारण येथील मुलांची स्थिती सुध्‍दा मराठीच्‍या बाबतीत फारच वाईट आहे. मराठी भाषेला नीट समजून न घेता दरवर्षी एका नवीन वर्गाची पायरी चढत शाळेच्‍या बाहेर पडलेला जेव्‍हा समाजात व्‍यवहार करण्‍यास प्रारंभ करतो निरक्षर व्‍यक्‍तीपेक्षा साक्षर व्‍यक्‍तीच मराठी भाषेला  पदोपदी मारत असतांना आढळून येतो. 
मात्र (मातृ) देवो भव, कार अपघातांत त्‍यांचा  अंत्‍य (अंत) झाला, पाणी  हे द्रव्‍य (द्रव) आहे. आज शिक्षक दीन (दिन) आहे, सचिनचा कर्म (क्रम) सौरभ नंतर येतो इत्‍यादी  वाक्‍याचे  बारीक निरीक्षण केल्‍यास कंसातील शब्‍दामुळे वाक्‍याचा अर्थ स्‍पष्‍ट होतो मात्र भाषेचे ज्ञान नसलेले  किंवा  अर्धवट ज्ञानी मंडळी एक प्रकारे भाषेचे चिरफाड करून वाक्‍याचे अनर्थ करून टाकतात. हे म्‍हणजे कसे आहे, गाडी  नीट चालवता येत नसलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या हातात गाडी देऊन अपघात करून घेण्‍यासारखे नाही का ? ज्‍याप्रकारे गाडी चालवण्‍यासाठी परवानाची गरज भासते अगदी त्‍याच प्रकारे भाषेची मांडणी करणा-या व्‍यक्‍तीला विशेष ज्ञान असल्‍याचा परवाना आवश्‍यक नाही काय ? 
लहानपणा पासून मुलांच्‍या बोलण्‍याकडे विशेष लक्ष देवून त्‍यांच्‍यात वारंवार सुधारणा घडवून आणण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक पालकांनी घेणे आवश्‍यक आहे. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतांना मुलांना मराठीच्‍या जास्‍तीत जास्‍त शब्‍दाची तोंड ओळख कशी होईल ? याचे नियोजन प्रत्‍येक भाषा विषय शिकविणा-या शिक्षकांनी केले पाहिजे. शब्‍द पाहिले, ऐकले आणि लिहिले तरच त्‍याच्या कायम स्‍मरणात राहील. मराठी शब्‍दांच्‍या बाबतीत अगदी प्राथमिक शिक्षणाच्‍या पाया पासून श्रवण भाषण,वाचन आणि लेखन या (LSRW) चार टप्‍यानुसार चालते आणि शिक्षकांचे सुक्षम निरीक्षण असेल तर मुलांमध्‍ये भाषेचे फार कमी चुका होतील. परंतु विशेष करून येथेच दुर्लक्ष केल्‍या जाते आणि भविष्‍यात याच मुलांच्‍या हातून भाषेची चिरफाड होतांना दिसून येते. मराठी भाषा फार सोपी वाटत असेल तरी  या विषयात अनुत्‍तीर्ण होणा-यांची संख्‍या  फार मोठी आहे. कारण स्‍वत:च्या भाषेत या मुलांना वर्णन करता येत नाही. त्‍यांना वेळेवर पर्यायी अर्थ पूर्ण शब्द आठवत नाहीत किंवा खरा शब्‍द  कसा आहे? हे ही लक्षात येत नाही. भाषेनुसार सन 1960 साली मराठी राज्‍याची निर्मिती झाली. परंतू गेल्‍या पन्‍नास वर्षात मराठीचा व्‍हावा तेवढा विकास झाला नाही. कारण या समस्‍येकडे कुणीच गांर्भीर्याने लक्ष देत नाहीत. यासाठी समाजातील प्रत्‍येक घटक तेवढाच जबाबदार आहे. त्‍यामुळे मराठीची प्रगती व्‍हावी, त्‍याचा विकास व्‍हावा,त्‍याची चीरफाड होवू नये असे वाटत असले तर प्रत्‍येकाने आज जागे होणे अत्‍यंत गरजेचे आहे. शाळेतून विशेष करून मराठी भाषा शिकविणा-या शिक्षकांनी याविषयी गांभीर्याने दक्षता घेवून मुलांच्‍या भाषिक कौशल्‍याचा विकास करावा. इयत्‍ता पहिली व दुसरीमध्‍ये अनुलेखन ,तिसरी व चौथ्‍या वर्गात शुध्‍दलेखन आणि पाचवी ते आठव्‍या वर्गापर्यंत प्रत्‍येक  विद्यार्थ्‍यांना शुध्‍द लेखन योग्‍य प्रकारे करता यावे असा किमान उद्देश डोळ्या समोर ठेवून कार्य केल्‍यास मुलांत वारंवार होणा-या चूका नक्‍कीच टाळता येतात. बहुतांश वेळा मुलांची श्रवण प्रक्रिया योग्‍य प्रकारे विकसीत न झाल्‍यामुळे समान आवाजाच्‍या शब्‍दात  मुले घोळ करतात जसे खाक-काक, मखर–मकर , खेळ-केळ ,भार–बार, घार–गार , झरा–जरा ,झाग–जाग,धार–दार ,भाई–बाई , साफ–साप,फळ-पळ, संग-संत,बंध-बंद, फर–पर ,खल-कल, भाग–बाग, साथ–सात , पथ–पत,कोश-कोष , इत्‍यादी शब्‍द ज्‍यांची ध्वनी जवळपास सारखी वाटते आणि शब्‍दाचा अर्थ बदलतो. यानंरत मराठीत असेही काही शब्‍द आहेत ज्‍यांच्‍या -हस्‍व व दीर्घ इकार व उकार मुळे वाक्‍याचा अर्थच बदलून जातो. जसे की, आदी–आदि, आयत- आयात, आर्त–आर्द, स्त्री-इस्‍त्री, कोश–कोष, दिन–दीन, नियत-नीयत, केशर–केसर, पास–पाश, पिक–पीक, बहु–बहू, लक्ष-लक्ष्‍य, विष–वीस ,चालक-चालाक, इ.  अशा बारी‍क सारीक बाबींकडे विषय शिक्षकांनी लक्ष दिल्‍यास  मुलांच्‍या मराठी लेखनात  नक्‍कीच सुधारणा होवू शकेल. 
मराठी भाषेचा विकास व्‍हावा व प्रगती व्‍हावी असे मनातून वाटत असले तर प्रत्‍येकांनी विशेष प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. शालेय वयात इंग्रजी शब्‍दार्थ पाठांतर करीत असल्‍याचे आपणा सर्वांना आजही आठवते. मात्र मराठी शब्‍दार्थ पाठांतर आपण  करतो कां? अर्थातच याचे उत्‍तर नाही असेच येते. इंग्रजी शब्‍दाची जास्‍तीत जास्‍त ओळख व्‍हावी म्‍हणून ऑक्‍सफर्डची डिक्‍शनरी प्रत्‍येकजण एकदा तरी  हाताळलेला असतो. मात्र मराठीची शब्‍दासंपत्‍ती वाढवी म्हणून निदान मराठी विश्‍वकोषाचे खंड हे  दूरचीच  गोष्‍ट आहे निदान वसंत आबाजी डहाके यांचा शालेय मराठी शब्‍दकोशाचा शंभरामागे एखादा मराठी  व्‍यक्‍ती हाताळतो. मराठी भाषेसाठी ही फार मोठी शोकांतिका आहे. त्‍यास्‍तव प्रत्‍येकाने आपली शब्‍दसंपत्‍ती कशी  वाढविता येईल  याचा  जरूर विचार करावा.  यासाठी मुलांना लहानपणापासून विविध प्रकारचे  मराठी शब्‍दकोडे सोडविण्‍याचा  छंद  कसा  लागेल  याकडे  विशेष  लक्ष द्यावे. वारंवार कोडे  सोडविल्‍यामुळे खेळत खेळत  मराठी भाषेच्‍या  अनेक शब्‍दांची  व त्‍याच्‍या  अर्थाची  ओळख होते.  मराठी भाषेच्‍या विकासासाठी  व भाषेची चिरफाड टाळण्‍यासाठी प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केल्या जाते. त्या निमित्ताने प्रत्येकाने मराठीत बोलेन, मराठीत लिहिन आणि मराठीतच चालेन असा एक संकल्प करू या मराठीच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी तेंव्हाच कुठे मराठी जगेल.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती  ता. धर्माबाद 
9423625769

( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत विषय शिक्षक आहेत. )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझी माय मराठी

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
चालायला बोलायला
वाचायला नि लिहायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
चांगले वागायला
नि चांगले पाहायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
सर्वस्व अर्पण करायला
इतरांना मदत करायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
मोठ्यांना सन्मान द्यायला
देशाच्या विकासात
हातभार लावायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
नैतिकतेने जगायला
नि दुसऱ्याला जगवायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
असंख्य अशा गोष्टी
जीवन समृद्ध करायला

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, 24 December 2020

Atmanirbhar ( आत्मनिर्भर )


कथा - आत्मनिर्भर
आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने स्वतः च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भरपणे जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पहिला
सुधाचे बालपण
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हरिपूर नावाच्या गावात माधव आणि सविता मोलमजुरी करून सुखी जीवन जगत होते. त्यांना सुधा नावाची चुणचुणीत मुलगी होती. सुधा दिसायला सुंदर, बोलायला चतुर आणि अभ्यासात हुशार मुलगी होती. माधव हा विठ्ठलाचा परमभक्त होता. सकाळ - सायंकाळ नित्यनेमाने हरिपाठ करायचा. त्याची पत्नी सविता ही देखील सोज्वळ आणि भाविक होती. तो पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला तो पंढरपूरला जात असे. घरात असे भक्तिमय वातावरण होते आणि या मंगलमय वातावरणात सुधा चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. मुलगी जशी मोठी होत जाते तशी आई-बाबांची काळजी वाढत राहते. सुधाचे वय वाढू लागले तशी ती अजून सुंदर दिसू लागली. तिची सुंदरता वाढू लागली आणि इकडे माधवची काळजी वाढू लागली. मुलीची खूप काळजी घेऊ लागले. तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आले होते. गावातील शाळा संपली आणि तिला शिकण्यासाठी शेजारच्या गावातील शाळेत जाणे आवश्यक होते. ती सातवीतून आठव्या वर्गात गेली होती. 
" बाबा, मला पुढं शिकायचं आहे. "
" सुधा, तू सातवी पास झालीस, हेच खूप झालं. आता पुढे शाळा बिळा काही नाही."
" नाही बाबा, मला शिकायचं, माझ्यासोबतचे शकू आणि रमा दोघेही शिकणार आहेत. त्यांच्यासोबत जाते ना, मी पण ..."
" हे बघ बाळा, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते श्रीमंत आहेत, आपल्याकडे तेवढा पैसा नाही, आपण नाही शिकू शकत."
" आई, बाबाला सांग ना, मला जाऊ दे ना शाळेला "
" बेटा, बाबा म्हणतात ते बरोबर आहे, तुझं शाळा शिकण खूप झालं, आता जरा घराच्या कामाकडे ही लक्ष दे." 
माधव आणि सविता आपल्या मुलीला खूप समजावून सांगत होते मात्र ती ऐकायला तयार होत नव्हती. शाळा शिकण्याच्या एकाच गोष्टीवर ती ठाम होती. त्या रात्री सर्वचजण चिंताग्रस्त होऊन झोपी गेले. सुधा एकुलती एक लाडाची लेक होती. तिचा हट्ट पूर्ण करणे आवश्यक होते. सर्व सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. रोजच्या जेवणाचे वांदे आहेत,तर तिच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणावं हा प्रश्न माधवच्या समोर पडला होता. तेरा चौदा वर्षाची सुधा शिकण्यासाठी बाहेरगावी जाणार याची काळजी त्यांना लागून होती. पोटाला चिमटा देऊन एकवेळ तिचं शिक्षण पूर्ण करू पण तिची येण्या-जाण्याची काळजी माधवला सतावत होती. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील अत्याचार व बलात्काराच्या बातम्या वाचून ऐकून त्याची काळजी अजून वाढत होती. ही सारी चिंता सुधाला कसं सांगावं ? ती तर अडून बसली होती. शेवटी सुधाला शाळेला जाण्याची परवानगी मिळाली. तिच्या मनाविरुद्ध काही करावं तर ती अजून काही उलटसुलट करून घेईल म्हणून माधवने शेजारच्या शाळेत तिला शिकण्यासाठी पाठवून दिला. ती आता आपल्या मैत्रिणीसह शाळेला पायी ये-जा करू लागली. आजपर्यंत ती कधी ही आई-बाबा शिवाय घराबाहेर पडली नव्हती पण शाळेच्या निमित्ताने ती बाहेर पडली. तिला बाहेरच्या जगाचा अनुभव यायला वेळ लागला नाही. तिला आता लोकांच्या नजरा, लोकांचे बोलणे आणि इतरांचा स्पर्श या सर्व बाबीची जाणीव होऊ लागली. आई-बाबा शाळा शिकण्यासाठी का नकार देत होते याची देखील तिला जाणीव झाली होती. सुधा तशी खूप समजदार आणि तल्लख बुद्धीची होती. त्यामुळे तिने बाहेरील वातावरणाशी फार लवकर जुळून घेतली. बघता बघता एक वर्ष संपले. ती आता धीट बनली होती आणि तिच्या आई-बाबांना देखील जरासा विश्वास वाढला होता. तरी सुधा ची आई अधूनमधून तिच्या लग्नाची गोष्ट काढत होती. 
" अहो, सुधाचे दोनाचे चार हात करायला हवं, लवकर स्थळ शोधायला हवं." 
" हो, मला ही तेच वाटतं, पण सुधा ऐकेल काय ?" 
" तिला मी समजावून सांगते, तुम्ही स्थळ शोधा आता."
" होय, माझ्या नजरेत एक चांगलं स्थळ आहे, शेजारच्या गावातच आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि चांगली जमीन आहे." 
" मग बघा की, उद्याच्या उद्या जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या"
" बरं, सकाळी पाहतो, झोप आता." 
झोपेचं सोंग घेतलेली सुधा हे सारे ऐकत होती. आई-बाबा माझं शिक्षण बंद करून लग्न लावून देतात. काय करावं ? शाळा शिकावं की लग्नाला होकार द्यावं ? याच विचारात ती झोपी जाते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 2 रा
सुधाची सोयरीक
उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. तिचा मामा त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करत होता त्यामुळे संपूर्ण गाव त्याला किशनमामा या नावाने ओळखत होते. त्याला एक मुलगा आणि मुलगी होती. ज्यांच्यासोबत सुधा हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज शेतात जायचं, आंब्याच्या वनात जाऊन पाडाचे आंबे खायचे, खेळ खेळायचे खूप मजा करायचे. त्याच गावात सखाराम नावाचे एक सावकार राहत होते. ज्यांना एक मुलगा होता दीपक जो की लाडाने खूपच बिघडून गेला होता. त्याचं लग्न लावून दिलं तर त्याच्यात सुधारणा होईल असा विचार सावकारच्या मनात चालत होता. त्याचवेळी सुधाच्या बाबत त्याला कळाले आणि मुलगी गावात त्यांच्या मामाकडे आली आहे हे ही कळाले. त्यांनी दुरूनच सुधाला बघितले, पाहताक्षणी सावकारला सुधा खूप आवडली. काही ही करून आपल्या दिपकचे लग्न सुधासोबत लावण्याचा तो विचार करू लागला. तसा संदेश किशनमामाच्या कानावर गेलं. किशनमामाने तसा संदेश सुधाच्या आई-बाबांना कळविले. त्याबरोबर ते दोघे धावत पळत सीतापूरला आले. 
घरात सुधाच्या लग्नाची तयारी चालू झाली. तिच्या कानावर ही गोष्ट गेली. तशी ती लग्नाला विरोध करू लागली. 
मला आताच लग्न करायचे नाही, दहावी पास झाल्यावर बघू. 
चांगलं स्थळ आहे, अशी संधी वारंवार मिळत नाही 
आईने तिला समजावत बोलत होती. मात्र सुधा आपल्या बोलण्यावर ठाम होती. काय करावं ? हे काही सुचत नव्हतं. सावकार एकसारखे किशनमामाच्या मागे हात धुवून लागला होता. हो नाही करता करता सुधा लग्नाला तयार झाली. सीतापूर गावात सखाराम सावकार एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांच्या घरात सर्व सुख सोयी होत्या. त्यांच्याकडे गायी, म्हशी, अशी जनावरे देखील होती. सुधा ला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही एवढं ऐश्वर्य होतं. मुलाच्या घरूनच मागणी आल्यामुळे मुलीला नापसंद करण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे किशनमामाने सुधाच्या लग्नाची बोलचाली करण्यासाठी गेला. 
" सुधा लग्नाला तयार झाली, तिचे आई-वडील खूप गरीब आहेत, लग्नात वधू पित्याकडून काही ही मिळणार नाही, कन्यादान करून मुलगी तेवढं आपल्या पदरात देतील, हे मान्य असेल तर बोला"
" किशनमामा, आम्हांला सर्व काही मान्य आहे. मुलगी तेवढं पदरात द्या. बाकी सर्व आम्ही करू". सर्वाना मुलगी पसंद होती आणि मुलाच्या बाबतीत काय सांगायचं ? साऱ्या गावाला माहीत होतं दीपक कसा आहे ते ? दीपक हा एक लाडात वाढलेला सावकाराचा एकुलता एक मुलगा. गावात कोणासंगे ही भांडण करायचं, दादागिरी दाखवायची ही त्याची सवय होती. काही दिवसापासून त्याला वाईट सवयी देखील लागल्या होत्या. किशनमामाला हे सारं ठाऊक होतं. त्यामुळे तो सुधाला अगोदरच सर्व काही सांगून ठेवलं होतं. सुधा सुरुवातीला याच गोष्टीमुळे नकार देऊ लागली होती. पण लग्न झाल्यावर दीपक मध्ये सुधारणा होईल म्हणून सर्व विचाराअंती तिने होकार दिला. सुधाची सोयरीक झाली ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला आणि शाळेत देखील कळाले. एवढ्या लहान वयात लग्न करू नये असा सल्ला शिक्षक मंडळींनी तिच्या वडिलांना सांगितला. पण माधव मुलीच्या काळजीत काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याला कायद्याची बाब देखील सांगून बघितलं पण तो काही ऐकत नव्हता. बिचारी सुधा ती काहीच बोलत नव्हती. तिला एवढ्या लहान वयात लग्न करायचं नव्हतं, तिला खूप शिकायची इच्छा होती मात्र वडिलांच्या परिस्थिती चा देखील तिला विचार करणे आवश्यक होते. वडिलांना सुधाची जशी काळजी वाटत होती तशी सुधाला देखील वडिलांची काळजी वाटत होती. आई-वडिलांचा विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. उद्यापासून तिच्या जीवनाची दुसरी पहाट सुरू होणार होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 3
सुधाची पहिली रात्र
दीपक हा श्रीमंत सावकाराचा एकुलता एक मुलगा होता. म्हणून त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार लग्नाची वरात काढण्यात आली. घोड्यावर दीपक बसलेला, त्याच्या समोर खूप मोठा बँड वाजत होता. त्याचे सर्व मित्रमंडळी खूप जोमात आणि बेहोश होऊन ( कारण ते सर्वच दारू प्यालेली होती ) नाचत होती. गावात यापूर्वी अशी कोणाची वरात निघाली नव्हती. लग्नाची वेळ संपून गेली तरी मित्रांचे नाचगणे काही थांबत नव्हते. सारीच मित्रमंडळी बेहोश झाली होती त्यामुळे त्यांना कशाचेही भान राहिले नव्हते. असे तसे करता करता चार पाच उशिराने दीपक आणि सुधाचा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नाचे जेवण म्हणून सावकारांनी लाडू, जिलेबी, शिरापुरी, गुलाबजामून अश्या गोड पदार्थासह वरणभात आणि मसालेदार भाजी देखील केली होती. न भूतो न भविष्यति असा विवाहसोहळा पार पडला. सुधाचे आई-वडील आणि त्याचे नातलग हा सोहळा पाहून धन्य झाले. किती श्रीमंतीचे घर मिळाले म्हणून प्रत्येकजण तिची प्रशंसा करीत होते. सुधा देखील खूप आनंदी होती. लग्नानंतरच्या सर्व पूजा, अर्चा, विधी संपन्न झाले. 
लग्नानंतर सुधाची पहिली रात्र होती. आज तिच्या मनात वेगवेगळे विचार घुटमळत होते. मनातल्या मनात ती आनंदी होत होती. आजची पहिली रात्र कशी असेल ? याचा विचार करत ती आपल्या खोलीत बसली होती. दीपक सकाळी जेवण करून बाहेर पडला होता. सायंकाळ होत आली तरी त्याचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. सर्वांनी आपापले जेवण उरकून घेतले तरी दीपकचा पत्ता नव्हता. सुधा दाराकडे डोळे लावून बसली होती. दीपक आल्यानंतर जेवण करता येईल या विचारात ती तशीच बसून राहिली. वाट पाहत पाहत तिला डोळा कधी लागला हेच कळाले नाही. मध्यरात्री बारा वाजून गेल्यावर दारावर आवाज ऐकू आला म्हणून ती दचकून जागी झाली. दारात दीपक होता. लुडकत लुडकत चालत होता. त्याचा स्वतःचा तोल त्याला सांभाळता येत नव्हता. सुधा लगेच जागेवरून उठली आणि दीपकला आधार देत आपल्या खोलीत आणली. दीपक खूप प्याला होता. त्याला त्यावेळी कशाचेही भान नव्हते. जेवण करणार का ? सुधाने दीपकला विचारले पण तो काहीच बोलत नव्हता. नुसते काहीतरी इशारे करत होता. त्याला मुळी भानच नव्हते. आज पहिली रात्र आहे हे मात्र त्याला नक्की लक्षात होते म्हणून तो सुधाला आपल्याजवळ ओढू लागला. सुधा त्याच्या या क्रियेला विरोध करीत होती. मात्र नशेत धुंद असलेला दीपक तिच्यावर हावी झाला. आपली भूक शांत करून तो झोपी गेला. पहिल्या रात्रीविषयी सुधाने काय काय स्वप्न पाहिले होते ? काय काय विचार केले होते ? कोणते मनसुबे तिने रचले होते ? सारे काही मातीत मिसळले. एका मिनिटांत तिची पहिली रात्र संपली होती. ती तशीच जळून राहिलेल्या लाकडाचा जसा धूर निघतो तश्या अवस्थेत ती झोपी गेली. 
कोंबडा आरवला. सकाळ झाली. घरातल्या लोकांना हे काही कळू नये या अविर्भावात सुधा सकाळी लवकर उठली. बाहेरची सर्व कामे करून डोक्यावरून अंघोळ केली. देवपूजा करतांना तेंव्हा दीपकला जाग आली ते ही आरतीच्या घंटीच्या आवाजाने. रात्री दारू जरा जास्त झाली होती. लग्नाची पार्टी दिली होती मित्रांना. लग्नात मित्रमंडळी खूप नाचले होते म्हणून आभार प्रदर्शनासाठी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री एक एक मित्र जोडल्या जात होते त्यामुळे सर्व मित्रांची विनंती पूर्ण करता करता त्याला जरा जास्तच झाले होते. पार्टी संपायला रात्रीचे बारा वाजले. दीपकची पहिली रात्र होती म्हणून बाराच्या अगोदर तो तिथून सुटला अन्यथा ही मंडळी रात्रभर पीत बसले तरी कोणी यांची वाट पाहत नाहीत. अशी मित्रमंडळी जमा झाली होती. सुधाला पहिल्या रात्री जो अनुभव आला ते प्रत्येक रात्री येऊ लागला.   तिची प्रत्येक रात्र पहिली रात्र ठरू लागली. दीपक बेहोश बेधुंद अवस्थेत घरी यायचा. तिच्यावर जोर जबरदस्ती करायचा. तिने कधी नकार दिला तर एक-दोनदा मार देखील दिला होता. दीपकचे वागणे तिला सहन होत नव्हते. घरात खुप श्रीमंती आहे पण मनाला समाधान नसेल तर ही श्रीमंती काय कामाची ? सासू-सासरे यांना दीपक विषयी काही बोलले तर ते काहीच ऐकून घेत नव्हते. लाडात वाढलेलं लेकरू आहे, तूच त्याच्यात काही सुधारणा करशील म्हणून तुझ्यासोबत लग्न लावून दिलंय असे ते अधूनमधून बोलत. मी बळीचा बकरा बनले की काय असे कधी कधी सुधाला वाटायचे. लग्न होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असेल सुधाला दिवस गेल्याची बातमी सासरच्या आणि माहेरच्या लोकांना कळाले. सर्वाना खूप आनंद झाला. सासूने तर फर्मान सोडले सुनबाई, मुलगाच जन्मायला हवा. सासरे देखील तसेच बोलू लागले. सुधा मात्र विचार करू लागली मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे आपल्या हातात थोडेच आहे ? ते तर ईश्वराच्या हातात आहे. ती याच विचारात गाढ झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - चौथा
वांझोटी सुधा
पाचव्या महिन्यात सुधाची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देखील सावकाराने गावजेवणाची खूप मोठी मेजवानी दिली. सर्वांनी सुधाला भरभरून आशीर्वाद दिले. दीपक आता बापबनणार होता. तरी त्यांच्यामध्ये तीळभर देखील सुधारणा झाली नाही. त्याला दारू पिल्याशिवाय रात्री झोप येत नसे आणि सकाळी दारू पिल्याशिवाय चालता येत नसे एवढी वाईट स्थिती झाली होती. दीपकमध्ये सुधारणा कशी करावी ? याविषयी ती नेहमी विचार करीत असे. मात्र तिला काही उपाय सापडत नव्हता. तिला दिवस गेले होते. तरी ही दीपक रोज रात्री पिऊन यायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करायाचा. सुधाने अनेकदा समजवून सांगितले असे केल्याने आपल्या येणाऱ्या बाळाला धोका होऊ शकतो मात्र तो होशमध्ये असेल तर समजेल ना ! त्याला ते कधीच कळत नव्हते. एके दिवशी रात्री सुधाच्या पोटात दुखाण्यास सुरुवात झाली. बेहोश दीपक बाजूला मेल्यागत पडून होता. किती ही हलवले तरी तो जागा होत नव्हता. सुधाचे रडणे ऐकून सासू-सासरे बाहेर आले. त्यांनी तिला एका गाडीत टाकून त्याच रात्री दवाखान्यात घेऊन गेले. सावकाराचे वजन शहरात देखील होते म्हणून लगेच एक महिला डॉक्टर मिळाली. सुधाला दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टर मॅडमने सर्व तापसणी केल्या व ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली. काही तासानंतर ती डॉक्टर मॅडम बाहेर आली आणि म्हणाली, ' माफ करा, मी बाळाला वाचवू शकले नाही, गर्भातच ते मृत्युमुखी पडले होते, पण एक बरे झाले, तुम्ही लवकर घेऊन आलात त्यामुळे बाळाची आईला वाचवू शकले.' एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. ते दोघे सुधाला पाहण्यासाठी मध्ये गेले. सुधाला अजून होश आला नव्हता आणि तिचे बाळ, बाजूला मृत्युमुखी पडलेले होते. सासू-सासऱ्यांच्या इच्छेनुसार तो बाळ मुलगाच होता, दिसायला सुंदर, गोंडस आणि गुटगुटीत होता मात्र मेलेला होता. तेथील नर्सने त्या बाळाला उचलले आणि त्यांच्या स्वाधीन केले. बाळाच्या आईला होश येण्याच्या अगोदर या बाळाला घेऊन जा आणि त्याचे अंतिम संस्कार करून टाका. ज्याचे प्रथम संस्कारच झाले नाही त्याचे काय अंतिम संस्कार करणार ? पण लगेच त्यांनी त्या बाळाला आपल्या हातावर घेतले आणि पुढील क्रियाकर्म पूर्ण केले. काही तासानंतर सुधाला जाग आली. ती आता मोकळी झाली होती. त्यामुळे तिचे डोळे आपल्या बाळाला शोधत होती. मात्र बाळाच्या रडण्याचा आवाज कुठेही ऐकू येत नव्हता. प्रत्येक स्त्री तेंव्हाच पूर्ण होते जेंव्हा ती माता बनते. ती माता बनणार होती पण काळाने तिच्यावर असा झडप घातला की, शेवटच्या क्षणी हिरावून नेलं. तुला मेलेलं लेकरू जन्माला आले हे मोठ्या जड अंतकरणाने तिला सांगण्यात आलं. हे कळतच ती धाय मोकलून रडू लागली. ते लेकरू का मेलं हे तिला माहीत होतं, त्याचं कारण तिचा नवरा होता हे जाणून होती पण सांगावं कुणाला ? हा तिच्या समोर फार मोठा प्रश्न होता. तिच्या बोलण्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार ? हा ही एक प्रश्न होता. इकडे दीपकला याचे काही सोयरसुतक नव्हते. तो रोजच आपल्या मित्रांसंगे दारू पिण्यात मश्गुल होता. सुधाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तशी ती सासरी जाण्याच्या ऐवजी माहेरी जाणे पसंत केले. दवाखान्यातून आल्यापासून सुधा उदास राहत होती. पोटचा लेकरू स्वतःच्या चुकीमुळे घालविल्याने तिला खूप पश्चाताप होत होता. एकवेळ जर दीपकचा विरोध केला असता तर बाळ सुखरूप या जगात आला असता. मी का विरोध केला नाही म्हणून ती स्वतः वर संताप करत होती. सुधाची आई तिला समजावून सांगत होती, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. महिना दीड महिन्याचा काळ उलटला. आईने सुधाला सासरी जाण्याविषयी विचारू लागली. तेंव्हा सुधा सासरी जाण्यास नकार देऊ लागली. त्या नरकात मी जाणार नाही. बाहेरून खूप ऐश्वर्यसंपन्न दिसते मात्र मधून सारं पोखरलेलं आहे. तिथं सुख नावाची वस्तूच नाही. तो नवरा नाही, तो हैवान आहे, राक्षस आहे. त्याला फक्त शरीराची भूक मिटविण्यासाठी बाई पाहिजे असते, बायको नाही. मी जाणार नाही. सर्वांनी खूप समजूत काढल्यावर सुधा सासरी जाण्यास तयार झाली. ती यावेळी मात्र मन कठोर आणि खंबीर बनून आली होती. रोजच्याप्रमाणे दीपक रात्री उशिरा दारू पिऊन आला होता. आल्या आल्या त्याने जबरदस्ती करू पाहत होता. पण तिने थोडा विरोध केला तसा त्याला खूप राग आला. पण तिने जरा समजूत काढली आणि त्याला तसेच झोपू घातले. तिला हे तंत्र आता बऱ्यापैकी जमू लागले होते. म्हणून पूर्वीप्रमाणे तिला त्याचा त्रास वाटत नव्हता. असेच एक दोन वर्षे निघून गेली. सासू रोजच तिला बाळाच्या बाबतीत काही गोड बातमी आहे का म्हणून विचारत असे. पण काही गोड बातमी मिळत नव्हती. म्हणून एके दिवशी सासूने सुधाला दवाखान्यात चेकअप करण्यासाठी नेले. डॉक्टर मॅडमने संपूर्ण तपासणी केली आणि सांगितलं की, सुधा कधीच आई होऊ शकत नाही. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पाचवा
नवऱ्याचे दुसरे लग्न
पहिल्या प्रसूतीच्या वेळी सुधाच्या गर्भपिशवीला धक्का बसला होता त्यामुळे ती यापुढे कधीच माता बनू शकत नाही असे डॉक्टर मॅडमनी सांगितल्यापासून सुधा अजून चिंताग्रस्त झाली. तिचे कशातही मन लागत नव्हते. सासूचे तर आता तिच्यावरून मन देखील उठले होते. आपल्या वंशाला आता दिवा मिळणार नाही याच काळजीत ती रात्रंदिवस विचार करू लागली. दीपकला तर याचे काही देणे घेणे नव्हते. सुधा आपल्या खोलीतून बाहेर पडत नव्हती. कोणासोबत बोलत देखील नव्हती. उन्हाळ्यात जीर्ण झालेल्या झाडासारखी ती वाळून चालली होती. त्या झाडाला पावसाळ्यात पुन्हा हिरवीगार पाने फुटून ते झाड बहरू शकते मात्र सुधा आता कधीच माता होऊ शकणार नाही याच विचाराने अजून कोमेजून चालली होती. दिवसामागून दिवस सरत होते. दीपक मध्ये काही फरक पडत नव्हता. सासूबाई तिला टाकून बोलत होती. शेजारापाजाऱ्याकडे ती सुधा विषयी काहीबाही बोलू लागली. सुधा आता कधीच आई बनू शकणार नाही हे जवळपास सर्वाना कळाले होते. त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. घरात आता दिपकच्या दुसऱ्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली होती. सावकार देखील याविषयी विचार करू लागले. दिपकच्या कानावर देखील ही गोष्ट गेली. त्याला तर ही आयती संधीच मिळाली होती. आजकाल सुधा त्याला जवळ देखील येऊ देत नव्हती त्यामुळे त्याने आपले लक्ष घरापेक्षा बाहेर जास्त ठेऊ लागला होता. दीपकचे लक्ष्मी नावाच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ती एक चतुर आणि धूर्त बाई होती. दीपक जेव्हा जेव्हा तिच्याजवळ जात असे तेव्हा तेव्हा ती त्याला गोड बोलून त्याच्याकडून पैसे तर उकळत होतीच शिवाय त्याच्याकडे लग्न करण्याचा देखील हट्ट धरत होती. ती एक विवाहित महिला होती. मात्र तिचा नवरा तिच्या वागण्यामुळे तिच्यापासून दूर झाला होता. ती एकटीच राहत होती. तिला देखील एका पुरुषाची आणि पैश्याची गरज होती जे की दीपककडून पूर्ण होत होते. अचानक एके दिवशी दीपक लक्ष्मीला घेऊन घरी आला. ' आजपासून लक्ष्मी आपल्याच घरी राहील, मी तिच्यासोबत लग्न केलं असून ती आता माझी बायको आहे.' असे सांगून दीपक मोकळा झाला. सुधा समोरच उभे राहून हे सारे पाहत होती. पण काहीच करू शकत नव्हती. सासू-सासऱ्याची त्याला मूक संमती होती, त्यामुळे ती मूग गिळून गप्प होती. लक्ष्मी घरात आल्यापासून त्या दोघीचे धुसफूस चालू झाले. ती महाराणी सारखी बसून खात होती तर सुधा मोलकरीणसारखी काम करून दिवस काढत होती. ती वारंवार आपल्या संसाराविषयी आणि भविष्याविषयी विचार करत होती. काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या सापडत नव्हते. लक्ष्मी तरी आपल्या वंशासाठी कुळदीपक देईल म्हणून तिचे घरात खूप लाड केल्या जाऊ लागले. दीपक आता रात्री बेरात्री घरात येण्याच्या ऐवजी घरातच राहू लागला. सोबतीला लक्ष्मी होतीच. ती त्याला दारू पिण्याला विरोध करत नव्हती तर उलट त्याला खूप दारू पाजत होती. तिच्या मनात काही वेगळेच विचार चालत होते, जे की कुणालाही कळू देत नव्हती. दारू पिऊन दारू पिऊन दीपक खंगुण चालला होता. आता या घरात आपले काही स्थान नाही. आपण हे घर सोडलेले बरे याचा विचार करत सुधा आपल्या खोलीत झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग सहावा
सुधाच्या स्वप्नात आली सुधा

लक्ष्मीचे पाऊल घरात पडल्यापासून सुधाचे महत्व कमी झाले. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. ती आपल्याच विचारात गुंग राहू लागली. याच विचारात ती झोपी गेली. त्या रात्री तिच्या स्वप्नात एक तिच्यासारखीच दिसणारी महिला आली. ती म्हणाली, ' सुधा, हे तू काय करतेस ? तू एक हुशार आणि धाडसी मुलगी होतीस. आपलं आयुष्य असं का वाया घालवत आहेस. उठ, स्वतःच्या पायावर उभे राहा. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आत्मनिर्भर हो, तुला काय शक्य नाही. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्याचा तू वापर कर. तुझं उर्वरित शिक्षण पूर्ण कर आणि काही तरी करून दाखव. तुझी ही खरी परीक्षेची वेळ आहे.' एवढं बोलून ती स्वप्नातली महिला अदृश्य झाली. ती खडबडून जागी झाली. सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. तिने पुढील शिक्षण घेण्याचा निर्धार केला. तिचे असे काही वय उलटून गेले नव्हते. ती जेमतेम वीस-पंचवीस वर्षाची होती. तिने आपला निर्णय घरात सांगितला. तेंव्हा सासूने या गोष्टीला विरोध दर्शविला. कुठे ही जायचं नाही आणि काही शिकायचं नाही. घरात बसून राहायचं.' पण सुधा काही एक ऐकायला तयार नव्हती. पुढील शिक्षण घेण्यासाठी पक्का निश्चय केला होता. त्यासाठी तिने आपल्या शाळेतील काही मैत्रिणीचा आधार घेतला आणि आपले शिक्षण तिने चालू केली. घराचा उंबरठा ओलांडून ती बाहेरच्या जगात प्रवेश केला होता. ती मुळात हुशार होती. फारच लवकर तिने आपल्या कौशल्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. सुधाचे घराबाहेर जाणे सासूला तर पटलेच नव्हते आणि लक्ष्मीला देखील ते पसंत नव्हते. कारण सुधा घराबाहेर पडू लागली तसे तिच्यावर काम करण्याची वेळ येऊ लागली होती. त्यामुळे तिने देखील सुधाच्या बाहेर पडण्यावर विरोध करू लागली. त्या दोघींचा विरोध एवढ्या टोकाला गेलं की तिच्यावर घर सोडण्याची पाळी आली होती. तरी तिने आपल्या निर्णयावर ठाम होती, तिने दीपकचे घर सोडण्याचा निर्धार केला. तिची एक मैत्रीण तिला आधार देण्यासाठी पुढे आली. ती टेलरिंगचे काम करत होती आपले पोट भरत होती. सुधा तिच्या घरी येऊन राहू लागली. तिच्या टेलरिंगच्या कामात सुधा देखील मदत करू लागली. पाहता पाहता ती देखील टेलरिंगचे काम शिकून घेतली. दोघांचे पोट भरेल एवढा पैसा त्यांच्या हातात येत होता. दीपकच्या ऐश्वर्यसंपन्न घरात ती जेवढी सुखी नव्हती तेवढी सुखी या घरात होती, याचे तिला समाधान वाटत होते. स्वतः चार पैसे कमावून ती स्वतःच्या पायावर उभी होती, ती आत्मनिर्भर झाली होती, याचे ही तिला अभिमान वाटत होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - सातवा
प्रगती बचतगट
तिचा टेलरिंगचा व्यवसाय चांगला जोमात चालू झाला होता. तिच्या हाताखाली आता चार पाच मुली टेलरिंगचे काम शिकून तिथेच काम करू लागली.  
प्रगती शिवणक्लास या नावाने तिने एक छोटीशी शाळा देखील सुरू केली. अनेक मुली आणि स्त्रिया तिच्याकडे टेलरिंगचा व्यवसाय शिकण्यासाठी येऊ लागली. तिचे नाव सर्वदूर पोहोचले होते. एक उत्तम उद्योजिका म्हणून तिला एका स्वयंसेवी संस्थेने पुरस्कार दिला. वृतपत्रात तिचे नाव झळकले. सर्व महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हायला हवे असा संदेश तिने आपल्या बोलण्यातून देत होती. शासनाच्या मदतीने तिने प्रगती नावाची बचतगट तयार केली. त्यात वीस होतकरू आणि गरजू महिलांना सहभागी करून घेतली. प्रगती बचतगटाचा आलेख देखील वरवर चढत होता. पाहता पाहता गावातील शे-दोनशे महिला तिच्या बचतगटामध्ये समाविष्ट झाले. प्रगती फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था ही निर्माण केली. ज्या कोणा महिलांवर अत्याचार, जुलूम किंवा त्रास होत असत अश्या असहाय महिलांना या संस्थेने आधार देण्याचे काम करू लागली. याच फाउंडेशनने प्रगती महिलाश्रमाची निर्मिती केली. ज्यात अनेक गरीब आणि ज्यांना या समाजात कोणी ही वाली नाही अश्या महिलांची राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था केली. नुसती त्यांची सोयच केली नाही तर त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन दिले. टेलरिंगच्या व्यवसायासोबत अनेक छोटे छोटे काम त्यांना देऊ केली. त्यामुळे प्रगती महिलाश्रमातील बेसहारा असलेल्या महिला देखील उद्योगी बनल्या. त्यांच्या हातात देखील चार पैसे पडू लागले. आज त्यांना आपण असहाय किंवा गरीब आहोत ही कल्पना देखील करवत नव्हती. आम्ही काही तरी करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. दररोज सायंकाळी सुधा त्या महिलाश्रमाला भेट देऊन सर्वांच्या खुशाली विचारीत होती. त्या सर्व महिलांसाठी सुधा एक कल्पतरू बनून आली होती. इकडे गावातील सावकारच्या प्रगतीला अधोगती लागली होती. दीपक आता अंथरुणावर खिळून पडला होता. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती तर लक्ष्मीला त्याची काही काळजी वाटत नव्हती. मुलाच्या काळजीपोटी सावकार एके दिवशी जगाचा निरोप घेतला. दीपकच्या आईचे देखील हाल बेहाल होऊ लागले. सुधा जेवढी काळजी घेत होती तेवढी काळजी लक्ष्मी घेत नव्हती. राहून राहून तिला सुधाची आठवण येत होती. दीपक आता काही दिवसाचा साथीदार होता. सुधाला हे सारे कळाले तेंव्हा ती त्याला भेटायला जाऊ की नको या विचारात होती. सकाळी उठून दीपकला भेटायला जावं असा विचार करून ती सकाळी तयार होऊ लागली. तोच बातमी कानावर येऊन धडकली की, दीपक जग सोडून गेला. किती झाला तरी तो तिचा नवरा होता म्हणून ती या बातमीने खूप दुःखी झाली. दीपकच्या जाण्याने त्याच्या आईला अपार दुःख झाले तर लक्ष्मीला असीम आनंद झाला. आता साऱ्या संपत्तीची एक एकटी मालकीण होणार या विचाराने तिच्या मनात आनंदाचे फटाके फुटत होते. दीपकच्या आईला मात्र काळजी लागली होती. काही करून लक्ष्मीच्या हातात एक फुटी कवडी पडू द्यायचे नाही असा ती मनोमन विचार करू लागली. यासाठी तिला शेवटी सुधा हीच एकमेव आधार होती. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - आठवा 
सुधा जिंकली

एक दिवस मन घट्ट करून दीपकच्या आईने सुधाचे घर गाठले. त्यावेळी सुधा आपल्या कामात गर्क होती. ती आपल्या शिवणक्लास मधील मुलींना शिवणकामाचे धडे शिकवीत होती. तिचा तो हुरूप आणि उत्साह पाहून दीपकच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सुधा आई होणार नाही म्हणून तिचा खूप अपमान केली, तिला खूप त्रास दिला याचे तिला मनोमन दुःख वाटत होते. सुधा मुलांना सुद्धा लाजवेल आशा रीतीने काम करत होती. स्वतः च्या पायावर तिने प्रगती केली होती, स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. तिला आता स्वतः चे एक घर होते, ज्या घरात अनेक मुली आणि महिला आत्मनिर्भरतेचे धडे गिरवत होते. आयुष्यभर दुसऱ्याच्या पैशावर जगणाऱ्या दीपकच्या आईला स्वतःची लाज वाटत होती. बाहेर कुणी तरी बाई आली आहे म्हणून एका मुलीने सुधाला कळविले. त्याबरोबर सुधा बाहेर येऊन पाहिली असता दीपकची आई म्हणजे सासूबाई बाहेर उभ्या होत्या. तिने लगेच बाहेर येऊन तिला दंडवत घातली आणि घरात घेऊन आली. चहापाणी झाल्यावर तिने येण्याचे कारण विचारली. तेव्हा सासूबाईनी घडलेली सर्व कहाणी कथन केली. लक्ष्मी आता सर्व संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तू काही तरी मदत कर, तिच्या हातात फुटी कवडी पडू देऊ नको अशी विनवणी करू लागली. सुधाने यावर खूप विचार केली आणि सासूबाईला मदत करण्याचे वचन दिले. 
सुधाच्या बोलण्याने सासूबाईला हायसे वाटले. ती आनंदात घरी गेली. लक्ष्मीला ही गोष्ट कळाली तसे ती आपल्या सासूबाईवर खेकसली. रागात तिने काहीबाही शिव्याशाप देऊ लागली. पण सासूबाई काही बोलली नाही. सुधाने एका वकिलाची भेट घेतली. तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि लक्ष्मी ही दीपकची लग्नाची बायको नसून कायदेशीर पत्नी मीच आहे हे पुराव्यासह दाखवून दिली. लक्ष्मीच्या विरोधात तिने कोर्टात केस दाखल केली. सर्व पुरावे पाहून कोर्टाने लक्ष्मीला त्या घरातून नुसते हाकलून लावले नाही तर दीपकच्या संपत्तीवर तिचा काही एक हक्क नाही असा निर्वाळा देखील दिला. कोर्टात सुधा जिंकली आणि लक्ष्मी घराबाहेर झाली. निकाल ऐकून सासूबाईला अत्यानंद झाला. सुधा देखील या निर्णयाने आनंदी झाल्या. सासूबाईने सुधाला आपल्या घरी परतण्याची येण्याची विनंती केली. पण सुधाने स्पष्ट नकार दिला, आहे त्याठिकाणी मी खूप सुखी आणि आनंदी आहे असे म्हणून तिने आपल्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. सासूबाईला आपल्या केलेल्या कृत्यविषयी पश्चाताप होत होता आणि ती या पापातून मुक्त होण्यासाठी काही तरी सत्कार्य करावे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आपली सर्व संपत्ती, घर आणि पैसा अडका सुधाच्या प्रगती फाउंडेशनच्या नावे करून टाकली. तेव्हा कुठे सासूबाईला समाधान वाटले. प्रगती फाउंडेशनने अनेक गरजू आणि गरीब महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अजून एक सुधा निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ लागले. सुधाच्या प्रगती फाउंडेशनचा डंका संपूर्ण देशात पसरला. कठीण परिस्थितीत सुधाने ज्या पद्धतीने आपले शिक्षण पूर्ण केले, टेलरिंगचे काम शिकून स्वतः आत्मनिर्भर झाली आणि आपल्यासोबत इतर महिलांना देखील आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना मदत केली या कामासाठी देशाचे पंतप्रधानानी प्रजासत्ताक दिनी सुधाचे जाहीर सत्कार केले आणि सर्व महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा मोलाचा सल्ला दिला. 

------ संपूर्ण ------
लेखक - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Wednesday, 26 August 2020

covid-19

नियमाचे पालन करून कोरोनाला हरवू या. 

या वर्षाच्या प्रारंभी भारत देशात प्रवेशित झालेला कोव्हीड - 19 हा विषाणू पाहता पाहता संपूर्ण देश काबीज केला आहे. मोठमोठ्या शहरापासून छोट्या छोट्या गावात कोरोना विषाणू पसरला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण सापडत आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33 लाख झालेली आहे. याचसोबत मृतांची संख्या 58 हजार पर्यंत झाली आहे. सुरुवातीपासून जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करून देखील भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत ICMR ने दिलेल्या कारणावर प्रत्येक नागरिकांनी चिंतन करणे आवश्यक आहे, असे वाटते. 
" भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. विदेशात कोरोना रोगाचा प्रसार कसा झाला होता ? याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आणि माहिती सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. आपण कोणाच्या संपर्कात आलो नाही आणि तोंडावरील मास्क काढलं नाही तर या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र जनता ही गोष्ट लक्षात न घेता, बेजबाबदारपणे वागत असल्याने हा विषाणू फैलावत आहे. शासनाने लॉकडाऊन का जाहीर केले ? याबाबीविषयी आजही जनता अनभिज्ञ आहे. लॉकडाऊन काळातील टाळ्या वाजविणे यांना लक्षात आहे, दिवे लावणे हे विसरू शकले नाहीत मात्र घरी राहा, सुरक्षित राहा या वाक्याचा खरा अर्थ अजूनही काही लोकांना कळालेले नाही. देशातील सारी जनता जागी व्हावी म्हणून मोबाईलवर जनजागृतीची रिंगटोन लावण्यात आली, लोकांनी त्यातून देखील काहीच बोध घेतले नाही. कोरोना रोगापासून स्वतः दूर राहणे आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी फक्त तीन गोष्टी पाळलेच पाहिजे. 
घरातून बाहेर पडतांना नाक व तोंड झाकून राहील असे मास्क वापरले पाहिजे. मास्क नसेल तर निदान रुमाल तरी तोंडावर बांधायला हवे. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकांनी तोंडावर मास्क वापरल्याने कोरोनाचा प्रसार थांबविता येऊ शकते. म्हणून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणी आपल्यावर कायदा करण्याची वेळ येऊ नये. बाहेर गेल्यावर इतर लोकांशी संपर्क करू नये मग ते किती ही जवळची व्यक्ती असेल. हस्तांदोलन करण्यापेक्षा दुरून नमस्कार हीच पद्धत वापरली गेली पाहिजे. शेवटचे म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना आपले हातपाय पाण्याने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करणे. या छोट्या वाटणाऱ्या पण आपणाला कोरोनापासून संरक्षित करणाऱ्या सवयी निदान वर्षभर तरी विसरून चालणार नाही. 
माझ्याकडे ताकत खूप आहे, शरीरात प्रतिकारशक्ती भरपूर आहे, मला कोरोना होणारच नाही अशा कोणत्याही भ्रामक गैरसमजुतीमध्ये राहणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. भारतात मृत्युदर कमी असला आणि रिकव्हरी रेट चांगला असेल तरी कोरोना रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जागरूकतेने वागले पाहिजे. अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहण्याची सवय लावून घ्यावे लागेल. लोकांची गर्दी टाळावे म्हणून सरकारने अजून ही रेल्वे सुरू केली नाही, मंदिराचे दार उघडले नाही, शाळा-विद्यालय चालू केले नाही. जोपर्यंत आपण सर्वजण समजदार नागरिक होऊन वागणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील, कदाचित 2020 हे वर्ष संपूनही जाईल. तेंव्हा आपली थोडीशी चूक आपल्या परिवारातील सदस्यांना संकटात नेऊ शकते, हे लक्षात असू द्यावे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली केंव्हाही बरे. म्हणून सरकारकडून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचे आपण पालन करू या आणि कोरोना महामारीला हरवू या. जय हिंद

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...