Thursday, 18 June 2020

fathers day

. . . . . .  लेख : पितृदेवो भव . . . .
मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत; परंतु वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते.
गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळय़ाचा, प्रेमाचा संबंध असतो.आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमाणसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु खरोखरच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठूर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्‍याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे. मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी 'बाप' या कवितेद्वारे  समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे.

घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तर वडील मात्र कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो.

त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडशे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात.

भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची अशी प्रथा आहे. (सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र ते स्थान प्राप्त करणे फार जिकरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे अनुवंषिक गुणधर्म फार मोठय़ा प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे.

आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि स्वाभिमान संपतो. दुसर्‍याला उपदेश करूच शकत नाही. 'मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला' उक्तीप्रमाणे वागणे निश्‍चित जमणार नाही.

मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळापर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्‍या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल.

वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे. सार्‍याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असे जीवन जगणे आवश्यक आहे.

नागोराव सा.येवतीकर
मु. येवती, ता. धर्माबाद  (९४२३६२५७६९)

Thursday, 4 June 2020

wait for some Time


थोडा वेळ वाट पाहावं ...!


कोरोना विषाणूने जगभर जसा धुमाकूळ घातला तसा भारतात देखील त्याने मार्च महिन्यापासून सर्वाना त्रस्त केले आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही जेथे कोरोना विषाणूचा परिणाम जाणवला नाही. अनेकांचे रोजगार बुडाले, कित्येक उद्योगधंदे डबघाईला आले, कित्येकजण स्थलांतर झाले तर काहीजण आपल्या जीवाला देखील मुकले. संसर्गजन्य प्रकारातील हा रोग नकळत शरीरात घुसतो आणि आपले आस्तित्व दाखवायला सुरुवात करतो. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनता कर्फ्यु लागू करून लॉकडाऊनला सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा परिणाम शैक्षणिक बाबीवर देखील झाला. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये ताबडतोब बंद करण्यात आले. खाजगी ट्युशन क्लास देखील बंद करण्यात आले. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदा करावी लागली. परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कळत नाही, त्यांना त्यांचे कौशल्य कळत नाही. आपण किती पाण्यात आहोत हे पाहण्याची कसोटी म्हणजे परीक्षा असते. पण यावर्षी परीक्षा न घेता वर्षभरातील कामावर त्यांचे गुणांकन करावे लागले. जून महिन्यापर्यंत हे संकट टळेल आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात तरी होईल असे वाटत असतांना कोरोनाने अजून घट्ट पाय रोवून बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रवक्त्याने तर कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे, जे की खरे वाटत आहे. आज मूळात खरी समस्या निर्माण झाली ती म्हणजे हे शैक्षणिक वर्ष कसे असेल ? शाळकरी मुलांचे वय सहा ते सोळा वयाचे असते. कोरोनाच्या भीतीमुळे आजपर्यंत आपण या मुलांना घराबाहेर जाऊ दिले नाही. पण शाळा सुरू झाल्यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही असा यक्ष प्रश्न आज पालकांसमोर उभे राहिले आहे. शाळेत कश्याप्रकारची काळजी घेतल्या जाईल ? विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था कशी असेल ? विद्यार्थी शाळेत ये-जा कसे करतील ? त्यांचा शाळेत कुणाकुणाशी संपर्क येऊ शकतो ? सर्व मुलांसाठी शाळेत स्वच्छतेची सोय होईल का ? मुले तोंडाला मास्क लावून येतील का ? मुले शारीरिक अंतर ठेवतील का ? हात धुण्यासाठी सॅनीटायझर किंवा साबणाची व्यवस्था होईल का ? बहुतांश शिक्षक जिल्हा, तालुका किंवा शहरातून ये-जा करतात. त्यामुळे अश्या सर्व शिक्षकांची कोविड चाचणी केली जाणे आवश्यक आहे. सध्या तरी ग्रामीण भाग शहरी भागापेक्षा कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षित आहे. मात्र शिक्षकांमुळे एखादा विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास पूर्ण शाळा आणि गाव धोक्यात येऊ शकते. ही भीती देखील मनात अधून मधून पडत आहे. नुकतेच इस्त्रायल देशात शाळेमधून कोरोना रोगाचा प्रसार मोठया प्रमाणात झाले असल्याची तेथील आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. जवळपास सात हजार शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विलगिकरण करावे लागले, ही बातमी विचार करण्यासारखी आहे. कित्येक शाळा स्थलांतरित लोकांच्या विलगिकरणासाठी अधिग्रहण करण्यात आले होते त्याची स्वछता कोणामार्फत होईल ? असे एक नाही कित्येक प्रश्न आज पालकांच्या डोक्यात चालू आहेत. ज्याची उत्तरे सध्या तरी कोणीही देऊ शकणार नाही. काही देशात तर शाळेला वर्षभर सुट्टी दिल्याची बातमी देखील वाचण्यात आली. शिक्षण महत्वाचे की जीव या कोंडीत सध्या सर्वजण पडले आहेत. पालकांची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ज्या पालकांची मुले दहावी आणि बारावीच्या वर्गात आहेत त्यांना फार काळजी लागली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या वर्गातील मुलांचे उन्हाळी वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास झाला असता. मात्र यावर्षी तर सुरुवात देखील झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल ? असा प्रश्न त्यांच्या मनात कायम घर करून आहे. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने काही अभ्यास उपलब्ध करून देऊ शकतील पण गरिब पालकांच्या विद्यार्थ्यांचे काय ? त्यांना कसे शिक्षण देता येईल ? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात जी आंतरक्रिया होते ते ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. कमीतकमी दिवसातून एखादा तास तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात संवाद होणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर आहे तेथे दोन सत्रात शाळा भरविणे आवश्यक आहे. लहान वर्गांना सकाळच्या सत्रात आणि मोठ्या वर्गांना दुपारच्या सत्रात शाळा भरविण्याचे नियोजन फायदेशीर ठरू शकते. खाजगी ट्युशनसाठी देखील विद्यार्थी प्रवेश मर्यादित करून त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आजकाल पालक शाळेपेक्षा खाजगी ट्युशनवर जास्त विश्वास दाखवितात, त्यामुळे मोठ्या शहरात ही स्थळे जास्त धोकादायक बनू शकतात असे पालकांना वाटते. यावर्षी परीक्षेच्या पद्धतीमध्ये ही बदल करणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांशिवाय मुलांना विषयांचे अध्ययन अनुभव मिळणे अवघड आहे. ऑनलाइनचा कितीही बोलबाला असेल तरी ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. कोरोना विषाणूचा प्रसार पाहता अजून थोडा वेळ वाट पाहण्यात खरा शहाणपणा आहे. तरी ही शाळा सुरूच करण्याची वेळ आली तर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी शाळाप्रमुख, शिक्षक आणि पालकांनी घेतली तर शैक्षणिक वर्षातील ह्या कठीण आव्हानावर मात करणे शक्य आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769


Tuesday, 2 June 2020

kovid & education

कोरोना आणि शैक्षणिक आव्हान


कोरोना विषाणूने जगभर जसा धुमाकूळ घातला तसा भारतात देखील त्याने मार्च महिन्यापासून सर्वाना त्रस्त केले आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही जेथे कोरोना विषाणूचा परिणाम जाणवला नाही. अनेकांचे रोजगार बुडाले, कित्येक उद्योगधंदे डबघाईला आले, कित्येकजण स्थलांतर झाले तर काहीजण आपल्या जीवाला देखील मुकले. संसर्गजन्य प्रकारातील हा रोग नकळत शरीरात घुसतो आणि आपले आस्तित्व दाखवायला सुरुवात करतो. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनता कर्फ्यु लागू करून लॉकडाऊनला सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा परिणाम शैक्षणिक बाबीवर देखील झाला. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये ताबडतोब बंद करण्यात आले. खाजगी ट्युशन क्लास देखील बंद करण्यात आले. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदा करावी लागली. परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कळत नाही, त्यांना त्यांचे कौशल्य कळत नाही. आपण किती पाण्यात आहोत हे पाहण्याची कसोटी म्हणजे परीक्षा असते. पण यावर्षी परीक्षा न घेता वर्षभरातील कामावर त्यांचे गुणांकन करावे लागले. जून महिन्यापर्यंत हे संकट टळेल आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात तरी होईल असे वाटत असतांना कोरोनाने अजून घट्ट पाय रोवून बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रवक्त्याने तर कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे, जे की खरे वाटत आहे. आज मूळात खरी समस्या निर्माण झाली ती म्हणजे हे शैक्षणिक वर्ष कसे असेल ? शाळकरी मुलांचे वय सहा ते सोळा वयाचे असते. कोरोनाच्या भीतीमुळे आजपर्यंत आपण या मुलांना घराबाहेर जाऊ दिले नाही. पण शाळा सुरू झाल्यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही असा यक्ष प्रश्न आज पालकांसमोर उभे राहिले आहे. शाळेत कश्याप्रकारची काळजी घेतल्या जाईल ? विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था कशी असेल ? विद्यार्थी शाळेत ये-जा कसे करतील ? त्यांचा शाळेत कुणाकुणाशी संपर्क येऊ शकतो ? सर्व मुलांसाठी शाळेत स्वच्छतेची सोय होईल का ? मुले तोंडाला मास्क लावून येतील का ? मुले शारीरिक अंतर ठेवतील का ? हात धुण्यासाठी सॅनीटायझर किंवा साबणाची व्यवस्था होईल का ? असे एक नाही कित्येक प्रश्न आज पालकांच्या डोक्यात चालू आहेत. ज्याची उत्तरे सध्या तरी कोणीही देऊ शकणार नाही. काही देशात तर शाळेला वर्षभर सुट्टी दिल्याची बातमी देखील वाचण्यात आली. शिक्षण महत्वाचे की जीव या कोंडीत सध्या सर्वजण पडले आहेत. पालकांची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ज्या पालकांची मुले दहावी आणि बारावीच्या वर्गात आहेत त्यांना फार काळजी लागली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या वर्गातील मुलांचे उन्हाळी वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास झाला असता. मात्र यावर्षी तर सुरुवात देखील झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल ? असा प्रश्न त्यांच्या मनात कायम घर करून आहे. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने काही अभ्यास उपलब्ध करून देऊ शकतील पण गरिब पालकांच्या विद्यार्थ्यांचे काय ? त्यांना कसे शिक्षण देता येईल ? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात जी आंतरक्रिया होते ते ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. कमीतकमी दिवसातून एखादा तास तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात संवाद होणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर आहे तेथे दोन सत्रात शाळा भरविणे आवश्यक आहे. लहान वर्गांना सकाळच्या सत्रात आणि मोठ्या वर्गांना दुपारच्या सत्रात शाळा भरविण्याचे नियोजन फायदेशीर ठरू शकते. खाजगी ट्युशनसाठी देखील विद्यार्थी प्रवेश मर्यादित करून त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आजकाल पालक शाळेपेक्षा खाजगी ट्युशनवर जास्त विश्वास दाखवितात, त्यामुळे मोठ्या शहरात ही स्थळे जास्त धोकादायक बनू शकतात असे पालकांना वाटते. यावर्षी परीक्षेच्या पद्धतीमध्ये ही बदल करणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांशिवाय मुलांना विषयांचे अध्ययन अनुभव मिळणे अवघड आहे. ऑनलाइनचा कितीही बोलबाला असेल तरी ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी शाळाप्रमुख, शिक्षक आणि पालकांनी घेतली तर शैक्षणिक वर्षातील ह्या कठीण आव्हानावर मात करणे शक्य आहे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Sunday, 31 May 2020

लालपरीला बदलावेच लागेल

लालपरीला बदलावेच लागेल
मातीचा धुरळा उडवीत लाल रंगाची एसटी ज्याला ग्रामीण भागात बस या नावाने ओळखले जाते, ती येत असताना पाहून बालपणीच्या मनाला कोण आनंद व्हायचा. ' बस आली बस आली ' म्हणून उड्या मारत सर्वाना सांगत आणि ओरडत जाणारी लहान मुले आज कुठेच दिसत नाहीत. मामाच्या गावाला जाण्यासाठी झुक झुक गाडी फार कमी लोकांच्या नशिबात असते. मात्र लाल परी म्हणजे बस सर्वांच्याच नशिबात असते. कारण ती सर्वांच्या गावात जाते. 25-30 वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर लक्षात येते की, दळणवळणासाठी बस किती महत्वाचे होते. ग्रामीण भागात त्याकाळी बैलगाडीच्या नंतरचे प्रवासासाठी बस हेच माध्यम होतं. सायकल वगळता कसल्याही प्रकारचे वाहन गावात नजरेस येत नसे. त्याचमुळे प्रत्येक व्यक्ती दररोज या लालपरीची चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो अगदी त्याप्रमाणे वाट पाहत असत. बस आल्याचा सर्वात जास्त आनंद बालगोपाळाना व्हायचा. आज तशी परिस्थिती राहिली नाही आणि बसनेच प्रवास करावा लागेल असे ही नाही. आज प्रत्येकांच्या घरी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बसची वाट पाहणे किंवा बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेने फार कमी झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरी ही बसने प्रवास करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण लोकसंख्या ही त्या प्रमाणात वाढत आहे ना ! ग्रामीण भागात तुलनेने कमी फेऱ्या मारणाऱ्या बसेस असतील मात्र लांबपल्यासाठी धावणाऱ्या बसेसची संख्या काही कमी नाही. तालुका, जिल्हे, मोठी शहरे व तीर्थक्षेत्राच्या बसस्थानकातील गर्दी पाहून आजही बसेसला अच्छे दिन आहेत याची प्रचिती येते. खाजगी वाहनांची प्रचंड स्पर्धा लक्षात घेता प्रवासी आज ही बसलाच पहिली पसंदी देतात. काही वेळा नाईलाजास्तव प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पण खाजगी वाहनाने प्रवास करतांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणार काय ? याबाबत प्रवाश्यांच्या मनात नेहमीच धाकधूक असते. कारण या वाहनाच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा परवाना असतोच असे नाही. ते सुरक्षित वाहन चालवित नाहीत. रस्त्यावर आजपर्यंत जे अपघात झाले आहेत ते जास्तीत जास्त अश्या खाजगी वाहनाचे आहेत. त्याउलट बसचे ड्रायव्हर हे शिक्षित आणि जबाबदारीने चांगल्याप्रकारे वाहन चालविणारे असतात. म्हणूनच बसचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक वाडी, पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी होय. जेष्ठ नागरिकांसाठी ही हक्काची गाडी समजली जाते. लोकसभापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या निवडणुकीच्या कामासाठी एसटीच महत्वाचे आधार असते. संकट काळात धावून येणारी ही एसटीच असते.  ' प्रवाशांच्या सेवेसाठी' ह्या ब्रीद वाक्याला जगणारी सेवा म्हणजे एसटीची सेवा होय. पण आजकाल हीच एसटी तोट्यात चालली आहे किंवा डबघाईला आली आहे असे अनेकजण बोलत असतात. कदाचित ते खरे ही असेल कारण एसटीला आज भरपूर प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. आज दळणवळण करण्यासाठी फक्त एसटी हे एकच साधन उरले नाही. ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटीला स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. 
आज एसटी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत जसे की लाल, निळी, हिरवी, शिवशाही. निळ्या रंगाच्या गाड्या फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जसे चालविले जाते तसे लाल रंगाच्या गाड्या ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यात आणि खेड्यासाठी वापरले जावे. सर्व हिरव्या गाड्या लांबपल्यासाठी वापरले जावे. खाजगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी शिवशाहीसारख्या गाड्या चालविले जावेत. या गाड्या चालविण्यासाठी खाजगी ड्रायव्हर न घेता महामंडळाचेच ड्रायव्हर असतील तर अपघात कमी होतील. शिवशाही गाड्याचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लोकं या गाडीने प्रवास करणे टाळत आहेत. काही चालक, वाहक आणि कंट्रोलर प्रवाश्यांसोबत हुज्जत घालतात किंवा अरेरावीची भाषा बोलतात. एसटी म्हणजे आपले एक रोजंदारीचे साधन आहे असे त्यांना मुळात वाटत नाही. जो लगाव असायला पाहिजे ते दिसत नाही. मला देखील अनेकवेळा एसटीचे वाईट अनुभव आलंय. अंबाजोगाईच्या कंट्रोलरला नांदेडला जाणारी बस किती वाजता आहे ? असे तीन वेळा विचारल्यावर देखील त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर न देता कंट्रोल रूममध्ये एका मित्रासोबत गप्पा मारत होते. शेवटी मी रागात बोललो तर ते माझ्यावरच उलटून म्हणाले तुम्ही शिकलेले आहात ना फलक बघून घ्या. काय म्हणता येईल यास ? तसेच स्थानकात बस योग्य ठिकाणी थांबविले जात नाहीत. बस आली की लोकं जागा धरण्यासाठी बसकडे धाव घेतात. जागा मिळावे याच कारणामुळे स्थानकात यापूर्वी अनेक प्रवश्याचे जीव गेले आहे. पण अजून ही याबाबत काही नियोजन नाही. बसमधून उतरणाऱ्या प्रवाश्यांना थेट स्थानकात न उतरविता एका बाजूला उतरावे आणि त्यानंतर स्थानकात गाळ्यावर बस लावावी ज्यामुळे चढणारे आणि उतरणारे प्रवाशी यांची गर्दी होणार नाही. कोणत्याही प्रवाश्यांना स्थानकात फिरू देऊ नये म्हणजे असे अपघात कमी होऊ शकतात आणि  याचा त्रास कमी होईल, हे नियोजन आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर करणे एसटीला आवश्यक आहे. एसटी बसस्थानाकात आल्यावर जी उद्धघोषणा होते ती काही वेळापूर्वी करता येईल. जसे रेल्वेचे दहा मिनिटंपूर्वी उद्घोषणा केली जाते. अगदी त्या पद्धतीने लांबपल्याच्या गाडीचे बसस्थानकात येण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर उद्घोषणा केल्यास प्रवाश्यांना ते सोईस्कर होईल. जवळचे कंट्रोलरद्वारे आणि एसटीच्या वाहकाद्वारे ही माहिती घेता येईल. आज संपूर्ण कार्यालये व्हाट्सअप्पचा वापर करत आहेत तर एसटीने का करू नये ? दिवसातून निदान दोन वेळा तरी राज्यातल्या प्रत्येक गावात एसटी पोहोचली पाहिजे. गाव तेथे एसटी यावर नियोजन करणे आवश्यक आहे. आरटीओ आणि महामंडळ एकत्रितरित्या काम केल्यास बेकायदेशीर चालणाऱ्या अनेक खाजगी वाहनावर बंदी आणता येऊ शकते. यासाठी गरज आहे ती फक्त ईच्छाशक्तीची जे की महामंडळाने आजपर्यंत दाखविली नाही. आज एसटी महामंडळाचा वर्धापनदिन आहे, त्यानिमित्ताने शुभेच्छा देतांना त्यांच्याकडून काही बदल देखील अपेक्षित आहेत, प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी लालपरीने कात टाकल्याशिवाय त्यास अच्छे दिन मुळीच येणार नाहीत. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Friday, 29 May 2020

C P Shankrod


*विद्यार्थी प्रिय शिक्षक सी. पी. शंकरोड*
-----------------------------------------------
दि. 31 मे रोजी नियत वयोमानाने वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे विद्यार्थी प्रिय असलेले सी. पी. शंकरोड सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा घेतलेला हा आढावा. 
-----------------------------------------------
धर्माबादपासून दहा किमी अंतरावर असलेल्या छोट्याश्या येवती या गावात एका शेतकरी कुटुंबात पापन्ना आणि चंद्रभागाबाई यांच्या पोटी दिनांक 13 मे 1962 रोजी चिनन्ना उर्फ विठ्ठल यांचा जन्म झाला. शेती होती पण पिकत नव्हते. त्यामुळे खूप कष्ट करावे लागत असे. खुप काम करावे लागत होते. लहानपणापासून काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांची घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. या परिस्थितीत त्यांचे मावळे जे की नंतर सासरे बनले त्यांच्या मदतीने व मार्गदर्शनामुळे एप्रिल 1979 मध्ये कुंडलवाडी येथील प्रशालेतून द्वितीय श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाले. त्याकाळी दहावी नंतर डी. एड. करण्याकडे सर्वांचे लक्ष असायचे. तसे त्यांनी देखील दहावी नंतर डी. एड. ला अर्ज केले. हदगाव येथील डी. एड. कॉलेजला त्यांचा नंबर लागला होता पण गावापासून हदगाव खूप दूर आहे म्हणून त्यांनी तेथे गेले नाहीत. एक वर्ष बेकार राहिल्या नंतर पुढील वर्षी परत त्यांनी डी. एड. साठी अर्ज भरले. सुदैवाने धर्माबादच्या डी. एड. कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागला आणि दोन वर्षांचा अभ्यासक्रम मिळेल ते काम करत त्यांनी पूर्ण केली आणि नोकरीच्या शोधात फिरू लागले. 15 सप्टेंबर 1982 रोजी नायगाव ( बा. ) येथील जनता हायस्कुलमध्ये त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली. वारकरी संप्रदायातील त्यांचे घर होते. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड होती. त्याचा फायदा शिक्षक निवड मुलाखतीत झाले. तुमची आवड काय ? या प्रश्नाला त्यांनी गायनाचे आवड असल्याचे सांगितले आणि या झोपडीत माझ्या या कवितेचे सुंदर गायन केले. लगेचच त्यांची निवड झाली. एक वार्षिक वेतनवाढ घेऊन 15 डिसेंबर 1983 मध्ये  बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव येथे रुजू झाले. या गावातील लोकांचा संबंध आज ही कायम आहे. 
किनवट तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी येथे दिनांक 18 ऑगस्ट 1984 रोजी त्यांना नव्याने पदस्थापना देण्यात आली. किनवट तालुका हा आदिवासी व जंगलाचा तालुका. येथे नोकरी करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय. येथील नोकरीला काळ्या पाण्याची शिक्षा समजले जायचे पण नोकरी आहे, करावी तर लागणार, घरची परिस्थिती पाहून त्यांनी मागेपुढे विचार न करता नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. शाळेचा पत्ता विचारत विचारत ते इस्लापुरला जाऊन पोहोचले. तेथील एका दगडावर शिवणी 17 किमी  पाहून त्यांच्या छातीत धस्स झालं. बाप रे ! काय करावं ? त्याकाळी बस नव्हते की कोणती रिक्षा नव्हती. मग त्यांनी किरायाने एक सायकल घेतली आणि शाळेच्या दिशेने निघाले. त्याठिकाणी एक वर्ष काम केल्यावर परत कमी करण्यात आले. 01 जुलै 1985 रोजी बिलोली तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव केंद्र सुजलेगाव येथील नोकरीचे दुसरे आदेश मिळाले. येथून मात्र सेवेतून कमी करण्यात आले नाही आणि नियमित सेवा करण्यात आली. येथील पाच वर्षांच्या सेवेनंतर गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जि. प. हायस्कुल येताळा येथे सप्टेंबर 1990 ला त्यांची बदली झाली. सुरुवातीपासून हायस्कुलच्या शाळेचे आकर्षण होते. येथे काम करण्याची संधी मिळावी असे त्यांना वाटत होते आणि ते स्वप्न पूर्ण झाले होते. नोकरी चालू असतांना घराकडे देखील त्यांचे लक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन भावंडे व एक बहीण होती. त्यांची देखभाल करण्याची सर्वस्वी जबाबदारी घरातील सर्वात मोठे असल्यामुळे त्यांच्यावरच होती. या सर्व प्रक्रियेत त्यांनी आपल्या शिक्षणाकडे देखील दुर्लक्ष केले नाही. नायगाव बाजारच्या शरदचंद्र महाविद्यालयातुन त्यांनी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बी. एड. देखील उत्तीर्ण झाले, ज्याचा फायदा त्यांना पदोन्नतीसाठी झाला. स्काऊट गाईडचे प्रशिक्षण घेऊन जिल्हा स्काऊट मेळाव्यातुन शाळेला अनेक पारितोषिक मिळवून दिले. कुस्ती या खेळ प्रकारात विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी विभागीय पातळीपर्यंत मजल मारली होती. कुटुंब नियोजन कार्यक्रम सारख्या राष्ट्रीय कार्यात त्यांचा सहभाग होता. सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना विशेष रुची होती. साक्षरता अभियानाच्या काळात त्यांनी कला पथक प्रमुख म्हणून काम करतांना येताळा व करखेली परिसरातील 30 ते 35 गावात त्यांचे सहकारी कोंडलवाडे सर सोबत उन्हाळी सुट्टीत जनजागृती करण्याचे काम केले. लावणी, अभंग, ओव्या, गोंधळ अश्या विविध कलांच्या माध्यमातून लोकांचा जागर करण्याचा प्रयत्न केला गेला. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दरवर्षी एक दोन विद्यार्थी पात्र ठरण्यामागे सरांचा मोठा हातखंडा असायचा. सरांना गायनाची आवड होती त्यामुळे ते विद्यार्थ्यांना विविध गाण्याचे सूर लावून सराव घेत असत. त्यांच्या जवळ असलेल्या कौशल्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतल्या जात असे. 
बी. एड. चे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना पहिली पदोन्नतीची संधी मिळाली. 1997 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा रत्नाळी येथे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. केंद्र आणि केंद्रातील इतर 10 शाळांचा कारभार सांभाळणे खूप अवघड बाब होती. जेवढे मोठे पद असते तेवढेच मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतात. येथे चार वर्षे प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाचा अनुभव घेतले. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते पण या चार वर्षाच्या काळात ते विद्यार्थ्यांपासून दूर गेले. या चार वर्षानंतर सप्टेंबर 2000 मध्ये त्यांची बदली धर्माबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कन्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडते की काय अश्या स्थितीत होती. कारण या शाळेत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जात होता. पण सरांनी या शाळेची सूत्रे हातात घेतली आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अँड. प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली. भर चौकात जाहिरात करून त्यावर्षी त्या शाळेची पटसंख्या साडे तीनशेच्या वर नेली. त्यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर हे शाळेचे अध्यक्ष होते. त्यांचे आणि सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने हे शक्य झाले. जिल्हा बाल महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन परत एकदा शाळेचे वैभव त्यांनी मिळवून दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सन 2002 मध्ये बिलोली पंचायत समितीकडून तालुका गुरुगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. माणसाने काम करत जावे यश आपल्या पाठीमागे येत असते, अशी त्यांची विचारधारा होती.
परत एकदा माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याने दिनांक 13 जुलै 2004 रोजी धर्माबादच्या जिल्हा परिषद प्रशालेत त्यांची नेमणूक झाली. याठिकाणी त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय असे काम केले. सर्वप्रथम विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी डोअर टू डोअर जाऊन त्यांनी भेटी दिल्या आणि संख्या वाढविली. कॉपीमुक्तीच्या काळात ही दहावीचा निकाल वाढवत राहिले. या शाळेत शिकणारी मुलं गरीब घरातील आहेत म्हणून त्यांनी तांत्रिक शिक्षण सुरू केले. ज्यांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. पहिली ते दहावी वर्गातील ज्यांना आईबाबा नाहीत, अनाथ असतील, गरीबतल्या गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेऊन सर्व सहकार्याच्या मदतीने आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्यांना एखादा शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक मदत ही देऊ केले. सहशालेय आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन पालकांच्या विश्वासास ते पात्र ठरले. त्यांचे सहकारी स्व. नरेंद्ररेड्डी कंचरला यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2015 ते 18 या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी येथील वर्ग दोन मुख्याध्यापक पदाचे कार्यभार देखील यशस्वीपणे सांभाळले होते. या काळात त्यांना अनेक चढ-उताराचे प्रसंग आले पण ते डगमगले नाहीत. प्रशासन चालवत असताना देखील त्यांनी सर्वाना सोबत घेऊन, कोणाचे मन दुखावू न देता काम केले. म्हणून तर आज त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नांदेडच्या जिल्हा परिषदेने त्यांना सन 2010-11 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 
सेवानिवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतांना विषय समायोजनात त्यांची करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे बदली झाली. याठिकाणी देखील त्यांनी आपल्या मागल्या अनुभवावरून अनेक उपक्रम राबविले. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा याठिकाणी ही चालू ठेवली. करखेली येथे सांस्कृतिक कार्यक्रम न होता दोन दशकांचा काळ उलटला होता. पण सरांनी दोन वेळा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शाळेला आर्थिक मदत ही मिळवून दिली. गेल्या 38 वर्षाच्या सेवेत त्यांनी ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणी आपल्या साखळीत माणसे जोडण्याचे काम केले आहे. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या बरोबरच्या मित्रांना घेऊन त्यांनी गावात भजनी मंडळ तयार केले होते. गावात भजन करण्यासाठी ते सर्वात पुढे राहत. ते स्वतः गायक आणि पेटी वादक होते. गावात कोणतेही धार्मिक कार्यक्रम राहिले की सर तिथे जातीने उपस्थित राहत. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या स्वाध्याय कार्यक्रमात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ते स्वाध्याय करत आले आहेत. आज 31 मे रोजी नियत वयोमानाने ते सरकारी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. सेवेने जरी निवृत्त झाले तरी ते मनाने अजून ही तरुण आहेत. भविष्यात त्यांच्या हातून असेच धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय कार्य घडत राहो, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच यानिमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो. 

शब्दांकन :- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Tuesday, 26 May 2020

विलासराव देशमुख जयंती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची आज जयंती. त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

*।। विलासराव देशमुख ।।*

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव
तेथे जन्मले अष्टपैलू विलासराव

दगडोजी देशमुखांच्या घरी
पुत्र जन्मले सुशीलादेवीच्या उदरी

एकोणतीसाव्या वर्षी आले राजकारणात
सरपंच बनून सुरुवात केली बाभळगावात

त्यांच्याकडे होती बोलण्याची कला
मंत्रमुग्ध करून टाकत असे सकला

खूप प्रेम करायचे आपल्या परिवारावर
तशीच अपार श्रद्धा तुळजाभवानीवर

विधानसभेत पोहोचले ऐंशीला पहिल्यांदा
काँग्रेस पक्ष वाढीस दिला खांद्यास खांदा 

कार्यभार सांभाळली अनेक मंत्रीपदाची 
दोनदा काम पाहिले मुख्यमंत्री पदाची

त्यांची तिन्ही लेकरे ही निघाली गुणी
चित्रपटासह चमकली राजकारणी

मुंडे-देशमुखांची जोडी अभेद्य होती
त्यांच्या मैत्रीचे किस्से अजूनही आठवती 

यकृताचा मोठा आजार त्यांना जडला
बहुआयामी नेता महाराष्ट्राने गमावला

- नासा येवतीकर, नांदेड 9423625769

Friday, 17 April 2020

लोभ म्हणजे अधोगती

लोभ म्हणजे अधोगती

माणसाच्या जीवनात सर्वात जास्त घातक म्हणजे लोभ. ज्याच्या जीवनात लोभ, लालसा आणि स्वार्थ भाव असते त्यांचे जीवन कधी ना कधी धोक्यात येते. याच लालसे मुळे अनेकांना फसवणुकीसारख्या प्रकाराला तोंड द्यावे लागते. निरक्षर किंवा अडाणी माणसे नाही तर शिकलेले व्यक्ती देखील अति लोभा मुळे वेगवेगळ्या प्रकरणात गुंतले जातात आणि त्यांची निव्वळ फसवणूक होते. एका भामट्याने कर्मचाऱ्यांस दीड लाख रूपयाला फसविले अश्या आशयच्या बातम्या वाचण्यात येते तेंव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. पण लोभापायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. यांचे असंख्य उदाहरण आपण नेहमीच्या जीवन व्यवहारात पाहत असतो. काही माणसे सुख समृद्धीमध्ये असून देखील जास्त पैश्याच्या लोभामुळ लाच घेण्याचे प्रकार करत असतो. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे मात्र ते तसे करत नाहीत. काही राजकारणी आणि पैसेवाले मंडळी त्यांना अनेक प्रकारची आमिष दाखवितात आणि ते त्या आमिषाला बळी पडतात. असे अनेक ठिकाणी घडते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनात लोभ नावाची क्रियाच निर्माण होऊ देऊ नये. हे महत्वाचे आहे. आपणाला लॉटरी लागावी असे वाटणे म्हणजे एकप्रकारे लोभच आहे. काही काम न करता पैसा प्राप्त करण्याची ईच्छा म्हणजे लोभ होय. अभ्यास न करता आपण परीक्षेत पास व्हावे अशी कामना म्हणजे लोभ होय. स्वप्नरंजनात जगून दे रे हरी पलंगावरी ही वृत्ती लोभ निर्माण करत असते. लोभ नष्ट करायचे असेल तर जीवनात नेहमी कष्ट करत राहावे. आयते खाण्याची सवय आपणाला आळशी बनविते आणि आळशी लोकांची कधीही प्रगती होत नसते. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनच्या वूहान शहरातून आलेल्या या सूक्ष्म विषाणूमुळे जगात वीस लाखाच्या वर लोकं प्रभावित झाले आहेत तर लाखाहून जास्त लोकांचा यात बळी गेलंय. यास जगाने महामारी म्हणून घोषित केले आहे. या विषाणूने भारतात देखील आपला प्रभाव दाखविला असून गेल्या वीस पंचवीस दिवसापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून माणसाच्या संचारावर देखील बंदी टाकण्यात आली आहे. अश्या प्रतिकूल काळात लोकांना जीवानावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून काही दुकानाना सकाळच्या वेळी विक्री करण्याची परवानगी मिळाली. सध्याची परिस्थिती पाहून या लोकांनी सहानुभूती दाखवायला हवी पण तसे होतांना दिसत नाही. एकीकडे देशातील व राज्यातील अनेक मंडळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देत आहेत तर इकडे हे दुकानातील विक्रेते दामदुप्पट भावाने मालाची विक्री करतांना दिसत आहेत. मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा लोभ यांच्या मनात निर्माण झाला आहे म्हणून तर ते असे वागत आहेत. पण यांनी खरंच असं वागायला हवं का ? असा प्रश्न देखील कधी कधी मनात येते. 
कष्ट करून घाम गाळून जे पैसे मिळतात, त्यातून मिळवलेलं मिरची भाकरीचे जेवण देखील रुचकर आणि स्वादिष्ट असते. कोणत्याच गोष्टीची काळजी नसल्यामुळे झोप देखील छान लागते. याऊलट लोभामध्ये पैसे कमावलेले व्यक्ती समोर पंचपक्वान्न असून देखील पोट भरत नाही आणि त्यामुळे रात्रीला झोप देखील लागत नाही. गैरव्यवहारातून कमावलेला पैसा कधी ही समाधान मिळवून देत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकणे आवश्यक आहे. अति लोभाने आजपर्यंत कोणाची प्रगती झाली नाही, हे नेहमी लक्षात असू द्यावे.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा, धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...