Friday, 20 September 2019

लघुकथा - चोरी

चोरी

संजय दहा बारा वर्षाचा पोरगा. त्याचे बाबा शहरात मिळेल ते काम करून आपला संसार चालवत होता. त्याला सुरेश आणि विमला नावाची एक मुलगी होती. संजय आई देखील मिळेल ते काम करून पोट भरायचे. विमला आणि संजय एकाच शाळेत शिकत होती. तो पाचव्या वर्गात तर विमला पहिल्या वर्गात शिकत होती. आपली मुलंसगीकून मोठी व्हावीत, आमच्यासारखं त्यांना कष्ट सोसायला नको म्हणून ते त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होती. ते दोघे एकही दिवस शाळा बुडवत नसत. मात्र संजयला एक वाईट सवय होती. लहानपणापासूनच तो घरात देखील आई बाबांच्या नकळत पैसे चोरायचा. आता लहान आहे म्हणून एक दोन वेळा त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. तो शाळेत आला तसा वर्गातल्या मुलांच्या दप्तरातील वस्तू गायब होऊ लागले. पण चोरी कोण करतोय हे कोणालाच कळत नव्हते. कोणाची पेन्सिल, पेन, तो चोरी करू लागला. एके दिवशी त्याच्या हाताला वर्गातील मुलांच्या कंपासमध्ये दहा रुपये भेटले. त्याने कंपासमधील पैसे चोरले आणि कंपास तसेच बॅग मध्ये ठेवून दिला. त्यादिवशी शाळेत खूप कल्ला झाला पण चोर काही सापडला नाही त्यामुळे तो वाचला. तो चोरी करण्यासाठी रोजनामी शक्कल लढवायाचा. सकाळी सकाळी शाळेत परिपाठ चालू असताना हा पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय म्हणून वर्गात बसायचा आणि मुलांच्या दप्तरातील वस्तू चोरायचा. कारण तेथे त्यावेळी कोणी येत नसत. कधी कधी दुपारच्या सुट्टीत सर्व मुले जेवायला बसले की हा काही तरी कारण सांगून वर्गात राहायचा. तसा तो अभ्यासात चांगला होता त्यामुळे कधी ही त्याच्याकडे संशयाची सुई फिरली नव्हती. त्याला वस्तू चोरण्याची चटकच लागली होती. शाळेच्या मुख्याध्यापकानी स्पष्ट सूचना दिली की, बॅगमध्ये वह्या पुस्तकाशिवाय काही ही ठेवायचे नाही. तेंव्हापासून त्याला चोरी करायला काहीच मिळत नव्हते. शाळेत नव्यानेच मॅडम रुजू झाले होते. त्यांना योगायोगाने पाचवा वर्गच देण्यात आला. शाळेच्या दुसऱ्याच दिवशी मॅडमच्या पर्समधून सहाशे रुपये गायब झाले होते. परिपाठ संपल्याबरोबर मॅडमच्या लक्षात आले. त्यांनी मुख्याध्यापकाना तसे कळविले. सर्व मुलांची चौकशी झाली पण चोरीचा काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी सोमवारी शाळा भरली आणि चोराचा पत्ता लागला. त्याच वर्गातील एका मुलाने मॅडमचे पैसे कुणी चोरले आहेत ? याची माहिती मुख्याध्यापकास दिली. लगेच संजयला ऑफिसात बोलावून घेतले. त्याच्या वडिलांना ही फोन लावण्यात आले. थोड्याच वेळ त्याचे वडील ही शाळेत आले. संजयला त्याने केलेल्या चोरीच्या कृत्यासाठी खूप मोठी शिक्षा करण्याची परवानगी त्याच्या वडिलांकडून मिळाली. काय करावं ? हा खूप मोठा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकासमोर पडला होता. शिक्षा करून त्याचे जीवन बरबाद करण्यात काही अर्थ नाही म्हणून मुख्याध्यापकानी त्याला समजावून सांगून सोडून दिले आणि रोज त्याच्या वागण्यावर लक्ष देत राहिले. काही दिवस लोटले असतील एके दिवशी खुद्द संजय मुख्याध्यापकाजवळ आला आणि म्हणाला, ' सर हे पॉकेट मला शाळेच्या मैदानात सापडले आहे. ' सरांनी पॉकेट उघडून पाहिले त्यात पाचशे रुपयांच्या दहा नोटा होत्या. तसेच त्यात त्या माणसाचे ओळखपत्र देखील होते. सरांनी ते पॉकेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पॉकेट जमा केले. पोलिसांनी त्याची नोंद केली. दुसऱ्या दिवशी सरांनी परिपाठमध्ये संजयने प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल शाबासकीची घोषणा केली. त्याच दरम्यान शाळेत एक अनोळखी व्यक्ती आली आणि पॉकेट दिल्याबद्दल सरांचे आभार मानू लागले. त्यावेळी सरांनी आभार माझे नाही या संजयचे मानायला हवे असे सांगितले. तेंव्हा त्या व्यक्तीने संजयचे कौतुक तर केलेच शिवाय प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून शंभर रुपये देऊ केले. ते शंभर रुपयांची नोट हातात घेतांना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्याने लगेच सरांचे पाया पडण्यास खाली वाकला. सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आयुष्यात कधी ही चोरी करणार नाही ही सरांना दिलेली शपथ त्याने आयुष्यभर पाळले.

- नासा येवतीकर, धर्माबाद

Saturday, 14 September 2019

माझे बाबा - सायन्ना गुरुजी येवतीकर

कृतार्थ पालकत्व :- सायन्ना गुरूजी येवतीकर

पहिला भाग
सायन्ना गुरूजी यांचा जन्म आणि नोकरी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येवती ह्या छोट्याश्या गावात रामबाई आणि दशरथ यांच्या पोटी जन्मलेले दूसरे अपत्य म्हणजे सायन्ना गुरूजी. त्यांच्या पेक्षा एक मोठे आणि लहान चार जण असे एकूण सहा भावंडे असलेला त्यांचा परिवार . त्यांचे वडील व्यवसायाने वीणकर होते. कपडे विकण्याचा त्यांचा व्यवसाय. येवती गावाच्या अजुबाजुला असलेल्या लहान-मोठ्या खेड्यात ते कपडे विकून आपला संसार चालवित असे. एक छोटेसे घर शेती बाडी काही नाही. त्यांचा स्वभाव जेवढा शांत होता तेवढाच तापट सुध्दा होता. त्यांची म्हणजे गुरुजीची आई रामबाई एक साधी गृहिणी. घरातील कामे करुन शेतातील कामे करायची आणि आपल्या संसाराला हातभार लावयाची. या दोघांच्या पोटी दिनांक 14 सप्टेंबर 1941 रोजी सायन्ना गुरूजी यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. गावात तर शाळा नव्हतीच मात्र गावाजवळ असलेल्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी मंडळ म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक होते. त्याशिवाय दूसरा मार्गच नव्हता. घरात शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. यापूर्वी शिक्षणासाठी कोणी घराबाहेर राहिले नव्हते. मात्र त्यांना घराबाहेर राहून शिकण्याची परवानगी मिळाली आणि ते आपले कपडे व पुस्तकाची पेटी घेऊन शिकण्यासाठी घराबाहेर पडले. गुरूजी स्वतः तल्लख बुध्दिमत्तेचे होते आणि शिक्षणाची आवड होती म्हणून ते लवकरच आहे त्या परिस्थितिशी जुळवून घेत प्रगती साधली. सातव्या वर्गात शिकत असताना अचानक एके दिवशी त्यांचे वडील शाळेत आले आणि त्यांना परत येवतीला आणण्यासाठी निघाले. एका हाताने डोक्यावरील पेटी धरली होती आणि दुसऱ्या हातात त्यांना धरून निघाले. गुरूजीना काही कळेना की त्यांना कोठे नेले जात आहे आणि का ? शाळेतुन बाहेर जाता जाता मधुकरराव गुरूजीने त्यांच्या वडिलास अडवले आणि मुलाला कोठे नेत असल्याबाबत विचारणा केली तेंव्हा त्यांचा वडिलांनी रागात म्हणाले की 'खुप झाले शिक्षण आत्ता त्याला घरी घेऊन जातो'. वडिलांची आर्थिक समस्या होती, ते पुढील शिक्षण देऊ शकत नव्हते हे त्या मधुकरराव गुरूजीने अचूक हेरले आणि वडिलांच्या हातातील पेटी काढून घेऊन 'आजपासून सायन्ना माझ्या घरी राहिल आणि त्याला मी जेवू घालातो तुम्ही काळजी नका करू, आत्ता घरी जा' असे म्हणत मधुकरराव गुरूजीनी वडिलांना गावी पाठविले. घराकडून आत्ता कसलीच अपेक्षा नव्हती. त्या मधुकरराव गुरूजीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असल्याची आठवण ते आजही काढतात. याच शिक्षणाच्या काळात गंगाधर मुधोळकर नावाचे जीवाभावाचे मित्र त्यांना लाभले ज्यांच्यामुळे त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळले. कारण त्यांचे मित्र गंगाधर मुधोळकर हे ही एका गरीब कुटुंबातील पण हुशार होते. म्हणून त्यांची मैत्री जमली. जीवनाच्या सुख दुःखात आज सुद्धा ते एकमेकास कधीही विसरत नाहीत. दहावीची परीक्षा हैद्राबाद येथे देऊन उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना त्याच पात्रतेवर प्राथमिक शिक्षकांची नोकरी लागली. नोकरी करत करत त्यांनी डी. एड. चा अभ्यास पूर्ण करत पदविका हातात घेतली आणि आपली नोकरी कायम केली. त्यांच्या परिवारत आजपर्यंत कुणीही सरकारी नोकरी केली नव्हती. सरकारी नोकरी म्हणजे काय असते ? याची ओळख गुरूजीमुळे झाली. नोकरी लागल्याचा आनंद घरातील सर्वाना झाला, इवन बायकोला सुध्दा. कारण नोकरी लागण्यापूर्वीच शिक्षण चालू असतानाच सायन्ना गुरूजी यांचे लग्न कृष्णाबाई यांच्याशी झाला.

दूसरा भाग

त्यांचे पहिले अपत्य डॉ. सुरेश

सायन्ना गुरूजी आणि कृष्णाबाई यांना एकूण चार अपत्य, डॉ. सुरेश हे पहिले अपत्य तर शोभाबाई आणि गंगूबाई हे अनुक्रमे दूसरे आणि तिसरे अपत्य होय. शेंडेफळ अपत्य म्हणजे साद माणुसकी सामाजिकता अभियानचे लातूर विभाग प्रमुख, स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक नासा येवतीकर. आज सर्वच जण आपापल्या जागेवर यशस्वी जीवन जगत आहेत. मात्र त्यांच्या या यशामागे लपलेला आहे तो या आई-बाबाचे कष्ट. वेळी पोटाला चिमटा देऊन त्यांनी लेकराला शिक्षण दिले म्हणून आज ते या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यात मुलांचे ही श्रम आणि कष्ट आहेत पण संस्कार मात्र त्यांचे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहे.
गुरुजीचे पहिले अपत्य म्हणजे डॉ. सुरेश, घरात कोणी तरी डॉक्टर होणार याचे आनंद सर्वानाच होता जेंव्हा 1984 च्या मुसळधार पावसात गुरुजींनी त्यांच्या मुलाला घेऊन परभणीचे पशुवैद्यकीय महाविद्यालय गाठले आणि तेथे प्रवेश मिळविला. त्यांनी त्या ठिकाणी खुप मेहनत घेऊन अभ्यास केला. एम व्ही एसस्सी चे शिक्षण पूर्ण केले. साधे प्राथमिक शिक्षक असलेले गुरुजींनी त्यांना ते शिक्षण कसे दिले ? हे त्यांचे त्यांना ठाऊक. त्याकाळी टेलीफोन किंवा मोबाईलची व्यवस्था नव्हती तर पोस्टाने पंधरा दिवसातुन एकदा पत्राच्या माध्यमातून त्यांची भेट व्हायची आणि खुशाली कळायची. शिक्षण पूर्ण करीत असताना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी सुध्दा सुरुच होती. डॉ. रमेश भूमे आणि डॉ. हृदय कुमार कौरवार सारखे हुशार मित्र भेटल्यामुळे अभ्यासाची दिशा मिळाली आणि गतीही मिळाली. रात्रंदिवस केलेल्या अभ्यासचे फळ म्हणजे त्यांची बँकेत ऑफिसर म्हणून निवड झाली. घरात सर्वाना आनंद झाला. आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ते औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी म्हणून काम पाहतात. आजही ते आपल्या वडिलांना फोन केल्याशिवाय झोपत नाहीत. ज्यादिवशी दोघांचे बोलणे होत नाही त्यादिवशी दोघांना सुध्दा रुखरुख वाटते. मुलगा म्हणजे कसा असावा याची प्रचिती डॉ. सुरेश यांच्या वागणुकीतुन स्पष्टपणे झळकते. स्वतः खुप हुशार होते मात्र त्याचा गर्व त्यांना कधीच नव्हता. त्यामुळेच त्यांच्या अंगी विद्या टिकली. शालेय जीवनापासून गणित विषयाची त्यांना खुप आवड. कोणतेही गणित चुटकी सरशी सोडविण्यात त्यांचा हात कुणीच धरत नसे. पुस्तक वाचत राहणे ही एक चांगली सवय होती. नेहमी काही ना काही वाचन करण्याची सवय आज ही कायम आहे. मोत्यांसारखे अक्षर काढण्याची ईश्वरदत्त देणगी त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण गुरुजींचे अक्षर सुंदर आणि वळणदार असल्यामुळेच त्यांच्या दोन्ही मुलांचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहेच शिवाय त्यांच्या नातवंडाची अक्षर देखील सुंदर आहेत. गावात त्यांच्या एवढा हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा आजपर्यंत जन्माला नाही आणि पुढेल जन्मेल की नाही माहित नाही असे डॉ. सुरेश यांच्या बाबतीत आज ही बोलले जाते. शांत स्वभाव, इतराना मदत करण्याची वृत्ती आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सुरेश चा सर्व गावाला अभिमान आहे. आज जेंव्हा गुरुजींची हे डॉ. सुरेश यांचे वडील आहेत अशी ओळख दिले जाते किंवा त्यांच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी जेंव्हा त्यांच्या वडिलांसमोर बोलले जाते तेंव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद वाटतो.

तिसरा भाग

शेंडेफळ अपत्य नासा येवतीकर यांचा यशस्वी प्रवास

आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न पाऊलवाटच्या माध्यामातुन त्यांचे चौथे अपत्य नागोराव यांनी केले. तसे तर शेवटचे अपत्य शेंडेफळ म्हणजे खुपच लाडाचे असतो. त्यामुळे बिघडून जाण्याची शक्यता सुद्धा जास्तच असते. त्यातल्या त्यात आईचा जीव जरा जास्तच. लहानसहान चूका तिच्या पदरामागे लपून चुकविल्या जायच्या. त्यावेळी सहज बोलल्या जायचे हा काय दिवा लावतो देव जाणे ! भविष्यात याचे काय होईल ? अशी चिंता केली जायची. कारण परिस्थितीच तशी होती. सातव्या वर्गापर्यंत त्यांचा अभ्यास जेमतेम असा होता. घरात कोणी प्रश्न विचारले की त्याचे उत्तर हमखास चुकायचे त्यामुळे सर्वांच्या बोलणी खाणे ठरलेले असायचे. आठवीच्या वर्गात धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे शाळेत प्रवेश त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरले. येथून अभ्यासला जी सुरुवात झाली ती थांबलीच नाही. अभ्यास करण्याची गोडी लागली आणि प्रगतीलाही सुरुवात झाली. खास करून त्यांच्या लेखन शैलीत सुधारणा झाली. वर्तमानपत्राचे आकर्षण येथेच निर्माण झाले. परिक्षेतील निबंध लेखनाच्या प्रश्नातुन त्यांना लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. स्थानिक वर्तमानपत्रातुन त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले. स्थानिक प्रश्न पेपरमध्ये लिहिल्यामुळे लोक त्यांना पत्रकार , वार्ताहर किंवा पेपरवाला म्हणू लागले. वास्तविक त्यातले ते काहीही नव्हते. या काळात त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता आपला छंद जोपासत राहिले. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेएवढे मार्क मिळाले नाहीत पण समाधान कारक होते. ज्यावेळी डी. एड. ला प्रवेश मिळाला त्या वेळी त्यांची घरात पत वाढली कारण डी. एड.ला प्रवेश म्हणजे हमखास नोकरी असा विश्वास होता. तोपर्यंत काय दिवे लावतो ? असेच प्रत्येकाना वाटायचे. अखेर ते प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद नांदेड मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या एका वर्षानंतर त्यांचे वडील शिक्षकी पेशेतून यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले. घरातील संस्कारी वागणुकीमुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत हे त्यांच्या चालण्या, बोलण्या, आणि वागण्यावरुन लक्षात येते. इतराचे मन दुखावेल असे कधीच बोलत नाहीत, सर्वांशी प्रेमळ व मैत्रीने वागणे, मोठ्याचा आदर करणे, कधीही कामाचा आळस न करणे, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे समाजातील लोकांना लेखनाच्या माध्यमातून जन जागृती करण्याचा सतत ते प्रयत्न करतात. गेल्या 18 वर्षापासून ते वृत्तपत्रात स्फूटलेखन व स्तंभलेखन करतात. याच माध्यमातुन त्यांनी जानेवारी 2016 मध्ये पाऊलवाट नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. सोशल मीडिया च्या माध्यमातील whatsapp चा सुयोग्य वापर करीत असताना त्यांनी कुणाल पवारे यांच्या मदतीने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दररोज सकाळी 07 वाजता न चुकता पोस्ट करतात त्यामुळे नासा येवतीकर हे नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरात पोहोचले आहे. वृत्तपत्रातील लेख वाचून त्यांच्या वडिलांना कधी कधी त्यांच्या ओळखीचे लोक विचारत की हे तुमच्या गावातील नागोराव सा. येवतीकर कोण आहेत ? खुप छान लेख लिहितात, मला एकदा त्यांना भेटायचे आहे. असे विचारले असता त्याचे उत्तर देताना त्यांची छाती भरून यायची आणि मोठ्या अभिमानाने सांगतात की तो माझा छोटा मुलगा आहे. यांच्या प्रत्येक लेखाचे पहिले वाचक म्हणजे त्यांचे वडील. मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे नियंत्रण असते, आज ही दोन्ही मुले वडिलांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करत नाही. आई-बाबांच्या भावना दुखावतील असे एकही काम ते करत नाहीत. म्हणूनच आज त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृध्दी दिसून येत आहे. पैसा आज आहे उद्या नाही त्यामुळे आपली गुणवान लेकरे हीच खरी संपत्ती आहे असे ते मानतात. त्यांच्या या प्रवृत्ती मुळे आज त्यांना आपले पालकत्व कृतार्थ झाले असे वाटते.
आज घरोघरी जो कलह किंवा वाद दिसतो ते या परिवार मध्ये दिसत नाही. अनेक घरात भाऊ-भाऊ मध्ये वाद आणि भांडण होताना दिसतात. इतकेच नाही तर न्यायालय मध्ये सुध्दा धाव घेतात. मात्र गुरुजींचे परिवार त्यास अपवाद आहे. ते सर्व एकाच छताखाली गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे सर्व शक्य झाले हे पालकांच्या संस्कारामुळे.

दीर्घ आयुष्य

गुरुजींना खरोखर दीर्घायुष्य आहे. फेब्रुवारी 2014 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांना रात्री 12 वाजता मण्यार जातीच्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला होता. त्यांना ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेल्यामुळे फार मोठ्या अपघातातुन बचावले. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरविले की बाबांची पंच्याहत्तरी अमृत महोत्सव साजरा करायचा. ठरविलेल्या वेळापत्रकानुसार 14 सप्टेंबर 2016 रोजी गुरुजींचा अमृत महोत्सवी सोहळा दोन्ही मुलांनी मिळून आयोजित केला आणि त्यांच्या जिवाभावाच्या सर्व मित्रांची, नातलग आणि सगेसोयऱ्याची या निमित्ताने परत एकदा भेट घडवून आणता आली. आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ही ते अगदी ठणठणीत आहेत. त्यांना कोणतेही आजार नाही. मधुमेह किंवा बी पी ची शिकायत नाही. या वयात सुद्धा त्याचे दात अजुन ही मजबूत आहेत. सडसड़ित, अंगकाठीचे पण आजही काटक विचारांचे गुरूजी स्वतः ला भाग्यवान समजतात की त्यांच्या पोटी एवढी सुंदर रत्न जन्मास आली. त्यांच्या भावी निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना.

शब्दांकन :- आप्पासाहेब काशीनाथ सुरवसे

Monday, 9 September 2019

Moharm

मोहरम माहिती

मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम १२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. 

>> मोहरमची तारीख कशी ठरते ?

इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फरक असल्याने दर वर्षी मोहरमची तारीख बदलते. यावर्षी मोहरम १२ सप्टेंबरला सुरू होणार असून ९ ऑक्टोबरला संपणार आहे. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राला आधार मानून तारखा आणि तिथी निश्चित केल्या जातात. 

>> मोहरमला 'मातम का महिना' का मानतात ? 

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसेन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम' हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केले. परंतु, इस्लाममध्ये 'बादशाही'ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवडांसह अनेकांनी नकार दिला. हुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने सोडले. हिजरीच्या महिलन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं. परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. परंतु, संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. हुसैनचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे 'मातम का महिना' म्हणून पाहतात. 

>> प्रथा काय ? 

मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो. 

Wednesday, 4 September 2019

शिक्षक आणि उपक्रम

शिक्षक आणि उपक्रम

देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन शिकवितात तेच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. पण बहुतांश ठिकाणी असे पाहायला मिळते की, शिक्षक विद्यार्थ्यांवर चिडचिड करतात, रागावतात आणि प्रसंगी शिक्षा देखील करतात. अश्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना खूप भीती वाटते आणि विद्यार्थी शिक्षकांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतो. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी भीती किंवा राग असेल तर विद्यार्थ्याची प्रगती म्हणावी तशी होत नाही. तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळा आणि शिक्षण याविषयी लळा निर्माण होते. अर्थातच त्यांची शाळेतील उपस्थितीदेखील वाढते आणि शिक्षणाच्या प्रवाहातून शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होण्यास मदत मिळते. माजी शिक्षण संचालक आणि शिक्षणतज्ञ मा. वि. वि. चिपळूणकर हे शिक्षकांनी उपक्रम करत राहावे असे म्हणत. शिक्षकांचा आणि समाजाचा खूप जुना संबंध आहे. पूर्वीच्या काळी गावात शिकलेला एकच व्यक्ती राहत असे आणि तो म्हणजे शाळा मास्तर. शिक्षकांच्या शब्दाला त्या काळीमान होता तसा मान आज मिळत नाही तरी देखील चांगल्या शिक्षकांची समाजात आजही वाहवा होतांना दिसून येते. शिक्षकांच्या वर्तनावर त्याचे शालेय आणि समाजातील स्थान निर्माण होते. म्हणून शिक्षकाने शाळेत आणि समाजात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी चांगले वर्तन करणे आवश्यक आहे. शाळेतील लहान लहान मुले आपल्या प्रत्येक बाबीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. शिक्षकांचे प्रत्येक वर्तन मुलांसाठी एक दिशा देत असते. आज शिक्षक दिन आहे म्हणजे शिक्षकांचा गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस. काही उत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला, राज्यपालांच्या हस्ते मुंबईला तर जिल्हा स्तरावर देखील पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. ज्यांना पुरस्कार मिळाले तेच आदर्श शिक्षक असून बाकीचे काही कामाचे नाहीत, असे नाही. सर्वच शिक्षक आदर्श आहेत, जे मुलांसाठी नेहमी धडपड करतात, मुलांना नवनवीन गोष्टी शिकवितात, मुलांना नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतात. सक्षम देशाच्या उभारणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेऊन उद्याचा सक्षम नागरिक करण्याकडे लक्ष द्यावे. 

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

शिक्षक दिन कविता

शिक्षक दिन

मुलांना देउनी आत्मज्ञान
जागरूक त्यांना बनवी
शिक्षणाने होतो विकास
गुरुजीं सदा हेच शिकवी

जगण्याची रीत कळते
शत्रू असो की दानव 
गुरुच्या संपर्कात येऊन 
बनतात सर्व मानव

गुरु शेवटी गुरु असतो
त्याला जगत नाही तोड
त्यांचे बोलणे ऐकलो नाही
जीवनाला मिळते वेगळे मोड

प्रत्येकाला असतो गुरु
त्याविना मिळत नाही यश
आपल्या अज्ञानामुळे
कोणी ही करतो वश

म्हणून गुरुला देव मानूनी
सदा त्यांची सेवा करू
शिक्षकदिनाच्या निमित्ताने
सदविचाराची कास धरु

 नासा येवतीकर
9423625769


तोच खरा शिक्षक

मुलांच्या हृदयात जाऊन
त्यांच्या संवेदना जाणून
घेऊन जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

मुलांच्या मनात काय आहे
आपणास करायचे काय आहे
हे ज्याला कळते 
तोच खरा शिक्षक

मुलांची आवड निवड
त्याला मिळणारी सवड
ओळखून जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

पुस्तकाच्या मागे न लागता
अनुभवाचे बोल ऐकविता
मुलांचे विश्व जो घडवितो
तोच खरा शिक्षक

शिकून मोठे झाले
शहाणे सवरते बनले
रस्त्यात ज्यांना आदराने 
नमस्कार केला जातो
तोच खरा शिक्षक

- नासा येवतीकर, धर्माबाद
94236257698


शिक्षकाभिमान

शिक्षकांचा सदा मला अभिमान आहे
शिक्षकांविषयी मला स्वाभिमान आहे

माणूस घडविण्याचे काम करतो
त्यामुळे समाजात मला सन्मान आहे

माझी वागणूक एक आदर्श ठरते
म्हणून चार लोकांत मला मान आहे

काय करावे अन काय करू नये
पदोपदी याचे मला अवधान आहे

नव्या तंत्रज्ञानांविषयी मुलांना
सजग करण्याचे मला ज्ञान आहे

प्रगतीपथावर नेणारा सुजाण असा 
नागरिक घडविण्याचे मला भान आहे

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि. प.प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Sunday, 1 September 2019

हरितालिकेची कथा

हरितालिकेची कथा

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.
पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.

समाप्त

याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

समाप्त

Friday, 30 August 2019

नांदेड जिल्हा परिषद विषय शिक्षक समुपदेशन प्रक्रिया

*न भूतो न भविष्यति अशी समुपदेशन प्रक्रिया*

नांदेड जिल्हा परिषद :-
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पदवीधर विषय शिक्षक पदाची नेमणूक जिल्हा परिषद नांदेड कडून खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करावेसे वाटते. ज्यापद्धतीने विषय शिक्षक ( भाषा, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र ) पूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली, त्यामुळे सहसा कोणावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली. सभागृहातून बाहेर येणारा प्रत्येक शिक्षक हसरा चेहरा घेऊन बाहेर पडताना दिसत होता. हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच शिक्षकांना त्यांच्या सॊईस्कर जागा मिळाले नाहीत, त्यामुळे ते जरासे नाराज दिसून आले. समुपदेशन प्रक्रिया घेण्यापूर्वी शिक्षकांकडून होकार व नकार घेतल्यामुळे सभागृहात होणारा संभाव्य गोंधळ खूप कमी झाला असे म्हणण्यापेक्षा गोंधळ झालाच नाही, असे म्हणणे उचित ठरेल. सभागृहात समुपदेशक शिक्षकांच्या व्यतिरिक्त कोणालाही बसण्याची परवानगी दिली नाही, मोबाईलवर बोलण्यास बंदी केली, आपापसात चर्चा केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला, यामुळे दोनशे लोकांचा सभागृह पिन ड्रॉप सॅलेंट होता. काही कडक पावले उचलले तर त्याचे परिणाम चांगले बघायला मिळते, याचा अनुभव या निमित्ताने आला. कसल्याच प्रकारचे छुपे प्रकार न करता सर्वंच्या सर्व शाळा स्क्रीन वर दाखविण्यात आल्यामुळे ( विज्ञान / गणित विषय निवड करतांना अट टाकावी लागली ) शिक्षकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पसंदीचे गाव घेता येणे सॊईस्कर झाले. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामूळे विद्यार्थ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान होत आले आहे. यापुढे जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात हुशार विद्यार्थी घडतील आणि जिल्ह्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करतील असे विद्यार्थी घडविण्याचे चांगले कार्य करा अशी शुभेच्छा नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अशोक काकडे यांनी सर्व नवनियुक्त विषय शिक्षकांना दिली. त्यामुळे प्रत्येकांना एक वेगळी स्फूर्ती मिळाली. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर यांनी सभागृहाला सोपी नियमावली सांगितली ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया यंत्राप्रमाणे पूर्ण झाली. नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात काम करणारी सर्व यंत्रणा ( ज्यात संगणकावर काम करणारे तंत्रस्नेही पासून गटशिक्षणाधिकारी आणि विस्तारअधिकारी ) अगदी शिस्तबद्धरित्या काम केल्यामुळे कोणात्याही शिक्षकांना त्रास झाला नाही. आजपर्यंत जे काम कोणत्याही अधिकाऱ्यांनी केले नाही ते काम यांनी करून दाखविले, त्याबद्दल त्यांचे हार्दीक आभार. मोठ्या प्रकल्पावर काम करताना छोटेसे त्रुटी होत असतात त्यामुळे मोठ्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढील पाच वर्षांनंतर दहावीचा निकाल जेंव्हा लागेल त्यावेळी याचे खरे परिणाम पाहायला मिळतील. जे शिक्षक पदवीधर शिक्षक म्हणून निवड केली ते मनातून आपल्या विषयाला न्याय देतील आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी चांगले नागरिक तयार करतील. या प्रक्रियेत विषय शिक्षक म्हणून निवड झालेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवाना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...