Thursday, 6 September 2018

साक्षरता लेख

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त प्रासंगिक लेख

साक्षर भारत ; समर्थ भारत

17 नोव्हेंबर 1965 रोजी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केले. सर्वप्रथम 1966 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. वैयक्तिक आणि सामाजिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्दिष्टाने जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. जगभरात 77 कोटी युवक अजून ही साक्षर झाले नसून प्रत्येक पाच युवकांमागे एक युवक तर दोन तृतीयांश महिलाचा निरक्षरामध्ये समावेश आहे. अजूनही शाळेचे तोंड न पाहिलेले, शाळेत अनियमित येणारी मुले, तर काही मुले मधूनच शाळा सोडलेली अशी जगभर अंदाजे 6 कोटी आहेत. भविष्यात ही मुले निरक्षर म्हणूनच वावरणार यात शंका नाही. आपल्या भारत देशात काही वेगळे चित्र आहे, असे मुळीच नाही. 
देशाच्या विकासात साक्षरतेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साक्षरतेमुळे व्यक्ती आपला स्वतःचा विकास तर साधतोच त्याशिवाय कुटुंबाचा, गावाचा आणि राज्याच्या विकासात देखील त्यामुळे हातभार लागतो. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये डोळसपणा येतो. त्याची बुद्धिमत्ता विकसित होते आणि तो देशहितासाठी विचार करू लागतो. शिक्षण हे माणसांच्या जीवनात खताप्रमाणे काम करते. खत-पाणी योग्य प्रमाणात मिळाले तर झाडांची चांगली वाढ होते आणि उत्तम फळे चाखण्यास मिळतात असेच काही शिक्षणाचे आहे. देशाचा खरोखरच विकास साधायचा असेल तर देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित म्हणजे साक्षर असणे गरजेचे आहे. अज्ञान किंवा अडाणीपणामुळे एक तर त्याचा स्वतःचा विकास होत नाही शिवाय यामुळे देशाची सुद्धा विकास होत नाही.
आपण दीडशे वर्षे इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली घालवल्यानंतर जेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो तेव्हा देशातील लोकांची साक्षरतेचे प्रमाण 40 टक्के पेक्षा खाली होती. तत्कालीन शासनासमोर ही निरक्षरता संपविणे फार मोठी समस्या होती. भारतातील साक्षरतेचे इंग्रजांना काही देणेघेणे नव्हते ते त्यांना लागणाऱ्या कारकून-बाबू लोकांची निर्मिती करण्यासाठी मिशनरीच्या शाळा सुरू केल्या होत्या. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक तेथे शिक्षण घेत होती. त्या गुलामगिरीच्या काळात फक्त इंग्रजीतून शिक्षण दिल्या जात असे त्यामुळे तळागाळातील सामान्य जनता प्राथमिक शिक्षणापासून कोसो दूर होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, जनतेच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव महात्मा फुलेंना झाली होती. तळागळातल्या सामान्य लोकांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष देताना म्हटले की, " देशातील जनतेला मातृभाषेतून मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे." त्यांनी नुसते बोललेच नाही तर लोकांसाठी त्यांनी आजीवन धडपडत राहिले. मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा काढली आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणून तयार केले. त्या स्वतः निरक्षर महिला होत्या मात्र साक्षर झाल्यामुळे त्यांचे नाव जगभर पसरले यावरून शिक्षणाचे महत्त्व किती आहे ? हे कळून येते.
आपला देश स्वातंत्र्य होऊन  70 वर्षे संपली तसे पाहिले तर शेती, उद्योगधंदे, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताची लक्षणीय प्रगती आहे. लोकशाही मार्गाने वाटचाल करणारा भारत हा जगातील मोठा देश आहे. सन 2020 पर्यंत भारत महासत्ता बनेल असे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशवासीयांना दाखविले. मात्र आपल्या या प्रगतीत देशातील लोकांची निरक्षरता ही प्रमुख अडचण ठरत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 26 टक्के जनता निरक्षर आहेत. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम अल्पसंख्यांक प्रवर्गातील निरक्षरांची संख्या सर्वात जास्त आढळून येते. महिला वर्गात निरक्षरांची संख्या पुरुषांच्या तुलनेत 35 टक्के एवढी जास्त आहे. आपल्या देशाच्या विकासात गरीबी आणि निरक्षरता यांचा फार मोठा अडथळा निर्माण होतो. लोक गरीब आहेत म्हणून निरक्षर आहेत किंवा ते निरक्षर आहेत म्हणून गरीब आहेत असे खेदाने म्हणावे लागते. शिक्षणाच्या विकासासाठी महात्मा फुले यांच्या सोबतीने महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे यासारख्या अनेक महापुरुषांनी अथक परिश्रम घेतले. त्यानंतर ही देशातील लोकांच्या विशेष करून महिलांच्या साक्षरतेत काही बदल झाला नाही.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शासनापुढे अनेक प्रश्न आणि समस्या होत्या. त्यात देशातील निरक्षर लोकांना साक्षर करण्याचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा होता. सुरुवातीला साक्षरता कार्यक्रम हे प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक विभागात राबविण्यात आले. समाज शिक्षण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम, राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी प्रमुख कार्यक्रम होते. परंतु 1978 मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिला प्रौढ शिक्षण कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात आला. 1988 ते 2007 या काळात राष्ट्रीय साक्षरता मिशन संपूर्ण देशात राबविण्यात आला. यातून जवळ जवळ 13 कोटी लोकांना साक्षर करण्याचे लक्ष होते. तरी सुद्धा या देशातील निरक्षर लोकांची संख्या कमी झाली नाही. म्हणून दिनांक 8 सप्टेंबर 2009 या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी साक्षर भारत मिशन 2012 या कार्यक्रमाचे उद्घाटन करून देशातील 365 जिल्ह्यातील 70 दशलक्ष निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. त्याच अंतर्गत निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात एक प्रेरक एक प्रेरिकाची नेमणूक करण्यात आली. गेल्या सहा-सात वर्षापासून ही मंडळी अविरत कार्य करीत आहेत.
व्यक्ती साक्षर झाल्यास स्वतंत्रपणे जीवन जगू शकतो. न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास निर्माण होतो. समस्यांना, संकटांना प्रभावीपणे सामना करण्यास सक्षम होतो. मुलांना, कुटुंबातील व्यक्तींना शिक्षणापासून दूर करीत नाहीत. अर्थात शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात आस्था निर्माण होते. सरकारी किंवा अन्य संस्थांनी चालवलेल्या विविध विकास कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्यावर होत असलेल्या किंवा झालेल्या अत्याचार अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात. आपले हक्क आणि कर्तव्य या बाबतीत जागरूक होतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतात. सर्वांनी साक्षर होणे ही काळाची गरज आहे. निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी शासनाने साक्षर भारत या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात प्रेरक व प्रेरिका यांची नेमणूक केलेली आहे त्यामुळे निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे काम फक्त त्यांचेच आहे असे न मानता सुशिक्षित लोकांची सुद्धा एक जबाबदारी आहे की आपण निदान एका तरी निरक्षर व्यक्तीला साक्षर करावे. असा विचार प्रत्येकाने जर केला तर देशात एकही निरक्षर व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. एकदा अक्षर ओळख झाली की त्याच्यात शिक्षणाची गोडी आपोआप निर्माण होते आणि ते स्वतःहून शिकण्यास समोर येतात. मग यातून त्यांचा विकास आपणास साधता येऊ शकतो. 8 सप्टेंबर अर्थात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन त्यानिमित्ताने समर्थ भारत घडविण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित व्यक्ती एक शपथ घेऊया, " पुढील वर्षाच्या साक्षरता दिवसांपर्यंत निदान एका तरी निरक्षर व्यक्तीला साक्षर करून देशाच्या विकासात हातभार लावेन."

- नागोराव सा. येवतीकर
  स्तंभलेखक
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

Tuesday, 14 August 2018

स्वातंत्र्य दिन विशेष लेख

विचार बदला, देश बदलेल

आज भारताचा 72 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर क्रांतिकारक आणि महात्मा मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाई चे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामाच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 
आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्यचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. 
आपण खुप नशीबवान आहोत की स्वातंत्र्य उत्तर काळात आपला जन्म झाला. गुलामगिरी म्हणजे काय असते याची जरा सुध्दा आपणास जाणीव झाली नाही. आपण स्वातंत्र्यलढाचा इतिहास फक्त पुस्तकातुन वाचन करतो आणि तेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर अमुक तारीख आणि अमुक व्यक्ती माझ्या लक्षात राहतच नाही असे ही बोलून जातो. जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीत लोकांनी काय हालअपेष्ट सहन केल्या असतील ? त्यांचा इतिहास वाचूनच अंगावर काटा उभा राहतो. सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग यांची नावे ऐकली की मनात स्फूर्ती निर्माण होते. भारतमाता की जय म्हटल्यामुळे शाळकरी शिरीषकुमारला इंग्रजांनी गोळ्या झाडल्या आणि आज आमच्या तोंडातुन भारतमाता की जय बारीक़ आवाजात निघतो. कारण आपणाला स्वातंत्र्य फुकटात मिळालेले आहे.त्यामुळे त्याचे आपणास काही एक किमत नाही. म्हणतात की फुकटच्या वस्तूची किमत विकत घेतल्याशिवाय कळत नाही.
आज आपणास प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. इंग्रज लोक भारतातुन निघून जाऊन 72 वर्षाचा काळ गेला. या 72 वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केली नाही हे जरी सत्य असले, तरी संपूर्ण जग भारत देशाकडे विकसनशील देश या नजरेतून पाहते. आज भारतात मनुष्यबळ तर आहेच शिवाय बुद्धिमान लोकांची संख्या सुध्दा भरपूर आहे. त्यामुळे जग आपल्याकडे बुद्धिमान व हुशार युवकांचा पुरवठा करणारा देश म्हणून पाहतो. आपल्या देशात युवकासाठी रोजगार नाहीत म्हणून होणारी ओरड सर्वत्र आहे. विदेशात काय रोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत काय ? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सुध्दा नाही, असेच मिळणार. सर्वाना रोजगार मिळत नाही जो यासाठी पात्र असेल ज्याच्या जवळ बुद्धिमत्ता आहे त्याला जगात कोठेही रोजगार मिळेल यात शंका नाही. परंतु स्वातंत्र्य जसे फुकट मिळाले तसे सर्व काही फुकट मिळाल्यास जीवन सुखी होईल, असे स्वप्न रंगविणारे युवक देशाच्या प्रगतीत काय हातभार लावतील ? ते फक्त रडण्याचे काम करतील. कारण त्यांना आयती खायची सवय लागली. युवकांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. तसा युवकांनी देखील स्वतः प्रयत्न करणे गरजेचे. देशाने आपणास खुप काही दिले याची एकदा जाणीव निर्माण करा. आपल्या देशाची प्रगती करणे आपल्या हातात आहे. कधी तरी आपल्या स्वतः पुरता विचार करणे बाजूला ठेवून, कोण आपणास काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय केलो याची एकदा तरी गोळा बेरीज आपण केली आहे काय ? ज्याप्रकारे मिसाइल मैन तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? हा प्रश्न सर्वानी आपल्या स्वतः च्या मनाला दिवसातुन एकदा तरी विचारावे. देशाच्या सेवेसाठी माझे योगदान काय आहे ? याचा विचार आपण करणे आवश्यक आहे. जन्म देणारी आई आणि ज्या भूमीवर आपण जन्म घेतला ती भारतमाता अश्या दोन माता प्रत्येकाच्या जीवनात असतात. म्हणूनच प्रसिद्ध गझलकार सुरेश भट म्हणतात की गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, चंद्र सूर्य तारे. या प्रकारे आपण जन्मदात्री आईची सेवा मनापासून करतो तसे भारत मातेची सुद्धा सेवा करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहेत. सीमारेषेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणारे सैनिकच फक्त देश सेवा करीत नाहीत, तर आपण सुद्धा आपापल्या परीने देशाची सेवा करू शकतो. सैनिक लोकांमध्ये ज्याप्रकारे देशभक्ती निर्माण केल्या जाते तसे इतर नागरिकांमध्ये सुद्धा निर्माण होणे अत्यावश्यक आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाने तयार केलेल्या घटनेनुसार आपणास वागावे लागते. त्याविरुद्ध वागलो तर निश्चितपणे आपण काहीतरी चूक करीत आहोत किंवा गुन्हा घडत आहे असे वाटते. नियमाचे उल्लंघन न करता प्रामाणिकपणे वागणे यातून एक प्रकारे देशसेवाच घडते. आपले कर्तव्य आपण न विसरता काम करीत राहिलो तर त्यातून देशाची सेवा घडते. प्रत्येकांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल व्हावे म्हणून प्रामाणिकपणे कार्य करायला हवे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात कुचराई न करता काम करणे गरजेचे आहे. राजकारणी लोकांनी जनतेचे कल्याण आणि विकास होईल असे काम केल्यास ती खरी देशसेवा ठरेल. व्यापारी मंडळींनी आपल्या व्यवहारात शुद्ध व्यवहार ठेवल्यास आपल्या व्यापाराची कीर्ती होईल आणि देशाचे नाव होईल. खेळाडू तर आपल्या खेळाद्वारे देशाचे नाव जगभर पोहोचवत देशाची सेवा करत असतात. आज देशामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे. यअमुक ठिकाणी लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली, अश्या बातम्या रोज निदान एक तरी वाचायला मिळते. जे लोक अधिक पैसा मिळविण्याच्या दृष्टीने किंवा लवकरात लवकर श्रीमंत व्हावे या उद्देशाने सामान्य नागरिकांना पैशाचा तगादा लावतात. लाच दिल्याशिवाय काम पूर्ण करीत नाहीत, अशी मंडळी देश सेवा करतात काय ? जेव्हा त्यांना अटक झाल्याची बातमी बाहेर येते तेव्हा त्यांच्या संपूर्ण परिवाराची बदनामी होते. ते ज्या विभागात काम करतात त्या विभागाची सुद्धा नाचक्की होते. ज्या गावात किंवा तालुक्यात ते काम करतात त्या गावाचे वा तालुक्याचे नाव देखील खराब होते. ज्या ठिकाणी आपल्यावर डाग लागतो त्या ठिकाणी आपण आपल्याशी जोडलेल्या सर्वच घटकावर डाग लागतोच लागतो. याद्वारे आपली देशसेवा होते का ? भ्रष्टाचार करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने याविषयी एकदा तरी विचार करावा. प्रत्येकजण या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारतात भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही. जगात भारताला घोटाळ्याचा देश असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले कर्तव्य पूर्ण करीत जनतेचे काम केल्यास ते एक प्रकारे देशसेवाच ठरेल असे वाटते. आपण जर एका वेगळ्या दिशेने विचार केलो तर आपणास पुढील तीस वर्षात नक्कीच वेगळा भारत दिसेल ज्यावेळी आपण सर्व आपल्या भारतीय स्वातंत्र्याची शतकी साजरी करू. आपले विचार बदला देश आपोआप बदलेल. देशाला बदलण्याच्या काळजीत आम्हीच बदलायला तयार नाही.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday, 11 August 2018

अवयवदान

13 ऑगस्ट - जागतिक अवयवदान दिनानिमित्त प्रासंगिक लेख

मरावे परी अवयवरूपी उरावे

जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ही कविता मनात शिरली. मराठीच्या शिक्षकांनी तसा जीव ओतून शिकविला त्यामुळे ती कविता आज ही मनात घर करून आहे. कवितेतील प्रत्येक ओळीतून एकच अर्थ मिळतो की, आपल्या मरणानंतर आपले येथे काहीच उरत नाही. जसे राम आणि कृष्ण आले व गेले तसे आपण ही आलो आहोत आणि एके दिवशी जाणार आहोत. आपल्या मृत्यूनंतर घरातील मंडळी आणि नातलगामधील लोक काही काळासाठी शोक करतील, दुःख व्यक्त करतील आणि त्यानंतर नित्यनेमाने कामाला लागतील. जो जन्माला आलेला आहे तो उद्या मरणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे यात शंकाच नाही. या पृथ्वीवर जन्माला येताना रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. याबाबतीत जगजेत्ता सिकंदराचे उदाहरण तंतोतंत लागू पडते. त्याची शेवटची ईच्छा होती की, दोन्ही हात बाहेर दिसतील असे ठेवा म्हणजे लोकांना कळेल की, एवढं श्रीमंत असून देखील त्यांनी सोबत काही नेले नाही. आपण केलेली कमाई, धनदौलत, जमीनजुमला, घर, संपत्ती, सर्व काही येथेच राहते. फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे आपले नाव तेवढे जिवंत राहते. म्हणूनच म्हटले जाते की, पैसा कमाविण्यापेक्षा माणुसकी कमवा. धनाने गरीब असाल तरी चालेल पण मनाने गरीब राहु नका. चांगली कर्मे करणारा व्यक्ती हा कधी ही गरीब राहू शकत नाही. समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा , मानसन्मान ह्या सर्व गोष्टी अगदी फुकटात मिळतात. पैसा खर्च करून सुध्दा ह्या बाबी सहजासहजी मिळत नाहीत. समाजाला आणि देशाला उपयोगी पडेल असे कार्य केल्यास आपले जीवन व्यर्थ जाणार नाही. देशाच्या रक्षणापायी आजपर्यंत कित्येक जवान मृत्यूमुखी पडले. त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. ते अजरामर झाले आहेत. आपले अनमोल जीवन ही व्यर्थ जाऊ नये, आपण ही या देशाचे व समाजाचे ऋण फेडावे असे वाटत असेल तर अगदी फारच सोपे कार्य आपणासमोर आहे ते म्हणजे आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संगणक युगात वावरत आहोत. अवयवदाना बाबत आपल्या देशात प्रचंड उदासीनता आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामुळे आपण अवयवदानापासून कोसो दूर आहोत. अमेरिका आणि श्रीलंका या देशात अवयवदानाचे प्रमाण 100 टक्के असून आपल्या देशात तेच प्रमाण एक टक्का देखील नाही. कवी केशवसुत यांनी आपल्या तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. जुन्या चालिरिती, पध्दती, प्रथा यांना तिलांजली देऊन आपल्या मृत्यूनंतर अवयवदान देण्याची तयारी ठेवणे गरजू लोकांसाठी एक संजीवनी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की.
आपल्या शरीरातून जेंव्हा चेतना नष्ट होते तेंव्हा आपला मृत्यू झाला असे जाहीर केल्या जाते. आपल्याला मृत्यू म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. हा विषय देखील चर्चिला जाऊ नये असे वाटते. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे.  आपल्या मृत्यूनंतर परंपरेनुसार त्या शरीराची काही जण दफन करतात तर काही जण दहन करतात. म्हणजेच मृत्यूनंतर ते शरीर काहीच कामाचे नाही म्हणून ही कृती केल्या जाते. परंतु आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधातुन माणसाच्या मृत्यूनंतर काही तास शरीरातील काही अवयव त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतात. जसे की, डोळे ( सात ते आठ तास ) किडनी, हृदय, त्वचा, इत्यादी ठराविक वेळासाठी मेलेल्या व्यक्तीमध्ये जिवंत राहतात. तसेच ते अवयव गरजू लोकांना ठराविक कालावधीत प्रत्यारोपण करून बसविता येते. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीची ती गरज पूर्ण होते आणि त्यास दीर्घकाळाचे जीवन मिळू शकते. अवयवदान तीन प्रकारचे असते. जिवंतपणी आपण एक किडनीचा भाग दान करू शकतो, परंतु आपल्या नात्यातील व्यक्तीलाच. दुसरा प्रकार म्हणजे निसर्गत: मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे आणि त्वचा दान करता येते. तसेच तिसरा प्रकार म्हणजे अपघाताने किंवा ब्रेन हॅमरेज झाल्यास ब्रेनडेड झाल्यास हृदय, किडनी, लिव्हर, डोळे, हृदयाच्या झडपा, कानाचे पडदे, हाडे आणि त्वचा दान करता येतात. जसे रक्त कोठेच तयार करता येत नाही अगदी तसेच  मानवाच्या शरीरात असलेले अत्यंत महत्वाचे असे डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयव कोणत्याच कारखान्यात तयार करता येत नाही. त्यास मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्यास्तव तो देह जाळणे आणि पुरणे एवढ्याच कामासाठी शिल्लक असेल तर त्यास दान दिल्याने काय बिघडते ? मात्र यामुळे अनेकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक गरजूना नवजीवन मिळू शकते. तसे जिवंत असताना आपण अनेक प्रकारचे दान देऊन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्ती त्यालाच म्हटले जाते जो आपल्या जवळील सर्व वस्तूचे दान देतो. यासाठी महाभारतातील कर्णाचे उदाहरण दिले जाते. बहुतांश लोक अन्नदान करतात. काही नवयुवक मंडळी रक्तदान करतात. काही लोक पैसा दान करतात तर काही कपडे दान करतात. काही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प करतात. या सर्व दानाच्या प्रकारात अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आपणास पूर्ण माहिती झाल्याशिवाय तसेच प्रचिती आणि स्वअनुभव आल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. अवयवदान केल्यामुळे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा त्या अवयवाच्या रुपात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत असू शकतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या स्लोगनप्रमाणे. दक्षिण भारतीय चित्रपटातील नागार्जुना, सौंदर्या आणि श्रीकांत या अभिनेत्यांनी नुवस्तावनी या तेलगू चित्रपटात या अवयवदानाचे महत्त्व फार सुंदररित्या अधोरेखित केले आहे. प्रशासन आणि वैद्यकशास्त्र विभागानी या अवयवदानाबाबत लोकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीनी या विषयावर चांगला चित्रपट तयार करून लोकांमध्ये अवयवदानाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करावा. नांदेडचे मुक्त पत्रकार श्री माधव अटकोरे यांनी यावर पार्थिवाचे देणे नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. तसेच नांदेड येथील।प्रसिद्ध निवेदक दिवाकर चौधरी हे देखील याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावे म्हणून खूप मोठे कार्य करीत आहेत. आज 13 ऑगस्ट म्हणजे जागतिक अवयवदान दिनानिमित्त कविवर्य भा. रा. तांबे यांच्या " मी जाता राहील कार्य काय ? " या प्रश्नाचे उत्तर अवयवदानाच्या संकल्पनेतून नक्कीच करता येईल. याविषयी सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे पूर्वी म्हटले जायचे पण आत्ता मरावे परी अवयवरूपी उरावे असे म्हणणे उचित ठरेल.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...