Saturday, 23 December 2017

साने गुरुजी जयंती

मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने हाका मारीत असे. त्यांच्या लहानपणीच्या छोटया मोठया प्रसंगातून आईने त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम केले आहे. याच विचारातून त्यांच्या हातून श्यामची आई नावाचे प्रसिद्ध साहित्य निर्मिले गेले. ज्यातून श्याम म्हणजे साने गुरुजी कसे घडले ? याची प्रचिती येते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला त्यांच्या काकांकडे राहू लागले, परंतु तेथील वातावरण व परिसर त्यास रुचले नाही आणि ते परत आपल्या गावी आले. गावापासून जवळपास 6 मैल अंतरावर असलेल्या मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. रोज पायी चालत ते शाळेला जात असे. मराठी व संस्कृत विषयात आपण प्रज्ञावान आहोत याची सर्वप्रथम जाणीव याच शाळेत झाली आणि तेथेच त्यांना कविता करण्याचेही सुचू लागले. साने गुरुजींच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. गुरुजींच्या शिक्षणाविषयी घरात चर्चा होऊ लागली. वडील भाऊ सुद्धा साने गुरुजींच्या शिक्षणाविषयी चिंतेत होते. ही बाब साने गुरुजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी औंध इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. कारण येथे गरीब मुलांसाठी मोफत शिक्षणासोबत मोफत जेवण सुद्धा दिल्या जात असे. कठीण परिश्रम करीत ते आपल्या शिक्षणाचा प्रवास करीत होते. तेथून ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला . सन 1918 मध्ये गुरुजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच्या एका वर्षापूर्वी त्यांची लाडकी आई यशोदाबाई यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना डोक्यावर आभाळ कोसळल्यागत वाटले. कारण त्यांच्यासाठी आई ही सर्वस्व होती. ती प्रेमस्वरूप होती, वात्सल्यसिंधु होती. महाविद्यालय शिक्षण त्यांनी न्यू पुणे कॉलेज ( परशुराम भाऊ कॉलेज जुने नाव) येथून बी.ए. व एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. मराठी व संस्कृत विषयातून पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंमळनेर मधील प्रताप हायस्कुल मध्ये शिक्षकांची नोकरी पत्करली. गुरुजींना लहान मुलांचा लळा होता आणि ग्रामीण भागात काम करण्यात विशेष रस होता. शिक्षकांना मिळणाऱ्या पगारी पेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकवण्याची त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले होते. मुलांचे ते गुरुजींच नाही तर आई, वडील पालकही होते. कारण वार्डनर म्हणूनही त्यांनी काम केले. शाळेत असतांना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक प्रकाशित करायला सुरुवात केली, जे की खूपच प्रसिद्ध झाले होते. साने गुरुजींचे जेवढे मुलांवर प्रेम होते तेवढेच प्रेम मुलांचे साने गुरुजीवर होते. येथे केलेल्या मेहनती मुळेच ते साने गुरुजी या नावाने मुलांमध्ये ओळखले जाऊ लागले. जो पर्यंत त्यांनी या शाळेत कार्य केले तो त्यांच्या जीवनाचा पहिला भाग होता.
महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह करीत दांडी यात्रेचे आयोजन केले. त्या सत्याग्रहात साने गुरुजी यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या जीवनातील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. वडील लोकमान्य टिळकांच्या विचारांशी सहमत होते. घरात तसे वातावरण नव्हते परंतु अधूनमधून विचारधारा चालत असे. भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना धुळे येथील तुरुंगात जेरबंद करण्यात आले ते 15 महिन्यांसाठी. याच तुरुंगात त्याच कालावधीत विनोबा भावे दररोज गीतेवर प्रवचन देत असत, त्यांचा प्रभाव गुरुजींवर झाला. पुढे त्यांना तिरुचैन्नपल्ली येथे तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्यांनी तामिळ व बंगाली भाषा शिकली. यातूनच मग आंतरभारती चळवळ उदयास आली. सन 1942 च्या चले जावं आंदोलनाच्या माध्यमातून साने गुरुजीचा संपर्क मधू लिमये, कॉ. एस. एम. डांगे, एन. जी. गोरे, एस.एम.जोशी यांच्याशी आला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे दार सर्वांसाठी खुले करावे म्हणून 01 मे ते 11 मे 1947 मध्ये आंदोलन करून ते यशस्वी केले. 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. जे की आजतागायत चालू आहे. यशोदाबाईच्या श्यामचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. प्रत्येक गुरुजीनी जर साने गुरूजी होण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात संस्कारमय विद्यार्थी नक्कीच तयार होतील. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद  जि. नांदेड
9423625769

Wednesday, 13 December 2017

झेल्या

संकलित - *व्यंकटेश माडगुळकर यांची कथा*

*झेल्या*

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विरून जावे. तरीदेखील ते दिवस माण्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या. माझा एक विद्यार्थी.
मी त्या खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली-पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणिते सांगतात, की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगातात, सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे विचार त्या चिमण्या डोक्यांतून उड्या मारीत असावेत.
मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनीमातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, ‘‘हं, हजेरी सांगा रे –’’
‘‘सदाशिव नारायण.’’
आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, ‘‘हजर.’’
‘‘अब्दुल फत्तूभाई.’’ लाल टोपीचा गोंडा हालला आणि चिरका आवाज उठला, ‘‘हजर.’’
होता होता शेवटचे नाव मी वाचले, ‘‘जालंदर एकनाथ.’’
आणि पोरे ओरडली, ‘‘जालंदर न्हाय. झेल्या म्हना. त्यो साळंतच येत न्हाई!’’
‘‘का येत नाही रे ?’’ मी विचारले.
‘‘कुनाला ठावं मास्तर, आनू का बोलावून ?’’ एकजणाने विचारले.
‘‘घरी न्हाई त्यो, वड्यात चिंचा पाडतोय,’’…. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला, तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. मग तीन चांगली दणकट पोरे जालंदरल बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. पंधरा-वीस मिनिटे झाली असतील नसतील, ती जालंदरला घेऊनच आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते.
‘‘सोडा त्याला. कुठं होतास रे?’’
‘‘वड्यात चिंचा पाडत हुता. आमी साळंत चल म्हनल्यावर शिव्या दिल्या मास्तर!’’ पोरांनी माहिती दिली.
बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगाने किरकोळच. वयानेही फारसा नसावा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, बाहीवर ठिगळ लावलेले कुडते, तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिरे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.
सौम्य आवाजात मी विचारले, ‘‘काय रे, शाळेत का येत नाहीस?’’
‘‘काम असतं घरी, ‘‘गुर्मीत बोलाल. त्याचे दात काळे आणि किडलेले होते.
‘‘कसलं?’’
‘‘म्हस हिंडवावी लागती. भाता वडावा लागतो. दादा म्हणतो, साळंत जाऊ नगस !’’
झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला, ‘‘लबाड बोलतोस ! काय सुदीक करीत न्हाई ह्यो घरी – बापाला सांगतो साळंत मास्तर मारत्याती म्हणून, अन् गावात उनाडक्या करत हिंडतो ! काय ऐकत न्हाई बापाचं !’’
त्यावर झेल्याने रागारागाने सदाकडे बघितले आणि तो तोंडतल्या तोंडात पुटपुटला, ‘‘चल की साळंबाहेर, जीवच घितो तुजा !’’
झेल्या उनाड आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली, तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, ‘‘अरे, काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला.’’
झेल्याचा हिशेब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती.
‘‘खिशात काय आहे तुझ्या ?’’
इतका वेळ बटणांच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले, ‘‘काय न्हाई.’’
‘‘चिंचा हायत्या मास्तर !’’ असे ओरडून एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले आणि झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले, तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, ‘‘अग आय आय ग, बोट मुरगाळलं माजं !’’
मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे.
‘‘तू बाजूला हो रे. जागेवर बैस बघू,’’ मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो,
‘‘झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का ? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला.’’
काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला,
‘‘समद्या ?’’
‘‘हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव. मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या !’’
हिरव्यागार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभरं खिशांतून काढून झेल्याने टेबलावर ठेवले.
‘‘शाबास जालंदर ! मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी यांतल्या चिंचा.’’
झेल्या खुशीने हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला.
दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला. पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या  नियमित शाळेत येऊ लागला.
मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे, त्याच्या व्रात्यपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडसी माणसे फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला.
हां हां म्हणता तीन महिने संपून गेले. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, ‘‘मी येतो मास्तर तुमच्यासंगं !’’
कुठे येणार होता तो माझ्याबरोबर ? मी कुठे जाणार होतो हे माझे मलाच माहिती नव्हते, तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो ? मी हसलो आणि म्हणालो, ‘‘अरे, वेडा काय तू ? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं चार इयत्ता शीक आणि तिकडे ये. माझ्या वर्गात ये, सातवी पास हो, इंग्रजी शीक !’’
झेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली.
नंतर सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि पायीपायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता.
गावचा ओढा ओलांडला, हद्द संपली.
‘‘झेल्या, जा ते आता.’’
मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला.
झेल्याने एकाएकी ओंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला, ‘‘मास्तर, मी न्हाई जायचा आता त्या साळंत !’’
त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला.
अंगरख्याच्या बाहीने तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता.
पाऊलवाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो.
त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल ?

Saturday, 9 December 2017

मानवी हक्क दिन

🔰 माझे हक्क आणि माझे  कर्तव्य 🔰

लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना दुसऱ्याच्या हक्काची गोष्ट आपण हिसकावुन तर घेत नाही ना याचा जरा सुध्दा विचार केला जात नव्हता. पण जसजसे वय वाढत गेले आणि आणि हक्क म्हणजे काय ? याची परिचीती आली आणि कळू लागले आपल्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव जेंव्हा झाली तेंव्हा हक्काने ज्या गोष्टी मिळवायला पाहिजे त्यावर सुध्दा आत्ता हक्क न सांगता समायोजन करण्याचे शिकलो. दुसऱ्याच्या हक्कातील वस्तु हिरावून घेतल्याने आपणाला तो आनंद मिळत नाही जो आनंद आपली वस्तू इतरांना वाटण्यात मिळते. हक्काची जाणीव झाली की माणूस सर्वात पहिल्यांदा कर्तव्याकडे वळतो. ज्यांना जाणीव होत नाही ते फक्त हक्कासाठी नेहमी लढत राहतात. हक्काची मागणी करतांना कर्तव्याला विसरून चालणार नाही. मी या देशाचा घटक असल्यामूळे देशाने मला काही हक्क दिले आहेत त्याच सोबत काही कर्तव्य सुध्दा आहेत. मला चांगले शिक्षण मिळावा, शुध्द पाणी मिळावा, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मिळण्याचा मला हक्क आहे. त्याच बरोबर हे हक्क मिळविण्यासाठी आपले कर्तव्य काय आहेत. आपण एक जागरूक नागरिक होऊन प्रत्येक पाऊल जागरूकतेने टाकणे आपले कर्तव्य आहे. आपण आपले कर्तव्य विसरून चालल्यामुळे आज अशी विपरित परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे माझे हक्क काय आहे हे तर आपणांस माहिती पाहिजेच शिवाय कर्तव्य सुध्दा आपण कधीही विसरू नये असे वाटते.

- नासा येवतीकर, धर्माबाद

Friday, 8 December 2017

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा तरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जाण्याची प्रत्येकाला आवश्यकता भासते. याशिवाय इतरही प्रसिद्ध क्षेत्रांना भेटी देण्याचे नियोजन प्रत्येक जण करीत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सगळीकडेच देव-देवतांच्या निवासस्थानी यात्रा व जत्रा यांच्या निमित्ताने भाविक भक्तांचा महापूर ओसंडलेला दिसतो. विशेषतः जत्रा पाहूनच अनेक जण दर्शन सोहळ्याचा बेत ठरवितात असे वाटते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे यात्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी मांढरदेवीच्या यात्रेत भाविकांच्या चेंगराचेंगरी अनेकांना आपला जीव गमवावे लागले होते. त्यास्तव अमुक यात्रेच्या वेळीच देवाचे दर्शन घेतल्यास ईश्वर प्राप्ती होते का ? गर्दीतल्या प्रचंड भाविकांकडे पाहून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. म्हणूनच यात्रा वगळून इतर वेळी दर्शन घेतले तर बिघडते कुठे ? गर्दीत अगदी पाच-सहा तास ताटकळत उभे राहून दर्शन घेतल्याने ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही शिवाय वृद्ध व बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, हे वेगळेच. माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा म्हणतात की, देव दगडात नाही, त्याची पुजा करू नका. देव माणसात आहे, म्हणून त्यांची सेवा करा. कारण जनसेवेतच ईश्वराचीही सेवा दडलेली आहे. म्हणून देवळात, मंदिरात गर्दी करण्यापेक्षा समाजातील दीन-दुबळ्या, रंजले-गांजले असहाय-अनाथ लोकांची सेवा करावी. ईश्वराच्या देवदर्शनासाठी दूरवर गेल्याने जो आनंद मिळत नाही, तो आनंद गरजू, गरीब लोकांना मदतीचा हात देऊन सेवा केल्यास नक्कीच मिळू शकते. अनेक महात्म्यांनी जनसेवेतच ईश्वरसेवा मानून कार्य केले म्हणूनच ते महान बनले. आपणही त्या तत्त्वाचा अवलंब करून ईश्वराचा मागे न धावता जनसेवा करीत राहावे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday, 6 December 2017

कानमंत्र

*शाळेने तारला संसार*

सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला सांगितले. तसे वर्गातील मीना, लता, सुरेश, आणि ज्योती उभे राहिले. एका-एकाने कारणे सांगायला सुरुवात केली. जसे ही ज्योतीचा नंबर आला की, ती काही सांगण्याच्या अगोदरच रडायला सुरु केली. तशी ज्योती ही चौथ्या वर्गातली अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि रोज गृहपाठ पूर्ण करणारी मुलगी होती. त्यामुळे ती का रडत होती हेच सरांना कळेना. सरांनी तिला खूप समजावून सांगितल्यावर ती चूप झाली. तास संपला. मध्यंतरची बेल झाली.  सर वर्गाबाहेर गेले. तशी ती सरांच्या मागे मागे गेली. सर ऑफिसमध्ये गेले तशी ती पण ऑफिसमध्ये गेली. परवानगी घेऊन आत गेली आणि सराजवळ जाऊन पुन्हा एकदा रडत रडत म्हणाली, " सर, रात्री माझ्या घरी माझ्या आई-बाबाचे भांडण झाले. बाबाने आईला खूप मारलं आणि सकाळी उठून घर सोडून जा असे म्हणाले. सकाळ झाली. आई उठली आणि पहिल्या गाडीला जाण्यासाठी मला आणि सोमाला घेतली आणि निघाली. पण माझे मन होत नव्हते. मी आईला खोटे बोललो की, आज शाळेत परीक्षा आहे. तेवढी परीक्षा देऊन येतो आणि दुपारच्या गाडी ला जाऊ या. बाबाने या गोष्टीला मान्यता दिली. पण आत्ता आई येणार आहे दुपारच्या गाडीला घेऊन जाण्यासाठी " असे म्हणत ती अजून रडू लागली. सरांना काही सुचेना. तिला रडू नको गप्प होय म्हणून शांत केले आणि सर म्हणाले, " मग आत्ता काय करायचं ? " तेंव्हा ती भरल्या गळ्याने म्हणाली, " सर मला कोठे हि जायचे नाही, येथेच शाळा शिकायचे आहे, तुम्ही सांगा कि, बाबाला समजावून ..!" सरांसमोर खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे कळेना. तरी तिला " ठीक आहे " असे बोलून वर्गात जाऊन बसण्यास सांगितले. दुपारची वेळ झाली. मुले सर्व जेवायला बसली होती. ज्योती आणि सोमा देखील जेवायला बसले होते. तेवढ्यात त्यांची आई शाळेत आली. रात्रभर रडून रडून डोळे खोल गेले होते, अंगावर मळकट कपडे होते, केसं विस्कटलेले होते, भूक लागलेली आहे हे स्पष्ट जाणवत होते, तिची स्थिती पाहून सरांना कसे तरी वाटले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. सरांनी तिला ऑफिस मध्ये बोलावलं. खिचडी शिजवणाऱ्या मावशीला सांगून पहिल्यांदा तिला जेवायला दिलं. ती जेवायला तयार होईना तेंव्हा खूप वेळ समजाविल्यानंतर कशी तरी दोन घास जेवली. त्या दरम्यान तिच्याकडून रात्री घरात काय घडलं याचा इतिवृत्तात ऐकून घेतला. तोपर्यंत मुलांचे देखील जेवण झाले. सरांनी म्हटले की, ज्योती आणि सोमा तुमच्या सोबत येत नाही असे बोलत होती काय करणार ? तिला खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच कळेना. सर म्हणाले अजून थोडा वेळ इथेच बसा मी ज्योतीच्या बाबाला बोलावून घेतो. पाचव्या वर्गातील माधवला बोलून घेऊन ज्योतीच्या बाबाला सरांनी शाळेत बोलाविले म्हणून निरोप पाठविला. थोड्याच वेळात ते शाळेत आले. त्याच्या चेहऱ्यावर अजून ही तो राग दिसत होता. सरांनी त्याला बसायला सांगितले. अगदी शांतपणे सरांनी ज्योती आणि सोमाच्या शिक्षणाविषयी त्याच्याशी चर्चा केली. ज्योतीच्या गृहपाठाच्या वह्या, तिची प्रगती हे सारे सांगितले. ती जर आई सोबत गेली तर तिची आणि सोमाची शाळा बुडेल. आत्ता राहिले फक्त तीन-चार महिने त्यानंतर उन्हाळी सुट्या लागतात. तेंव्हा पुढील निर्णय एका-दोन महिन्यानंतर तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. असे म्हणून सरांनी ज्योतीच्या आईला घरी पाठविले, बाबांनी रागातच होकार दिले. आत्ता ज्योतीच्या डोळ्यात अश्रू होते, ते आनंदाचे. तिने सरांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी सरांनी ज्योतीला जवळ बोलावून घेऊन एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, तुझे आई-बाबा एकत्र रहावे असे वाटत असेल तर तुला खूप अभ्यास करून शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यश मिळवायला हवे. तुझ्या हातात तीन चार महिने आहेत. ज्योतीला सुद्धा सरांचा कानमंत्र पटला. त्यादिवशी पासून ती खूप अभ्यास करू लागली. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येऊ लागली तशी तिचे काळीज धडधड करू लागले. अखेर परीक्षा संपली. शाळेची परीक्षा देखील संपली. तीन महिन्याचा करार देखील संपला. शाळेला सुट्या लागल्या. ज्योती, सोमा आणि त्यांची आई माहेरी निघून गेल्या. सरांसमोर खूप मोठा प्रश्न होता. ज्योतीला दिलेला कानमंत्र काम करेल काय ? याची काळजी लागली होती. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ज्योती या परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक बनली होती. त्यानिमित्त जिल्हास्तरावर तिचा आई बाबा सोबत सन्मान केला जाणार होता. पण ज्योतीला प्रश्न पडला की, कोणा सोबत जाऊ. गावात सर्वानी ज्योतीच्या वडिलांचे खूप कौतुक करून अभिनंदन केले. पोरीने बापाचे नाव काढलं असे म्हणू लागली. हे सगळं ऐकून आणि पाहून त्याला राहवले नाही. ज्यादिवशी सत्कार करायचा दिवस होता त्यादिवशी तो सकाळीच उठला आणि पहिल्या गाडीने सासरवाडीला गेला. सकाळी सकाळी बाबाला पाहून ज्योतीला रडूच कोसळले. ती धावत धावत जाऊन बाबांच्या गळ्यास पडली. बाबांनी तिचे अभिनंदन केले. सोमा त्याची आई, ज्योती आणि तिचे बाबा सर्वजण तयार झाले आणि सत्कार घेण्यासाठी जिल्ह्याला गेले. त्याठिकाणचा सत्कार समारंभ पाहून त्यांचे डोळ्याचे पारणे फिटले. परत सासरवाडीला जाऊन एक दोन दिवस राहून तेथील पाहुणचार घेऊन सर्व गावी परत आले. शाळेला सुरुवात झाली. ज्योती पुढच्या वर्गात गेली होती पण पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते म्हणून ती टीसी नेण्यासाठी बाबाला घेऊन आली. पण सरांनी आईला बोलावून आणल्याशिवाय टी सी मिळणार नाही असे म्हटल्यामुळे लगेच आईला बोलावून घेतले. शाळेत ज्योतीच्या आई बाबांचा सत्कार करण्यात आला. तेंव्हा ज्योतीच्या बाबांनी एकच वाक्य बोलले, " पोरीच्या शाळेने आमचा संसार तारलं " त्यावेळी ज्योती सरांकडे पाहू लागली. सरांना त्यांचा कानमंत्र कामाला आला याचा आनंद वाटत होता.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...