Wednesday, 24 June 2020

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

लॉकडाऊनच्या काळात वाचलेले एक अप्रतिम पुस्तक 

लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर साहित्यकृती होय. साहित्यिक नारायण वामन टिळक यांची पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई. नाशिक जवळच्या जलालपुर हे त्यांचे जन्मगाव तर लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव मनकर्णिका असे होते आणि सर्वचजण लाडाने त्यांना मनू असे म्हणत. स्मृतिचित्रे या पुस्तकात लक्ष्मीबाई यांनी आपले माहेर, सासर आणि टिळकांसोबत घालवलेल्या अनेक आठवणी यात सांगितलेल्या आहेत. यात एकूण चार भाग असून पहिल्या भागात त्यांच्या संसारात अनेक अडचणी कसे आ वासून उभे होते याची माहिती मिळते. दुसऱ्या भागात नारायण टिळक हे ख्रिस्ती धर्म स्विकारतात त्यास लक्ष्मीबाई च्या मनात कशी घालमेल होते आणि शेवटी ते ही ख्रिस्ती धर्म स्विकारतात याचा अनुभव सांगितलं आहे. तिसऱ्या भागात नारायण टिळक यांचा मृत्यू कसा होतो ? हे अनुभव वाचायला मिळते तर शेवटच्या भागात टिळकांच्या नंतर लक्ष्मीबाई आणि त्यांचा पुत्र दत्तू यांचे जीवन अनुभव वाचण्यास मिळतात. पुस्तकात एकूण 512 पाने असून कोल्हापूरच्या रिया पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना तोंड कसे देत जावे ? दानधर्माचे महत्व, त्यांच्या पोटचा एकच लेकरू होता मात्र घर नेहमीच गोकुळ सारखे भरून राहत. दिल्याने काही गोष्टी संपतात असे वाटते मात्र उलट मानवता जोडत जाते आणि साखळी वाढत जाते हे सर्व या पुस्तकाचे वाचन केल्यावर कळते. महाराष्ट्राला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोबरे मिळाले ते या लक्ष्मीनारायण जोडीमुळे. बालकवी लहानपणी यांच्याच घरी होते ज्यावेळी ते खूप आजारी होते असा उल्लेख या पुस्तकात वाचण्यास मिळतो. जलालपूर, नाशिक, नागपूर, सातारा, पुणे, वणी, महाबळेश्वर, माथेरान येथील अनुभव वाचण्यासारखे आहेत. शेवटी ते मुंबईला गेले आणि मुंबईहून कराचीला असा जीवनप्रवास पाहायला मिळतो. जीवनात अनेक खस्ते खात खात त्यांनी आपला संसार नेटाने चालविला. प्रत्येक स्त्रियांनी जरूर हे पुस्तक वाचावं कारण ज्या प्रकारे लक्ष्मीबाई यांनी संकटात आपली नौका चालविली ते खरोखरच प्रेरणादायी आहे. अक्षरशत्रू असलेली लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या प्रेरणेने आणि मुलाच्या सहकार्याने एवढं सुंदर साहित्याची भेट आपल्या सर्व वाचकांना दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. 

- नागोराव सा. येवतीकर

पाऊस व मित्र

पाऊस व मित्र

आई म्हणते मला
नको जाऊ पावसात
अंग भिजून जाईल
थंडी भरेल अंगात

आला किती पाऊस
नक्की मी भिजणार
जवळ नाही छत्री
आता काय होणार

एवढ्यात आला मिंटू
घेऊन रंगीबेरंगी छत्री
खूप छान वाटलं जेंव्हा
त्याने जपली ही मैत्री

पाऊस झाला कमी
आम्ही पाण्यात खेळलो
पावसात वाचलो पण
पाण्यात खेळून भिजलो

आईने दिल्या शिव्या
मी चुपचाप सहन केला
मित्राच्या आठवणीने
पाऊस स्मरणात राहिला

- नासा येवतीकर, धर्माबाद ( कृष्णसुत )
9423625769

माझे बाबा

।। माझे बाबा ।।

माझे बाबा मला आजही आठवतात
पडद्यावर न येता पडद्यामागे राहतात

आई घरातल्या कामात असते मग्न
बाबा कोणतेही येऊ देत नाही विघ्न

आई करते घरातल्या सर्वांवर संस्कार
बाबा सांभाळतात घराबाहेरचे विकार

बाबांचे प्रेम आईसारखे दिसून येत नाही
संकटकाळात बाबाशिवाय पर्याय नाही

सर्वांचेच बाबा असतात अगदी प्रेमळ
बाहेरून कडक तरी आतून मात्र नितळ

- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 23 June 2020

शाळा कधी सुरू होणार ?

शाळा कधी सुरू होणार ? 

शाळा कधी सुरू होणार ? पालक, विद्यार्थी आणि अनेक नागरिकांचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाजवळ नाही. जे सध्या सरकार चालवत आहेत, त्यांच्याकडे देखील या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध नाही. त्यामुळे ते रोज नवीन घोषणा करतांना दिसून येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करतात. शाळा कश्या सुरू करता येतील ? याचे नियोजन शालेय शिक्षण मंत्री सरकार कडे सादर करतात आणि त्या अनुषंगाने शाळा सुरू करायला हरकत नाही असे ते म्हणतात. तर राज्याचे उपमुख्यमंत्री कोरोना आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू करता येणार नाही असे म्हणतात. सामान्य जनता यातून काय निर्णय घ्यावा याच संभ्रमात आहेत. जुलै महिन्यात नववी व दहावी,ऑगस्ट महिन्यात सहावी ते आठवी, सप्टेंबर महिन्यात तिसरी ते पाचवी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने आपल्या अध्यदेशाद्वारे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन तसा निर्णय घेण्याचे ही सुचविले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र शाळांचे नियोजन ही चालू आहे मात्र तरी ही शाळा कधी सुरू होणार ? याविषयी लोकांमध्ये संभ्रम अवस्था आज ही कायम आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे आणि आज तो प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात स्थिरावला आहे. सहजासहजी हा विषाणू आटोक्यात येईल याची खात्री नाही. लॉकडाऊनचे पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर अनलॉकमध्ये या जून महिन्यात त्याचा प्रादुर्भाव आणखीन वाढू लागला. शाळा सुरू करण्यासाठी परिवहन क्रिया देखील चालू करावी लागते. बस आणि रेल्वे चालू झाल्यावर अनेक नागरिकांची वर्दळ वाढेल आणि त्याच प्रमाणात कोरोना देखील पसरेल यात शंका नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देता शाळा कसे सुरू करता येईल ? यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण देण्यात अनेक समस्या येत आहेत याचे गेल्या तीन महिन्यात खूप अनुभव मिळालं आहे.  त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी लागू पडत नाही. घरात बसून बसून विद्यार्थी कंटाळलेले आहेत तर पालक देखील मुलांच्या शिक्षणाबाबतीत चिंतातुर झाले आहेत. शाळा बंद असले तरी सरकारी शाळेतील आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन चालू आहेत मात्र विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्य शाळेतील शिक्षकांचे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी शाळेत नाहीत तर फीसचे संकलन होऊ शकत नाही तेंव्हा येथील कर्मचाऱ्यांचे वेतन संस्थाचालक कुठून देणार ? वेतन नाही तर घर कसे चालवावे ? हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मनात देखील हाच प्रश्न सतावत आहे, शाळा कधी सुरू होणार ? अनेकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे, असे वाटते. काही मंडळी राज्यातील मंदिरे आणि देवालय दर्शनासाठी खुले करावीत अशी मागणी करत आहेत मात्र कोणता शिक्षक शाळा सुरू करावे म्हणून मागणी किंवा निवेदन देताना दिसून येत नाही, असे शिक्षकांना टोमणे मारत आहेत. खरंच जर शिक्षकांच्या हातात शाळा सुरू करता आली असती तर 15 जूनला ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू झाल्या असत्या. मात्र लातूर जिल्ह्यातील एक घटना जशी घडली की विना परवानगी एकाने दहावीच्या वर्गास सुरुवात केली अन त्याला कारवाईला सामोरे जावे लागले. लोकांना काय काही ही बोलणे खूप सोपे वाटते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करतांना काय त्रास होतो ते त्यांच्या वंशात जन्म घेतल्याशिवाय कळणार नाही. टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या नियोजनात ज्यांची शाळा सुरू करायची आहे त्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून सुरक्षितपणे शाळा सुरू करणे शक्य होईल का ? या सारख्या उपायांचा विचार करण्यात यावे. 

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769 

Monday, 22 June 2020

लघुकथा - पाथरवट


लघुकथा - पाथरवट

निळे सर पाचव्या वर्गात हजेरी घेत होते. राजू मोघे हे नाव घेतल्यावर क्षणभर थांबले. शाळा सुरू झाल्यापासून हा विद्यार्थी शाळेत आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तो नियमित शाळेत येत होता पण यावर्षी तो एकही दिवस शाळेत का आला नाही यावर सर विचार करू लागले. निळे सर बालरक्षक म्हणून काम पाहत होते. राजू शाळाबाह्य होऊ नये याची चिंता त्यांना सतावत होती म्हणून सर मुलांना विचारू लागले, " अरे हा राजू गावात आहे की नाही. ? " मुलांनी एकच कल्लोळ करीत म्हणाले " आहे सर, तो रोज निसर्ग हॉटेलात काम करतो, तेथेच खातो आणि रात्री उशिरा आपल्या घरी येतो. " पोरांना राजू बाबत हे सारं माहीत होतं. त्याच्या घरी जाऊन काही फायदा नाही म्हणून निळे सर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. सरांना पाहताच राजू काही बाहेर येईना. मालक राजूच्या नावाने ओरडत होता, " हे राजू, बघ गिऱ्हाईकला काय पाहिजे विचारून घे " पण राजू काही बाहेर येईना, मालक रागात जोराने बोलल्यावर तो बाहेर आला आणि निळे सरांच्या टेबलावर जाऊन भीत भीत विचारलं, " काय पाहिजे सर ? " सरांनी लगेच त्याचा हात धरला आणि विचारलं, " सांग शाळेत का येत नाहीस ? काय प्रॉब्लेम आहे ? " तो आणखीनच रडवेला झाला.  " सर तुम्हांला उद्या शाळेत येऊन सांगतो. उद्या आमचं हॉटेल बंद राहते. पण आत्ता सोडा मला " राजू म्हणाला. हॉटेल मालकांसमोर काही बोलता येत नाही म्हणून राजू तसा बोलला असेल असे सरांना वाटले. दुसऱ्या दिवशी खरोखरच राजू शाळेत आला. निळे सरांनी त्याला वेगळ्या खोलीत घेऊन गेले आणि त्याचे म्हणणे ऐकू लागले. राजू आपली कर्म कहाणी सांगू लागला, " सर, मी खूप गरीब आहे. माझ्या घरी माझ्यापेक्षा लहान तीन भावंडं आहेत, आई दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करते, मी हॉटेलात काम करतो आणि त्याच पैश्यावर आमचं घर चालते. " हे ऐकून निळे सर म्हणाले, " बाबा काय काम करतात ? " यावर राजू रडत रडत म्हणाला, " बाबा, जमेल तेवढं हमालीचं काम करतात आणि येतांना त्या मिळालेल्या पैशाचे दारू पितात. त्यामुळं मला काम करणं आवश्यक आहे नसता आमचं घर कसं चालेल ? " निळे सर राजुचे बोलणे ऐकून स्तब्ध झाले. राजू तसा लिहण्या-वाचण्यात चांगला मुलगा होता आणि शाळेतील प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याला कसे ही करून शिकवायचं असा निळे सरांनी मनातल्या मनात निर्धार  केला. राजूला हॉटेलात महिन्याचा किती पगार मिळतो हे विचारलं तेंव्हा त्याने उत्तर दिलं की, " महिन्याला हजार रु. पगार आणि दोन वेळाचे जेवण मिळते " सरांनी ठीक आहे एवढंच म्हटलं आणि राजूला घरी जाण्यास सांगितलं. निळे सरांनी डोक्यात एक कल्पना तयार केली आणि ती कल्पना आपल्या इतर मित्रांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निळे सर आणि त्यांचे मित्र निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. तसा मालकाने राजूला नेहमीप्रमाणे आवाज दिला. निळे सरांना पाहून राजू आज घाबरला नाही तो थेट टेबलाजवळ गेला आणि त्यांची ऑर्डर घेतली. तो चहा घेऊन येतांना निळे सरांच्या मित्रांपैकी एका मित्राने राजूला उभं राहायला सांगितलं. तसा राजू जागेवरच थांबला. तो मित्र एक पत्रकार होता, त्याने हॉटेल मालकाला विचारलं की, " हा मुलगा आपल्या हॉटेलात किती दिवसापासून काम करतो ? " मालकाची जराशी बोबडी वळाली, तो म्हणाला, " साहेब आजच आलाय, काही तरी काम द्या म्हणाला म्हणून त्याला ठेवलं" " पण हा तर बालकामगार दिसतोय, बालकामगार कामावर ठेवणे हा तर गुन्हा आहे. तुम्ही कसे काय यास कामावर ठेवलं ? " मालकाची आता पूर्ण बोबडी वळाली होती. साहेब माफ करा यापुढे असं होणार नाही, फोटो काढू नका म्हणून तो विनंती करत होता. मित्राने ठरवलेल्या नियोजनानुसार मालकांना म्हणाला की, " तू बालकामगार ठेवण्याचा एक गुन्हा केला आहेस म्हणून तुला एकच शिक्षा की तू याचा महिन्याचा पगार जे काही आहे ते त्याला नियमित देत जा. त्याच्या मदतीने त्याचे शिक्षण पूर्ण होईल आणि तुला आशीर्वाद मिळेल. त्यात खंड पडू देता कामा नये. " बदनामीपेक्षा त्याला ही शिक्षा बरी वाटली. तो राजुच्या खात्यात दरमहा हजार रु. टाकण्याचे कबुल केले आणि तसे जबाबदारीपूर्वक पूर्ण करत होता. निळे सरांचे एक मित्र पोलीस होते. त्या पोलिस मित्राच्या मदतीने राजुच्या बापाला ही दारूची सवय सोडायला लावली. बापाने फुकटचा पैसा नको म्हणत निसर्ग हॉटेलात मुलांच्या जागेवर काम करायला सुरुवात केली. राजुला जे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नव्हते हा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर निळे सरांनी छान कल्पना शोधून काढली आणि राजुला खरा न्याय मिळाला. त्यावर्षी निळे सरांच्या अथक प्रयत्नामुळे शाळाबाह्य होत असलेल्या राजूला नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवून दिले व त्याला नवोदय विद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश मिळाला. त्याच्या पुुुढील शिक्षणाची काळजी ही मिटली. पाथरवटच्या हातात एखादा दगड आला की, त्यावर छन्नीचे घाव घालून एक सुंदर मूर्ती तयार करतो अगदी त्याचप्रकारे शिक्षकांचे काम असते. निळे सरांनी पाथरवटासारखे काम करून राजूला घडविले.  

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday, 21 June 2020

माझे बाबा ; माझे हिरो

माझे बाबा ; माझे हिरो
आज जागतिक फॉदर्स डे आहे म्हणून माझ्या बाबाविषयी ( सायन्ना गुरुजी येवतीकर ) थोडं लिहावं म्हणतो. कदाचित हे लिहिणे संयुक्तिक आहे किंवा नाही हे मला ठरविता येणार नाही. मात्र माझे बाबा माझ्यासाठी नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आहे.
ज्यांच्यामुळे आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे यांच्यात त्यांचेच श्रेय आहे. ते जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी आज असा राहिलो नसतो. गरीब परिस्थिती मधून माझे बाबा घडले, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिली. ते तीन बहिणी आणि तीन भावंडे अश्या मोठ्या परिवारातील. त्यापैकी आज दोन बहिणी आणि दोघे भाऊ हयात आहेत. माझे आजोबा दशरथ हे कपडे विणण्याचे काम करत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन विक्री करत. ते देवधर्म करण्यात मग्न असत. त्यांना मंत्र वगैरे येत असे लोकं सांगतात. 
पारतंत्र्याच्या काळात प्राथमिक शिक्षण आणि स्वातंत्र्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करतांना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीमुळे शिक्षण सोडले नाही. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर राहत असल्याने त्यांना तेलगू आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे जमत. अगदी सुरुवातीला महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी त्यांनी तेलगू भाषेतील शाळेत नोकरीस प्रारंभ केला होता. मात्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येणे पसंद केले आणि महाराष्ट्राचे नागरिक बनले. नोकरीचा काळ ही काही सुखाचा नव्हता कारण त्याकाळी रस्ते नव्हते दळणवळणाची सुविधा नव्हती त्यामुळे जेथे नोकरी त्याच गावी राहावे लागत असे. 20-25 वर्षे त्यांनी आपले घर सोडून नोकरीच्या गावी राहिले. घरची परिस्थिती खूपच बेताची होती त्यामुळे घरून काही मदत मिळेल याची काहीही आशा नसायची. काळी छत्री, सायकल आणि शबनम असा त्यांचा पेहराव पूर्वी होता असे सांगितले जात. गावाकडे बदली झाल्यानंतर त्यांनी सायकलवर शाळा केल्याचं मला आज ही आठवते. बाबांचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार आहे. त्यांच्यासारखे अक्षर लिहिता यावे असा माझा नेहमी प्रयत्न असायचा. त्यांना वाचण्याचा खूपच छंद. त्यांच्या हातात एखादे पुस्तक आले की ते पुस्तक संपल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. माझे वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले तसे गावाच्या पत्त्यावर अनेक वाचकांचे पत्र येत असत. ते सारे पत्र मी गावी येईपर्यंत ते सांभाळून ठेवत आणि मला देत. नंतर प्रकाशित झालेली साप्ताहिके आणि मासिके येऊ लागली आणि त्यांना ते वाचण्यासाठी मिळू लागली. सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी माझ्या वडील भावाकडे असलेले सर्वच पुस्तके वाचून काढली आहेत. माझे वडील बंधू म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर काम करणारे डॉ. सुरेश येवतीकर, यांना ही वाचण्याचा विलक्षण छंद. हे जिथे जात तेथून दोन पुस्तकं हमखास आणत असत. पहिल्या पानावर आपली सही करून पुस्तक आणलेली तारीख त्याखाली लिहून ठेवण्याची त्यांची खूप जुनी सवय आज ही कायम आहे. 
मला थोडाफार वारसा या दोघांकडून मिळाला. शब्दकोडे सोडविण्याचा छंद देखील त्यांना गप्प बसू देत नाही. पुण्यनगरी आणि दैनिक चौफेर या दोन वृत्तपत्रातील सारीच कोडे सोडविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. नेहमी पेपरमध्ये डोळे लावून बसलेले माझे बाबा मात्र माझ्या आईला नकोसे वाटते. उतरत्या वयात थोडा आराम करावा असे तिला वाटते पण त्यांना कोडे सोडविल्याशिवाय करमत नाही. बाबांना शेती करण्याचा फारच हौस. सध्या शरीर साथ देत नसल्याने ते शेताकडे जास्त लक्ष देत नाहीत मात्र शेतीची खूप माहिती त्यांना आहे. लहानपणापासून अनुभव असल्याने निसर्गाच्या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत.
घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे सारखेच प्रेम. कुणावर ही तसूभर प्रेम कमी केलं नाही. आज त्यांना दोन मुले, दोन मुली आणि त्यांची मुले असे जवळपास पंधरा - वीस लोकांचा गोतावळा आहे. त्यांच्या हातात लक्ष्मी आहे असे कधी कधी आई बोलते. ते खरोखरच आहे. त्यांच्या अर्थ साहाय्याने अनेक कुटुंबाचे भले झाले आहे हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. आर्थिक देवाणघेवाणीत त्यांना अनेक लोकांनी दगा देखील दिला आहे तरी देखील ते गरजू व्यक्तीला आर्थिक मदत केल्यावाचून राहत नाही. माझे बाबा टक्केवारीने पैसे देतात असे लोकं म्हणत असतील कदाचित पण याच आर्थिक मदतीमुळे एखाद्याचे भले झालेले पाहून मनाला समाधान देखील होते. कोणाचे भले झाले आणि कोणी कोणी दगा दिला याचा उल्लेख मी करणार नाही. मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून तर फेब्रुवारी 2013 मध्ये सर्पदंश झाल्यावर मृत्यूच्या छायेतून  आम्हांला वाचविता आले. या घटनेला आज साडे सात वर्षे होत आहेत. डॉक्टरांनी देखील वाचण्याचे पन्नास टक्के खात्री दिली होती. त्यामुळे आम्ही सर्व चिंतातुर झालो मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभले आणि हा संकटाचा क्षण पार पडला. सर्वांच्या आशीर्वादामुळे ते आमच्या सोबत आहेत. माझ्या जीवनात त्यांचे अनमोल स्थान आहे. दहावीमध्ये आणि बारावीत चांगल्या मार्काने पास झालो आणि त्यानंतर डी एड साठी ते नेहमी माझ्या पाठीशी होते. मला डी एड करायचे नव्हते मात्र ते यावर ठाम होते. त्यांच्या निर्धारामुळे माझे डी एडचे शिक्षण पूर्ण झाले.  डी एड झाल्यावर शिक्षक म्हणून किनवट तालुक्यात लागलेली नोकरी सोडून देऊन घरी बसलो तेंव्हा मला त्यांनी समजावून सांगितले म्हणून ती नोकरी टिकली आणि मी पुढे गेलो. नाहीतर आज मला नंतर नोकरी लागली नसती असे चित्र दिसले होते. माझे बाबा सर्वांवर नकळत प्रेम करायचे. शहरातून किंवा बाहेरून कोठून येताना ते नेहमी काही ना काही आणत असत. त्यांनी जेवढं आम्हांला केलं तेवढं नातलगांना देखील केलं आहे. 

लोकांना तर चांगल्या माणसात देखील अवगुणच दिसतात, माझ्या बाबामध्ये लोकांच्या दृष्टीने असतील ही काही अवगुण पण माझ्या नजरेत माझे बाबा म्हणजे माझे हिरो आहेत.
धन्यवाद .....!
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Thursday, 18 June 2020

fathers day

. . . . . .  लेख : पितृदेवो भव . . . .
मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत; परंतु वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते.
गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळय़ाचा, प्रेमाचा संबंध असतो.आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमाणसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु खरोखरच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठूर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्‍याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे. मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी 'बाप' या कवितेद्वारे  समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे.

घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तर वडील मात्र कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो.

त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडशे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात.

भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची अशी प्रथा आहे. (सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र ते स्थान प्राप्त करणे फार जिकरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे अनुवंषिक गुणधर्म फार मोठय़ा प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे.

आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि स्वाभिमान संपतो. दुसर्‍याला उपदेश करूच शकत नाही. 'मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला' उक्तीप्रमाणे वागणे निश्‍चित जमणार नाही.

मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळापर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्‍या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल.

वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे. सार्‍याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असे जीवन जगणे आवश्यक आहे.

नागोराव सा.येवतीकर
मु. येवती, ता. धर्माबाद  (९४२३६२५७६९)

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...