Monday, 2 December 2019

करू नका


      .          ।। करू नका ।।

प्रेमाने बोलत रहा असे करू नका वाद
जीवनात चांगल्या गोष्टीना करू नका बाद

पती-पत्नीनी नेहमी रहावे एकोप्याने 
वाद वाढतील असे करू नका संवाद

संसारात सदा चढ-उतार येतच राहतात
जीवनातल्या कटु प्रसंगाना करू नका याद

मानवी जन्म आहे श्रेष्ठ मिळणार नाही पुन्हा 
जीवन आहे अनमोल असे करू नका बरबाद

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769


कविता - पाऊस


।। पाऊस ।।

आभाळ दाटले बघ नभी
होईल भरपूर बरसात
पाऊसधारा अंगावर झेलू
मनसोक्त नाचू या पाण्यात

वादळवारे लगेच सुटतील
ढगे पळतील वेगात
छत्रीविना पाऊस पाहू
भिजुन जाऊया पाण्यात

पडला जोराचा पाऊस
साचले पाणी खड्यात
कागदाची होडी करू या 
वाहून जाऊ द्या पाण्यात

थांबला एकदाचे पाऊस
खेळूया झिम्मड पाण्यात
एकमेकावर पाणी उडवू
खेळ आलाय पहा रंगात

- नासा येवतीकर, धर्माबाद


Saturday, 30 November 2019

कविता - मामाचे गाव

मामाचे गाव

मामाचे गाव 
खूपच छान
भेटतो सारे
होऊन लहान

मामाचे गाव
आहे लहान
लोकं सारी 
आहेत महान

मामाचे घर 
अगदी लहान
खेळायला मोठे 
अंगण छान

मामाच्या घरची
मिरची भाकर
खातांना वाटते
गोड गोड साखर

मामाच्या घरी 
दिवा वातीचा
तरी ही शोभून 
दिसते रात्रीचा

मामाच्या घरात 
नाही मुळीच टीव्ही
एकमेका संवाद
दुसरा पर्याय नाही

मामाच्या घरी आहे
मोठा काळा कुत्रा
चोरांना पळवून लावी
नव्हता मुळीच भित्रा

मामाच्या घरात
छोटेसे मनीमाऊ
दूध पितांना झालो
आम्ही भाऊ भाऊ

मामाचे गाव
आहे दूर दूर
जाताना मनात
नेहमी हूर हूर

मामाचे गाव
माझ्या मनात
कोरून ठेवलंय
हृदयाच्या कप्प्यात

मामाचे गाव
आवडते भारी
बालपणीचे मित्र
भेटतात सारी 

- नासा येवतीकर
9423625769

कविता - विठ्ठलाचा ध्यास

।। विठ्ठलाचा ध्यास ।।

मनी लागे आस
भेटावया खास
लागला तो ध्यास
विठ्ठलाचा

दूर ती पंढरी
मुखी नाम हरी
पायी चाले वारी
वारकरी

ऊन वारा पाणी
कुणी अनवाणी
संग अन्नपाणी
घेऊनिया

ओढ पंढरीची
पर्वा ना जीवाची
नाम जपायची
पांडुरंगा

सोडुनिया घर
चालला तो दूर
लागे हूर हूर
मनाचिया

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक

।। पुस्तक ।।

पुस्तक म्हणजे ज्ञानाचा झरा
पुस्तक म्हणजे माझा मित्र खरा

पुस्तक बोलतो माझ्याशी
पुस्तक ज्ञान देतो सगळ्यांशी

पुस्तकांचे असावे एक घर
वाचत बसावे दिवसभर

पुस्तक देतो स्नेह आणि प्रेम
आईच्या प्रेमासारखंच सेम

एकटा असतो जेंव्हा घरात
डोळे खुपसून असती पुस्तकात

पुस्तकाला करू नका दूर
त्याशिवाय मनाला लागते हूर

चला पुस्तकांशी मैत्री करू
आपल्या डोक्यात ज्ञान भरू

- नासा येवतीकर

विठ्ठल विठ्ठल

।। विठ्ठल विठ्ठल ।।

नाम विठ्ठल
काम विठ्ठल
माझे दाम ही
विठ्ठल विठ्ठल

कर्म विठ्ठल
मर्म विठ्ठल
माझा धर्म ही
विठ्ठल विठ्ठल

पुढे विठ्ठल
मागे विठ्ठल
माझ्या या देही
विठ्ठल विठ्ठल

उठता विठ्ठल
झोपता विठ्ठल
माझ्या सर्वस्वी
विठ्ठल विठ्ठल

चालता विठ्ठल
बोलता विठ्ठल
काम करता ही
विठ्ठल विठ्ठल

नासा येवतीकर, धर्माबाद

Friday, 29 November 2019

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे



कुटुंब ही मुलांची पहिली शाळा असते. आई ही त्याची पहिली शिक्षिका असते तर वडील त्याचे दुसरे शिक्षक. वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे शिक्षणासाठी शाळेत जाण्यापूर्वी तो घरातच वावरत असतो. या वयात मुलांना चांगले काही ऐकायला आणि बघायला मिळाले तर आपले मूल नक्की बुद्धिमान होऊ शकते. खास करून आईने मुलांना नेहमी काही ना काही ऐकू घालावे. उदाहरण म्हणून आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन विचारात घेता येईल. मा जिजाऊ यांनी बाल शिवाजी यानाा लहानपणी रामायण आणि महाभारत यातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे राजे घडले. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी थोडा वेळ अवश्य काढावे. मुलांना असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्यावी. कुटूंबातील वाद किंवा कलह मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करत असतो. म्हणून कुटुंबात नेहमी प्रेमाचे आणि खेळीमेळीचे वातावरण असायला हवे. 
आपण लावलेले रोपटे चांगले वाढावे म्हणून त्यास आपण नित्यनेमाने पाणी टाकतो. सूर्यप्रकाशात त्याची वाढ चांगली होते. मुलांच्या बाबतीत देखील असेच आहे. मुलांच्या निकोप वाढीसाठी आईने पाण्याचे काम करावे तर वडिलांने सूर्यप्रकाश व्हावे. वयाच्या दहाव्या वर्षेपर्यंत मुलांकडे विशेष लक्ष दिले की पुन्हा त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची गरज भासत नाही. तेंव्हा नुकतेच पालक झालेल्या आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. 
- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...