Monday, 21 May 2018

लेख क्रमांक 11 तंबाखूमुक्त

तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?

जागतिक आरोग्य संघटनेने WHO तंबाखूला जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. जगामध्ये प्रत्येक वर्षी तंबाखूच्या आजाराने पन्नास लक्ष लोक मरतात तर एकट्या भारतात दहा लक्ष लोक तंबाखूमुळे आपले जीवन गमावितात. तंबाखूच्या वापरामुळे हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार तसेच इतर असंसर्गजन्य रोग होतात. भारतामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. पुरुष मंडळी तर सोडाच त्याठिकाणी लहान मुले आणि स्त्रिया सुद्धा तंबाखूच्या आहारी गेलेली दिसून येतात. विडी, सिगारेट, गुटखा, जर्दा अशा विविध माध्यमातून व्यक्ती तंबाखूचा वापर करीत असतो. ज्याप्रकारे चहा पिल्यामुळे मनाला तरतरी मिळते असे वाटते त्याच धर्तीवर तंबाखूच्या सेवनाने तरतरी मिळते, माइंड फ्रेश होते, बुद्धीला चालना मिळते, डोकं चालायला लागते असा काही लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरलेला आहे. तंबाखू खाणारे मंडळी वरील कारणे सांगून तंबाखू खाण्याचे समर्थन करणारी वक्तव्य करतात. तंबाखू सेवनाने कर्करोग होतो किंवा नाही या विषयावर अजूनपर्यंत संशोधन झाले नाही किंवा हे खरच आहे असेही सांगता येत नाही. यावर मागील काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा झाली आणि वाद-विवाद सुद्धा झाले. तंबाखूचे समर्थन व्यक्त करणारी मंडळी तंबाखूसेवनाने काही ही होत नाही, कोणताच आजार होत नाही असे सांगतात. आमचे आजोबा तंबाखू खात होते परंतु ते वयाच्या ऐंशीव्या वर्षी नैसर्गिकपणे वारले असे घरातील उदाहरण देऊन पटवून सांगतात. त्यास्तव कधीकधी अशा बोलण्यावर विश्वास टाकला जातो. परंतु तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले तर मात्र अति तेथे माती या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनाची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही तेवढेच खरे आहे. म्हणून तंबाखू खाणे किंवा सिगारेट, बिडी पिण्याची सवय आपणास लागू नये याची प्रथम काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता तंबाखूचे सेवन करणे ही वाईट सवय आहे. समाजामध्ये या सवयीला कोणी ही चांगले म्हणणार नाही. कारण यामुळे चार-चौघात बसलेले असताना आपणास वारंवार बाजूला जावे लागते, थुंकावे लागते. बोलताना त्रास होतो, आपल्या थुंकण्याचा इतरांना त्रास होतो. म्हणून आपल्या पासून सर्वजण चार हात दूर राहणे चांगले असे ते समजतात. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्याच्या शेजारी असलेल्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतो.
तंबाखू खाण्याची सवय सहवासातून लागते. मित्रांच्या संगतीत राहून तंबाखूच्या आहारी गेलेली बरीचशी मंडळी भेटतात आणि अगदी हताशपणे बोलतात की ही सवय सुटणे फारच अवघड बाब आहे. खूप प्रयत्न करून पाहिला पण सवय काही तुटत नाही, राव असे एकांतात मित्रांशी बोलतात. जास्तीत जास्त मित्रांचा सहवास शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात असतो आणि त्याच कालावधीत तंबाखू सेवनाची सवय लागण्याची दाट शक्यता असते. या शालेय वयात तंबाखू खाण्याची सवय मोठेपणी काही केल्या सोडवत नाही. आणि जे या काळात तंबाखूपासून दूर राहतात त्यांच्या जीवनात तंबाखू कधीच प्रवेश करत नाही, असा बर्‍याच लोकांचा अनुभव आहे. म्हणूनच या शाळा-महाविद्यालयात मुलांना तंबाखूची सवय लागणार नाही याची काळजी मुख्याध्यापक, शाळा व संस्थेचे घटक आणि पालक या सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे तंबाखू खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तंबाखूवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक संस्थेसह सार्वजनिक ठिकाणी तंबाखूवरील बंदी सक्तीचे करण्यात आले आहे. लहान मुलांकडून तंबाखू विक्री करण्यास मनाई तर आहेच शिवाय शालेय परिसरात 100 यार्ड मध्ये तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा मोठ्या अक्षरात फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचे बंधनकारक केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडासह शिक्षापात्र गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमाची कठोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र तरीही शाळा कॉलेज च्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकत मिळतात हे खरोखरच चिंतनीय बाब आहे. मुलांना सहजरित्या हे मिळत असल्यामुळे मुले त्याकडे आकर्षित होतात. सर्वप्रथम शाळेला लक्ष्य करून तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम सर्व राज्यभर राबविण्यात यावा. प्रत्येक शाळेतवरील दर्शनी भागात दिसेल आणि तंबाखूचे दुष्परिणाम काय होतात याचे चित्र शाळेत लावल्यास त्याचे अनुकूल परिणाम नक्कीच बघायला मिळेल. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनासुद्धा त्याची माहिती होईल आणि त्यांच्या घरी कोणी तंबाखू खाणारे असतील तर मुले त्यांना तंबाखू खाण्याचा सल्ला देऊन तंबाखू खाण्यापासून परावृत्त करू शकतील. मुलांनी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम नक्की दिसून येतो, हा एक अनुभव आहे. तेंव्हा आज जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त तंबाखूला आपल्या जीवनातून वेळीच हद्दपार करण्यासाठी जागे व्हा व तंबाखूमुक्त जीवन जगूया.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday, 20 May 2018

लेख क्रमांक 10 जलसाक्षरता

जलसाक्षरता : काळाची गरज

मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले. पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे. 
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही. त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही. व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे  प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday, 19 May 2018

लेख क्रमांक 09 दैव

दैवं चैवात्र पंचमम

जीवनात दैवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी दैवाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने दैवाचे महत्व स्वीकारावेच लागेल. माणूस भलेही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या अक्कलहुशारीचा डंका पिटवत असेल, पण त्यामागे त्याचे दैव काम करीत असते. स्वतःच्या हिमतीवर, स्वबळावर हे सारे निर्माण केले आहे असे मानणारा व्यक्ती दैवावर विश्वास ठेवत नाही. परंतु जो दुःखी आहे, अनंत कष्ट उपसून सुद्धा ज्याला यश मिळाले नाही ती व्यक्ती मात्र दैवावर अविश्वास दाखवित रडत बसते. आज आपलं सगळच चांगला आहे, बुद्धी देखील चांगली आहे. परंतु भविष्यकाळ उज्ज्वल बनवायचा असेल तर कुशल रहावेच लागते. गेल्या जन्मात जी काही कर्मे केली त्याचे यथायोग्य फळ दैव रूपाने या जन्मात प्राप्त झाले आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्मलेल्या बालकांना पाहून सहज म्हटल्या जाते की, काय दैेव आहे त्याचे, जन्मल्याबरोबर करोडपतींच्या यादीत आहे. जीवनात दैव फार मोठे काम करते.  सामान्य माणसाने विचार केला ना समजेल की जीवनात दैव किती महत्त्वाचे आहे ?
खेडेगावात उद्योगधंदे नसतात. हाताला काम नसते म्हणून खिशात पैसा नसतो. श्रीमंत जर व्हायचे असेल तर भरपूर काम करावे लागते आणि भरपूर प्रमाणात काम फक्त शहरातच मिळू शकते. त्यासाठी खेडेगावातील बेरोजगार युवकांची लोंढे शहराकडे धाव घेतात. मोठ्या शहरात आल्यानंतर प्रत्येकालाच लहान मोठ्या स्वरूपात काम मिळते. परंतु ज्यांचे दैव चांगले असते त्यांची वर्षानुवर्षे प्रगतीच होत राहते. काही वर्षानंतर तो त्या शहरातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील पंक्तीत सुद्धा बसतो. शहरात आलेले सर्वच जण करोडपती होतात असेही नाही. ज्यांचे दैव चांगले अशांनाच यश मिळते. ज्यांचे दैव नाही ते रिकाम्या हाताने परत फिरतात. जीवनात दैवाला देखील स्थान आहे हे लक्षात ठेवूनच जीवन व्यवहार केला पाहिजे. वरील उदाहरण फक्त शहरात येणार्‍या बेरोजगार युवक एवढ्यापुरताच मर्यादित असून प्रत्येक क्षेत्रात असेअनुभव बघायला मिळतात.
वैयक्तिक जीवनात तर दैवाचे महत्त्व आहेच पण ऐतिहासिकदृष्ट्या देखील विचार केला तर अशा कित्येक घटना आहेत की जिथे दैव आहेच असे मानावे लागेल. परंतु इतिहासकार त्यास दैव मानीत नाहीत ही बाब वेगळी. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याच्या तुरुंगात बंद केले होते.  किल्ल्यामधून बाहेर पळून जाण्यासाठी महाराजांनी कमालीची युक्ती योजली. येथून दररोज मिठाईच्या पेट्या आत बाहेर जात असत. रखवालदार त्यांची रोज कसून तपासणी करीत असत. एके दिवशी महाराज एका पेटीत बसले. रखवालदार पहिल्या एक-दोन पेट्यांची तपासणी केली परंतु त्यानंतरच्या पेट्या त्यांनी तपासले नाहीत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तेथून पलायन करता आले, हे दैव नव्हे का? महाराजांच्या दिमतीला दैव राहिला नसता तर त्यांची वरील युक्ती असफल ठरली असती की नाही ?  असा विचार केला तर....
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजकारणात आले नसते तर ते एका शाळेवर शिक्षक राहिले असते असे त्यांनी एका भाषणात बोलतांना व्यक्त केले. त्यांचे दैव यांना शिक्षक बनवू दिले नाही कारण त्यांना भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर बसायचे होते. म्हणून असे म्हटले जाते की दैवापुढे कोणाचे काही चालत नाही. दे रे हरी पलंगावरी म्हणत बसले तरी दैव इकडे धावून येत नाही. काही ही न करता आपण दैवाला नेहमी दोष देत राहतो. तसेच जीवनात दैवाला आपण पहिले स्थान देतो. वास्तविक  दैवाचे स्थान पाचवी आहे. संस्कृत मध्ये याविषयी सुंदर वर्णन केले आहे त्याची आठवण सर्वांनी नेहमी ठेवावीत.

अधिष्ठानं तथा कर्ता करणंच प्रथग्विधम
विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम

याचा अर्थ अधिष्ठान पहा,कर्ता पहा, मग त्यानंतर जे यश मिळते ते दैवामुळे असे म्हणायला हरकत नाही. तेंव्हा चला तर मग आपल्या दैवाला दोष न देता काम करीत राहू आणि शेवटी दैवाकडे पाहू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 08 अतिथी

अतिथी देवो भव

अतिथी सत्काराचा मूळ हेतू म्हणजे माणसांमध्ये देण्याची वृत्ती फुलविणे हा आहे. आज माणसांमध्ये देण्याची वृत्ती संपुष्टात आली आहे म्हणून नीतिशास्त्र कार म्हणतात " दाता भवती वा न वा".  दाता कोणी होईल की नाही शंकाच आहे. भारतीय संस्कृतीला फार प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपण " अतिथी देवो भव " अतिथीला देव माना असे म्हटले जाते. त्यानुसार आजपर्यंत अतिथी मंडळीचा यथायोग्य सन्मान व व्यवस्था केल्या जात असे. परंतु आज समाजात असे चित्र फार कमी बघायला मिळत आहे. असे का ? त्याला अनंत कारणेही आहेत, नाहीत असे नाही. अतिथी म्हणजे वेळ-काळ सांगून न येणारा पाहुणा. सहा महिने ठाण मांडून बसतो त्यास अतिथी म्हणत नाहीत. जो पाहूणा त्या घरात दुसरा दिवस राहत नाही तो अतिथी. याविषयी संस्कृत मधील ओळी लक्षात घ्यावे
" न विद्यते द्वितीया तिथी : यस्य स : अतिथी "
तेव्हा अतिथी घरात आल्यानंतर त्याला देण्याची, त्याची समाधान करण्याची वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस आपली देण्याची वृत्ती कमी होत आहे. दुसऱ्यांना काहीच न देता घेण्याची वृत्ती माणसाकडे वाढतच जात आहे, ज्यामुळे समाजातील नैतिकता घसरत आहे. इतरांना काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे. आपण बाजारातून येताना घरात खाऊ आणतो. घरी आल्याबरोबर घरातील लहान मुले हातातील पिशवी घेतात आणि त्यातील खाऊ काढून घेतात. तो इतरांचा विचार न करता ताबडतोब खाण्यास सुरुवात करतात. घेण्यासाठी त्याच्यावर काही संस्कार करण्याची गरज नाही. पण त्याचाच हाताने इतरांना वाटण्याची क्रिया करताना नकळत संस्कार होऊन जातात. काही पालक आपल्या मुलांवर अति लाड करतात त्यामुळे ते बिघडतात म्हणजेच त्यांच्यावर संस्कार होत नाहीत. पालक त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती निर्माण करू शकत नाहीत कारण अति लाड आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात संस्कार नावाची वस्तू शोधूनही सापडत नाही. घरातील सदस्यांची संख्या जेवढी जास्त तेवढा जास्त प्रमाणात त्यांच्यावर संस्कार होतात हा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये लोकांना अनुभवास येतो.
घरातील संस्कार लोप पावत चालल्यामुळे आज प्रत्येक जण खाण्याच्या मागे लागून खानसाहेब झाले आहेत. देण्याची अथवा दानाची भावना आज लुप्त झाली आहे. आपली जुनी परंपरा आहे की माणूस एकटा कधीच जेवत नाही. जेवण्यापूर्वी ताटाजवळ पहिला घास ठेवण्याची प्रथा आजही बघायला मिळते. कोणी म्हणतात पहिला घास देवाचा तर शास्त्र म्हणते " स्वचंडालभूतपतितवायसे " याचा अर्थ कुत्रा,चांडाळ, भूत, पतित कावळा सर्वांसाठी माणूस पहिल्या घासाचा अन्न बाजूला ठेवतो. आजच्या बुफे किंवा डायनिंग टेबलावरच्या जेवणाच्या पद्धतीत माणूस आपले संस्कार पार विसरून जात आहे. पहिला घास बाजूला ठेवत नाहीत ते अतिथीचा आवभगत कसे करतील ?
ग्रामीण भागात आजही संस्काराचे काही चांगले अनुभव बघायला मिळतात. गावात एखादा अतिथी व्यक्ती आल्यास त्याची योग्यप्रकारे विचारपूस करून त्याची सोय करतात. तर इकडे शहरांमध्ये अतिथी दिसला की संधी साधून त्याची फसवणूक केली जाते. त्याची सर्वप्रकारे गैरसोय केल्या जाते. माणसाची नीती पूर्णपणे बदलून जाते कारण येथे अशाच प्रकारचे संस्कार केले जातात. घरात, गल्लीत, परिसरात शहरात सर्वच जण विवेकहीन वागतात. मग ते अतिथीला योग्य सन्मान देऊ शकतील काय ? याचे उत्तर अर्थातच नाही. तेथे त्यांना सुद्धा असंख्य समस्या असतात. साधे ते प्रेमाने चौकशी सुद्धा करत नाहीत. जर केलेच आणि तो अतिथी आपणास चिकटला तर त्याची सोय कुठे करू याची भीतीसुद्धा मनात असते.
प्राचीन काळात अतिथींना देव माना असे संस्कार होत असत. परंतु आज काळ वेगळा आहे. आज लोकांच्या अनेक समस्या आहेत त्यातुन त्यांची सुटका होणे अशक्य आहे. त्यामुळे अतिथीला देव मानणाऱ्याची संख्या फार कमी झाली आहे. याउलट अतिथीला दूर करा म्हणणार्‍या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढीस लागली ही चिंताजनक बाब आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...