Tuesday, 6 March 2018

निकाल .....! निकाल ......! निकाल .....


साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समूहाकडून 
जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त 
आयोजित करण्यात आलेल्या 
*मराठी लेखन हस्ताक्षर स्पर्धा*

या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना विशेष आनंद होतो आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी गटामध्ये 

प्रथम क्रमांक - दीप्ती दादा क्षीरसागर
वर्ग - चौथा जि मराठी शाळा चोरमलेवस्ती, पुणे

द्वितीय क्रमांक - अनुष्का अनिल बेद्रे
वर्ग - दुसरा वसुंधरा प्रा. विद्यालय, आष्टी, बीड

तृतीय क्रमांक - गायत्री पवार
वर्ग - चौथा शिशु विहार बालक मंदीर

उत्तेजनार्थ -
01) दीपाली राजेश घाटे, वर्ग पाचवा
    जि प प्रा कें शा कार्ली, अकोला
02) उल्हास प्रकाश ढुमसे, वर्ग चौथा
   जि प प्रा शाळा इंशी, नाशिक
03) सानिका संतोष मिसळे, वर्ग पाचवा
    जि प प्रा कें शा कार्ली, अकोला
04) शंकर अनिल गायकवाड, वर्ग तिसरा
जि प प्रा शाळा बामणी थडी, धर्माबाद
05) कृष्णा गजानन हातरगे, वर्ग पाचवा
जि प हा. बोधडी बु. किनवट


इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये 

प्रथम क्रमांक - रुचिता संजय महानोर,
वर्ग सहावा जि प कें प्रा शाळा सातारा , औरंगाबाद

द्वितीय क्रमांक - प्रतीक्षा प्रभाकर राऊत
वर्ग सहावा जि प प्रा कें शा कार्ली, अकोला

तृतीय क्रमांक - ढेमे प्रफुल्ल अशोक,
वर्ग सातवा मातोश्री सरस्वती प्रा. वि. आडगाव शिवार, नाशिक

उत्तेजनार्थ -
01) गुळवे वैष्णवी बालाजी, वर्ग सातवा
जि प प्रा शा जवळे बु. उस्मानाबाद
02) पूजा पुंडलिक पाटील वर्ग आठवा
जि प प्रा शा जुन्नी
03) शुभम साहेबराव डोंगरे, वर्ग सातव
    जि प प्रा शा माचनूर, बिलोली
04) वनश्री अरुण ढबाले, वर्ग सातवा
    जि प पू. मा. शा मांडवी, भंडारा
05) कांबळे सपना नारायण वर्ग सातवा
    जि प प्रा शा कुंभारवाडी, लातूर


इयत्ता नववी ते बारावी गटामध्ये
प्रथम क्रमांक - अथर्व सुरेश सुतार
वर्ग नववा राजा रघुनाथराव वि. भोर

द्वितीय क्रमांक - भूषण अरविंद पारकर
वर्ग दहावी, विद्याभावन हायस्कुल घाटकोपर

तृतीय क्रमांक -लक्ष्मी सूर्यकांत आक्कलवाड
वर्ग नववा के. एम. पाटील मा. वि. पाटोदा बु. धर्माबाद

उत्तेजनार्थ -
01) शुभांगी गणेशराव भाले
वर्ग नववा जि प हा धर्माबाद
02) विशाखा राजेंद्र साळी
वर्ग बारावी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद
03) प्राजक्ता संजय टाकळीकर, वर्ग दहावा
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, बिलोली
04) अंजली श्याम गोरे, वर्ग नववा
जि प.हा. करखेली, धर्माबाद
05) चैत्राली श्रीराम केळकर, वर्ग अकरावी
रामनिवास रुईया महा. माटुंगा

आणि

खुल्या गटामध्ये 

प्रथम क्रमांक - डॉ. शरयू शरद शहा, मुंबई

द्वितीय क्रमांक - शरद पांडुरंग शेळकंदे, सहशिक्षक, जि प प्रा शाळा टाकळी भीमा, पुणे

तृतीय क्रमांक - सुरेश महादेव सुतार प्राथमिक शिक्षक जि प प्रा शाळा बारे, पुणे

उत्तेजनार्थ -
01) राजेंद्र रामहरी टेकाडे, प्रा.शि. जि प प्रा शा भोरगड, नागपूर
02) अनिल दिगांबर बेद्रे, जि प प्रा शा वनवेवाडी, बीड
03) सौ. स्वाती दिलीप गडाख, नाशिक
04) किरण राजेंद्र बागूल, नाशिक
05) शीतल दिनकर भालेकर, प्रा. शि. जि प प्रा शा पिंपळगाव, नांदेड



पूर्ण पारदर्शीपणे निकाल देण्याचा आमचा प्रयत्न होता. आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दीक आभार. ज्यांचे नाव पुरस्कारामध्ये आले आहेत त्यांना लवकरच त्यांचे ई-प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरित करण्यात येतील. 
साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समूहातील सर्व सदस्य


Congratulation .........!

पारितोषिक :-*

कै. खंडेराव माणिक इटलोड यांच्या स्मरणार्थ रमेश इटलोड यांचेकडून प्रत्येक गटात प्रथम क्रमांक पारितोषिक (151/-) 

कै. शिवानंद शिलारे यांच्या स्मरणार्थ उदय शिलारे यांचेकडून प्रत्येक गटात द्वितीय क्रमांक पारितोषिक ( 101/- )

कै. कारभारी सयाजी नरसिमलू अवधूतवार यांच्या स्मरणार्थ धनराज अवधूतवार यांचेकडून प्रत्येक गटात तृतीय क्रमांक पारितोषिक ( 51/- ) ........

कै. हणमंत नारायण जेटेवाड बरबडेकर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक गटात उत्तेजनार्थ पारितोषिक ( प्रत्येकी 25/- ) आर. एच. जेटेवाड बरबडेकर यांचेकडून ( एकूण 501/- )

लवकरच वितरित करण्यात येणार.

( टीप : विजेत्या स्पर्धकांची लेखन कॉपी पोस्ट करण्याची मागणी करू नये. कमिटीचा निर्णय अंतिम असेल. याच ब्लॉग वर आपले comment दिल्यास आमच्यापर्यंत ते पोहोचतील. )

धन्यवाद ........!






मुलींचे शिक्षण

08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रासंगिक लेख

* मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण *

शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत समाजात, मि‍डियामध्‍ये जोरदार चर्चा होते.. खरोखरच शनि मंदिराच्‍या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्‍यांचे सारेच प्रश्‍न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजासहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्‍या जाते. त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडल्‍या जात नाही त्‍यांमूळे त्‍यांच्‍या वरील अन्‍याय काही केल्‍या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्‍ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्‍याय महिलांनीच सक्षमरित्‍या सामना करून सोडविले पाहिजे, त्‍याशिवाय महिलांची प्रगती अशक्‍य आहे आणि ही शक्‍ती महिलांमध्ये फक्‍त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्‍त्रोत आहे. शिक्षण घेतल्‍यामुळे आपल्‍या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते.  यांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणून आपण महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि त्‍यांची पत्‍नी सावित्राबाई फुले यांच्‍या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्‍नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्‍वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्‍नी सावित्रीबाईला साक्षर  करण्‍याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्‍यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्‍या घरात शिक्षण दिले. त्‍याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्‍याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्‍याच्‍या क्षेत्रात त्‍यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्‍मा फुले यांना शिक्षणाचे महत्‍व कळाले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सन १८४८ मध्‍ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्‍त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्‍यांची धारणा होती त्‍यातूनच मग त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीला शिकवले. असे महत्‍व प्रत्‍येक पालकांना,  नव-यांना म्‍हणजेच  पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे  म्‍हणण्‍यापेक्षा मुलांच्‍या व मुलींच्‍या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची  भावना  अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्‍या गुलामीगिरीच्‍या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्‍छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्‍ट. भारत स्‍वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्‍या होती. त्‍यातल्‍या त्‍यात महिलांची निरक्षरता तर देशाच्‍या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्‍यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्‍या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्‍या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्‍या बाबतीत भारताची प्रगती उल्‍लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार  नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्‍या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.  शासनाने मुलींच्‍या  शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्‍हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्‍ता,  सावित्रीबाई फुले दत्‍तक पालक योजना, मोफत  गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने  मोफत  प्रवास  करण्‍यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्‍या अनेक योजनाच्‍या माध्‍यमातून मुलींच्‍या शिक्षणासाठी शासन  प्रयत्‍न करीत होते आणि करीत आहे. त्‍यांना त्‍यात काही अंशी यश  मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्‍यांची अनेक कारणे आहेत. त्‍या कारणाचा  विचार करून त्‍यावर उपाय योजना  करणे आवश्‍यक  आहे. 
* पालकांची शिक्षणाबात अनास्‍था - 
मुलींच्‍या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील  पालकामध्‍ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी  भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्‍वत: शिक्षणाच्‍या  बाबतीत अनभिज्ञ असतात,  त्‍यामुळे त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व पटत नाही. बरं  शिक्षणाचे महत्‍व पटत नाही असे जर म्‍हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्‍या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू  देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्‍या वर्गापर्यंत शाळा त्‍याच  वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्‍याची मुभा  दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्‍या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्‍याठिकाणी जाण्‍यासाठी मुलींना परवानगी दिली  जात नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे आज प्राथमिक  वर्गातील मुलींची  संख्‍या माध्‍यमिक वर्गात गेल्‍यावर ५० % पेक्षा कमी होते तर उच्च शिक्षणात त्याहून ही कमी होतात. ही गळती मुलीच्‍या विकासास नक्‍कीच बाधक ठरत आहे. 
* अनिष्‍ठ रूढी व परंपरा - 
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्‍ठ रुढी व परंपरेच्‍या खोल गर्तेतुन बाहेर येण्‍यास तयार नाहीत. मुलींच्‍या शिक्षणाविषयी त्‍यांच्‍या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्‍यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्‍या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्‍न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे  पुढील शिक्षण बंद करण्‍यात आल्‍याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्‍यासाठी एखादे चांगले स्‍थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून मुलींविषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्‍पष्‍टपणे दिसून येते. सध्‍या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्‍या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्‍या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्‍याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्‍हणजे हुंडा. यामुळेसुध्‍दा मुलींच्‍या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्‍या मुलींना खुप शिकविले, तिच्‍या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्‍या लग्‍नाच्‍या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्‍या शिक्षणास घातक ठरत आहे. त्‍यामुळे अश्‍या अनिष्‍ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्‍यावश्‍यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्‍हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्‍या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्वसामान्‍य विचार पालक करतोच, यात त्‍याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्‍वत:च्‍या बुध्‍दीमत्‍तेच्‍या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान या सर्वच गोष्‍टी वाढीस लागतात. महिलांच्‍या हातात स्‍वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्‍याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्‍वाभिमानाने जीवन जगता येते. स्‍वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्‍ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्‍याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्‍यात यश सुध्‍दा मिळवू शकतात. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण अत्‍यंत महत्‍चाचे आहे.
* हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण - 
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा, मिताली राज इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत. ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्‍या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार  समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्‍हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्‍तव नाकारून चालणार नाही. देशाच्‍या राजकारणात आणि इतर महत्‍चाच्‍या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्‍यांच्‍यात धाडस, साहस, प्रगती व्‍हावी यासाठी सरकारने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्‍यांनी निवडणूक जिंकून सत्‍ता व पद मिळविले आहेत. त्‍या पदावर खरोखरच महिलाच राज्‍य करीत आहेत काय ? याचे वास्‍तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्‍याचे सभापती, शहराचे नगराध्‍यक्ष किवा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे.  त्‍यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्‍या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्‍हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्‍या नसल्‍यामूळे ते आपल्‍या पतीच्‍या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्‍या हेतूने किंवा उदेश्‍याने नियमावली तयार केली त्‍याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो.  आपणाला आपले हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्‍या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्‍या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल. 
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्‍या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्‍याची गरज घरातील मुलींकडून पूर्ण केल्‍या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्‍यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलींविषयी वेगळाच. एवढं असून सुध्‍दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्‍यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्‍त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्‍यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्‍या दहामध्‍ये सर्वश्रेष्‍ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्‍ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतील परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? याबाबत प्रश्‍नचिन्‍हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्‍न करतो. कुठे ना कुठे रोजगार मिळवून स्वतः च्या पायावर उभा राहतो. तसेच मुलींच्या बाबतीत विचार केला जात नाही, ही प्रथा कुठे तरी बंद व्‍हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्‍या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्‍यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्‍वत:बद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्‍या सुरक्षित आयुष्‍यासाठी तिला वयाच्‍या आठराव्‍या वर्षापर्यंत शिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्‍यक आहे. पराया धन किंवा परक्‍या घरची सून म्‍हणून जाणारी, आपल्‍या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्‍या गोष्‍टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्‍या विरूध्‍द आवाज उठविण्‍यासाठी  मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण म्‍हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे. 

- नागोराव सा. येवतीकर 
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

Monday, 5 March 2018

जागतिक महिला दिन

स्‍त्री जन्‍माचे स्वागत करूया ...!

" नकोशीला फेकून मातेचे पलायन, मुलीला जन्म दिला म्हणून सुनेला जाळले, मुलींची भ्रूण हत्या करण्यात जिल्हा अग्रेसर " अशा मथळ्याच्या बातम्या जेंव्हा  ऐकायला आणि वाचायला मिळतात तेव्हा वरील क्रूर कर्म करणार्‍या मंडळीविषयी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि वाटते की, आपल्या पाल्याविषयी एवढे निष्ठुर का होतात ? समाजात आजही असे कुटुंब आढळते की ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असते मग ती मुलगा असो वा मुलगी, याचा ते अजिबात विचार करीत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला त्याच समाजात नकोशीला फेकणारी ही मंडळी आढळतात. आपल्या संस्कृतीमध्ये ' कुपुत्रो जायेत क्वचिदपि, कुमाता न भवती ' असे म्हटल्या जाते. परंतु काही वेळा महिलांना कुमाता होताना पाहून मन खिन्न होते. एवढ्या थराला ते का जातात ? असे जे कोडे पडते ते कोडेच राहते, त्याची उकल होत नाही. याहीपुढे समाजात असे बघायला मिळते की, एखाद्याच्या घरी मुलगा जन्माला आला की, नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण असे  घरातील, परिवारातील आणि नात्यातील लोकांना खूपच आनंद होतो. आपला आनंद ते सर्वाना पेढे वाटून व्यक्त करतात. याउलट जेव्हा एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा 'अरेरे ' असे सहजच उद्गार तोंडातून बाहेर पडतात. तिच्या येण्याने कुणालाच आनंद वाटत नाही. उलट प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसून येतात. मुलगा जन्मल्यास पेढे आणि मुलगी जन्मल्यानंतर पेढेच्या ऐवजी जिलेबी वाटण्याची प्रथा समाजात दिसून येते. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येण्याचा एका सेकंदापासून मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. भारत देश वगळता कोणत्याही देशात मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मास किंमत किंवा भाव दिला जात नाही. म्हणजे मुलगा होवो किंवा मुलगी त्याना त्या ठिकाणी अपत्य समजल्या जाते आणि येथे आपल्या देशात मुलगा जन्मल्यास ' वंशाचा दिवा, कुलदीपक ' आणि मुलगी जन्मल्यास ' परक्याचे धन, डोक्यावरील ओझं ' असे समजले जाते. समाजात चालू असलेल्या घाण प्रथा, अनिष्ट चालीरीती, सनातन पद्धती, लग्नात वधू पक्षाकडून मागितली जाणारी वरदक्षिणा या सर्व रुढीपरंपरामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत समाजात केल्या जात नाही. म्हणून तिच्या स्वागतासाठी काय करावे लागेल ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

समाजात चालू असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा यामुळे पालक मंडळी स्त्री जन्मास घाबरत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर या प्रथा भारतात नसते तर काय झाले असते ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? मुलींच्या बापाला काय त्रास होतो ? मुलांच्या आई बापाला कधी कळणार ? जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीप्रमाणे समाजात असे नित्यनेमाने बोलले जाते ते उगीच नाही.  पण मुलगा आणि मुलगी यांच्या बुद्धिमत्ता किंवा गुणवत्ता याचा जर विचार केला तर मुलगी ही मुलापेक्षा काकणभर सरसच असते हे दरवर्षीच्या दहावी व बारावीचा निकालावरून स्पष्ट होत असते. प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकांच्या मतानुसार या प्राथमिक वर्गात सुद्धा मुली या मुलांच्या बाबतीत सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कदाचित मुलींना देण्यात येत असलेल्या विविध योजनांचा अनुकूल परिणाम असू शकतो. दहावी बारावीपर्यंत चांगले गुण घेणारी मुली पुढे मात्र दिसेनाशी होतात. उच्च शिक्षणात मुलांची संख्या लक्षणीय दिसते. प्राथमिक वर्गात हुशार  नसलेल्या किंवा सर्वसाधारण असलेला विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करतो आणि काही ना काही रोजगार मिळवितो. मात्र दहावी बारावीपर्यंत हुशार असलेली मुलगी उच्च शिक्षणात न दिसता कुणाच्या तरी घरी सून म्हणून दिसते. तिचे पुढील शिक्षण खुंटल्या जाते. शंभरातून एक-दोन मुली यशस्वी झाल्या म्हणजे त्याचे सारे श्रेय सर्व मुलींना देता येत नाही. मुलींच्या संरक्षणासाठी भारतात भरपूर कलम व कायदे तयार केल्या जातात मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे समाजात ही अराजकता माजली आहे. कायद्याची भीती इथे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे इथे प्रत्येकजण कायदा मोडण्याची व तोडण्याची भाषा बोलतात. आपल्या अज्ञानपणामुळे निरक्षर व अडाणी माणूस चुकतो असे म्हटले तर कोणी समजून घेतील पण सुशिक्षित सुजाण व साक्षर मंडळीसुद्धा याबाबतीत चुका करताना दिसत आहेत. त्यांना कसे समजावलं ?  झोपी गेलेल्या माणसाला एखाद्यावेळी उठविणे सोपे आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठविणे महाकठीण आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी समाजाने काही प्रथा व पद्धतीमध्ये बदल करणे भावी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

समाजातील अनिष्ट प्रथा आणि पद्धतीत शासन किंवा कायद्यापेक्षा समाजानेच त्यात बदल करणे अपेक्षित आहे. सर्वात पहिल्यांदा वधूपित्याने द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा ही पद्धत समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वरपित्याने याची सुरुवात केली पाहिजे आणि समाजाने त्या वरपित्यांचा वेळोवेळी विविध ठिकाणी सत्कार करावा म्हणजे याचा प्रचार व प्रसार योग्य प्रकारे होईल. कायद्याने सर्व काही बदलता येत नाही. काही वेळा आणि काही ठिकाणी कायद्याच्या ऐवजी तडजोड कामाला पडते. प्रथम ही वरदक्षिणा किंवा हुंडा पद्धत बंद झाली की स्त्री जन्माचे स्वागत नक्कीच हसत हसत होईल. घरी आलेली सून ही सून नसून माझी मुलगी आहे, असे प्रत्येक सासू-सासऱ्यांचा मनात तयार होणे गरजेचे आहे. आपण आपल्या मुलींची काळजी ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने सुनेची काळजी घेतली जावी. याठिकाणी सुनेने सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांना आई-वडील मानून त्यांची मनोभावे सेवा करणे गरजेचे आहे. नातेसंबंध हे प्रेमावर टिकतात आणि संवादामुळे विस्तार पावतात. बऱ्याच कुटुंबात वाद होतात मात्र प्रेमाचे संवादच होत नाहीत त्यामुळे कलह निर्माण होते आणि त्या वादाचे रुपांतर काहीतरी अघटित स्वरूपात समोर येतात. मुलगा किंवा मुलगी यांचा भेद मनात न ठेवता आई-वडिलांनी आपल्या लेकराचे संगोपन करावे. लहानपणी त्यांच्या मनात मुलगा मुलगीचा भेदभाव निर्माण केल्यास मोठेपणी त्यांच्यावर तेच संस्कार कायम राहतात. त्यासाठी मुलगा-मुलगी समान ही भावना त्यांच्यात लहानपणीच रुजवावे. शासन मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहेत त्यात सातत्यपणा ठेवून मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बरेच पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणाला पाठवित नाहीत मात्र तेच पालक मुलांना मात्र पाठवितात हा विरोधाभास दिसून येतो. त्यास्तव मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केल्यास त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होऊ शकते. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने काही महिलांचा सत्कार करून किंवा गुण गौरव करून मुलींच्या जन्माचा दर वाढविता येणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाची मानसिक स्थिती बदलल्याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत वाजत गाजत होईल असे तरी वाटत नाही.

- नागोराव सा. येवतीकर

मु. येवती ता. धर्माबाद

9423625769

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम गुरुपौर्णिमा विशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती का...