Monday 5 March 2018

जागतिक महिला दिन

स्‍त्री जन्‍माचे स्वागत करूया ...!

" नकोशीला फेकून मातेचे पलायन, मुलीला जन्म दिला म्हणून सुनेला जाळले, मुलींची भ्रूण हत्या करण्यात जिल्हा अग्रेसर " अशा मथळ्याच्या बातम्या जेंव्हा  ऐकायला आणि वाचायला मिळतात तेव्हा वरील क्रूर कर्म करणार्‍या मंडळीविषयी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि वाटते की, आपल्या पाल्याविषयी एवढे निष्ठुर का होतात ? समाजात आजही असे कुटुंब आढळते की ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असते मग ती मुलगा असो वा मुलगी, याचा ते अजिबात विचार करीत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला त्याच समाजात नकोशीला फेकणारी ही मंडळी आढळतात. आपल्या संस्कृतीमध्ये ' कुपुत्रो जायेत क्वचिदपि, कुमाता न भवती ' असे म्हटल्या जाते. परंतु काही वेळा महिलांना कुमाता होताना पाहून मन खिन्न होते. एवढ्या थराला ते का जातात ? असे जे कोडे पडते ते कोडेच राहते, त्याची उकल होत नाही. याहीपुढे समाजात असे बघायला मिळते की, एखाद्याच्या घरी मुलगा जन्माला आला की, नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण असे  घरातील, परिवारातील आणि नात्यातील लोकांना खूपच आनंद होतो. आपला आनंद ते सर्वाना पेढे वाटून व्यक्त करतात. याउलट जेव्हा एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा 'अरेरे ' असे सहजच उद्गार तोंडातून बाहेर पडतात. तिच्या येण्याने कुणालाच आनंद वाटत नाही. उलट प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसून येतात. मुलगा जन्मल्यास पेढे आणि मुलगी जन्मल्यानंतर पेढेच्या ऐवजी जिलेबी वाटण्याची प्रथा समाजात दिसून येते. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येण्याचा एका सेकंदापासून मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. भारत देश वगळता कोणत्याही देशात मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मास किंमत किंवा भाव दिला जात नाही. म्हणजे मुलगा होवो किंवा मुलगी त्याना त्या ठिकाणी अपत्य समजल्या जाते आणि येथे आपल्या देशात मुलगा जन्मल्यास ' वंशाचा दिवा, कुलदीपक ' आणि मुलगी जन्मल्यास ' परक्याचे धन, डोक्यावरील ओझं ' असे समजले जाते. समाजात चालू असलेल्या घाण प्रथा, अनिष्ट चालीरीती, सनातन पद्धती, लग्नात वधू पक्षाकडून मागितली जाणारी वरदक्षिणा या सर्व रुढीपरंपरामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत समाजात केल्या जात नाही. म्हणून तिच्या स्वागतासाठी काय करावे लागेल ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

समाजात चालू असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा यामुळे पालक मंडळी स्त्री जन्मास घाबरत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर या प्रथा भारतात नसते तर काय झाले असते ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? मुलींच्या बापाला काय त्रास होतो ? मुलांच्या आई बापाला कधी कळणार ? जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीप्रमाणे समाजात असे नित्यनेमाने बोलले जाते ते उगीच नाही.  पण मुलगा आणि मुलगी यांच्या बुद्धिमत्ता किंवा गुणवत्ता याचा जर विचार केला तर मुलगी ही मुलापेक्षा काकणभर सरसच असते हे दरवर्षीच्या दहावी व बारावीचा निकालावरून स्पष्ट होत असते. प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकांच्या मतानुसार या प्राथमिक वर्गात सुद्धा मुली या मुलांच्या बाबतीत सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कदाचित मुलींना देण्यात येत असलेल्या विविध योजनांचा अनुकूल परिणाम असू शकतो. दहावी बारावीपर्यंत चांगले गुण घेणारी मुली पुढे मात्र दिसेनाशी होतात. उच्च शिक्षणात मुलांची संख्या लक्षणीय दिसते. प्राथमिक वर्गात हुशार  नसलेल्या किंवा सर्वसाधारण असलेला विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करतो आणि काही ना काही रोजगार मिळवितो. मात्र दहावी बारावीपर्यंत हुशार असलेली मुलगी उच्च शिक्षणात न दिसता कुणाच्या तरी घरी सून म्हणून दिसते. तिचे पुढील शिक्षण खुंटल्या जाते. शंभरातून एक-दोन मुली यशस्वी झाल्या म्हणजे त्याचे सारे श्रेय सर्व मुलींना देता येत नाही. मुलींच्या संरक्षणासाठी भारतात भरपूर कलम व कायदे तयार केल्या जातात मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे समाजात ही अराजकता माजली आहे. कायद्याची भीती इथे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे इथे प्रत्येकजण कायदा मोडण्याची व तोडण्याची भाषा बोलतात. आपल्या अज्ञानपणामुळे निरक्षर व अडाणी माणूस चुकतो असे म्हटले तर कोणी समजून घेतील पण सुशिक्षित सुजाण व साक्षर मंडळीसुद्धा याबाबतीत चुका करताना दिसत आहेत. त्यांना कसे समजावलं ?  झोपी गेलेल्या माणसाला एखाद्यावेळी उठविणे सोपे आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठविणे महाकठीण आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी समाजाने काही प्रथा व पद्धतीमध्ये बदल करणे भावी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

समाजातील अनिष्ट प्रथा आणि पद्धतीत शासन किंवा कायद्यापेक्षा समाजानेच त्यात बदल करणे अपेक्षित आहे. सर्वात पहिल्यांदा वधूपित्याने द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा ही पद्धत समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वरपित्याने याची सुरुवात केली पाहिजे आणि समाजाने त्या वरपित्यांचा वेळोवेळी विविध ठिकाणी सत्कार करावा म्हणजे याचा प्रचार व प्रसार योग्य प्रकारे होईल. कायद्याने सर्व काही बदलता येत नाही. काही वेळा आणि काही ठिकाणी कायद्याच्या ऐवजी तडजोड कामाला पडते. प्रथम ही वरदक्षिणा किंवा हुंडा पद्धत बंद झाली की स्त्री जन्माचे स्वागत नक्कीच हसत हसत होईल. घरी आलेली सून ही सून नसून माझी मुलगी आहे, असे प्रत्येक सासू-सासऱ्यांचा मनात तयार होणे गरजेचे आहे. आपण आपल्या मुलींची काळजी ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने सुनेची काळजी घेतली जावी. याठिकाणी सुनेने सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांना आई-वडील मानून त्यांची मनोभावे सेवा करणे गरजेचे आहे. नातेसंबंध हे प्रेमावर टिकतात आणि संवादामुळे विस्तार पावतात. बऱ्याच कुटुंबात वाद होतात मात्र प्रेमाचे संवादच होत नाहीत त्यामुळे कलह निर्माण होते आणि त्या वादाचे रुपांतर काहीतरी अघटित स्वरूपात समोर येतात. मुलगा किंवा मुलगी यांचा भेद मनात न ठेवता आई-वडिलांनी आपल्या लेकराचे संगोपन करावे. लहानपणी त्यांच्या मनात मुलगा मुलगीचा भेदभाव निर्माण केल्यास मोठेपणी त्यांच्यावर तेच संस्कार कायम राहतात. त्यासाठी मुलगा-मुलगी समान ही भावना त्यांच्यात लहानपणीच रुजवावे. शासन मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहेत त्यात सातत्यपणा ठेवून मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बरेच पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणाला पाठवित नाहीत मात्र तेच पालक मुलांना मात्र पाठवितात हा विरोधाभास दिसून येतो. त्यास्तव मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केल्यास त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होऊ शकते. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने काही महिलांचा सत्कार करून किंवा गुण गौरव करून मुलींच्या जन्माचा दर वाढविता येणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाची मानसिक स्थिती बदलल्याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत वाजत गाजत होईल असे तरी वाटत नाही.

- नागोराव सा. येवतीकर

मु. येवती ता. धर्माबाद

9423625769

1 comment:

  1. प्रत्येकाने स्त्रीची समाजातील स्थिती जाणून घ्यावी.अशिक्षित च नाही तर सुशिक्षित माणसे सुध्दा आजही स्त्रीला दुय्यम स्थान देतात.

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...