Saturday, 11 February 2017

परीक्षा :- पालकांची

शांतता ........परीक्षा चालू आहे !

फेब्रुवारी - मार्च महीना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी - बारावीच्या परीक्षेने या परीक्षा सत्राला सुरुवात होते. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून आई वडील मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. मुलांना काय हवे आणि काय नको याची दक्षता घेतात. त्यामुळे राहून राहून वाटते की परीक्षा पाल्याची आहे की पालकांची. कारण प्रत्येक बाबतीत ते मुलांच्या अभ्यासाची काळजी करतात. यात मुलांना ही काही तरी विशेष अशी जाणीव होते आणि ते सुद्धा नेमके याच वर्षी धीर गंभीर होतात. दहावीच्या वर्गात येण्यापूर्वी पालक आणि विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकड़े लक्ष देत नाहीत. मग दहावीच्या वर्गात प्रवेश केल्याबरोबर पालक आणि विद्यार्थी दोघे पण जागे होतात. ऐन वेळी अभ्यास केल्याने यश मिळते काय ? याचा जरा देखील विचार करीत नाहीत.
घरातील वातावरण -
परिक्षेच्या काळात घरातील वातावरण मजेशीर आणि हसत-खेळत असायला पाहिजे परंतु त्या उलट परिस्थिती प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. सर्वात पहिल्यांदा घरातील सर्वाना आवडते असलेले टीवी बंद केल्या जाते. या टीवीचा परिणाम सर्वावर होतो विशेष करून घरात अभ्यास करणाऱ्या मुलांवर होतोच होतो. सायंकाळच्या वेळी मुले जेंव्हा अभ्यासाला बसतात नेमके त्याच वेळी टीवीवर कोणता ना कोणता खास कार्यक्रम चालू असतो. ते कार्यक्रम पहावे अशी मुलांची पण ईच्छा असते मात्र पालक त्यास अभ्यास कर म्हणत खोलीत बसवितात. तो शरीराने जरी खोलीत असला तरी मनाने तो पुस्तकात नसतो मुळीच. या वाचनाचा किंवा अभ्यासाचा काही अनुकूल परिणाम दिसतात काय ? अर्थात त्याचे उत्तर नाही असेच येते. त्यामुळे घरातील टीवी बंद ठेवणे हा सर्वोत्तम उपाय आहे काय ? क्रिकेट हे मुलांचे सर्वात आवडते खेळ आहे. मुले आपला जास्तीत जास्त वेळ खेळण्यात घालवितात, त्यातल्या त्यात क्रिकेट खेळण्यात. क्रिकेट मंडळ सुध्दा नेमके परीक्षेच्या काळातच क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करतात. त्यामुळे मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष राहत नाही आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. याविषयी क्रिकेट मंडळाने विचार करून परीक्षा संपल्यावर म्हणजे एप्रिल- मे महिन्यात सामन्याचे आयोजन केल्यास मुलांचे नुकसान होणार नाही. परिक्षेच्या काळात घरातील प्रत्येकजण काळजीपूर्वक वागतात. मुलांच्या अभ्यासासाठी त्रास होणार नाही यांची काळजी प्रत्येक सदस्य घेताना दिसून येतो. एवढेच नाही तर पाहुणे मंडळी सुध्दा विचार करूनच घरी येतात. मुलांची आई शेजाऱ्यां-पाजाऱ्यांकडे सहज बोलून जाते, यावर्षी मुलां-मुलींचे दहावीचे वर्ग आहे बाई, मला कुठे जायलाही जमत नाही. त्यांना सोडून कुठे जावे. त्यांचा अभ्यास बुडेल आणि त्यास कमी मार्क पडतील असे बोलते. त्यांच्या परीक्षेमुळे आई कोणाच्या ही घरी जाणे किंवा कार्यक्रमास जाणे टाळते. मुलांच्या परीक्षेचा घरात वर्षभर परिणाम जाणवतो. आई-बाबा कुणाच्या लग्नाला तर जात नाहीतच शिवाय घरात कोणाचे लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा केल्या जात नाही. दरवर्षी सहलीला जाणारे कुटुंबसुध्दा आपली सहल रद्द करुन मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात. काही क्षणापुरतेच सण समारंभ साजरे केली जातात. मुलांच्या परिक्षेच्या काळात घरातील मंडळी सर्व काही त्याग करतात. याचे मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल काय ? हा एक मोठा प्रश्न आहे.
परिक्षेची काळजी -
एक काळ होता ज्यावेळी दहावीच्या परिक्षेला खुप महत्त्व होते. दहावी झाली की डी एड करायचे आणि लगेच शिक्षकाची नोकरी लागायाची. त्यासाठी दहावीला चांगले गुण मिळणेे आवश्यक होते. त्यासाठी पालक मंडळी वेगवेगळ्या योजना वापरत असत. कसे ही करून दहावीला 75% च्या वर गुण मिळावे यासाठी ज्या ठिकाणी नकला खुप चालतात अश्या शाळेत पैश्याच्या बोलीवर मुलांना प्रवेश दिल्या जायचे. शाळेचा तो एक प्रकारे व्यवहार सुरु झाला होता. ऐन परिक्षेच्या काळात मुलांना मोकळेपणाने म्हणजे नकला मारुन पेपर लिहू द्यावे यासाठी ही पालकांची धडपड असायची. शाळेकडे जे तोंडी गुण असायचे त्यासाठी सुध्दा पैसा दिला जायच्या. यात नकलाचा एवढा सुळसुळाट वाढला होता की, लिहिता-वाचता न येणारा विद्यार्थी देखील चांगल्या मार्काने पास होऊ लागला. पुढे डी एड ला ही त्यांचा नंबर लागू लागला आणि तीन वर्षात शिक्षक म्हणून नोकरी सुरु. अश्या या पध्दतीत विद्यार्थ्यापेक्षा पालकाना त्यांच्या परीक्षेची जास्त काळजी असायची. मात्र गेल्या दहा वर्षात सर्व पध्दती बदलून गेल्या. बोर्डाने सुद्धा परीक्षा पध्दतीत आमुलाग्र बदल केला आणि प्रशासनाने ही यात मोलाची साथ देत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यास सहकार्य केले. त्यामुळे पूर्वी दहावी आणि बारावीच्या परिक्षेला जे जत्र्याचे स्वरुप येत होते, ते आत्ता बंद झाले. बारावी नंतर डी एड करण्यात आले आणि गेल्या सहा वर्षा पासून शिक्षक भरती  बंद आहे त्यामुळे डी एडचे ही आकर्षण कमी झाले. म्हणजे आज पालकांच्या डोक्यावरील ओझे खुप प्रमाणात कमी झाले आहे असे वाटत असले तरी काही पालक आपल्या मुलांच्या करियर साठी कोणत्याही स्तरावर जाऊन समोरच्याशी बोलणे करतात. असे अनेक गैरप्रकार परिक्षेच्या काळात वाचायला आणि पाहायला मिळतात. एखादा विद्यार्थी अभ्यासात मध्यम असेल तर अश्या मुलांच्या पालकाना तर खुपच काळजी लागते. त्या मुलांचे भविष्य त्यांना अंधकारमय वाटते. त्याची काळजी मुलाने करण्याऐवजी पालकच करतात. त्या पेक्षा पालकानी त्या मुलाची आवड निवड लक्षात घेऊन त्यास मार्गदर्शन केल्यास तो जीवनात नक्की यशस्वी होऊ शकतो. पालक आपल्या मुलांना लहान सहान गोष्टीत त्यास कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता मदत करतात याचा अर्थ ते आपल्या मुलांना पंगू करतात, असे नाही काय ? असे केल्याने मुले आळशी होणार नाहीत कश्यावरुन ? सर्वसाधारण पाहणीमध्ये असे दिसून येते की गरीबाची लेकरे ज्या तन्मयतेने शिकतात श्रीमंताची लेकरे ज्यास कोणतीही वस्तू मागितली की मिळते ते शिकत नाहीत. असे का ? यावर कधी पालकानी विचार केला आहे काय ? शिक्षणाची गरज आणि आवश्यकता जोपर्यंत मुलांना समजणार नाही तोपर्यंत पालकाचे सर्व प्रयत्न असफल आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नसलेल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व लवकर कळणार नाही. बाप कमाई वर काही एक कळत नाही. जेंव्हा आप कमाई चालू होते त्यावेळी एक-एक पैश्याचे महत्त्व कळते. म्हणून कमवा आणि शिका यासारखे धोरण खुप मोठे काम करून जातात. वास्तवतेचे चटके लागले पाहिजे तर तो अभ्यासाकडे वळतो. आज मोठ्या शहरात असे अनेक मुले आहेत जे बापाच्या पैश्यावर आणि अभ्यासाच्या नावाखाली मजा करीत फिरतात. परीक्षेत यश नाही मिळाले की पेपर अवघड होता, नशीब साथ दिली नाही, थोडक्यात हुकला, स्पर्धा खुप वाढली असे अनेक कारणे सांगून वेळ मारून नेतात. त्याच परीक्षेत अगदी गरीब असलेल्यां मुला-मुलींची ज्यानी कोठे ही शिकवणी लावले नाही त्यांची निवड होते. हे कश्यावरुन तर मुळात मुलांना अभ्यास करण्याची गोडी असावी लागते, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणून पालकानी आपल्या मुलांच्या परीक्षा आणि त्यात मिळत असलेले यश यांचे मुलांवर दडपण येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. परीक्षेत अमुक गुण मिळाले पाहिजे अशी जबरदस्ती मुलांना अधोगतीकडे नेते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करते. भीती निर्माण करते. पहिल्या वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणाऱ्या पालकाना दहावी बारावी किंवा इतर कोणत्याही परिक्षेच्या काळात विशेष काही धडपड करावी लागत नाही. तहान लागली की विहीर खोदणाऱ्या पालकांची अवस्था खुप बिकट होते. त्याहुन बिकट त्या मुलांची होते. म्हणून पालकानी आपल्या पाल्याची अभ्यासाची काळजी प्राथमिक वर्गापासून घ्यावी अन्यथा ऐन महत्वाच्या परिक्षेच्या काळात परीक्षा पाल्यांची आहे की पालकांची असा प्रश्न निर्माण
परीक्षेला जाता जाता ....
फेब्रुवारी महिना उजाडला की, सर्वांना परीक्षेचे वेध लागतात. महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक परीक्षा मंडळाद्वारे या परीक्षेच्‍या कार्यक्रमाचे उदघाटन बारावीच्‍या परीक्षेने दरवर्षी करीत असते. तसे बारावीच्या परीक्षेला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत असते, तर दहावीच्‍या परीक्षेला मार्च महिन्यापासून सुरूवात होत असते. मग इयत्‍ता पहिली ते नववी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांची परीक्षा होते. विद्यापीठाच्‍या परीक्षेने या परीक्षांचा शेवट होतो. परीक्षेच्‍या काळात मुलांवर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण जाणवते. वर्षभर केलेल्‍या अभ्‍यासाची फक्त दोन ते तीन तासात परीक्षा द्यावी लागते. बहुतांश वेळा असे होते की ऐनवेळी विद्यार्थी प्रश्‍नाचे उत्‍तर विसरुन जातात. त्यामुळे परीक्षेच्या काळात गोंधळून जाऊ नये किंवा मनावर जास्‍तीचे दडपण घेवू नये. परीक्षेच्‍या आदल्‍या दिवशी जागरण करून अभ्‍यास न करता निश्चित झोपी जावे. उद्याचा पेपर कसा जाईल ?याची अजिबात काळजी न करता आपले डोके शांत ठेवल्‍यास त्‍याचा परिक्षेच्या काळात निश्चितपणे फायदा होतो. नावडता विषय आपणाला अवघड वाटतो, त्‍याची जास्‍तच काळजी वाटते. त्‍यामुळे त्या विषयातील येत असलेला भाग सुध्‍दा आपण विसरून जातो. असे होऊ नये यासाठी त्‍या विषयाची धास्‍ती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. इयत्‍ता पहिली ते आठव्‍या वर्गाची परीक्षा पध्‍दत बंद केल्‍यामूळे विद्यार्थ्‍यांचा परीक्षेला तोंड देण्याचा सराव कमी झाला असे म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. पूर्वी पहिल्‍या वर्गापासून घटक चाचणी व सहामाही म्‍हणजे प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा होत असत. परिक्षेच्या काळात शाळेमध्‍ये सर्वत्र परीक्षेचे वातावरण असायचे, जो तो आपले डोके पुस्‍तकांत खुपसून अभ्‍यास करीत बसायचे, शक्‍यतो गृहपाठाच्‍या वह्या वाचून काढले जायचे कारण त्‍यातीलच प्रश्‍न परीक्षेत विचारल्‍या जायचे. परीक्षेला जातांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीने सामसोळीच्या शेपटाला स्पर्श केला तर पेपर सोपा जातो असं परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची. नेमकं परीक्षेला निघताना ती सामसोळी मात्र कुठेच दिसायची नाही. पेपर सोपा गेला तर त्याची आठवण सुध्दा यायची नाही. परंतु जर पेपर अवघड गेला असं जर वाटलं तर मनात रुखरुख लागायची. परीक्षेला जातांना अजून एक प्रकर्षाने व्हायचं परीक्षेच्या पॅडला तुळशीचे दोन पान लावायचे. त्याचं काय गुपित आहे ते आजपर्यंत कळाले नाही. आज शहरात अंगण नाही तर तुळस कुठं दिसणार. पण ही बाब अजूनही घरोघरी दिसून येत आहे. परीक्षेचा दिवस उजाडला की, सकाळी सर्व कामे आटोपून परीक्षेला पॅड घेऊन निघतांना आई ओरडून म्‍हणायची " अरे देवाच्‍या पाया पड, पेपर सोपा जाईल"  तिच्‍या या बोलण्‍याचं मला हसू यायचे आणि  मी म्‍हणायचो ‘वर्षभर अभ्‍यास केल्‍यामूळे माझं पेपर सोपं जाणारच आहे. त्‍यासाठी देव काय मदत करणार आहे. तो काय स्वत: येऊन मला लिहायला मदत करणार आहे कां ? असा प्रति प्रश्‍न तिला विचारायचा. आपल्‍या देवाला कुणी काही असं बोललेलं तिला खपायचे नाही, रुचायचे नाही. ती मला समजावून सांगे की, ‘देवाला पाया पडल्‍याने आत्मिक समाधान लाभते, बळ मिळते, एक वेगळा उत्‍साह येतो. यामूळे देवाला नमस्‍कार करायचा’. मग शेवटी आईचे मन रहावे म्‍हणून देवासमोर नतमस्तक व्‍हायचो. पहिला पेपर सोपा गेला की, आपसुकच दुस-या दिवशी परीक्षेला जाण्‍यापूर्वी पाय देवघरांकडे वळायचे. मग यानंतर जीवनात कोणती ही परीक्षा असो त्‍यापूर्वी आपले पाय देवघरांकडे वळतातच. आज ही आम्‍ही हीच प्रथा किंवा परंपरा आपल्‍या मुलांपर्यंत पोहचवित आहोत. आज आपली मुले जेंव्हा परीक्षेला निघतांत त्यावेळेस ‘जा देवाचे पाया पड आणि मग परीक्षेला जा’ असे आपण अगदी सहज म्‍हणतो. परीक्षेला जातांना देवाच्या पाया पडावे किंवा नाही हा वादातीत विषय आहे. त्‍यावर चर्चा केल्‍यास वादंग होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र देवाच्या पाया पडल्यानंतर जो आत्‍मविश्‍वास मनात तयार होतो, ते अत्‍यंत महत्‍वाचे आहे. परीक्षा म्‍हणजे एक कसोटी, आयुष्‍यात घेत असलेले महत्‍वाचे वळण. या कसोटीत निर्भेळ यश मिळविण्‍यासाठी देवांसोबत घरातील वाड-वडिलांचे आशीर्वाद घेणे सुध्‍दा अत्यंत महत्‍वाचे आहे असे वाटते. ज्‍याप्रकारे पूर्वी रंणागणावर जातांना राजे महाराजे आपल्‍या पूर्वजांचे आशीर्वाद घ्‍यायचे तसेच काहीसे या परीक्षेच्‍या बाबतीत होत असते. स्‍वामी समर्थाच्‍या ‘भिऊ नकोस  मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्‍याने त्‍यांच्‍या भक्‍तात एक नवी प्रेरणा, उत्साह दिसून येतो दे रे हरी  पलंगावरी अशी ज्‍याची वृती नाही त्‍याला परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. परीक्षेत जास्‍तीत गुण मिळावे यासाठी नकला मारणे ही स्वतः सोबत केलेली फार मोठी चूक आहे. त्‍यामूळे नकला मारून पास होण्‍यात काही अर्थ नाही. या परीक्षेत कदाचित तुम्‍ही पास व्‍हाल पण आयुष्‍याच्‍या परीक्षेत नकलाच  नसतात तिथे मात्र नापास होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. नकला मारणे म्‍हणजे चोरी करणे. आणि चोरी  कधी ना कधी पकडली जाते. म्‍हणून मुलांनो, परीक्षेत यशस्वीपणे तोंड देण्‍यासाठी परमेश्‍वर आपणास सुबुध्‍दी देवो, आत्मिक बळ देवो. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना खुप खूप शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

सोशल मिडीया

   सोशल मिडीया: जरा जपून वापरा

सोशल मीडियामधील फेसबुक, ट्विटर, लिंकदिन, व्हाट्सएप्प, टेलीग्राम यासारख्या माध्यमाचा सध्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे. संगणक युगातील क्रांतीने खुप दुरवरच्या व्यक्तीला जवळ आणले आहे असे जरी वाटत असले तरी, याच माध्यमाने जवळच्या माणसाला दूर केले आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. यात आज प्रत्येकजण सर्वात जास्त फेसबुक आणि व्हाट्सएप्प वापरणारे झाले आहेत. नुकतेच वाचण्यात आलेल्या बातमीनुसार फेसबुक वापर करणाऱ्याची संख्या लवकरच दोन अब्ज होणार आहे. यावरून सोशल मीडिया मध्ये फेसबुकचे महत्त्व किती जास्त आहे हे कळून येईल. यापूर्वी लोकं आपला मोबाईल क्रमांक द्या असे म्हणत त्या ऐवजी आज व्हाट्सएप्प क्रमांक द्या असे बोलू लागली. व्हाट्सएप्पने आपणास भरपूर काही उपलब्ध करून दिले आहे. व्हाट्सएप्पमुळे आपणास विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपले म्हणणे हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे एक चांगले माध्यम सर्वाना मिळाले आहे. त्यामुळे जो तो आज मार्गदर्शक, समुपदेशक, पत्रकार, वार्ताहर, छायाचित्रकार, संपादक आणि शिक्षक अश्या विविध भूमिकेतून काम करताना दिसून येत आहे. विविध जातीच्या, धर्माच्या समान व्यवसायाच्या आणि समविचारी लोकांचे समूह तयार होऊ लागले आणि मग सुरु झाल्या चावडी वरील गप्पा. जसे आपण सर्व मित्र - मित्र भेटल्यावर गप्पा मारतो तश्या गप्पा किंवा संवाद येथे वाचायला किंवा पाहायला मिळू लागले. एखाद्याने काही विचार व्यक्त केले की, त्याला काही ना काही उत्तर देण्याची प्रथा चालू झाली.
मित्रांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे तर ते एक हक्काचे व्यासपीठ बनले. शुभेच्छा आणि अभिनंदनामुळे व्हाट्सएप्प पूर्ण भरून जात आहे. यातून काही चांगले घेता येईल काय ? याचा कधीही विचार केला जात नाही. म्हणून कसलाही विचार न करता पोस्ट करणाऱ्या लोकांकडून इतराना त्रास होत आहे. आपणाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वैराचार नव्हे, आपण आपली मते जरूर मांडावीत परंतु त्याचा त्रास कुणाला होणार नाही यांची काळजी देखील घेणे आवश्यक आहे. चार चौघात आपली प्रतिमा कशी आहे ? आपले व्यक्तिमत्व कसे आहे ? आपला स्वाभाव कसा आहे ? आपली विचारधारा कशी आहे ? या सर्व बाबीची माहिती आपण केलेल्या पोस्ट मधून इतरांना कळते. सोशल मिडियात काही बाबी पोस्ट करण्यापूर्वी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करता येणार नाही. जसे धनुष्यातून बाण, तोंडातुन शब्द, आणि गेलेली वेळ परत येत नाही तसे सोशल मिडियात केलेली कोणतीही पोस्ट ही परत घेता येत नाही. याची सुरुवात जरी करमणुक किंवा मनोरंजन म्हणून झाले असले तरी, ती आज सर्वांसाठी आवश्यक बाब बनली आहे. सरकारी कार्यालयात देखील याचा वापर वाढू लागला आहे. पाच वर्षापूर्वी शाळेत मोबाइल वापर करण्यास बंदी होती तर आज मात्र अगदी सर्रास पाणे शाळेत मोबाइलचा वापर शालेय उपक्रम राबविताना करता येतो. अधिकारी आणि कर्मचाऱ्याना आपला संदेश एकमेकाजवळ पोहोचते करण्यासाठी व्हाट्सएप चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, साहित्यिक या सर्व प्रकारच्या कार्याना गती मिळत आहे. तशी ही आपल्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. मात्र समूहा मध्ये वावरत असताना किंवा पोस्ट करताना प्रत्येकानी थोडी काळजी घेतली तर सोशल मीडिया सर्वासाठी वरदान ठरू शकते. त्यासाठी काही बाबीची काळजी घ्यावी लागते.
आपली पोस्ट करण्यापूर्वी समुहाचे नाव आणि त्यांचे कार्ये लक्षात घ्यावे लागेल. समूह संयोजकाशी थोडी फार ओळख असेल तरच समुहात थांबावे किंवा त्यांच्याशी संपर्क करून समूहाची माहिती करून घ्यावी. समुहात सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे पोस्ट करू नये. शक्यतो आपले स्वतः चे काय म्हणणे आहे ते पोस्ट करावे दूसरीकडील माहिती कॉपी -पेस्ट करणे टाळावे. छोट्या चित्रातून फार मोठा संदेश देता येतो. त्यामुळे ही चित्र वापरताना खुप काळजी घ्यावी लागते. अन्यथा या चित्रामुळे न बोलता देखील काही अनर्थ होऊ शकतो. शुभ सकाळ, शुभ सायंकाळ, शुभ रात्री, या सारखे पोस्ट समूहावर शक्यतो टाळावे. त्यामुळे समुहातील सर्व लोकांना होणारा त्रास वाचू शकतो. वाढदिवस किंवा अभिनंदनाच्या शुभेच्छा समूहाऐवजी वैयक्तिक दिल्यास दोघात असलेली आत्मियता वाढिस लागते. आज व्हाट्सएप घरातील सर्वचजण पाहतात त्यामुळे अश्लील चित्रे किंवा वीडियो पोस्ट करुच नये. त्याचा सर्वात ज्यास्त धोका जसे तुम्हाला असतो त्याहुन जास्त धोका समोरच्या व्यक्तीला असतो. काही व्यक्तिना तर त्यांच्या मोबाईल मध्ये काय काय डाउनलोड झाले आहे ? याची देखील माहिती नसते. आपोआप डाउनलोड झाल्यामुळे असे अनेक प्रकार घडतात. समुहातील सर्वांशी सभ्यतेची वर्तणुक ठेवावी, खास करून महिलाशी संवाद करताना काळजी घ्यावी. समुहात शक्यतो वादविवाद टाळावे. साहित्याची चोरी करणे व्हाट्सएपमुळे खुप सोपे झाले आहे. दुसऱ्याचे साहित्य आपल्या नावाने प्रसिध्द करणाऱ्या महाभाग लोकांची संख्या येथे खुप वाढिस लागली आहे. मात्र अश्या प्रकारामुळे आपली समुहात पत कमी होते. त्याच सोबत लोकांचा आपल्या वरील विश्वास देखील कमी होतो. हे लक्षात घ्यावे. त्यामुळे मुळ कवी वा लेखकांच्या नावासह साहित्य पोस्ट करावे. आपले स्वतः चे साहित्य असेल तरच आपल्या नावासह पोस्ट केल्यास आपले नाव खरोखरच दूरपर्यंत पोहोचेल. दिवसातील काही ठराविक वेळ व्हाट्सएपसाठी द्यावे. इतर वेळी व्हाट्सएपपासून दूर राहणे केव्हाही चांगले. अन्यथा या रोगाची लागण झाली म्हणून समजा. हा रोग एकप्रकारे कैंसर सारखाच आहे जो दिवसेंदिवस नाही तर तासागणिक वाढतच राहतो. व्हाट्सएपमुळे काही कुटुंबात तणाव वाढले असल्याच्या बातम्या जेव्हा वाचनात येतात तेंव्हा वाटते की व्हाट्सएपच्या अति वापर करण्याचा कदाचित हा परिणाम असू शकतो. म्हणून मित्रांनो व्हाट्सएपसारख्या भुतापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करू या.

- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

लग्नाचे वय

*यंदा कर्तव्य आहे .....!*

लग्नासाठी मुलींच्या वयाची अट 18 वरुन 21 वर्षे करण्याचे एक खासगी विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले असल्याचे वृत्त वाचून थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती निर्माण झाली. तृणमूल कॉग्रेसचे खासदार विवेक गुप्ता यांनी ही मागणी केली आणि लोकसंख्येला आळा घालण्याच्या दृष्टीने हा बदल आवश्यक आहे असे ते म्हणाले. त्याच बरोबर कमी वयात लग्न झाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यापूर्वीच दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही लग्नाची अट 21 वर्षे करणे उपयुक्त ठरते असे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे, यात यत्किंचित ही चूक नाही. मात्र मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 वर्षे वर नेताना काय काय समस्या निर्माण होतात ? याचा देखील थोडा विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.
आज देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही देशभरात बालविवाह होतच आहेत. यात अजुन वाढ होणार नाही काय ? असा ही प्रश्न पडतो. देशात विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक कायदे तयार केले जातात मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे कायदे असून ही नसल्यासारखे वाटते. आज मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे तरी ही याकडे कुणाचे लक्ष नाही. ग्रामीण भागात बालविवाह करण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. पालकांचे अज्ञान आणि घरची आर्थिक परिस्थिती या दोन प्रमुख समस्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र शहरात तेच प्रमाण कमी दिसून येते. शहरात आजही मुलींचे शिक्षण पूर्ण करता करता 21 वर्षे कधी पूर्ण झाले ते कळतच नाही. त्यामुळे या विधेयकाचे शहरी भागातून स्वागतच केले जाईल मात्र भागात या विधेयकास विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुलगी ही अत्यंत नाजुक बाब असते आणि म्हणून तिची प्रत्येकजण काळजी घेत असतो. कोणत्याही मुलींचे लग्न होण्यापूर्वी खुप काळजी घेतली जाते, जसे की हिऱ्याची. समाजात मुलीविषयी एक जरी अपशब्द बाहेर पडला तर मुलींना आणि मुलींच्या आई-बाबाला एक मोठी समस्या बनते. म्हणून प्रत्येक पालक आपल्या मुलींवर कठोर संरक्षण ठेवतात. ग्रामीण भागात उपवर झालेली मुलगी जास्त दिवस घरात रहाणे आई-बाबाना धोक्याचे वाटते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुली नेहमीच असुरक्षित असतात. खेडोपाड्यात वयात आलेल्या मुलींना बाहेर सुद्धा फिरता येत नाही. त्याचीच काळजी मुलींच्या घराच्याना लागते. त्यामुळे ते मुलींचे लग्न लवकरात लवकर उरकण्याची घाई करतात. आजकालच्या चित्रपटांमुळे सुद्धा मुले-मुलीं बिघडू लागली आहेत. सोशल मिडीयाच्या प्रसारामुळे मुलांना सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ते अनावश्यक बाबी अनुभव घेत आहेत. त्याचेच दुष्परिणाम म्हणून आजच्या या दुर्दैवी घटना पाहण्यास मिळत आहेत. मुला-मुलींमध्ये आकर्षणाचे प्रमाण ही हल्ली वाढू लागले आहे. याचमुळे पालक वर्ग काळजीत पडला आहे. आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने खांद्यास खांदा लावून काम करीत आहे. ती आज खऱ्या अर्थाने मुक्त आहे, मात्र अधुनमधून घडणाऱ्या घटना, विविध गुन्हे, यामुळे महिला आजही असुरक्षित आहेत याची जाणीव होत राहते. मुलींचे लग्न लावून कन्यादान करणे हे प्रत्येक माता-पित्याचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करतांना पालकाना कोणकोणत्या समस्याना तोंड द्यावे लागते ? हे मुलींचे पालक असलेले व्यक्तीच ओळखू शकतात. जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे या उक्तीनुसार इतराना त्यांचे त्रास कदापिही जाणवणार नाही. त्यामुळे मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यापूर्वी भारत देशातील ग्रामीण भागातील पालकांच्या समस्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. याउलट मुलींचे बालविवाह होणार नाहीत याची जरा जास्त काळजी घेतली तरी सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
  स्तंभलेखक
9423625769

Thursday, 9 February 2017

हार्दीक शुभेच्छा

       परीक्षार्थ्यांना शुभेच्छा संदेश

आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो तर त्यात यश मिळेल कदाचित परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन वळणार आहे आणि आपण वळण घ्यायचे नाही असे ठरविले तर आपण यश मिळवू शकणार नाही. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला अनेक वळण घेता येऊ शकतात. महात्मा फुले असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येकजण का घेतात ? याचा आपण कधी विचार केला आहे काय ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे नुसते म्हटले नाही तर त्यांनी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली. सर्वाना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे असे हंटर कमिशन समोर आपले मत मांडले. लोकांच्या शिक्षणासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा मुलींच्या शिक्षणासाठी अनेक त्रास सहन केले. म्हणून आज शिक्षणाच्या बाबतीत सोनियाचा दिवस आपण पाहत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा संघर्ष करा असा मोलाचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधीजी हे जीवन शिक्षणावर भर देत असत. भारतात सर्वच जण शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. कारण भारत देशाला प्रगती पथावर न्यायचे असेल तर देशातील सर्व लोकांनी शिकलेच पाहिजे. म्हणून आज प्रत्येकजण त्यांचे स्मरण करतात. कारण त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी दिवसरात्र वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. रात्रदिवस पुस्तकाचे वाचन करणे, त्यावर चिंतन करणे, आणि लोकांचा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा यासाठी लेखन करणे असे फार मोठे कार्य त्यांनी केले. आपणाला देखील जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन, चिंतन आणि लेखन या तीन गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. वरील तीन गोष्टी जीवनात मिळवायाचे असेल तर त्यासाठी आपल्या जवळ हवी कठोर मेहनत करण्याची तयारी आणि अविरत काम करण्याची ईच्छा. याशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. म्युनसिपाल्टीच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी आपला अभ्यास केला. ग्रंथालयातील वेळ वाचविण्यासाठी आणि जास्तीचा वेळ वाचन करता यावे म्हणून ग्रंथपालाचे डोळे चुकवून ग्रंथालयामध्ये पाव खायचे पण पुस्तक वाचायचे. वाचाल तर वाचाल या उक्तीची ओळख त्यांच्या जीवन चरित्रातून दिसून येते. आठरा तास अभ्यास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती म्हणूनच ते भारताची राज्यघटना रात्रंदिवस कष्ट करून लिहू शकले. त्याच गोष्टीचा आदर्श घेऊन विद्यार्थीनी कष्ट घेतले पाहिजे.
दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश केले की, प्रत्येकजण जागे होतात आणि मन लावून अभ्यास करण्याचा संकल्प करतात. परंतु दहावी आणि बारावी वर्गाचे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे म्हणून रात्रंदिवस अभ्यास केल्याने खरोखर यश मिळते काय ? तर याचे उत्तर नाही असे मिळेल. त्यासाठी आपल्या अभ्यासात सातत्यपणा असणे आवश्यक आणि अत्यंत महत्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे

आधी कष्ट मग फळ । कष्टेविना सर्व निष्फळ ।।

सर्वात पहिल्यांदा मेहनत म्हणजे अभ्यास करावे त्यात नक्की फळ मिळेल. दे रे हरी पलंगावरीची वृत्ती आपण सोडून द्यायला हवे. कष्ट केल्यावर यश मिळणारच जर यदा कदाचित तेथे यश मिळाले नाही तर नाऊमेद न होता पुन्हा जोमाने काम करावे. सचिन तेंडुलकर जेव्हा शून्यावर बाद होत असे ते ही पहिल्याच चेंडूवर तेंव्हा ते स्वतः आत्मपरिक्षण करून सरावावर भर देत असत आणि त्यापुढील सामन्यात शतक ठोकत असत. असेच काही काम आपणास ही करायचे आहे. नाऊमेद व्ह्ययचे नाही, खचून जायचे नाही, भविष्यात अनेक संकटाना तोंड द्यायचे आहे, त्याची ही पूर्व तयारी समजून कार्य करावे.
आज आपणाला उशीर झाला आहे असे मुळीच समजू नका. कल करे सो आज कर आज करे सो अब या संत कबीर यांच्या दोहयानुसार आजपासून अभ्यासाला सुरु करू या. जे पूर्वीपासून अभ्यास करीतच होते ते थोड्या जोमाने कामाला लागा. परिक्षेच्या काळात स्वतःच्या तबीयतची काळजी घेणे आवश्यक आहे. तबीयतची काळजी घेतली नाही तर वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा तोंडावर असताना जास्त काळजी, चिंता, किंवा अस्वस्थ न होता हसत-खेळत रहावे. कुटुंबातील सर्वांशी वार्तालाप करावे. मन प्रसन्न ठेवल्याने आपल्या बुद्धिमत्तेची कार्यक्षमता वाढू शकते आणि गांगारुन किंवा गोंधळून गेल्यामुळे विस्मृतीत जातो. मग प्रश्नाचे उत्तर सोपे आणि माहित असून देखील लिहिता येत नाही. परिक्षेच्या दिवसात अनेक विद्यार्थ्याना याचा अनुभव येतो. मनाची घालमेल आणि भीती घालविण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. परिक्षेच्या काळापुरतेच नाही तर जीवनात सुद्धा या वागण्याचा फायदा होतो. शालेय जीवनातल्या प्रत्येक बाबीचा परिणाम आपणास जीवनात बघायला मिळतो. त्यासाठी काही चांगल्या गोष्टी आणि बाबी जसे की वाचनाचा नियमित सराव आवश्यक आहे. तेंव्हा सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दीक शुभेच्छा.

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Monday, 6 February 2017

कथा - प्रामाणिक वसंता

           *कथा - प्रामाणिक वसंता*
*- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*

प्रामाणिकपणा मुळे वसंताचे क्लेक्टरकडून कौतुक आणि पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक आजच्या सर्वच पेपर मध्ये ही बातमी झळकली. खरोखरच वसंताने कामच असे केले होते म्हणून स्वतः कलेक्टर साहेबांनी त्याचे कौतुक केले. वसंता एक ऑटो ड्रायव्हर. गरीब मात्र प्रामाणिक. त्याने कधी ही पैश्याची हाव केली नाही. ऑटो चालविताना वाहतुकीचे नियम तोडला नाही की कोठे छोटा अपघात देखील केला नाही. प्रवाश्यासोबत नेहमी प्रेमळ वागत असतो. वयोवृध्द व्यक्तिना कमी पैश्यात त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असे. एक-दोन रूपयासाठी त्याने प्रवाश्यासोबत कधी घासाघीस केली नाही. प्रवाशी हेच आपले दैवत असे तो समजायचा. सकाळी आठ वाजता घरा बाहेर पडायचा आणि  सायंकाळी बरोबर सहा वाजले की ऑटो आपल्या घरी त्याच्या नियमित जागेवर लावून उर्वरित वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवित असे, असा त्याचा रोजचा नित्यक्रम. त्याचे कुटुंब म्हणजे बायको रकमा, मोठी मुलगी स्वरुपा आणि मुलगा दीपक, छोटा परिवार सुखी परिवार असा. ही दोन्ही मुले घराजवळील सरकारी शाळेत शिकत होती. तसे वसंता सुद्धा सरकारी शाळेतून दहावी पास झालेला होता. त्याची घरची परिस्थिती खुप हलाखीची होती. वसंताचे वडील शेतमजुरी करीत असे. स्वतः ची शेतीबाडी काही ही नव्हते. गावात राहून आपल्याने शेती किंवा शेतमजुरी करणे शक्य नाही म्हणून लग्न झाल्या झाल्या शहरात येऊन ऑटो चालविण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले होते. त्याची पत्नी रकमा आजुबाजुच्या घरात मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावित असे. त्यांना एक छोटेसे घर होते. घर कसले ती तर एक झोपडीच होती. पण तरी ही ते चौघेजण त्या झोपडीमध्ये सुखी व समाधानी होते. तर अश्या छोट्याश्या झोपडीतील एका गरीब ऑटो ड्रायव्हर वसंताचे नाव पेपरमध्ये वाचताना बायको रकमा, स्वरूपा आणि दीपक यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला परंतु शेजारी-पाजारी लोकांना ही वसंताचा खुप अभिमान वाटत होता. त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे आज  फळ मिळाले असे जो तो बोलू लागला आणि वसंताला ही मनोमन खुप आनंद झाला.

त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून दिवसभर ऑटो चालवून सायंकाळी सहा वाजता आपल्या नियमित जागेवर ऑटो लावली. त्यानंतर एकदा वाकून ऑटोमध्ये सर्वत्र नजर फिरविली असता, मागील शीटच्या पाठीमागे मोकळ्या जागेत त्याला एक पिशवी नजरेस पडली. कोण्या तरी प्रवाश्याने ती पिशवी मागे ठेवली होती आणि उतरत असताना विसरून गेले होतेे. वसंताच्या डोळ्यासमोर दिवसभरातील प्रवाशी तरळले मात्र पिशवी कोणाची असेल ? याचा काही शोध लागला नाही. लगेच वसंताने ती ऑटोमधली पिशवी उचलली आणि घरात नेली. ती पिशवी कुणाची असेल ? त्या पिशवीत काय असेल ? या प्रश्नाने वंसंताचे डोके काही चालत नव्हते. पिशवीत आहे तरी काय हे पहावे म्हणून पिशवी उघडून पाहिली असता त्यात दोन-चार साड्या, लहान मुलांचे एक-दोन ड्रेस आणि एक छोटी पिशवी दिसून आली. यावरून वंसंताने अंदाज बांधला की कोण्या तरी महिलेने आपल्या ऑटोमध्ये विसरली असावी. त्या छोट्या पिशवीमध्ये काय असेल या उत्सुकतेने ती पिशवी उघडली, त्या बरोबर वंसंताचे डोळे चमकुन गेले. छोट्या पिशवीत साधारणपणे पैसे असतील असा वंसंताचा अंदाज होता पण त्यात निघाले सोन्याचे दागिने. वंसंताच्या काळजाचे ठोके वाढले होते. जवळपास दहा-बारा तोळे वजन असलेल्या सोन्याचे दागिने होते. वंसंताने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने यापूर्वी एकदाही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली. काय करावे हे त्याला काही सूचत नव्हते. तेवढ्यात तेथे रकमा आली. वंसंताच्या हातात दागिने पाहून ती खुप खुश झाली. पण वंसंताने जेंव्हा हे दागिने आपले नसून ते ऑटो मध्ये कुणी तरी पिशवी विसरली होती आणि त्या पिशवीमध्ये आढळले असे सांगल्यावर ती खुपच नाराज झाली. ज्याचे दागिने आहेत त्यांना परत करणे आपले कर्तव्य आहे असे वंसंताने आपल्या बायकोला समजावून सांगितले. यावर रकमा नाराजीच्या सुरात म्हणाली की, ती पिशवी कुणाची आहे ? त्याचा आत्ता नाही-पत्ता नाही. मग देणार कुणाला ? देवाने आपणाला भेट म्हणून दिली आहे. घरात आलेल्या लक्ष्मीला असे बाहेर करू नका. असे खुप बोलली पण वंसंताचे मन काही मानत नव्हते.

वंसंता प्राथमिक शाळेत शिकत असताना एक घटना घडली. जोशी सर परिपाठमधून रोज काही ना काही चांगल्या गोष्टी सांगत असत. आज सुध्दा सरांनी सांगितले की, रस्त्यावर किंवा कुठे ही काही सापडले तर ते आपल्या आई-बाबाकडे द्यावे. शाळेत एखादी वस्तू किंवा काही सापडले तर ते शाळेच्या मुख्याध्यापकाकडे किंवा आपल्या वर्गशिक्षकाकडे द्यावे. त्यामुळे आपल्या वरील अनर्थ टळतात. सापडलेल्या वस्तू वर आपला काही एक हक्क नसतो. मात्र तीच वस्तू आपणास संकटात नेऊ शकते. आपल्यावर चोरीचा आळ आणु शकते. म्हणून लगेच ती वस्तू मोठ्या व्यक्तीकडे किंवा जबाबदार व्यक्तीकडे सुपुर्त करावे म्हणजे मानसिक समाधान मिळेल. जोशी सरांचे बोलणे वंसंता मन लावून ऐकत होता. एके दिवशी शाळेच्या मैदानात असलेल्या हापश्यावर पाणी पिण्यासाठी गेला असता, तेथे हापश्यावर त्याला एक कंपासपेटी दिसून आली. कुणी तरी पाणी पिताना कंपासपेटी हापश्यावर ठेवली आणि तेथेच विसरली होती. वसंताने ती कंपासपेटी सरळ मुख्याध्यापकाकडे जमा केली. दुसऱ्या दिवशी परिपाठ मध्ये मुख्याध्यापकानी सर्व मुलासमोर वसंताचे जाहीर कौतुक करून कंपासपेटी ज्याची होती त्याला परत केली.
आज यानिमित्ताने वसंताला परत एकदा जोशी सरांचेे जी वस्तू सापडली ती वस्तू आपली नसते ही शिकवण लक्षात आली. तसा तो जागेवरुन ताडकन उठला, पिशवी भरली आणि घराबाहेर आला. आपली ऑटो बाहेर काढली आणि सरळ पोलिस स्टेशन दिशेने जाऊ लागला. जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये वसंताने ती सापडलेली पिशवी जमा केली. तेंव्हा कुठे वसंताला समाधान वाटले. पोलिसांनी वसंताचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहून घेतल्यानंतर ती पिशवी आपल्या पोलिस स्टेशन मध्ये जमा केली आणि त्याची माहिती इतर पोलिस स्टेशनला कळविले. दोन-चार दिवसानंतर एक महिला दागिन्याची चौकशी करीत करीत त्या पोलिस स्टेशनमध्ये आली तेंव्हा तिचे दागिने परत मिळालेले पाहून खुप अत्यानंद झाला. ही पिशवी येथे कशी आली ? याची चौकशी केली असता, तिला वसंताची माहिती तिला मिळाली. वसंताचे आभार व्यक्त करावे म्हणून तिने वसंताचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळविला. हां हां म्हणता ही बातमी शहरात सर्वदूर पसरली. तशी कलेक्टर साहेबांच्या कानावर देखील ही बातमी पोहोचली. तसे कलेक्टर साहेबांनी वसंताचे जाहीर कौतुक करण्याचे ठरविले. कारण समाजात अश्या प्रामाणिक लोकांची संख्या खुप कमी कमी होत चालले आहे. सामाजिक विकासासाठी आज प्रामाणिक लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून कलेक्टर साहेबांनी वसंताचे नुसते जाहीर कौतुकच केले नाही तर पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपयाचे इनाम ही दिले. शालेय जीवनात शिकलेल्या प्रामाणिकपणा मुल्याचे फळ आज मिळाले असल्याचा आनंद वसंताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता

*🎁🎁🎁 समाप्त 🎁🎁🎁*

( या कथेतील सर्व नावे काल्पनिक असून, याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही. यदा कदाचित तसा काही संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावे. )

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...