Thursday, 6 October 2016

जीवन सुंदर आहे भाग दूसरा

*आत्महत्या हा पर्याय नाही*
🖊 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
     09423625769

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ? घरात खाणारी तोंडे जास्त आणि कमविणारा मात्र तो एकटा त्यामुळे घराचा पूर्ण भार त्याच्यावर असणार हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना कुटुंबातील, परिवारातील आणि मित्राचा आधार असायला हवे. आज ना उद्या समस्या संपतील या आशेवर जगणे आवश्यक आहे, मात्र चिंता ही स्वस्थ बसू देत नाही. पण खरोखर आपण आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले तर आपल्या समोर ज्या काही समस्या होत्या त्यापासून आपली कायमची सुटका होईल मात्र त्याच समस्या आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील सदस्यना अजून गंभीर स्वरुपात भेडसावते याचा एक वेळ विचार केलाय का ? नाही. जीवनातील कोणत्याही समस्यावर आत्महत्या किंवा जीवन संपविने हा पर्याय होऊच शकत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या डोक्यावरील कर्जाचा किंवा शेतातील नापिकीचा जास्त डोक्यात न घेता काम करीत रहा. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ही गोष्ट लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त योग्य दिशेने चालण्याचा प्रयत्न करीत रहावे. फक्त शेती न करता त्यासोबत काही लघू उद्योग करता येईल काय याचाही विचार करून तसा जोड व्यवसाय केल्यास आपल्या जीवनाला नक्कीच उभारी मिळेल. आज दुधाचा व्यवसाय करणारी शेतकरी मंडळी झालेला नुकसान दुसऱ्या व्यवसायतुन भरून काढू शकतात आणि त्यासाठी आपणास काही वेगळी प्रक्रिया करावे लागत नाही. शेळीपालन व्यवसाय ही आपणाला अगदी सहजपणे करता येईल त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे काही व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केल्यास हे जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती येईल.

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

जीवन सुंदर आहे

..... *जीवन सुंदर आहे* ......
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
   09423625769
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य नष्ट करून टाकली.

जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलींनी सुद्धा फार लहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

Saturday, 1 October 2016

मी महात्मा गांधी बोलतोय........

भारताती तत्वज्ञान, जीवनपद्धती यांच्या वरील सखोल चिंतनाने त्यांचे जीवन भारावले गेले. आश्रम-जीवन, स्वावलंबन ,अन्न- वस्त्रे यांच्या गरजा कमी करणे, साधी राहणी, आत्मशुद्धी, मानवतावादी विचारसरणी अश्या अनेक बाबींवर ते विचार करीत राहिले. परावलंबनाने भारताची आर्थिक कुचंबना होत आहे, इंग्रज सरकार भारतीयांना विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडते आहे, या विषयी विचार केल्यावर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वत:सूतकताई, गरजे पुरती वस्त्रे , स्वालंबन, आश्रम-जीवन, यांचा स्वीकार करून ‘ बोले तैसा चाले ‘ हा आदर्श त्यांनी जनते समोर ठेवला. एक पंचा,एक उपरणे,साध्या चपला अशा त्यांच्या दर्शनामुळे जनतेला आदरणीय आदर्श नेता वाटू लागले राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे या विषयात लक्ष घालून त्यांनी स्पृश्य -अस्पृश्य, हिंदू- मुसलमान, या सर्वावर भारतीय तत्वांची भावना निर्माण करून ऐक्य साधले पाहिजे असा प्रचार केला. त्यांच्या भाषणांतून लीखांनातून आणि प्रार्थनासभांतून हीच शिकवण ते देत राहिले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ हि उपाधी दिली. तसेच त्यांना ‘ राष्ट्रपिता’ म्ह्नवूनही गौरविले. गांधीजींच्या कोनत्याहि आंदोलनात त्यामुळेच जनता त्यांच्या सोबत राहिली.

इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अह्र्भागी असत. १९१९ मद्ये रौलट कायद्या विरूद्धचे आंदोलन, चंपाअरण्यातील शेतकर्यावरील अन्याया विरुद्ध सत्याग्रह, अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण, असहकारीतेची चळवळ,हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले  २१ दिवसांचे उपोषन, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा इ. उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. इंग्रजांनी पुढे केलेल्या स्वार्थी योजनांना गांधीजींनी प्रखर विरोध केला.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने, आचरणाने, शिकवणुकीने,आनि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्यॊत्सुक बनली. हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना १९४२ मध्ये ‘चले जाव’ असे ठणकावून सांगितले. या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली. गांधीजीसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले. पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले. ठिकठीकाणी धरपकड, लाठीमार, गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना १९४७ मध्ये भारत सोडून जावेच लागले. आणि भारत स्वतंत्र झाला. सत्याग्रही गांधीजींच्या विच्यारात केवळ माणुसकी, शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे, यांना महत्व होते. काहींना हे विचार पटत नव्हते. देश्याची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच; अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला. आणि या वैच्यारिक संघर्षनातूंच महात्माजींची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. पण मृत्यू समयी त्यांच्या मुखातून ‘ हे राम ‘ हे उद्गार काढून त्यांनी हे जग सोडले.

Saturday, 24 September 2016

संतुलित आहार


संतुलित आहार
      - नागोराव सा. येवतीकर,
        मु. येवती ता. धर्माबाद
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस शिकार केलेले प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खाण्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाच्या जेवण्यात सुधारणा होऊ लागली. त्यानंतर मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महानगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्नाविषयी किंवा आहारा विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटा च्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्नाचे अति सेवन करणे शरीराला जसे घातक आहे तसे कमी जेवण करणे हे ही धोकादायक आहे विशेष करून लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयात पोषक आणि संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे.
शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बादाम, साजुक तूप यासरखी महागडी पदार्थ खावे लागतात, असा एक गोड गैरसमज जनमाणसात पसरलेले आहे. रोजच्या जेवणात सर्व अन्नघटकाचा समावेश केल्यास सुध्दा आपले शरीर शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ राहू शकते. मेळघाटसारख्या विभागातील कुपोषणाचा प्रश्न जेंव्हा आपल्या समोर येतो तेंव्हा संतुलित आहार घ्यावे अशा प्रकारची सहज प्रतिक्रिया आपण देऊन टाकतो. दररोज एक प्रकारचे जेवण केल्यामुळे आपण कंटाळून जातो त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थची चव घेतो, न जाणतेपणाने आपण संतुलित आहार घेत असतो. परंतु यात काही जाणीवपूर्वक बदल करून गृहिणीने आठवड्याचा वेळापत्रक तयार करून तसे खाद्य म्हणजे जेवण आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा मुलांसोबत आपणाला  सुध्दा होतो.
घरातील लहान मुले जेवण्याच्या बाबतीत नेहमीच हे नको, ते हवे अश्या तक्रारी करीत असतात. आंबट फळे खात नाहीत, फक्त गोड असलेल्या फळाची मागणी करतात. त्यामुळे ते जीवनभर त्या फळापासून दुरच राहण्याची शक्यता नकारता येत नाही. कारले कडू लागतात म्हणून बऱ्याच मुलांना ते घशाखाली उतरत नाही. प्रत्येक भाजी खाण्याबाबत त्यांना आग्रह केल्यास त्यांच्या शरीराला फायदा होईल. आपल्या शरीराला जेवढे पिष्टमय, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाची गरज आहे तेवढीच क्षार व जीवनसत्वाची सुध्दा आहे. हिरव्या पालेभाज्या आणि फळे यातून क्षार व जीवनसत्व मिळते. शरीरात ए जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाल्यास रात्रीला अंधुक अंधुक दिसणे म्हणजे रांताधळेपणाचा रोग होतो. त्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आहारात असणे आवश्यक आहे.  बी जीवन सत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होणे व त्वचा खरखरीत होणे असे रोग होऊ शकतात.  दाताच्या हिरड्या मजबूत राहण्यासाठी सी जीवनसत्वाची गरज असते आणि हे जीवनसत्व सर्व आंबट गोड फळातुन मिळतात. सकाळी कोवळया सूर्यप्रकाशात बसल्यामुळे डी जीवनसत्व मिळते आणि त्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात व पाठीला बाक येत नाही. कैल्शियम मिळविण्यासाठी मांस व अंडी चा जेवणात वापर करण्याच्या सल्ला वैद्यकीय मंडळी याच साठी देतात. असे काही विकार आपल्या मुलांना होऊ नये यासाठी सर्व मातानी जागरूकपणे आपल्या स्वयंपाकात संतुलित आहाराचा समावेश केल्यास आपला मुलगा अर्थात देशाचा भावी नागरिक बळकट, तंदुरुस्त आणि सुदृढ होईल यात शंकाच नाही.
जेवण करताना घ्यायची काळजी
जेवण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावे. जेवणाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ परिसरात जेवण परिपूर्ण होतच नाही. दिवसातुन दोनच वेळा जेवण करण्याची सवय लावून घ्यावी. भूक लागली की जेवण असे शक्यतो करू नये. सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ साफ केल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर अर्धा तास काही ही सेवन न करता तसेच रहावे. सर्वात महत्वाचे सकाळी शक्यतो चहा टाळावे त्याऐवजी दुधाचा वापर करावा. दूध हे पूर्ण अन्न आहे आणि चहामुळे आपल्या भूकेचा सर्व नाश होतो. त्यामुळे सकाळी चहासोबत बिस्किट किंवा पाव खाऊ नये त्याऐवजी मोड आलेली कडधान्ये किंवा इतर काही अन्नघटकाचा नाष्टा करावा ज्यामुळे आपण दुपारच्या जेवणापर्यन्त थांबु शकतो. दुपारच्या वेळी जर आपण कार्यालयात काम करणारे कर्मचारी असाल तर झोप येणार नाही असे जेवण करावे. शाळेतील मुलांनी सुध्दा दुपारी पोट भरून जेवण करू नये त्यामुळे वर्गात लक्ष राहत नाही. सायंकाळी जेवण शक्यतो रात्री आठ च्या पूर्वी आटोपते घ्यावे. त्याच बरोबर सायंकाळी हलके अन्न घ्यावे त्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होते. उशिरा जेवण केल्याने आणि जड अन्न खाल्याने पचन क्रियेवर सुद्धा ताण येतो आणि मग पोटाचे विकार सुरु होतात. सायंकाळी जेवण केल्यानंतर शतपावली करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जेवताना आपण प्रसन्न असावे. उदास किंवा रागावलेल्या परिस्थितीत जेवण करू नये. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करावे आणि जेवताना फक्त कौटुंबिक चर्चा करावी. त्यामुळे सर्वांशी संवाद होईल. आज घराघरातील संवाद लोप पावले आहे असे वाटत आहे. ते यामुळे जुळून येतील. प्रत्येकाचे जेवणाच्या वेळा वेगवेगळे आहेत त्यामुळे कोणाचे कोणाच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे असे म्हटले जाते त्यामुळे अन्नाचा नाश न करता त्याचा पूर्ण वापर करावा म्हणूनच पूर्वी चे लोक म्हणतात की फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजावे. फिरत फिरत किंवा सोप्यावर किंवा पलंगावर बसून जेवण करणे टाळावे कारण जेवताना थोडे फार तरी शीत खाली पडतात आणि त्याच्या शोधात बारीक लाल मुंग्या फिरत असतात. ते शीत जर सोप्यात किंवा पलंगावर पडले तर तिथे लाल मुंग्या येणार. जेव्हा आपण सोप्यावर किंवा पलंगावर बसू तर त्याचा त्रास आपणालाच होणार. जेवणापूर्वी थोडा वेळ तरी शांत बसून मनोमन प्रार्थना म्हणावी.  रेडियो ऐकत, टीव्ही पाहत किंवा पेपर वाचन करीत जेवण करू नये त्यामुळे आपले लक्ष अन्ना वर राहत नाही. घाईघाईने जेवण न करता अगदी स्वस्थपणे जेवण करावे. गाय, बैल किंवा म्हैस या सारख्या प्राण्याना जशी रवंथ करण्याची सोय आहे तशी आपल्या शरीरात नाही याची जाणीव ठेवावी. या सर्व बाबी लक्षात ठेवून जेवण केल्यास आपणास नक्कीच उत्तम आरोग्य लाभेल यात शंकाच नाही.

Friday, 16 September 2016

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त लेख

मराठवाड्याचा विकास

इंग्रजाच्या जुलमी गुलामगिरीतुन दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. परंतु हैद्राबाद संस्थान मधील लोकाना स्वातंत्र्य मिळाले नव्हते. हैद्राबाद संस्थान चे निजाम राजे यांनी आपला प्रांत स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यास तयार नव्हते. त्या राज्याच्या सैनिकांना रझाकर असे म्हटले जाई. रझाकरचे सैनिक प्रान्तातिल हिंदू लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार व जुलुम करीत असत. दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढत चालले असताना समजातून सुद्धा त्याला मोठा विरोध मिळू लागला. हैद्राबाद मुक्ती संग्राम चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांना गावोगावी अनेक लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याच कालावधीत या रजाकार सैनिकांनी गोविंदराव पानसरे यांचा नांदेड़ जिल्ह्यातील अर्जापुर येथे खून केला . त्याचे पडसाद समजातून फार मोठ्या प्रमाणावर पडले. भारताचे पोलादी पुरुष असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळी भारताचे गृहमंत्री होते. लोकांचा जनक्षोभ आणि पटेलांची कणखर वृत्ती यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना दोन दिवस उलटल्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले. यात संपूर्ण मराठवाडा विभाग सुध्दा सामिल झाला. अर्थातच इंग्रजांनी दीडशे वर्षात जेवढा अत्याचार किंवा जुलुम केला नाही त्यापेक्षा किती तरी जास्त त्रास या कालावधीत लोकांना सहन करावा लागला हे सत्य सांगतानाही लोकांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो.
भाषावार प्रांतरचनेनुसार दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. मराठवाडा विभाग जो पूर्वी हैद्राबाद मध्ये होता तो महाराष्ट्राला जोडण्यात आला. पूर्वीपासूनच मराठवाडा विभाग मागासलेला होता. महाराष्ट्राला जोडताना या विभागाकडे लक्ष दिले जाईल असे वाटले होते परंतु प्रत्येक वेळी मराठवाडा विभागास नुसती पानेच पुसली गेली. मराठवाड्या मधल्या कोणत्याच प्रश्नाला विशेष दर्जा दिला गेला नाही. राज्यातील सर्व विभागाचा अभ्यास केला तर ही बाब प्रकर्षाने दिसून येते की मराठवाडा अजून किती मागासलेला आहे. मराठवाड्यातील लोकांना प्रत्येक वेळी भांडण करून किंवा वाद करूनच विकास पदरात पाडून घ्यावा लागतो. त्याशिवाय मराठवाड्याला आजपर्यन्त काहीच मिळाले नाही. अजूनही विभागाची तीच स्थिती आहे. गेल्या तीन वर्षापासून मराठवाडा विभागात पाऊसपाणी वेळेवर पडला नाही त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची लक्षणीय संख्या मराठवाड्यातीलच आहे. शेतकरी आत्महत्या का करीत आहेत ? याचा जराही शोध न लावता भलतीच उपाययोजना केली जात आहे. शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर त्यांच्या शेती सिंचन क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. राज्यातील इतर विभागातील शेती पाहिले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्वतः विषयी घृणा निर्माण होते आणि आत्मचिंतनातुन त्यांच्या मनात क्लेष निर्माण होतो.
सर्वाना समानतेची वागणूक असायला पाहिजे असे घटनेत नमूद केले आहे मात्र इथे सरळ सरळ सापत्न वागणूक दिली जाते. लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, आणि शेती याकडे दुर्लक्ष केल्या जाते. धरण उशाला अन कोरड घशाला अशी स्थिती मराठवाडातील जनतेची झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथील जनतेला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी तर लातूर जिल्ह्यसाठी रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा जर काढला तर शासनाचे करोडो रुपये वाचामराठवाडा तील रस्ते हा तर नेहमीच आणि चवीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विभागातील जिल्हा ते जिल्हा आणि तालुका ते जिल्हाचे रस्ते नीट नाहीत तेथे खेड्यातुन तालुक्याला जोडणारे रस्ते तर सांगता सोय नाही. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्यातून रस्ता हेच समजत नाही. खड्यामुळे गाडीचे आयुष्य तर कमी होतेच शिवाय प्रवासी लोकांना सुद्धा त्याचा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. दळणवळण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे खेड्याचा विकास खुंटतो. रोजगार निर्मिती होत नाही. लोकांच्या हाताला काम मिळत नाही. ते बेरोजगार होतात आणि कुटुंबाच्या कुटूंब , गावाच्या गाव स्थलांतरित होतात. मराठवाडा ज्या प्रांतातुन वेगळा झाला त्या प्रांताकडे जर पाहिले तर वाटते की आपण त्याच प्रांतात राहिलो असतो तर किती बरे झाले असते ? निदान आपला तरी विकास झाला असता
मराठवाडा विभागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा सर्व लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण लक्षात घेऊन एकत्र येऊन लढा निर्माण करणे आवश्यक आहे असे वाटते. हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन झाला आहे पण अजूनही मराठवाड्या मधील जनता खितपत पडली आहे हे सत्य आणि जळजळीत वास्तव आज डोळ्यासमोर दिसत आहे. यावर राजकीय लोकांनी एकत्र येऊन विचार करणे अपेक्षित आहे. एवढेच या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करावेसे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर,
   मु. येवती ता. धर्माबाद मराठवाडा
  09423625769

Wednesday, 7 September 2016

दफ्तराच्या ओझ्यापासून सुटका


*दफ्तराच्या ओझ्यापासून सुटका*

असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडिया (असोचेम) समितीमार्फत देशात नुकत्याच केलेल्या पाहणीत १३ वर्षांखालील ६८ टक्के शाळकरी मुलांना सौम्य स्वरूपाची पाठदुखी असल्याचे आढळले आहे. दप्तराचे ओझे वाहून ७ ते १३ वयोगटातील ६८ टक्के शाळकरी मुलांना पाठदुखी आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पाहणी अहवालात असे म्हटले आहे की, ७ ते १३ वयोगटातील ८८ टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुले त्यांच्या वजनाच्या ४५ टक्के वजन पाठीवर वाहून नेतात. मुलांच्या दफ्तराच्या ओझ्याविषयी यापूर्वी सुध्दा राज्य सरकारने उपाय योजना कराव्यात असे उच्च न्यायलयाने निर्देश दिले आहेत. यावर शासनाने परिपत्रक काढून मोकळे झाले परंतु त्याची अंमलबजावणी कश्याप्रकारे होत आहे याची खातरजमा अजून पर्यन्त केली नाही. मुलांच्या दप्तराचा कायदा २००६ नुसार दप्तराचे ओझे मुलाच्या शरीराच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त असू नये. असा नियम असून ही या नियमची कोठेही प्रभाविपणे अंमलबजावणी होत नाही. मुलांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कसे कमी करावे याबाबत शाळाप्रमुखांनी उपाय योजना करणे आवश्यक आहे.
दफ्तरमध्ये आवश्यक बाबी म्हणजे सर्व विषयाची पुस्तके, विषयाच्या वह्या, रफ वही, स्वाध्याय पुस्तिका, जेवणाचा डबा हा विना अनुदानित शाळेतील मुलांसाठी आणि पाण्याची बाटली ह्या सर्व बाबीचा विचार केल्यास नक्कीच दफ्तराचे ओझे वाढणार यात शंकाच नाही. यावर खालील उपाय करता येतील असे वाटते. प्रत्येक शाळेत लॉकर जरी उपलब्ध करून दिल तरी मुलांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी होईल असे वाटत नाही. काही जण यासाठी टैब चा पर्याय सुचवतता मात्र ती खर्चिक बाब आहे. सर्वाना टैब पुरवठा करणे मोठे अवघड काम आहे. त्यासाठी स्वस्त आणि सुलभ उपाय योजले तर त्याचा फायदा राज्यातील सर्व मुलांना होऊ शकते. राज्यात आज मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास भाग एक आणि दोन असे सहा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत.


* वारनिहाय विषयाच्या वहीचा वेळापत्रक तयार करणे

मुले विषयच्या वह्या रोजच्या रोज ने आण करतात. याचा भार आपणाला सहज कमी करता येतो. सहा दिवसाचे सहा विषय आणि आणि त्याच दिवशी ते वह्या तापसण्याचे काम केल्यास बरेच काम सुलभ होते आणि दफ्तराचे ओझे सुध्दा कमी होईल. यामुळे मुलांना चांगला वेळ मिळतो आणि यात सातत्यपणा येईल. सध्या प्रचलित पद्धतीनुसार धडा संपला की गृहपाठाची वही पूर्ण करणे आणि सर सांगतील त्यावेळी दाखविण्याची ही प्रथा आत्ता जुनी झाली त्यात काही बदल करणे आवश्यक आहे. तेंव्हा वार निहाय वह्याचे नियोजन नक्की फलदायी ठरेल असे वाटते.

* वार निहाय विषयाचे नियोजन

ज्या पद्धतीने वार निहाय विषयाच्या वह्याचे नियोजन केल्या आहे त्याच पध्दतीने जर वारनिहाय विषय नियोजन केल्यास दफ्तराचे ओझे बऱ्याच अंशी कमी होईल असे वाटते. आपण विषयाच्या तासिका, भारांश या सर्व बाबीचा विचार करून एका दिवसात सर्व विषयावर अध्यापन करतो. घरी गेल्यानंतर मुलांना सर्व विषयांचा आढावा घेताना नाकी नऊ येतात आणि राहिलेला अभ्यास कधी करावा ? हा प्रश्न पडतो. त्याऐवजी एका दिवशी एक विषय दिवसभर अध्यापन केले तर मुलांना त्याच विषयावर भर देता येते. विषयाची एकच लिंक असते. शिक्षक सुद्धा या पध्दतीने आपल्या विषयाला न्याय देऊ शकेल. सकाळच्या सत्रात विषयाचे अध्यापन करता येईल आणि दुपारच्या सत्रात त्याच विषयाशी संबंधित पश्नोत्तर किंवा स्वाध्याय सोडवून घेतल्यास खूप फायदा मिळू शकतो. विद्यार्थी च्या गुणावत्तेत ही वाढ होते. यामुळे मुलांच्या दफ्तरात एक पुस्तक एक वही बाकी इतर साहित्य राहील म्हणजे वजन किती कमी होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. पण ही पध्दत एका शिक्षकाने एका शाळेत राबवून चालणार नाही. राज्यातल्या सर्व शाळेत ही पद्धत चालू केली तर मुलांचे आरोग्य वाढेल ते निरोगी राहतील. सायकल चालवित पाठीवर दफ्तराचे ओझे घेऊन शाळेला जाणाऱ्या मुलांची अवस्था तर खुपच वाइट आहे, बिकट आहे.



*बिन दफ्तराची शाळा

महिन्यातुन एक किंवा दोन दिवस मुलांना दफ्तर विना शाळेत बोलावावे. त्यादिवशी मुलांसोबत गप्पा-टप्पा आणि अवांतर चर्चा करावी. आठवडाभर शिकवलेल्या भागावार औपचारिकपणे प्रश्नउत्तर विचारावे. प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम राबाववे. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा यासारखे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी डबा पार्टी करावी, क्षेत्रभेट करावे, अश्या दफ्तराविना शाळेत आल्यामुळे मुले आनंदात शाळेत येतात आणि त्यांना शाळेचा लळा ही लागेल. विशेष म्हणजे त्याच्या पाठीवर एका दिवसाचे दफ्तराचे ओझे राहणार नाही. 

पाठीच्या वाढत्या तक्रारींचा आणि मणक्याचा आकार बदलण्याचा संबंध हा अतिरिक्त आणि असमान ओझ्याशी आहे. त्यामुळे मणक्याची गंभीर स्वरूपाची हानी होते आणि अनेकदा बरे न होणारे पाठीचे दुखणे बळावते. कमी वयात मणक्यांना आलेली सूज, स्लीप डिस्क, सततची पाठदुखी, मणक्याची लवकर झीज होणे आदी तक्रारी मुलांना आहेत, असे असोचेमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष बी. के. राव यांनी सांगितले.

मुलांच्या दफ्तराच्या अतिरिक्त ओझ्यामुळे येणाऱ्या ताणाने मुलांच्या मस्कोक्युलेटल सीस्टिमच्या वाढीवर परिणाम होतो. असे तज्ञ डॉक्टर चे म्हणणे आहे. या सर्व बाबीचा विचार करून आत्ता पालकांनी शाळेकडे मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याविषयी आग्रहाची मागणी लावून धरून त्याचा पाठपुरावा करणे सुद्धा आवश्यक आहे अन्यथा भविष्यात आपली मुले निरोगी राहतील ? याची खात्री नाही

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
nagorao26@gmail.com



==========================


साक्षरता दिन

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस - 08 सप्टेंबर



दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...