Wednesday, 16 November 2022

पंजाब केसरी लाला लजपत राय ( Lala Lajapat Ray )


पंजाब केसरी लाला लजपत राय

लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी पंजाब मधील धुंढिक येथे झाला. ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी लाल म्हणजे लाला लजपत राय हे होते. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.

लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला. १८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोरमध्ये शिकत असताना स्वामीदयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या. १८८४ मध्ये त्यांच्या वडीलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडीलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत राया यांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते. निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

( वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769


No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिन ( Republic Day )

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा