Saturday 7 December 2019

एकच ओळखपत्र

एक व्यक्ती एक मतदान 



राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की त्या यादीतले पाच ते दहा टक्के मतदार हे मयत, दुबार किंवा स्थलांतरित असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारीवर देखील याचा परिणाम दिसून येतो. त्याचसोबत काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आढळून येते. खास करून सीमावर्ती भागात काही मतदारांचे नावं दोन राज्यात असतात आणि ते दोन्ही राज्यात मतदान करून दोन्ही राज्यांतील योजनांचा लाभ घेत असतात. काही जणांचे एका राज्यात असून देखील दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असते. अश्या बाबीवर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने जे पाऊल उचलले आहे ते अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे. यासाठी निवडणूक आयोग काय योजना तयार केली आहे याची माहिती मतदारांना होणे आवश्यक आहे. याबाबतीत पहिल्यांदा मतदार जागरूक होणे गरजेचे आहे. ही पडताळणी करताना मतदारांस आपला मोबाईल क्रमांक आणि त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे. त्यामुळे एक व्यक्ती देशभरात कुठे ही एकाच ठिकाणी आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. त्याला एकदाच मतदान करता येणार आहे. ग्रामपंचयात, नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी बोगस नोंदणी केली जाते असे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. संबंधित मतदारांच्या मोबाईल वर एक मेसेज येईल ज्याद्वारे मतदाराला स्वतः ला एक लॉगिन आय डी आणि पासवर्ड तयार करावे लागणार आहे. त्याच क्रमांकावर वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी येणार आहे. त्याद्वारे मतदार लॉगिन करणार आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावाना हा क्रमांक वापरता येणार नाही. यासाठी आयोगाचे बिलओ मतदारांना सर्वतोपरी मदत करणार आहेत. आयोगाने सुरू केलेल्या या कार्यक्रमात सर्वच मतदारांनी स्वतः हुन पुढे येत पडताळणी करून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. देशातील बोगस मतदार शोधून ते कमी करण्याचे काम या कार्यक्रमातून होणार आहे. भारत हा जगातील लोकशाहीच्या माध्यमातून उभारलेला एक बलशाली राष्ट्र आहे. जेथे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय मतदान करू शकतो. त्याच्या एका मताला अमूल्य असे किंमत आहे. सध्या प्रत्येक घरात मोबाईल पोहोचले आहे पण एक समस्या असू शकते एखाद्या व्यक्तीजवळ मोबाईल नसेल तर काय करायचे ? त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ? याबाबत अजून काही माहिती कळाली नाही.  प्रत्यक्ष निवडणूक घेतांना मतदान ओळखपत्र सोबत अन्य पुरावे देखील ग्राह्य समजले जात असल्यामुळे मतदान ओळ्खपत्राचे महत्व खूप कमी झाले आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदान ओळखपत्र सक्तीचे करण्यात यावे. ज्याच्याजवळ मतदान ओळखपत्र नसेल त्यांना तहसील कार्यालयातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण करावी. प्रत्येक नागरिकांकडे आज आधारकार्ड आहे. कारण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जात आहे. यदाकदाचित ते कार्ड हरवले असेल तरी ऑनलाइन उपलब्ध होते. तशीच काही क्रिया मतदान ओळ्खपत्रासाठी करता येईल काय ? यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या मतदारांना पुढे चालून काही दंड भरण्याची तरतूद देखील करण्याचा विचार आयोगाने करायला हवे. मतदान करण्याविषयी लोकांमध्ये किती ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी शिकले सवरलेले मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. मतदानासाठी सुट्टी देऊन देखील कर्मचारी मतदान करण्या ऐवजी त्या सुट्टीचा उपयोग सहलीसाठी करताना दिसून येतात. त्यामुळे या विषयी काही विशेष यंत्रणा तयार करून मतदान न करणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्या मतदारांनी मतदान का करू शकले नाहीत याचा शोध लावून अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यापुढील निवडणुकीत ऑनलाइन तंत्रज्ञानाचा उपयोग करून निवडणूक आयोग आपल्या निवडणूक प्रक्रियेत काही आमूलाग्र बदल करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. निवडणूक आयोगाच्या कोणत्याही योजनेत मतदारांचे सहयोग आणि सहकार्य असल्याशिवाय ती योजना सफल होत नाही. म्हणून मतदारांनी सजग होऊन आयोगाला सर्वतोपरी मदत करायलाच हवे, असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक

4 comments:

  1. Election card la Aadhar number link karane important ahe.

    ReplyDelete
  2. Yes yamule dubar Matdan honar nahi

    ReplyDelete
  3. बरोबर ahe सर..

    ReplyDelete
  4. बरोबर आहे सर

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...