Friday 6 December 2019

स्मार्ट बॉय : काळाची गरज

*स्मार्ट बॉय : काळाची गरज*

हैदराबादच्या हायटेक सिटी मध्ये डॉ. प्रियांका रेड्डी हिच्यावर चार नराधमांनी आमनुषपणे अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिला जिवंत जाळले. 


भारतात हे पहिलेच प्रकरण आहे असे ही नाही. यापूर्वी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ही नामुष्की नक्कीच येणार नाही. त्यासाठी प्रशासन देखील तेवढेच कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
घरातून नैतिकतेचे शिक्षण -
आपल्या घरात असलेल्या मुलांना सर्वप्रथम नैतिकता शिकवायला हवी. कोणासोबत कसे वागावे, बोलावे ? याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पालकांनी वाढत्या वयाच्या मुलांसोबत मित्रासारखे संबंध ठेवून त्यांच्याशी संवाद करत राहणे आवश्यक आहे. दहाव्या उत्तीर्ण झाले की आज मुलांना मोबाईल आणि गाडी याची आवश्यकता भासत आहे. या दोन वस्तू दिल्याशिवाय तो पुढील शिक्षण घेणार नाही असे स्पष्टपणे बोलतांना दिसत आहेत. या दोन गोष्टी मुळेच आजची मुले अनैतिक मार्गाकडे वळत आहेत. गाडी आणि मोबाईल म्हटलं की पॉकेटमनी देखील आलेच. आजकाल पालकांकडे पैसा ही मुबलक प्रमाणात असल्याने ते ही मुलांना पॉकेटमनी देत राहतात. याचे विपरीत परिणाम पाहायला मिळते. सध्या मोबाईलवर अनेक प्रकारचे वेबसाइट उपलब्ध आहेत जे की, या युवकांना वाईट मार्गावर घेऊन जातात. मित्रपरिवारामध्ये हळूहळू ही बाब गंभीर वळण घेत जाते. काही खराब मित्रांच्या संगतीमुळे मुलगा वाईट बाबीकडे वळायला लागतो. उरलेल्या पैश्यातून मग त्याला दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, मुलींच्या मागे लागणे यासारखे घाणेरडे व्यसन लागतात. या वयातील मुले मग एका संधीची वाट पाहत असतात. ज्याप्रकारे जंगलात शिकारी आपल्या शिकारच्या शोधात असतो अगदी तसेच. म्हणूनच आपल्या घरातील मुले या वेगळ्या वळणावर जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. घरातली मुलगी सात च्या आत घरात राहावे असे वाटते तर मुलगा रात्री किती वाजता ही आलेले आपणांस चालते, यात पहिल्यांदा बदल करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी राक्षसांचा संचार असतो आणि या कचाट्यात मुलगी येऊ नये याची काळजी जसे आपण घेतो तशीच काळजी पालकांनी मुलांच्या बाबतीत देखील घ्यायला हवी. मुलांचा मोबाईल दर आठ दिवसांनी किंवा अधूनमधून कधी ही न सांगता तपासून घ्यायलाच हवे. याची मुलांच्या मनात भीती असेल तर तो मागेपुढे विचार करू शकतो. मुलांना देत असलेल्या प्रत्येक पैश्यांचा हिशेब देखील घ्यायलाच हवं आणि सोबत त्यांच्या मित्रांची देखील एकदा ओळख करून घ्यावी. या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपण कटाक्षाने करत असू तरच आपली मुलं स्मार्ट बॉय होऊ शकतात.
प्रशासनाने कडक व्हावे - असे अनैतिक प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन अगदी कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी गाडीवर फिरणारे युवक दिसले तर त्यांची कसून चौकशी व्हायलाच पाहिजे. एक दोन वेळा अशी चौकशी झाली तर रात्रीच्या वेळी फिरायला हे युवक कचरतील. मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी काही युवक मंडळी शाळेच्या मैदानात किंवा उघड्यावर जेथे रात्रीला कोणीच येत नाही अश्या निर्मनुष्य ठिकाणी चार पाच मित्र मिळून कॉकटेल पार्टी करतात. ह्या बाबीवर पोलीस प्रशासन नियंत्रण आणू शकते. रात्री सात ते दहा या वेळांत एकदा पेट्रोलिंग केलं की अश्या गोष्टीवर आळा बसू शकतो. ह्या वयातील मुले नशेच्या धुंदीत असे दुष्कृत्य करतात. त्यावेळी त्यांचे डोके सैतानाचे बनलेले असते. त्याचसोबत ह्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे तसा वटहुकूम देखील काढण्यात आला आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कायद्याची भीती मनात बसल्याशिवाय ही मंडळी घाबरणार नाहीत. चांगल्या घरातील आणि सुसंस्कारी घरातील मुले असे दुष्कृत्य सहसा करत नाहीत. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास कोणी वालीच नसतो, अश्या मुलांकडून असे कृत्य होते. म्हणून समाजातील अश्या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या हाताला काही कामधंदा नसते अशी मुले गैर मार्गाला लागतात. म्हणून प्रत्येक गावात आणि शहरातील वॉर्डात रिकामटेकडे मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवणे ही गरजेचे आहे. कमी वयोगटातील मुले काही ठिकाणी गैरवर्तन करत असतील तर त्यांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे हे हैद्राबादच्या घटनेतुन शिकायला मिळते. भारत देश महिलांसाठी असुरक्षित देश आहे ही काळिमा प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. अशी घटना यापुढे घडणार नाही याची काळजी देशातील प्रत्येकाने देखील घेणे गरजेचे आहे, असे वाटते. ( लेख लिहीत असतांनाच हैद्राबादच्या त्या चार नराधमाचे एंकौंटर झाले अशी बातमी कानावर धडकली. )

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
www.nasayeotikar.blogspot.com

  

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...