Sunday 25 November 2018

कथा

बदमाश कोल्हा, गरीब गाढव! 
एका जंगलात एक कोल्हा आणि एक गाढव शेजारी शेजारी राहत होते. सुरुवातीला कोल्हय़ाला त्याची शिकार करायची हुक्की येई. पण गाढव चांगलेच उंचपुरे आणि दणकट होते. कोल्हय़ाचा काही त्याच्यापुढे निभाव लागला नसता. तरी पण कोल्हा बरेच दिवस गाढवाच्या शिकारीची स्वप्ने पाहत होता. पण गाढव इतर कुणी प्राण्याने त्याच्यावर हल्ला केल्यावर आपल्या दणकट पायांनी त्याला पिटाळून लावत असे. ते पाहिल्यावर तर कोल्हय़ाच्या मनात त्याची दहशतच बसली. मग त्याने गाढवाच्या शिकारीचा नाद सोडून दिला. त्याने ठरवले की, या गाढवाशी मैत्री केली तर जंगलातल्या इतर प्राण्यांपासून आपलेही संरक्षण होईल. मग त्याने हळूहळू गाढवाशी ओळख करून घेतली. दोघे शेजारी-शेजारी राहत असल्यामुळे त्यांची सतत गाठभेट होई. त्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. गाढवाला दिवसभर जंगलात फिरायला भिडू मिळाला. 
काही दिवसांनी दोघांची छान मैत्री झाली. तरीही कधी-कधी कोल्हय़ाच्या मनात कपट येई. पण गाढव हुशार होते. त्यामुळे कोल्हय़ाला फार अक्कल पाजळता येत नसे. गाढवालाही कोल्हय़ाला फार घाबरायचे कारण नव्हते. त्यामुळे दोघे जंगलात एकत्र फिरू लागले. कोल्हा छोट्या-मोठय़ा शिकारी करी. गाढव आपले हिरव्या कुरणात दिवसभर चरत असे. मग दोघे तलावावर पाणी प्यायला सोबत जात. खाऊन-पिऊन झाल्यावर मस्त सावलीत बसून गप्पाटप्पा करत. सोबतीने इकडे-तिकडे फिरत. दोघांचे दिवस मजेत चालले होते. दिवसेंदिवस दोघांची मैत्रीही घनिष्ठ होत चालली होती. दोघांनाही एकमेकांपासून करमेनासे झाले. एके दिवशी कोल्हा आणि गाढव एका हिरव्या कुरणाच्या शेजारी सावलीत बसून गप्पाटप्पा करत होते. दोघांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. दोघेही एकमेकांना आपल्या लहाणपणीच्या गोष्टी सांगत होते. त्यात ते इतके रंगून गेले होते की, त्यांना आजूबाजूचे काही भान राहिले नव्हते. तेवढय़ात एक भुकेलेला सिंह जवळून जात होता. त्याची नजर कोल्हा-गाढवावर पडली. सिंहाला सकाळपासून काहीच खायला मिळाले नव्हते. त्यामुळे तो भुकेने व्याकूळ झाला होता. सिंह लांब उडी मारून दोघांच्या जवळ पोहचला. त्याच्या आवाजाने कोल्हा-गाढव भानावर आले. मरण त्यांच्यासमोर उभे राहिले होते. कोल्हय़ाला कळून चुकले की, आता आपली काही धडगत नाही. सिंहाच्या तावडीतून आपण काही जिवंत सुटू शकत नाही. 
कोल्हा तसा चतुर आणि बदमाश होता. तो गाढवाला म्हणाला, ''तू इथेच थांब. मी सिंहाला विनंती करून आपली सुटका करून घेतो.'' बिच्चारे गाढवही घाबरले होते. त्यामुळे ते जागेवरच थांबले. कोल्हा सिंहाजवळ गेला. त्याने सिंहाला पुढचे पाय वाकवून नमस्कार केला. मग म्हणाला, ''महाराज, तुम्ही मला सोडून देणार असाल तर मी हे गुबगुबीत गाढव तुमच्या स्वाधीन करतो. तुम्ही त्याच्यावर मस्त ताव मारा.'' सिंहाने मघाशी गाढवाशी गुलुगुलु गप्पा मारणार्‍या कोल्हय़ाला पाहिले होते. कोल्हय़ाचे कपट सिंहाच्या लक्षात आले. शिवाय एवढय़ा मोठय़ा गाढवाची शिकार आपल्या एकट्याला हवी कशाला, हे सिंहाला माहीत होते. 
सिंह गालातल्या गालात हसला. कोल्हय़ाने गाढवाला सिंहाच्या समोर त्याची माफी मागायला म्हणून आणले. गाढव आधीच घाबरले होते. सिंहाजवळ येताच ते थरथर कापू लागले. कोल्हय़ाने ''बरंय महाराज येतो मी'' म्हणत पळायला सुरुवात केली, तोच सिंहाने झडप घालून कोल्हय़ाची मान पकडली. मग गर्जना करत म्हणाला, ''बदमाशा कोल्हय़ा, आपल्या मित्राला फसवून पळून जातोस काय? थांब, आधी मी तुझाच फडशा पाडतो.'' सिंहाने आपल्या मजबुत दातांनी कोल्हय़ाची मान घट्ट पकडून पिरगाळली. ही संधी साधून गाढवाने जंगलात धूम ठोकली. सिंहाने कोल्हय़ावर मस्त ताव मारला. आपल्या मित्राचा विश्‍वासघात करणार्‍या कोल्हय़ाला स्वत:चाच जीव गमवावा लागला. 
आईचा सल्ला 
एक भुकेला सिंह एका गायीला व तिच्या दोन बछड्यांना दूर उंच गवतात लपून पाहत होता. त्या दोन बछड्यांपैकी एक जरी आईपासून दूर गेले तर त्याच्यावर झडप घालण्याचा त्याचा इरादा होता. बराच वेळ उलटून गेला; पण ते तेथे एकामेकांपासून दूर होण्याची चिन्हे दिसेनात. पावसाळ्यात उगवलेले ताजे गवत खाण्यात ते मग्न होते. उतावळा झालेला सिंह स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. गवतात लपत-छपत तो त्या बछड्यांपैकी सर्वात तरुण बछड्याजवळ गेला. 'शू!' सिंह हळूच कुजबुजला. तरुण बछडा सिंहाच्या कुजबुजण्याने दचकला व एक पाऊल मागे सरकला. ''घाबरू नकोस, मी तुला अशा ठिकाणी नेईन जेथे गवत येथल्या गवतापेक्षा गोड आहे.'' सिंहाने मधाळ स्वरात बछड्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. बछड्याने आपल्या आईकडे पाहिले पण ती चारा खाण्यात मग्न होती. ''माझ्याबरोबर ये,'' सिंह पुन्हा कुजबुजला. आपल्या आईचा एकत्र राहण्याचा सल्ला तो बछडा विसरला व त्याने सिंहाबरोबर जायचे ठरवले. अर्थात त्या बछड्यावर सिंहाने लवकरच ताव मारला हे सांगायला नकोच.
बोध : थोरा-मोठय़ांचा योग्य सल्ला धुडकावू नये.

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...