सुंदर
त्याचं नाव सुंदर, तसं त्याचं कामही सुंदर त्याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं. परंतु सारेच जण त्याला बंदर म्हणायचे. कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल गेल्यासारखे. त्याला पाहताक्षणीच वाटायचे हा बंदर म्हणजे माकडच आहे. त्यामूळे गावातील सर्व पोरं सोरं त्याला बंदर... बंदर म्हणून डिवचायचे. याप्रकारामूळे त्याचं मन त्याला रोज खात असे आणि देवाने मला असे रूप का दिले म्हणून देवाच्या नावाने बोटे मोडायचा. त्याच्या त्या कुरूपामूळे कोणी त्याला जवळ येऊ देत नव्हते, मैत्री करीत नव्हते ना त्याला खेळू देत होते. त्यामूळे त्याला कोणी मित्र, सखा वा दोस्त नव्हताच मुळी. घर-परिवारात आणि नातलगात सुद्धा त्याला चिडवले जायचे त्यामूळे तो जीवनाला पुरता कंटाळला होता. मात्र त्याची आई त्या कुरूप सुंदर मुलांवर जिवापाड प्रेम करायची. त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी सदैव ती त्याला चांगल्या गोष्टी सांगून त्याच्यात विश्वास निर्माण करीत असे. आपणाला मिळालेले रूप हे निसर्गाची देणगी आहे, त्यावर आपण काही करू शकत नाही. निसर्गाने कोकिळेला काळा रंग दिला म्हणून लोकं त्या पक्ष्याला हिणवत नाहीत परंतु त्याच्या मंजूळ आवाजाने वेडेपीसे होतात. रूपाने सुंदर दिसण्यापेक्षा मनाने आणि आपल्या कर्माने सुंदर होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी चांगली कामे करीत जा, मोठ्यांच्या आज्ञा पाळत जा, दीन दलित दुबळ्या अपंग लोकांना मदत करीत राहा, खूप अभ्यास करून जीवनात यशस्वी हो आणि आपली कीर्ती दुरवर पसरवून टाक, मग बघ एके दिवशी हे सारेच लोक तुला खरोखरच सुंदर म्हणतील. अशी समजूत ती रोजच काढीत असे.
आईच्या या शिकवणीमूळे लोकांचे बोलणे तो निमूटपणे ऐकायचा. नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे वाहे वारे प्रमाणे लोकांचे चिडवणे ऐकायचा आणि सोडून द्यायचा. लहानांपासून मोठ्यांचे सगळयाचे काम तो निस्वार्थ भावाने करीत असे त्यामूळे प्रत्येकांच्या -हदयात तो स्थान मिळविला होता. आई सोबत त्याचे जीवन मस्त आनंदात, मजेत जात होते. गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्याला जवळच्या शहरात जाणे भाग होते. गावापासून चार कोसावर असलेल्या शाळेत प्रवेश घेतला आणि शहरातच एक खोली घेऊन आईविना राहण्याचा निर्धार केला. आज त्याच्यासोबत प्रेमळ आई नव्हती परंतु तिची शिकवण मात्र मनात साठवून होती.
शहरातही त्याला गावांप्रमाणेच अनुभव येत होता. पांढरपेशांची ती गोरी गोमटी मुलं सुंदरला जास्तच त्रास देवू लागली. शाळेच्या पहिल्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांसह शिक्षक मंडळी सुद्धा त्याची टर उडविली. परंतु तो न डगमगता आईची शिकवण मनात ठेवून तेथे राहू लागला. हळूहळू सुंदरचे नाव सर्व शाळेत गाजू लागले ते त्याच्या सुसंस्कारित वागण्यामूळे व सुंदर रेखीव अक्षरामूळे. अभ्यासातही तो हुशार होता त्यामूळे लवकरच सर्व शिक्षकांचा लाडका शिष्य बनला. जो तो त्याच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करीत होता. तो सर्वांचाच चांगला मित्र बनला. गल्लीमध्ये सुद्धा आपल्या वर्तनाने तो सा-याचेच मन जिंकला होता. कोणतेही लहान-सहान कामे जसे भाजीपाला आणणे, दुध आणणे, वृत्तपत्र आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, धान्य दळून आणणे इ.कामे करून गल्लीतल्या सगळ्याच लोकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. आपली कामं करून घेण्यासाठी सारेच लोक त्याला प्रेमाणे “सुंदर....सुंदर” म्हणत होती. लोकं आपणाला असेच बोलावावे म्हणून तो सगळ्यांची कामे आवडीने करायचा.
दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करून त्याने पत्राकारिता हे क्षेत्र निवडले. शालेय जीवनापासून मातृभाषा मराठीवर त्याचे विलक्षण प्रेम होते. कविता लिहिण्याचा त्याचा छंदच मुळी त्याला या क्षेत्राकडे नेले. आपले शिक्षण पूर्ण करून तो एका दैनिकांत वृत्तसंकलनाच्या कामाला लागला. पाच-सात वर्षात त्याने अनेक कविता रचल्या आणि विविध दैनिक, साप्ताहिक, मासिकांतून प्रकाशित झाले. अनुभवावर रचलेल्या कविता त्याच्या नावाप्रमाणे खुपच सुंदर होते. जिल्ह्यात त्याचे नाव सर्वदूर पसरले. काही वाचकांनी त्याला अभिनंदन पर पत्र पाठविले तेव्हा त्याला अजून हुरूप आला. आपल्या कल्पक बुद्धमत्तेतून त्याने अनेक कविता तयार केल्या. दैनिकांत काम करीत असल्यामूळे प्रकाशकांशी त्याचा जवळचा संबंध येऊ लागला. एका प्रकाशकाने त्याच्या कविता पुस्तक रूपात तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि लागलीच त्याने त्यास होकार दिला.
“सुंदर आई” नावाचा जीवनातला पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तसे त्याचे नाव संपूर्ण राज्यात पसरले. त्यानंतर त्याने अनेक कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित करीत खूप मोठा व्यक्ती झाला. परंतु त्या दैनिकांतील नौकरी सोडली नाही. दैनिकांच्या मालकाने सुंदरवर विश्वास दाखवित त्यास उपसंपादक व त्यानंतर संपादकाची जबाबदारी दिली. आईची शिकवण उराशी बाळगून तो रोज मोठा होत होता परंतु तो सामान्यांसारखाच राहून आपलं अस्तित्व टिकवीत होता. आज त्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती आणि अर्थातच एवढा कुरूप असूनही त्यास सर्वच जण “सुंदर...सुंदर” असेच म्हणत होती.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
व्यसन
आज सगळं गाव दु:खात बुडालं होत. हळहळ व्यक्त होत होती. बापाच्या सरणाला पोराने विस्तू लावण्याऐवजी आज पोराच्या सरणाला बाप विस्तू लावीत होता हे चित्र गावातील लोकांना देखवत नव्हते. परंतु काळासमोर कोणाचे चालते, जे व्हायचं ते होऊनच राहते. अखेर आबा पाटलांच्या मुलाने पहाटे पहाटे झोपेतच दम तोडला. वर्षभर खाटल्यावरच होता, आज जाईल कि उद्या याचा काही नेम नव्हता. माणसाला झटपट करण यावं, असं तडपून तडपून मरण येवू नये अशी चर्चा गावातल्या लोकांत जास्त पाप केलं की कुत्र्यासारखचं मरण येते हे भाविक मंडळीचे म्हणणे. पण त्या वेळेला आबा पाटलांच्या डोक्यात काय विचार चालले असतील? ते स्वत:लाच दोष देत होते. माझ्यामुळेच..... फक्त माझ्या या वागण्यामूळे, व्यसनामूळे माझ्या मुलाचा जीव गेला. मी विचार करून वागलो असतो, तर ही वेळ माझ्यावर नक्कीच आली नसती असा विचार करून आबा पाटील लहान मुलांसारखे ओक्साबोक्सी रडू लागले. धनुष्यातून निघालेला बाण आणि मागे पडलेली वेळ ही कधीच परत येत नसते.
आबाजी रावसाहेब पाटील हे नुसते पाटीलच नव्हते तर त्या गावचे वीस वर्षे ते सरपंच होते. त्यामूळे ते बोलतील ती पूर्व दिशा, त्याच्या डोळ्याला डोळा सुद्धा भिडवायची कोणाची हिम्मत नव्हती. पंचवीस-तीस एकर जमीन, चार पाच सालगडी शेतात काम करायला, चार-पाच बायका घरकाम सांभाळायला. पाच पन्नास लोकांच्या पत्रावळ्या रोजच उठत होते. देवाने त्यांना काही कमी केलं नव्हतं परंतु लग्न होऊन पाच वर्षे झाले तरी मूल होईना. तेव्हा मोठ्या महादेवाला पाटलीन बाईंनी नवस केला तेव्हा शिवरात्रीला शंभू महादेवच घरी जन्मला. त्या दिवशी पाटलांना ही खूप आनंद झाला. सगळ्या गावाला पाटलांनी गोड जेवण दिलं. अख्या पंचक्रोशीत पाटलांचा दबदबा होता म्हणून खूप लोक आली. सगळीकडे आनंदी आनंद, पाटलांनी त्याचं नाव संभाजी ठेवलं परंतु सगळं गाव त्यांना शंभू पाटील म्हणूनच हाक मारीत होते.
गोरापान, काळेभोर केस, गरगरीत डोळे, असा शंभू पौर्णिमेच्या चंद्रासारखा मोठा होऊ लागला. पाटलाचा एकुलता एक नवसाचा मुलगा त्यामूळे प्रत्येकजण तळहाताच्या फोडासारखं जपत होते. पाटील तर त्यास “संभाजी राजे” म्हणून हाक मारीत. सदान् कदा पाटलांच्या मांडीवरच बसायचा, पाटला सोबत उठायचा अन् त्यांच्यासोबतच झोपायचा. पाटलाचा मुलगा म्हणून कोणी त्यांच्यासोबत भांडण करायचे नाही मग शंभू पाटील जसे म्हणतील तसे ती पोरं करायची. दिवसा मागे दिवस जाऊ लागले. शंभु लहानाचा मोठा झाला. त्याच्या हेकाटीपणामूळे पोरं त्याच्यासोबत खेळेनाशी झाली. शंभू आला की ते दुसरीकडे जाऊ लागली. त्याला कोणी मित्र करून घेण्यास तयार नाहीत. रडका चेहरा करीत तो आबा पाटलाकडे जात आणि या मुलांची तक्रारी करीत. मग आबा पाटील रागात काही तरी बोलून त्याला तेथेच बसवीत. चार-पाच लोक गोल वर्तुळात बसलेली, त्यांच्या हातात बदकाची रंगीत पानं, त्याच्यात होणारी चर्चा ही शंभू पाटलाला नित्याची झाली होती. करमणूक व्हावी आणि वेळ निघावा यासाठी पाटलाचे काही हौशी मित्र रोजच पत्ते खेळायला यायचे आणि दिवसभर त्यांचा डाव चालू राहायचा. शंभू पाटील रोजच आबाजवळ बसून बारीक निरीक्षण करायचा. हळूहळू शंभूला जोकर पासून राणी व गुलाम पर्यंतची पाने कळायला लागली. रंगजमणी खेळता खेळता त्यास चुकत माकत रम्मी सुद्धा जमू लागली. असेच एके दिवशी आबा पाटलांच्या हातात रमी होती परंतु त्यांनी पान फेकणार एवढ्यात शंभू म्हणाला, “बाबा, रम्मी झाली, तुम्ही पान का फेकता?” म्हणत त्याने आबाच्या हातातील पत्ते जुळवून रम्मी करून दाखविली तेव्हा आबा पाटील त्याच्या पाठीत शाबासकी देत “व्वा रे संभाजी राजे, आज तुम्ही माझे पाचशे रूपये वाचविलेत.” शंभूला सुद्धा त्या शाबासकीने खूप बरे वाटले. आत्ता रोजच शंभू आणि आबा एकत्रित विचार करीत रम्मी खेळू लागले. आबांना रोज सायंकाळी घोटभर औषध (शंभूला हे दारू नसुन माझं झोपेचं औषध आहे असे ते नेहमी सांगत) घेतल्याशिवाय झोपच येत नसे. औषध घेतलं की बाबा मस्त झोपतात हे शंभू रोजच पाहत असे.
गावात जिथपर्यंत शाळा होती ती पूर्ण झाली. आपल्या पोराला खूप शिकवायचं म्हणून त्याला तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलं. गावात सगळ्याचा लाडका असलेला शंभू शहरात कोणाचा काय लागतो? सातवीपर्यंतचे शिक्षण त्याचे असे तसेच झाले. त्यामूळे त्याचे शाळेत मन लागत नव्हते ना अभ्यासात. सदा न् कदा तो चिंताग्रस्त. त्याची चिंता दूर करण्यासाठी तशीच काही मुले त्याचे मित्र बनले. त्याची मैत्री गाढ झाली. ती सर्व मंडळी शाळेत कमी आणि खोलीवर जास्त राहू लागली. अभ्यासाच्या नावाने बोंबाबोंब, दिवसभर ही पोरं पत्ते कुटू लागली. शंभूनी सर्वांना रम्मी कसे खेळतात हे शिकवलं मग त्याची बैठक वाढतच गेली. बाबाचं औषध काय असतं हे इथल्या मित्राकडून कळालं. कधी रात्री झोप न आल्यास तो सुद्धा औषध घेऊ लागला. शंभूकडे पैश्याची काही कमी नव्हती आणि आबाकडे मुलांच्या अभ्यासात लक्ष्ा देण्यास वेळ नव्हता. शंभू काय करतो? याकडे जरा सुद्धा लक्ष न देता पैसे मागितले की त्यापेक्षा जास्त पैसा त्याच्या हातात देऊन पाटील मोकळे.
शंभू कॉलेजात जाऊ लागला तसा तो अजून स्वैर बनला. बार मध्ये जाणे, धाब्यात खाणे आणि क्लबात जाणे ही नित्याची बाब झाली. यात कधी कधी तो वाईट मित्राच्या संगतीमूळे बाईकडे वळला. जसे त्याचे बाईकडे पाय वळले तसे ते पाय पुन्हा परत आलेच नाहीत. व्यसनामूळे शंभू आत्ता पूर्ण वाया गेला होता ही बाब आबा पाटलांना कळाली तसं आबाचं काळीज फाटलं. शंभूला लगेच गावी बोलावून घेण्यात आलं. बिघडलेल्या पोराला वळणावर आणण्यास लग्नाच्या बेडीत अडकविण्याचा विचार करून आबा पाटील त्याची सोयरीक बाजूच्या माधवराव पाटलांच्या मुलीशी जुळवलं. संभाजीचं लग्न मोठ्या थटामाटात झालं. आबांना वाटलं की, पोरगं आता पटरीवर येईल आणि सर्व काही सुरळीत होईल.
शहरात शाही, मौजमजेत राहिलेल्या शंभूला हे जीवन पिंज-यात राहिल्यासारखे वाटत होते. बाहेरची मजा चाखलेला शंभू बायकोला समजून घेतला नाही. तिच्यासोबत रोजच हिडीस – फिडीस त्यामूळे घरात अशांतता दिसत होती.
त्या दिवशी रात्रीचे जेवण आटोपून सर्व आपापल्या अंथरूणावर अंग टेकले होते. तेवढ्यात शंभूच्या खोलीतून मोठ्याने रडण्याचा आवाज आला. आबासह सर्व लोक धावले. शंभू चक्कर येऊन पलंगाजवळ पडला होता. आबांनी लगेच गाडी काढली आणि सर्वजण तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी नाडी तपासून आज रात्री येथेच मुक्काम करण्यास सांगून काही औषधं दिली. थोड्या वेळानंतर शंभूला जाग आली, त्याला बरे वाटू लागले परंतु डॉक्टरांना भेटल्याशिवाय जायचे नाही असं आबांनी ठरवलं. सकाळ झाली. डॉक्टर दहाच्या सुमारास दवाखान्यात आले. त्यांनी सर्वप्रथम याच शंभूकडे आले परत नाडी तपासली आणि रक्त व लघवी तपासण्यासाठी पाठविले. आबांच्या चेह-यावर चिंतेची एक रेघ स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांना त्यांनी मनात भिती बाळगत विचारले सुद्धा “काय झालं असेल, डॉक्टर?” “रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगु शकत नाही” असे डॉक्टर म्हणाले. थोड्याच वेळात लघवी व रक्ताचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी रिपोर्ट वाचल्यानंतर आबाला एका बाजूला बोलावले आणि शंभूला एड्स झाले असल्याची माहिती दिली. आबाचं काळीज ठिक-या ठिक-या होऊन जमिनीवर पडले. परंतु ही बाब आबांनी कोणासही सांगितले नाही. काही तरी कारण सांगून अंगाची हळद ही निघाली नाही त्या मुलीसोबत फारकत केलं. शंभूला महारोग झाल्याची कल्पना गावाला झाली परंतु त्यास एड्स म्हणतात हे आबांनी त्यांना जाणू दिलं नाही. दिवसामागं दिवस सरू लागले तसा शंभू अजून बारीक होऊ लागला, खोकला वाढतच राहिला. अखेर त्या दिवशी पहाटे पहाटेच आबाच्या मांडीवर डोकं ठेवून शंभू शांत झोपी गेला. त्याचा जीव व्यसनानेच घेतला परंतु व्यसनाची मूळ सवय घरातून मिळाली याची बोच अजूनही आबाच्या मनात सलत होती.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
अपेक्षाभंग
आज सरिताच्या डोक्यात विचाराचं काहूर उठलं होतं. डोकं अगदी सुन्न झालं होतं. काय करावं आणि काय नाही याच विचारात ती तशीच झोपी गेली. तिच्यासमोर दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. एक तर गुमाने संसार करणे आणि दुसरे म्हणजे श्यामरावांशी फारकत घेवून नौकरी करणे. या दोन पैकी कोणता पर्याय निवडावे याबाबत तिच्या मनात वावटळ उळलं होतं.
सरिता ही मध्यमवर्गीय कुटूंबातील सुसंस्कृत घरातील समजदार आणि हुशार मुलगी. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई घरकाम करत होती. तिच्यापेक्षा लहान एक भाऊ असा छोटा व सुखी परिवारात वाढलेल्या सरिताला दु:खाचा लवलेश ही माहित नव्हता. आपण खुप शिकावे आणि यशस्वी जीवन जगावे असे तिला वाटत होते. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत जीवनात असं काही बिकट प्रसंग घडेल की त्यावेळी आपणाला हे आजपर्यंत शिकलेल्या पदवी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा त्याग करावं लागेल, याची साधी कल्पना सुद्धा केली नव्हती. शाळेमध्ये शिकतांना शिक्षक तिला प्रश्न विचारायचे "सरिता, तुला शिकून काय व्हायचं आहे?" तर तिचं उत्तर ठरलेले असायचे, “सर, मला शिकून डॉक्टर व्हायचं आहे आणि रूग्णांची सेवा करायची ईच्छा आहे." खरोखरच तिची बुद्धीमत्ता सुद्धा तशीच होती. पहिल्या वर्गापासून तर नवव्या वर्गापर्यंत ती अव्वल नंबरवरच होती. सा-याच विषयात ती अगदी हुशार व तल्लख होती. कोणताच विषय तिला कठीण असे वाटत नव्हते. ती एक प्रेमळ, मायाळू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारी मुलगी होती. त्यामूळे शाळेत ती सर्वांची आवडती होती. ती एका चांगल्या शाळेत शिकत होती जेथे सर्वच प्रकारचे संस्कार नकळतपणे मुलांवर करण्यात येते होते. त्यास्तव तिच्यावर खुप चांगले संस्कार झाले होते. घरात सुद्धा वातावरण अत्यंत चांगले असल्यामूळे तिला इतर काही दु:खदायक किंवा क्लेशदायक बाबींची जाणिवच नव्हती. ती मनाने धाडसी व साहसी होती. कठीण प्रसंगी स्वत:ला सावरून घेण्याची शक्ती तिला आयुष्यातील एक दोन घटनांनी दिले ज्यामूळे तिचा अपेक्षाभंग झाला.
अपेक्षेप्रमाणे मॅट्रीकच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवीत तीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. बारावीच्या परीक्षेत सुद्धा अपेक्षेप्रमाणे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. तेव्हा सर्वांनाच खुप आनंद वाटला. आता फक्त सेट परीक्षेत चांगले गुण मिळविले तर तिचा डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. पण दैवाने इथेच साथ दिली नाही. दोन वेळा प्रयत्न करून सुद्धा तिला चांगले गुण मिळवता आले नाही. बी.एस्सी. किंवा बी.ए. करण्याचा अजिबात विचार नव्हता. काही जणांनी डी.एड्. करण्याचा सल्ला दिला. तो घरच्यांना पटत होता परंतु तिला पटत नव्हते. शेवटी घरी रिकामं बसण्यापेक्षा डी.एड्. केलेलं बरं म्हणून तीने तिथे प्रवेश घेतला.
दिवस असे मजेत जात होते. सरिताला डॉक्टर व्हायचं स्वप्न भंग पावलं म्हणून दु:ख वाटत होतं. सोबतच शिक्षिका म्हणूनही जनतेची सेवा करता येतेच की या विचाराने तिला दिलासाही मिळत होता. ती लग्नाच्या वयाची झाली, याची जाणिव आई-वडिलांना तेव्हाच झाली होती. तिचे हात पिवळे करावे आणि मोकळं व्हावं असं आईला नेहमी वाटत होतं. तसं तीने एके दिवशी आपलं मन मोकळं केलं आणि लग्न करायचेच असं ठरविलं. परंतु सरिताने स्पष्ट नकार दिला. ती पाहुणचार म्हणजे बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा तयार नव्हती. परंतु आईच्या आर्जव विनंतीमूळे तयार झाली. बँकेत चांगल्या पदावर काम करणा-या शामरावांनी स्वत:हून आई-वडिलांकडे गळ घातली. त्याला मुलगी पसंद होतीच फक्त औपचारिकता पूर्ण करणे बाकी होते. सरिता तशी दिसायला सुंदर होती. नाकी-डोळी छान, रंग गोरा-गोरा पान या गीताप्रमाणेच ती होती. शामरावांनी आपली पसंती “होकार” कळविली तसे घरात चलबिचल सुरू झाली तर हिच्या मनात विचाराचं काहूर उठलं.
सरिताच्या मनात आत्ताच एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते. डी.एड्. पूर्ण केल्यानंतर एक-दोन वर्षे शिक्षिका म्हणून अनुभव घेऊनच लग्न करावे असा तिचा विचार होता. मात्र आई-वडिलांना वाटत होते की, यापेक्षा चांगले स्थळ मिळणार नाही. पोरीनं नशीब काढलं आई-वडिलाचे मन दुखवायचे नव्हते आणि शिक्षण ही सोडायचे नव्हते. करावे काय? अश्या दुहेरी पेचात ती पडली होती. शेवटी ती लग्नाला तयार झाली पण एका अटीवर “माझे डी.एड्. चे शिक्षण पूर्ण करू देत असाल तरच मी लग्न करेन” अशी गळ शामरावांसमोर टाकली. यात शामरावांना काही अडचण जाणवली नाही. डी.एड्. चा अर्धा वर्ष तर सरला आत्ता राहिले दीड वर्ष.. लगेच शामरावांनी होकार भरला आणि तुळशीचे लग्न लागले की सरिता व शामराव यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. ती नववधू सासरी आली. बघता बघता दिवाळी सुट्टया संपल्या. दिवस कसे सरले हे दोघांनाही कळाले नाही. उद्या डी.एड्. चे कॉलेज सुरू होणार त्याच्या आदल्या रात्री शामराव व सरिता यांच्यात पहाटपर्यंत चर्चा रंगली. शामराव म्हणत होते, “जाऊ दे ना, काय डी.एड्., बी.एड्. लावलीस? माझा पगार काय कमी आहे का?” यावर सरिता आपल्या निर्णयावर ठाम राहिली, डी.एड्.पूर्ण करणार म्हणजे करणारच! लग्नाच्या अगोदर माझी अट काय होती? माहित आहे ना! “शामराव एक पाऊल मागे घेतले आणि तिचा मार्ग मोकळा झाला. लढाई जिंकल्याच्या तो-यात ती कॉलेजात जाऊ लागली.
सुरूवातीचे काही दिवस मजेत गेले कारण सरिता घरीच राहत होती. परंतु आता तिचा कॉलेज सुरू झाल्यापासून त्या दोघांत रोजच कुरबुर चालू झाली. पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत दोघांमध्ये नेहमी वाद-वाद होऊ लागले. तिची कॉलेजला जायचा वेळ आणि शामरावांचा बँकेत जायचा वेळ एकच त्यामूळे सकाळची भरपूर घाई असायची. शामराव पुरूषी रूबाबात तिला ऑर्डर द्यायचा आणि ती स्वयंपाक घरातून जोरजोरात बोलायची. सायंकाळी शामराव “मूड” मध्ये असायचा परंतु कॉलेजातली स्वाध्याय, गृहपाठ, पाठाची तयारी यामध्ये ती गुंग असायची. कधी कधी तो वाट पाहून वाट पाहून झोपी जायचा मात्र ती गृहपाठ पूर्ण केल्याशिवाय झोपायची नाही. या अशा वागण्यामूळे तो पूरता त्रस्थ झाला होता. कधी एकदा तीचं डी.एड्. पूर्ण होते असं त्याला वाटू लागायचं. त्यातच शासनाने सहा महिने आंतरवासिता करण्याचा नियम काढला तेव्हा तर शामरावाचे अजून सहा महिन्याचा वनवास वाढल्यासारखे वाटले.
तिची आंतरवासिता कालावधी संपतो न संपतो निकाल ही लागला आणि ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तेव्हा दोघांनाही खुप आनंद झाला. तिला चांगले गुण मिळाल्यामुळे तिला जिल्हा परिषदेचा शिक्षिकेच्या नौकरीचा कॉल आला. ती कॉल लेटर पाहून आनंदाने नाचू लागली होती. तिची मनोमन खुप ईच्छा होती की आपण ही नौकरी करावी. ही संधी सोडू नये. तिचा स्वप्न साकार होणार असे वाटत असतांना शामराव मात्र या नौकरीच्या विरोधात होता. नौकरी करून काय करणार? माझा पगार आपल्या संसारासाठी पुरेसे नाही का? मी तुला डी.एड्. चे शिक्षण पूर्ण करून देण्याचे वचन दिलो होतो मात्र नौकरीचं वचन तर दिलो नव्हतो ना! तू जर नौकरी करू लागलीस तर जे दोन वर्ष आपण दु:ख अनुभवले ते आयुष्यभर अनुभवणार का? सर्वप्रथम आपण ठरवायचे की, आपणाला पैसा हवा आहे की, मानसिक सुख. याउपरही तू आपल्या निर्णयावर ठाम राहत असशील तर तुझयासमोर एकच पर्याय तू माझयापासून फारकत घे आणि खुशाल नौकरी कर.
याच विचारात रात्रभर तिला झोप लागली नाही. काय करावं सुचेना शाळेत शिकतांना तिच्या अपेक्षा खुप मोठ्या होत्या. परंतु आज त्या शिक्षणामूळे तिला संसार तोडायची पाळी येते की काय असे वाटत होते. काही अशी शामरावाचे तिला योग्य वाटत होते, की पैसा कमावून मनाला समाधान नसेल तर तो पैसा काय कामाचा? यापेक्षा घर सांभाळून सुखी राहण्यात काय वाईट आहे! आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर शाळेत करता आले नाही म्हणून काय झालं स्वत:चे संसार सुखी करण्यासाठी या ज्ञानाचा वापर करता येत नाही काय? मनात पक्का विचार करून अंथरूणातून उठली संसार या पर्यायावर टीक मार्क करून शामरावांना गरमा गरम चहा दिला. लगेच जेवणाचा डबा दिला. शामराव समाधानाने बँकेत गेले. सरिता आपल्या सर्व अपेक्षांचा त्याग करून झोक्यावर बसून रेडिओ सुरू केली त्यात "जिंदगी का सफर है, ये कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं” हे गाणे चालू होते.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
परीक्षा गुरुजींची
आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्त दिसत होते. त्यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्यांना कळतच नव्हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते. ज्यांना काहीच येत नाही ते नेमके आज परीक्षेला हजर होते आणि ज्यांना ब-यापैकी लिहिता-वाचता येते ते गैरहजर होते. त्यामूळे गुरूजीला काळजी लागली होती. तसे गेल्या आठवडाभरांपासून गुरूजी परिपाठमध्ये सर्व मूलांना सूचना देतच होते की पुढच्या आठवड्यात आपली ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत संकलित चाचणी होणार आहे तेव्हा कोणी गैरहजर राहू नका, गावाला जाऊ नका, मुलांच्या पालकांना देखील या परीक्षेची आगाऊ सूचना देऊन ठेवली होती. एवढे सारे करून देखील आज वर्गातील अर्धे मुले गैरहजर होती. काय करावे? या प्रश्नाने गुरूजींचे डोके सकाळी सकाळीच उठले होते.
शहरांपासून १५-२० किमी अंतरावर असलेल्या जेमतेम ५०० लोकसंख्या असलेल्या बोरगाव वस्तीत सदा पायमोडे गुरूजी गेल्या दोन वर्षापासून गुरूजी म्हणून काम करू लागले होते. तसे पाहिले तर त्यांचे आडनाव पाटील होते. पण त्यांचे वडिल जे की याच शाळेत गुरूजी होते. आणि येथूनच सेवानिवृत्त झाले. मुलांना काही आले नाही किंवा गैरहजर राहिले तर ते मुलांच्या पायावर मारायचे. एके दिवशी दुस-या वर्गातील रमेश चार दिवस शाळेत आला नाही म्हणून दामोदर गुरूजी त्यांच्या घरी भेटण्यास गेले. रमेश अंगणात खेळतांना पाहून गुरूजींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याच्या पायावर छडी मारत मारत गुरूजी शाळेत त्याला शाळेत आणले. पायावर जास्त मार बसल्यामुळे रमेश जवळपास लंगडूच लागला. त्या दिवशी पासून त्यांचे नाव पायमोडे गुरूजी असे नाव पडले. ( शाळेत दोन शिक्षक होते आणि दोन्ही शिक्षकांचे नाव पाटीलच होते. मग पाटील सर म्हटले की कोणते पाटील? असा कोणी विचारले की शाळेतील पोरं आणि गावातील लोकं पायमोडे गुरूजी असे म्हणायचे ) गुरूजी आपल्या संपूर्ण परिवारासह त्याच गावात राहायचे. शेवटचे १५-२० वर्षे त्यांनी त्याच गावात काढले. तेथेच त्यांनी शेती विकत घेतली, घर बांधले आणि तेथेच राहू लागले. त्यांचा एकुलता एक मुलगा सतिश हा मुळातच हुशार होता. तो डॉक्टर व्हावा असे घरातील सर्वांना वाटायचे कारण तसा त्याचा अभ्यासही होता. मात्र सरकारच्या विविध जाचक नियम अटी व असुविधेमूळे त्याला कोणत्याच मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून आणि आई-वडिलांच्या आग्रहाखातर त्याने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. मूळात हुशार असल्यामूळे तो शासनाच्या सर्व प्रकारच्या परीक्षा सहज उत्तीर्ण होत होता. तीनच वर्षात त्याला शिक्षण सेवक म्हणून त्याच्याच गावात नोकरी मिळाली. डॉक्टर होण्याचे स्वप्न विसरून तो शाळेत मन लावून मुलांना शिकवत होता. स्वत:च्या ज्ञानाचा फायदा मुलांना व्हावा यासाठी त्याने सर्व प्रकारे प्रयत्न करत होता. वडिल मुलांना मारत मारत शाळेत आणत होते पण सदा गुरूजी मात्र अत्यंत प्रेमाने समजावून सांगून आणण्याचा प्रयत्न करत असत.
बघा ना! आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत परीक्षेला सर्व मुले उपस्थित रहावे म्हणून त्याचा सर्व खटाटोप पाण्यात मिसळला होता. स्वत: गावात राहत असल्यामुळे गावातील प्रत्येक कुटूंबाची जवळून ओळख होती. गुरूजी सकाळीच लवकर तयार होऊन प्रत्येक मुलांच्या घरी भेट देत होते. काल शाळेला जे आले नव्हते त्यांच्या घरी पहिल्यांदा भेट द्यायचे ठरविले अन शिल्पाच्या घरी गेले आई बाहेरच सोयाबीनचे शेंगा खालीवरी करीत होती. गुरूजी म्हणाले, राधा मावशी, शिल्पा कोठे आहे? काल शाळेला आली नाही. ती म्हणाली, घरात हाय, अन बापू आजपण येणार नाय ! यावर गुरुजींच्या कपाळावर आट्या पडल्या, चिंतेच्या स्वरात गुरुजी म्हणाले “अहो मावशी, आज महत्वाची परीक्षा आहे. आज तरी तिला पाठवा हो”. यावर शिल्पाची आई जवळ जवळ रागात बोलली “ सोयाबीन कोण जमा करणार ? आधीच माणसं भेटेनाशी झाली. तुमची परीक्षा उद्या नाही तर परवा घ्या". नाही मावशी तसे चालत नाही. आज सगळीकडे परीक्षा आहे तिला शाळेला पाठवा. शिल्पा शाळेला ये ती गुरूजीला पाहून घरात लपून बसली. तशी ती हुशार म्हणता येणार नाही पण ब-यापैकी लिहिता-वाचता येणारी पण आठवड्यातून २-३ दिवस घरकामासाठी शाळा बुडवते ती तरी काय करणार? गुरूजीला प्रत्येक वेळी हाच अनुभव यायचा.
तेथून त्यांचा मोर्चा वळला कृष्णाकडे त्याचे वडिल गाडीवरून पडले होते आणि जबर मार लागला होता. आईला मदत करणेसाठी घरात कृष्णाच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते म्हणून तो गेल्या दोन दिवसांपासून शाळेला आलेला नव्हता. कृष्णाची शाळेला यायची इच्छा होती. गुरूजी परिस्थिती पाहून काही एक न बोलता ‘काळजी घ्या’ म्हणून घराबाहेर पडले. तेथून बाजूलाच स्नेहाचे घर होते. ती काल शाळेला आली होती. हुशार चुणचुणीत आणि रोज शाळेला येणारी मुलगी म्हणून तिची शाळेत ओळख होती. गुरूजीला आश्चर्य वाटले, की तिच्या घराला कुलूप होते. शेजारच्यांना विचारले की स्नेहाचे घरचे कुठे गेले? केव्हा येणार आहेत ? शेजारच्याने सांगितले “गुरूजी, काल रात्री स्नेहाला खूप ताप आला होता. ताप डोक्याला चढला होता म्हणून सकाळी पहिल्या गाडीला स्नेहाला घेऊन त्यांचे आई-बाबा शहरात गेलेत. गुरूजींनी लगेच मोबाईल काढले आणि स्नेहाच्या बाबांना फोन लावला, हॅलो, रामराव काका नमस्कार, काय झालं स्नेहाला?” “गुरूजी तिला रात्री डोक्याला ताप चढला होता. सकाळी पहिल्या गाडी ला घेऊन आलोय डॉक्टर कडे "
"काय म्हणाले डॉक्टर ? "
" डेंगू ताप आहे म्हणे एक-दोन दिवस लागतील बरे व्ह्ययला."
" ठीक आहे काळजी घ्या तिची " असे म्हणून गुरुजी शाळेकडे निघाले. वर्गात येऊन बघतात तर काय अर्धे मुले उपस्थित झाली होती. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये सचिन, सौरव, राहुल आणि धोनी नसेल तर टिमची जी हालत होते तीच काही हालात आज सदा गुरुजींची झाली होती. कशी बशी परीक्षा घेतली. कोणी ही जास्त मार्क घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांच दिवशी ते तापसलेले मार्क ऑनलाइन भरायचे असल्यामुळे लगेच तपासून त्याचे गुण भरण्यात आले आणि सर्व पेपर्सचा गट्ठा मुख्याध्यापकांच्या हाती देऊन सदा जड पावलाने घरी पोहोचला. परीक्षा मुलांची होती मात्र काळजी गुरुजींना लागली होती.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
मुख्यालय
शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला हे वृत्त वाचल्याबरोबर रामराव गुरूजीच्या छातीत धस्सं केल. आज काही तरी अवघड बातमी वाचायला मिळणार याची गुरूजीला खात्री होती. कारण आज जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासाठी फक्त खास बैठक बोलाविण्यात आली होती आणि त्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविता यावी यासाठी विविध उपाय योजनेवर चर्चा अपेक्षित होती. झाले ही तसेच शिक्षक मंडळी मुख्यालयी म्हणजे शाळेच्याच गावात राहिल्याशिवाय शाळा सुधारणार नाही आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता सुद्धा, त्यासाठी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव सर्वांच्या संमतीने पारित करण्यात आला. तीच बातमी प्रत्येक पेपरच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाली होती. शाळा सुरूवात होवून आठवडा सुद्धा उलटला नाही की या बातमीने गावात चर्चेला उधाण भरलं. गावातले काही उडाण पोरान बातमी वाचली होती, त्यांनी गुरूजीला बघून मग, काय मास्तर केव्हा येणार गावात राहायला? अशी उपरोधात्मक बोलू लागली. शाळेला येता येताच ही बातमी वाचल्यामुळे गुरूजी अस्वस्थ मनाने शाळेत आले होते. शाळेची घंटा वाजली, परिपाठ संपला नियमित वर्गाला सुरूवात झाली परंतु गुरूजीचे मन कोठेच लागेना बायको लेकरं याच काय? त्यांना सोबत ठेवू की मी एकटाच गावात राहू? या विचाराच्या तंद्रीत दिवसभर राहिल्यामुळे चेहरा कोमजून गेला होता. चेह-यावरचा रोजचा तेज आज लुप्त झाला होता. दुपारी डब्बा जेवताना सुद्धा त्यांचे लक्ष जेवणावर नव्हते. त्यांच्यासोबत इतर ४-५ सहकारी मंडळी होती. ती मात्र ही बातमी वाचून अजिबात डगमगले नाहीत त्यांना कसलीच काळजी वाटत नव्हती. या त्रासातुन सुद्धा काही तरी नक्की मार्ग काढू असा विश्वास त्यांना वाटत होता. त्यामुळे ते कधीच घाबरत नव्हते. रामराव गुरूजी मात्र छोट्या मोठ्या घटना वाचल्या की, त्यांच्या छातीत धडकी भरे. म्हणूनच त्यांचे मित्र त्यांना विनोदाने भित्रे गुरूजी म्हणत असत. तसे त्यांचे नाव रामराव कात्रे परंतु ते नेहमी भितात त्यामुळे त्यांचे नाव कात्रे च्या ऐवजी भित्रे असे नामकरण करण्यात आले.
रामराव कात्रे गुरूजी हे वडगावचे राहणारे जेमतेम शे पाचशे लोकांच्या वस्तीतील त्या गावात गुरूजीचे एक छोटेसे घर होते आणि त्या घरात आई बाबा सोबत त्याची बायको राधा आणि दोन लेकर आनंदात राहत होती. वडगावच्या जवळ म्हणजे साधारणपणे १२-१५ किमी अंतरावरील बोरगाव येथे गुरूजीला नौकरी मिळाल्यामुळे तो खुश होता. आई बाबा पण आनंदातच होते. घरीच भाकर खावून नौकरी करणे फार सोपे काम असते. चांगले स्थळ बोलून आलं गुरूजींचे लग्न थाटात झाले. वर्षामागून वर्ष सरली आणि गुरूजींना दोन लेकरं ही झाली. राधाच्या मनात राहून राहून वाटत असे की, आपण शहरात जावून राहावं. परंतु गुरूजी आई बाबाचा एकूलता एक मुलगा. त्यामुळे त्यांना एकटे सोडून जाणे गुरूजींना शक्यच नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात नेहमीच धुसफूस चालत असे. परंतु गुरूजी कसे तर समजावून करून राधाला पटवीत असत आणि संसाराचा गाडा चालवित असत.
परंतु आजच्या बातमीने गुरूजी खूपच चिंताग्रस्त होवून शाळा सुटल्यानंतर घरी परतले. घरी आल्यानंतर ही त्यांचे कुठेच मन लागेना शेवटी राधा न राहवून म्हणते की, काय हो, काय झालय? या प्रश्नावर गुरूजी काय उत्तर देणार त्यांनी राधाला पेपर दिला आणि वाचण्यास सांगितले. ज्या बातमीने गुरूजी दु:खी कष्ट व नाराज झाले होते तीच बातमी वाचताना राधाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण या निमित्ताने तरी घर सोडायला मिळेल असे तिला वाटायला लागले परंतु तिने आपल्या चेह-यावरील भाव कोणाला समजू दिले नाही. दिवे लावली आणि रात्री जेवण्याच्या वेळी गुरूजींनी आपल्या आई-बाबासमोर त्या बातमीचा विषय ठेवला. सगळ्यांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह फक्त त्यास राधा अपवाद होती. जेवताना एकदम नीरव शांतता होती. शेवटी बाबांनी दीर्घ श्वास घेत म्हटले, रामा तु तुझ्या बायको लेकरासह बोरगावला जा राहायला. आम्ही राहतो इथे शेती घर बघत. काही काळजी नको. सरकारने नियमच केला तर त्याला कोण काय करणार? यावर गुरूजी काय बोलणार अगदी गुमाण जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला.
झोपण्यापूर्वी राधाने आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी तोंड उघडले, बाबांनी तर परवानगी दिली चला आपण सर्व बोरगावला राहू. राधेला ही बातमी म्हणजे सुवर्णसंधीच वाटत होती आणि ही संधी सोडायची नाही असा ठाम निर्धार केला होता. यावेळी सुद्धा गुरूजींनी राधेची समजूत काढली प्रथम १-२ महिने मी एकटा राहतो त्यानंतर आपण सर्वजण राहू असे बोलून दोघेही गाढ झोपी गेले. सकाळ झाली गुरूजी बोरगावला जाण्याची तयारी करू लागले आज त्यांच्या सोबत फक्त जेवणाचा डबा नव्हता तर निदान चार पाच दिवस त्या गावात मुक्काम करायच्या तयारीने सर्व साहित्याची बांधाबांध केली. आई बाबांचा आशीर्वाद घेऊन गुरूजी निघाले. ते थेट शाळेतच आले आपल्या सर्व सामानासह गावात खोली साठी शोधाशोध केली नाही कारण राहण्यायोग्य घरे त्या ठिकाणी नव्हतीच मग काय करणार शाळेतील एका वर्गाच्या कोप-यात बांधून आणलेले सर्व साहित्य ज्यात अंथरूण, पांघरूण, स्वयंपाकाचे सामान, ड्रेस, अंडरवियर, बनियान, टॉवेल इ. टाकून ठेवले तेथेच शिकवायचे आणि तेथेच रहायचे असा बेत गुरूजींनी आखला तेथे ना लाईटची सोय ना पाण्याची. सकाळी कोणी उठण्याच्या अगोदर पानवाल्याच्या विहीरीवर जायचे दोन बादल्या आपल्या अंगावर टाकायचे एक भांडे पाणी भरायचे आणि परत शाळेवर यायचे. मुले शाळेत येण्यापूर्वीच सकाळचा स्वयंपाक व जेवण आटोपून घ्यायचे. सकाळी काहीच सवड मिळत नव्हती. हे सगळं करेपर्यंत शाळेचीच वेळ व्हायची. सायंकाळी मात्र हमखास वेळ मिळायचा. एक दोन दिवस गुरूजीला सुद्धा याचा कंटाळा आला. सायंकाळची वेळ काही केल्या कटत नव्हती. शाळा सुटल्यावर चार पाच पोरांना शिकवावे असे एका मताने म्हटले परंतु दिवसभराचा कलकलाट ऐकून कंटाळा आलेला असतांना पुन्हा पोरांना शिकविणे नको रे बाबा वाटले. शनिवारच्या दिवशी दुपारच्या शाळेला सुट्टी असत म्हणून शाळा संपल्यावर गावी जाण्याचे नियोजन केले. सायंकाळी पर्यंत गावी आल्यानंतर पोर बाबा आले बाबा आले म्हणत पळत गुरूजीला बिलगली आई बाबांना पण आनंद वाटला अन् राधेची तर कळी खुलली होती. गावात खोली भेटली असेल आणि रविवार नंतर सोमवारी बोरगावला जाण्याचा योग येईल या विचाराने राधा खुश होती परंतु गुरूजींनी जेवण झाल्यानंतर राधेला सांगितले की, गावात खोली मिळाली नाही आणि ते शाळेच्या एका खोलीत बस्तान मांडले आहेत. राधा ते ऐकून निराश झाली आणि काही न बोलता झोपी गेली.
रविवार सुट्टीचा दिवस अगदी मजेत गेला. दुस-या दिवशी सकाळी लगबगीने तयार होऊन गुरूजी शाळेच्या रस्त्याला निघाले. गावी दीड दिवस कधी संपला हे कळालेच नाही. स्वयंपाक करून खाण्याचा कंटाळा येऊ लागला सायंकाळी खुप कंटाळवाणे वाटू लागले. शाळेतल्या गावात कोणी मित्र नाही ना नातलग ज्याच्या सोबत गप्पा गोष्टी करता येईल. कादंबरी वा गोष्टीचे पुस्तक वाचून सुद्धा कंटाळा येऊ लागला. त्यातच एके दिवशी गावातील चांडाळ चौकडी गुरूजी जवळ आले, काय गुरूजी काय चाललय? गुरूजी आपल्या नेहमीच्या सुरात काही नाही, बोअर होतय वाटत मध्येच नानाने आपल्या तोंडात तंबाखुची मसाला कोंबून म्हणाला. गुरूजी पत्ते खेळता येतात का? लंगड्या माधवने विचारले. गुरूजींना पत्ते खेळता येत असूनही त्यांनी नाही असे उत्तर दिले. गावात दिवाळी, नागपंचमी, होळी या सणाच्या दिवशी मित्रासोबत गुरूजी रम्मी खेळत असे. त्यामुळे पत्ते खेळणे त्याला नवीन नव्हते मात्र नौकरीच्या गावात मुळीच खेळायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते. रिकामा वेळ कसा घालावयाचा यावर उपाय काही सुचना आणि चांडाळ चौकडी रोज येऊन गुरूजींना तंग करू लागले. अन् एके दिवशी गुरूजींचा पाय घसरला आणि चांडाळ चौकडी सोबत पत्याचा डाव सुरू झाला. एक वा दोन तासावरचा डाव आता रात्रभर चालू लागला. पानवाल्याच्या विहीरीवर स्नान करणे हळूहळू कमी होऊ लागले. शाळेत मुलांना काही तरी काम देवून वामकुक्षी घेण्याच्या प्रकारात वाढ झाली. मित्रासोबत अधूनमधून झिंग व्हायची सवय या चांडाळ चौकटमुळे खूपच वाढली. आता सकाळी उठल्यावर चहाची जागा देशीने घेतली. दर शनिवारी गावी जाणारे गुरूजी महिना महिना घरी जाणे बंद झाले. पगार तर उरतच नव्हती शिवाय गावात उधारी वाढली. जेवण्याचे वांदे झाले. लोक कोणी जवळ येऊन देईनात शाळेतील मुले सुद्धा दूर राहू लागले. आता राधाच फक्त मला समजून घेऊ शकते म्हणून राधा, मला माफ कर असे म्हणू लागले. बाजुलाच झोपलेली राधा गुरूजीला उठवते, अहो, उठा काय झालं काही स्वप्न बघितलात काय? गुरूजी उठून बघतात तर काय हे आपल्या घरी आहेत. तेव्हाच पेपर हातात पडते. बातमी वाचून गुरूजी खदाखदा हसतात. बातमीमध्ये सभा बारगळली असा मथळा असतो.
- नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
No comments:
Post a Comment