Saturday 12 May 2018

लेख क्रमांक 03

लेख क्रमांक 03
दिनांक 13 मे 2018 रविवार

यशस्वी जीवनासाठी शिस्तीचे महत्व

भारतीय क्रिकेट संघासाठी दोन दशकाहून जास्त वेळ देशासाठी खेळलेला मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना न ओळखणारा एकही व्यक्ती भारतातच नाही तर जगात शोधूनही सापडणार नाही. ते एका रात्रीतून एवढे महान फलंदाज बनले नाहीत. त्यांना एवढे जे अमाप यश, कीर्ती, प्रसिद्धी मिळाली ते अनेक वर्षे तपश्चर्येचे फळ आहे. त्यांच्यामध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी होतीच शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित सराव करण्याची जी शिस्त त्यांच्या अंगी होती त्यामुळेच ते जगातील सर्वोत्तम फलंदाज बनू शकले. सराव करताना थोडा जरी आळस दाखविला असता तर ते कदाचित जगातील सर्वोत्तम फलंदाज बनू शकले नसते. जगात असे कितीतरी लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या शिस्तीच्या बळावर अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट सिद्ध करून दाखविले आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपणाकडे ज्ञान, बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, श्रम करण्याची तयारी याच्यासोबत काटेकोर शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात आणि रोजच्या दिनचर्येत कसल्याही प्रकारची शिस्त नसेल किंवा त्याची आपणास सवय नसेल तर ठरलेल्या वेळात एखादे काम पूर्ण करूच शकत नाही. शिस्तीची सवय विद्यार्थिदशेपासून आपणाला लागली पाहिजे. यामध्ये शिस्तीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा तोटा भावी आयुष्यात नक्कीच संभवतो. शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित शाळेत उपस्थित राहणे या एका शिस्तीच्या सवयीचा परिणाम भविष्यात जेथे कोठे आपण काम करण्यासाठी नोकरी पत्करतो त्या ठिकाणी दिसून येते. कार्यालयात उशिरा येणारे व कामाचा आळस करणारी मंडळी विद्यार्थीदशेत असताना नक्कीच शिस्तीचे पालन केलेले नसतात. त्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की येते. शाळेतील गृहपाठ व दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे हीसुद्धा एक शिस्तच आहे. त्याचाही परिणाम भविष्यात आपणाला दिसून येतो. त्यासाठी आपण विद्यार्थीदशेत असताना शिस्तीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करण्यासाठी गुरुजींना प्रसंगी कठोर व्हावे लागते. परंतु शासनाने सध्या शाळेतून कठोरपणा वर बंदी घातली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शाळेतील शिस्तीच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. त्याचे प्रतिकूल परिणाम भविष्यात बघायला मिळू नये याची भीती वाटते.
आपण आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले आहे ते प्राप्त करण्यासाठी नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लक्ष ठेवण्याचे काम शिस्तीमुळे सोपे होते. थोडे जरी लक्ष विचलित झाले किंवा डळमळीत झाले तर ध्येयप्राप्तीचा रस्ता अवघड बनतो तर कधीकधी असफलता येण्याची सुध्दा शक्यता असते. जसे की वाहन चालविताना आपले लक्ष पूर्णपणे रस्त्यावर ठेवावे लागते. वाहन चालविताना आपले लक्ष थोडे जरी विचलित झाले तर छोटे-मोठे अपघात घडून आपण जखमी होतो तर काही प्रसंगी आपल्या जीवास मुकावे लागते. त्यामुळे ठरविलेल्या जागेवर पोहोचू शकत नाही. त्यास्तव आयुष्यात शिस्त फारच महत्त्वाची समजली जाते. या शिस्तीमुळे जेव्हा आपणास दिलेली कामे आपण वेळेपूर्वी किंवा किमान वेळेत पूर्ण करतो तेंव्हा वरिष्ठाकडून पाठीवर शाबासकीची थाप पडल्यावर आत्मविश्वास वाढीस लागतो. मिळालेल्या आत्मविश्वासामुळे आपल्या पुढील।अनेक कामे अचूकपणे वेळेत पूर्ण करता येतात आणि आपली समाजात कार्यालयात चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत मिळते.
अभ्यास करण्याची सवय ही सुद्धा एक शिस्त आहे. एखादी बाब समजून घेण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिस्तीमुळेच घडले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांचे पुस्तकावर सर्वात जास्त प्रेम होते सदानकदा ते पुस्तकाशी चिकटून राहत असे म्हणून त्यांना यश, कीर्ती मिळाली. " एकांतातील शंभर वर्षे " या कादंबरीचे लेखक ग्रबियल गार्षीया मार्केझ यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले व दीड वर्षानंतर खोलीच्या बाहेर आले ते या कादंबरीसह. ही कादंबरी खूप गाजली आणि त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याजवळ असलेली गुणवत्ता व शिस्त याच मुळे ते महान साहित्य कलाकृती निर्माण करू शकले. आपण जीवनात शिस्तीला महत्त्व दिले नाही तर सर्वसामान्याप्रमाणे साधारण आयुष्य जगावे लागते. आपणाला आपले आयुष्य कसे जगायचे आहे ? याची स्वतःची नियमावली स्वतः तयार करून त्या नियमावलीचे पालन करीत गेल्यास आपले जीवन नक्कीच सुंदर व सुखदायक होईल यात शंकाच नाही. सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, वेळेवर जेवण करणे व लवकर झोपणे या रोजच्या शारीरिक क्रियेत शिस्त असेल तर आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. शरीर चांगले असेल तर मनही चांगले असते. इंग्रजीत एक म्हण आहे sound in body is sound in mind याप्रमाणे.
महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देण्याच्या आपल्या शिस्तीमुळे अनेक कामे यशस्वीपणे झटपट पूर्ण होतात. त्याऐवजी मित्रांसोबत गप्पा मारणे, चित्रपट पाहणे, खेळत राहणे यात आपण रंगून गेलो तर आपल्या शरीराला व मनाला तीच सवय लागते. आपले अनेक महत्त्वाची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपले काम पूर्ण झाल्याखेरीज इतर बाबीकडे लक्ष देणार नाही अशी शिस्त शरीराला व मनाला लावण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अंगी असलेल्या शिस्तीमुळे भारताला हिंसा न करता स्वातंत्र्य मिळाले. अहिंसेद्वारे स्वातंत्र्य मिळविता येते हे महात्मा गांधी यांना वाटत होते आणि त्याच मार्गाने जाण्याची शिस्त त्यांनी भारतीयांच्या मनात निर्माण केली. काही क्रांतीकारकानी चौरीचौरा येथील पोलीस ठाणे जाळून हिंसेचा मार्ग स्वीकारला होता तेव्हा महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांना भारतीय क्रांतिकारकाचे बेशिस्त वर्तन आवडले नाही, त्यामुळे जनतेला त्यांनी सांगितले की, या मार्गाने आपणाला स्वातंत्र कधीच मिळणार नाही. क्रांतिकारकानी त्यानंतर कधीही अहिंसेचा मार्ग सोडला नाही.
आपल्या रोजच्या क्रियेमध्ये सुद्धा शिस्त अत्यंत महत्त्वाचे आहे. आपलेले चालणे,  उठणे, बसणे आणि हसणे या सर्व क्रियांमध्ये शिस्त असेल तर आपण समाजात उठून दिसू शकतो. काम करीत असताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभाग घेताना आपला मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याची सवय ही सुद्धा एक शिस्त आहे. मनाला तशी सवय लागून गेली की आपल्या मोबाईलच्या रिंगमुळे वातावरण भंग होऊ नये. तर केव्हाही घराबाहेर पडताना त्याची काळजी घ्यावी. परंतु बहुतांशी ठिकाणी बहुतेक जणांकडून त्याचे पालन होताना दिसून येत नाही. लहान-सहान गोष्टी आपल्या जीवनात रोज घडतात त्यात शिस्त ठेवली तर त्याचा त्रास आपणाला तर होणारच नाही शिवाय इतरांनाही होणार नाही. तेव्हा चला तर मग आपल्या शरीराला व मनाला चांगली शिस्त लावू या आणि आपले जीवन यशस्वी करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...