Wednesday 17 January 2018

मार्कंडेय जयंती विशेष लेख

महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत

ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मृकंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा  भगवान शंकर म्हणाले, " तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही, परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे, मी आपणास एक पुत्र देत आहे. मात्र त्याचे आयुष्य फारच कमी आहे. तो अल्पायुषी आहे. तो फक्त सोळा वर्षे जगेल." मृकंड आणि त्याची पत्नी मरूधावती यांनी ते मान्य केले आणि भगवान शंकर तथास्तू म्हणून लुप्त झाले.
दिवस-महिना करीत काही वर्ष उलटले. मृकंडच्या घरी एका मुलाने जन्म घेतला. त्याचे नाव मार्कंडेय असे ठेवण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी मार्कंडेय यांना ऋषीमुनींच्या आश्रमात पाठविण्यात आले. तल्लख बुद्धिमत्तेचा मार्कंडेय सगळी विद्या घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या घरी परतले. घरातील उदास व नाराजीचे वातावरण पाहून मार्कंडेय चिंताग्रस्त झाले. एवढे दिवसापासून दूर राहिलेले मुल घरी परतल्यावर अाई-बाबा खुश होतात, आनंदून जातात. मात्र माझे आई-बाबा का आनंदी नाही ? याचा ते विचार करू लागले. मार्कंडेयच्या आई-वडिलांना माहीत होते की, मार्कंडेय हा अल्पायुषी आहे. सोळा वर्षे पूर्ण झाले की, तो इहलोकातून परलोकात जाणार. पण हे त्या मार्कंडेयला कसे सांगणार ? परंतु मार्कंडेयने आई-वडिलांजवळ नाराजीचे कारण जाणून घेण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी मार्कंडेयला संपुर्ण कहाणी सांगितली. तेव्हा मार्कंडेय यांनी निश्चय केला आणि आपल्या आई-वडिलांना सांगितले, ' मला काहीही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. ' असे सांगून आई वडिलांची आज्ञा व आशीर्वाद घेऊन भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी मार्कंडेय घराबाहेर पडले
  भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मार्कंडेय यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि त्याची सलग एक वर्ष जप करीत राहिले. वयाची सोळा वर्ष पुर्ण झाले. त्यांची मृत्यूची वेळ जवळ आली. तेव्हा साक्षात यमराज त्यांना घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी मार्कंडेय शिवभक्तीत तल्लीन होते. जसेही यमराजने मार्कंडेय यांचे प्राण घेण्यासाठी पुढे आले तसे मार्कंडेय यांनी शिवलिंगाच्या भोवती घट्ट आलिंगन घेतले.  त्यावेळी स्वतः शंकर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि यमराजाला म्हणाले की, " या बाळाचे प्राण तुम्ही नेऊ शकत नाही, मी या बालकास दीर्घायुष्य प्रदान करीत आहे." हे ऐकून यमराज मार्कंडेयचा प्राण न घेता जीवदान देऊन परत गेला. त्यानंतर भगवान शंकर म्हणाले," मार्कंडेय, आपणाकडून लिहिण्यात आलेल्या महामृत्युंजय मंत्र आपणास खूप प्रिय असून भविष्यात जो कोणी या मंत्राचा स्मरण करेल त्यांना माझा आशीर्वाद सदैव मिळत राहील. या मंत्राचे जप करणारा व्यक्ती मृत्यूचा भीतीपासून मुक्त होईल आणि भगवान शंकराची कृपा त्यांच्यावर सदैव राहील." हेच ते बालक जे की पुढे महर्षी मार्कंडेय या नावाने ओळखले जाऊ लागले
महर्षी मार्कंडेय ऋषी हे भारतातील पद्मशाली समाजाचे कुलदैवत आहेत. भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक व केरळ अश्या संपूर्ण दक्षिण भागात वास्तव्य आढळून येते. या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड विणणे हे आहे. मार्कंडेय ऋषींचे वंशज भावना ऋषी यांनी कमळाच्या तंतूपासून धागा बनवून कापड तयार केले आणि ते देवांना वाहिले. यावरूनच पद्म म्हणजे कमळ आणि शाली म्हणजे कापड असे पद्मशाली नाव पडले असे म्हटले जाते. महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती पद्मशाली समाजबांधव फार मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करतात. महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून वीस किलोमीटर अंतरावर चंद्रपूर मार्गावर मार्कंडेय नावाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी लहान मोठे शिवलिंग पडलेले दिसून येतात. हजारो वर्षांपासून हे मंदिर उभी आहे. महाराष्ट्रात सोलापूर, नांदेड, जालना, चंद्रपूर आणि ठाणे जिल्ह्यात पद्मशाली बांधव फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आज महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...