Monday, 22 January 2018

राष्ट्रीय मतदार दिन

राष्ट्रीय मतदार दिवस

इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. अनेक लोकं अनेक प्रकारे आपल्या देशाची सेवा करतात. शास्त्रज्ञ मंडळी संशोधनाद्वारे आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतात. युवक-युवती सैन्यामध्ये विविध पदांवर काम करत देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, राजकारण या माध्यमातून अनेकजण देशाप्रती आपले सेवा देत असतात. याचबरोबर शाळेतील विद्यार्थी एन.सी.सी.च्या माध्यमातून देशसेवा करण्याचा प्रयत्न करतात. मग मतदान करणे हे सुद्धा एकप्रकारे देशसेवेचाच एक भाग आहे. आपली लोकशाही बळकट, सुदृढ व सक्षम करण्यासाठी देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यासाठी, विकासाला गती येण्यासाठी या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास चूकीचे ठरणार नाही. बहुतांश वेळा आपण असे विचार करतो की, माझ्या एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे ? मतदानाच्या निमित्ताने जी सुट्टी मिळाली आहे त्या सुट्टीचा आनंद उपभोगावे म्हणून आपण कुठेतरी सहल काढतो. खरोखरच यावर आपण कधी आत्मपरीक्षण किंवा स्वतःला कधी एक प्रश्न विचारले आहे का की, मी माझे कर्तव्य विसरलो काय ? मतदान करणे माझे कर्तव्य नव्हे काय ? माझ्यासारखे अनेक लोकं असेच विचार करतात आणि मतदान करीत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान झाल्याची टक्केवारी खूप कमी दिसून येते. पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपल्या एका-एका मतामुळेच उमेदवारांच्या खात्यात मत जमा होत राहतात. कधी कधी असे ही ऐकायला मिळते की, अमुक एक व्यक्ती एका मताने निवडून आला. त्यावेळी त्या मताचे खरे मूल्य आपणास कळते. यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही हे लक्षात घ्यावे.
ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली ते सर्वजण निवडणूक प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होत असतात. निवडणूक आयोग त्यासाठी दरवर्षी नवीन मतदार नागरिकांची नोंदणी बी.एल.ओ. मार्फत करीत असते. आपली वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नांव मतदार यादीत नोंदविले नाही तर मतदानाच्या पवित्र हक्कापासून आपण वंचित राहू शकतो. नव्याने मतदार झालेले युवक फार मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभागी होतात. मात्र पुढे पुढे त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग कमी होत जातो, याचे कुठे तरी संशोधन व्हायला हवे. देशातील प्रत्येक मतदार यात सहभागी झाल्यास निवडणूक निकाल अधिक पारदर्शकपणे दिसून येईल असे वाटते. मात्र वेगवेगळ्या कारणामुळे दरवेळी मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसून येते. मतदान यादी अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे. बहुतांश मतदार यादीत मयत लोकांची आणि काही दुबार नावे आढळून येतात. तसेच त्या यादीतील काही कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून काम पाहतात त्यांच्यात मतदान करण्याची टक्केवारी वाढली पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र यांच्या साहाय्याने मतदान करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते मात्र या पद्धतीने मतदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी दिसून येते. ही टक्केवारी वाढली पाहिजे. मतदान करण्याची सक्ती केली पाहिजे. जी व्यक्ती मतदान करणार नाही त्यांच्या काही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करायलाच हवे. निवडणुकीच्या ओळखपत्राचा वापर आपण वेगवेगळ्या कामासाठी करत असतो आणि प्रत्यक्षात मात्र जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्याकडे पाठ फिरवली जाते. म्हणून त्याचा वापर नागरिक तेंव्हाच करतील जेव्हा ते मतदान करतील, अशी काही व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे असे वाटते. सर्वात शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण देशातील एक जागरूक मतदार आहोत म्हणून आपले अमूल्य मत काही गोष्टीच्या लालचीमध्ये पडून विकू नये. निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसा याचा महापूर असतो असे त्या काळातील बातम्या वरून दिसून येते. त्यामुळे पन्नास रुपयाच्या दारूपायी किंवा लाल, पिवळ्या नोटाच्या मोहात पडून आपले मत कोणाला दान करू नये. त्याऐवजी आपणास योग्य वाटणाऱ्या उमेदवारास आपले अमूल्य मत देऊन लोकशाही बळकट करण्यात खरे शहाणपण आहे.  आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्यदिन आणि  प्रजासत्ताक दिन. या दिवशीच प्रत्येकांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहताना दिसते. नैसर्गिक आपत्ती असो ध्वजदिन निधी संकलन प्रत्येक जण देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे येतो व आपल्या कुवतीनुसार मदत करतो. याप्रमाणे मतदानाच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजचे आहे. म्हणूनच भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा करीत असतो. तर चला मग आजच्या दिवशी शपथ घेऊ या जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्याविषयी जागरूक करू या.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...