Wednesday 10 August 2016

साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप आणि तुम्ही आम्ही पालक मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित .

*🗽  साहित्य दरबार वैचारिक लेखमाला  🗽*

भाग :- (सोळावा )
दिनांक - 07/08/2016
वार - रविवार
वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★★★★★★★

विषय - शिक्षक काल आणि आज


💥 संकल्पना :- ना सा येवतीकर धर्माबाद

💥 संयोजक - आप्पासाहेब सुरवसे लाखणगाव

💥 परीक्षक - सौ. स्नेहल आयरे ठाणे

💥संकलन - जी पी पवार पाटिल हिंगोली

💥 ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार धर्माबाद

💥 मार्गदर्शक :- हरीश बुटले संपादक तुम्ही आम्ही पालक मासिक


===========================
प्रथम क्रमांक विभागून : लेख


शिक्षक विद्यार्थ्याचे दैवत

   'गुरूविन कोण दाखवीन वाट',अशी एक म्हण आहे,आणि हो ,आपल्या जीवनातील एक विशिष्ट वळण देणारी,वाट दाखवणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे, आपले आदरस्थान शिक्षक .आई प्रथम गुरू आहे ती तर आपल्याला जन्मापासूनच जगण्याचे सर्वच पाठ देत असते परंतु शिक्षक आपल्याला जगाच्या उच्च पातळीवर जगण्यासाठी प्रबळ बनवत असतात.शि-शिस्त, क्ष-क्षमता,क-कार्य या तीन गोष्टीचासंगम घडवतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा ,जगण्याचा एक अविभाज्य घटक असतो शिक्षक.
              शिक्षकाची भूमिका वीसतीस वर्षापूर्वी पाहिलेतर,पायात कोल्हापुरी वाहाणा अंगात नेहरू शर्ट,धोतर किवा पायजमा अशा वेशभुषेत शिक्षक होता.शिकवताना आवाजातील रुबाब,पोर..कशी टर्की भ्यायची.पाढे आलेच पाहिजेत असा अट्टाहास करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी पाठांतरीत असण्यासाठीआग्रही असायचा.पूर्ण पुस्तक विद्यार्थ्यांना पाठ करायला लावणारा शिक्षक प्रसंगी छडीच्या धाकावर विद्यार्थ्यांना झुलवत असे."छडी लागे छमछम विद्या येई घमघम",अशा प्रकारची गाणी प्रसारमाध्यमांतून देखील प्रसारीत होत.विद्यार्थी देखील शिक्षकांच्या शब्दाचा बाहेर नव्हती.शिक्षक  म्हणजे समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती असा बोलबाला होता.समाजातील लोकांच्या घरातील अडीअडचणी सोडवणारा एक समजुतदार व समंजस सुशिक्षित आदरणीय व्यक्ती म्हणुन त्याची ख्याती होती.गावागावात शिक्षकांचा शब्द कोणी ओलांडत नसत.शिक्षकाला पूज्य मानणारी मंडळी घरातील दैवताप्रमाणे मानणारी मंडळी शिक्षकाला खूपआदर देत असे.
             शिक्षक देखील विद्यार्थ्यांना दैवत मानुन त्याना मनोभावे शिक्षण देत असे ज्ञानाचे अमृत विद्यार्थ्यांना पाजणे संस्कारक्षम   रामायण ,महाभारतातील कथा सांगणे एकच ध्यास शिक्षकाला होता.प्रशासनाने नेमुन दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणेत्याना उच्च पदस्थ करणे व शिक्षणाला धर्म मानणारा शिक्षक शाळेप्रती अर्पितो होता.त्यावेळी विद्यार्थी देखील शिक्षकांच्या प्रत्येक शब्दाला मान देणारा होता.गुरुजी म्हणतील तिच पूर्व दिशा एवढा विश्वास शिक्षकांच्या शब्दावर होता."बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही ".गुरुजींना विचारतो असे वाक्य विद्यार्थ्यांच्या तोंडुन ऐकायला मिळायचे.ज्ञान विद्यार्थ्यांनप्रती पोहचवणे व त्याना समाजात एक प्रतिष्ठीत, मूल्यवान बनवणे हाच ध्यास शिक्षकांना होता.
          दिवसेनदिवस शिक्षणाच्या या प्रवाहात बदल होत गेले.अभ्यासक्रम बदलले.लोकसंख्या वाढली नियमीत पणे शिकवणा-या शिक्षकांच्या भूमिकेत देखील बदल झाले .व्यावसायिक  अभ्यास अभ्यासक्रमात समाविष्ट झाला व कृतीयुक्त अभ्यासाला महत्व आले .परीक्षा पध्दती बदलली.कार्याला,कृतीला,शा.शि.ला महत्त्व आले.व पर्यायाने शिक्षकांच्या भूमिकेत बदल झाला.देशातील निवडणुका असतील जनगणना असेल कुठल्याही गोष्टीची निवड असेल शिक्षकांच्या सहभागाशिवाय तिला पूर्णत्वयेईना गेले व पर्यायाने शिक्षकांच्या हालचालीत बदल झाला .विद्यार्थ्यांना जे ज्ञान दान दिले जात असे त्यात थोडा कोरडेपणा येऊ लागला.राष्ट्रीय कार्यातील कामाला तर शिक्षकाला हातभार लावावाच लागतो त्या ठिकाणी पर्याय नसतो.शिक्षकांच्या अध्यापनाच्या कार्यात थोडा अडसर निर्माण होतो परंतु शिक्षकांनी स्वतःला सावरुन अध्यापनाच्या कार्यात यशस्वीता ठेवली.
         दिलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा व शोधकवृत्तीने प्रश्नाची उत्तरे कशी शोधायची आपल्याला असलेल्या बुद्धीचा वापर करुन स्वयंअध्ययनकसे करायचे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने दिग्दर्शकाची भूमिका पार पाडायला आता सुरुवात केली आहे.
        न्युटन ने ज्या प्रमाणे स्वत: विचार करुन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याप्रमाणे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भावी शास्त्रज्ञ बनवण्याचे काम सध्या  शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांत आत्मजागृती ,ज्ञानरचनावाद जागृत करण्याचे काम व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनवण्याचे काम शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांना चौकोनी चिरा बनवण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षक जात आहे.छडी गेली ..विद्यार्थ्यांन सोबत एकरुप होवुन शिक्षक नाचु गाऊ लागला.विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन हात फिरवु लागला .लेकरही ज्ञानाचे धडे गिरवु लागले.
पर्यायाने विद्यार्थी स्वयंअध्ययनाचे पाठ गिरवण्याचा प्रयत्न करत आहे जेणे करुन भविष्यात येणा-या संकटाला त्याला तोंड देण्याची क्षमता प्राप्त होईल.अशारितीने शिक्षकाला देखील अतिशय काटेकोरपणे स्वत:च्या चारित्र्याला जपावे लागत आहे कुठलीही वाईट गोष्ट करणे शिक्षकाला टाळणे अपरिहार्य झाले आहे.
        पूर्वी शिक्षकाच्या छडीच्या,त्याच्या आदराच्या तालावर विद्यार्थी मोठा झाला संस्कारी झालाखूप मोठा साहेब झाला.परंतु ज्ञानेश्वरानी भिंत चालवली म्हणुन नतमस्तक होणारा विद्यार्थी व शिक्षक आज मात्र भिंत कशी चालवली या गोष्टीचा विचार करतो आहे व तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करुन नासा या वैज्ञानिक प्रयोगशाळेत, मायक्रोसॉफ्टच्या कंपन्या न मध्ये जागतिक पातळीवर देशाच नाव करत आहेत पर्यायाने शिक्षकाचे देखील नाव होत आहे.
       आमच्या शिक्षकांनी ,गुरुजींनी भले ही गुरूकुल पद्धतीत छडीचा धाक दाखवुन श्रमप्रतिष्ठा ,ज्ञान आमच्या अंगी बाणुन आम्हाला शिकवले.परंतु मित्रांनो, आजचा शिक्षक मात्र विद्यार्थ्यांचा मित्र झाला आहे.तो मुलांना सांगतो,तुम्ही डिस्कव्हरी चॅनल पाहा,हिन्दी, इग्रंजी बातम्या ऐक व पाहा .पूर्वी मात्र सिनेमा पाहिला म्हटले की छडी मिळत असे.
        काळ बदलला गरजा बदलल्या स्पर्धा वाढली व शिक्षकाला देखील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी,"आधी केले मग सांगितले "याप्रमाणे अक्षरशः नाचवावे लागते हो!.शाळेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारी साठी विद्यार्थ्यांना अगोदर नृत्य करुन दाखवावे लागते नंतरच ते नृत्य करतात.असा हा आमचा आजचा आदर्श शिक्षक सर्वगुणसंपन्न आहे.पूर्वी ही होता परंतु मुलांच्या कलागुणाना वाव देत त्याचे सुप्तगुण सुद्धा आता प्रकट झाले आहेत व विद्यार्थी देखील मित्रत्वाच्या नात्याने सर ,"तुमच्या मोबाईलवरचे ते देशभक्तीपर गीत दाखवा बरे"!असे म्हणत आहेत.त्याना शिक्षकांचा आदर आहे भिती नाही.
         कालपर्यंत डोळे मोठे करुन,हातात छडी घेऊन शिकवणारा शिक्षक आज मात्र मान डोलवीत ,डोळ्यांच्या खाणाखुणा करत ,गाण्याच्या तालावर हातवारे करत विद्यार्थ्यांन सोबत ज्ञानसागरात मंत्रमुग्ध झाला आहे.
    म्हणुन म्हणावेसे वाटते..
"नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
 सत्यम् शिवम् सुंदरा
विद्या धन दे आम्हास एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा".

          सौ. स्नेहलता विष्णूदास कुलथे
           प्रा. पदवीधर
           जि.प.प्रा. शा.किट्टी आडगाव
            ता. माजलगाव जि बीड
           मोबा 7588055882
           साहित्य दर्पण पुरोगामी संघ
           समूह क्रमांक 37


============================
प्रथम क्रमांक विभागून : लेख

गुरुविन जगी थोर काय
***********************
'' गुरु ईश्वर तात माय ''
''गुरुविन जगी थोर काय ''
आई-वडील , ईश्वर या सगळ्या प्रतिमा कोणामध्ये पहावयास मिळत असतील तर त्या गुरु मध्ये.म्हणजेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, कारण गुरु आपणाजवळचे सर्व ज्ञान शिष्याला देत असतात.म्हणुण संत तुकाराम महाराज म्हणतात---------
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन किंवा गुरुजन. चंदन ज्याप्रमाणे आपला सुगंध इतराना देऊन आपल्या पात्रतेचे बनवतात त्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांना बनवतात. गुरु म्हणजे ज्ञान देणारे.आता आपण त्यांना शिक्षक म्हणतो.
आज आपण कालचा शिक्षक आणि आजचा शिक्षक या विषयी मत व्यक्त करणार आहोत.
शिक्षक होणं हे काही वाटतं तितकं सोप नाही.कारण या पेशामध्ये शिक्षकानं फक्त  द्यायचच असतं आणि ते देणं ही कोणत्ही भौतिक बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने द्यायच असतं
हे मी पुर्वीचे सांगते आहे आता शिक्षकांना भरमसाठ पगार आहे फक्त तो वेळेवर होत नाही,  असो.
पुर्वी च्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात  होती गुरुच्या घरी राहुन त्यांची सर्व कामे करुन ,सेवा करुन विद्या संपादन करायची .विद्याभ्यास पुर्ण केल्या नंतर शिष्य गुरु दक्षिणा देत असत. नंतर काही श्रीमंत ,जमीनदार आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या घरीच गुरुजीना ठेवत.कालांतराने रविंद्रनाथांच्या शांतीवन सारख्या निसर्ग शाळा सुरु झाल्या.जमीनदारांच्या राजांच्या मुलांना शिकवण्याच्या बदल्यात गुरुजीनाही बलुतेदार पद्धती प्रमाणे धान्य मिळायचे तरीही
गुरुजी आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य इमाने इतबारे करत असत.त्यावेळचे शिक्षण म्हणजे पावकी, निमकी, दिडकी ,अडीचकी आणि या व्दारे तोंडी हिशेब , पुस्तक वाचण्यासाठी बाराखडी तोंडपाठ करुन घेतली जाई.नंतर इंग्रज आले
त्यांनी राज्यकारभाराच्या सोईसाठी शाळा काढल्या.बालवाडी ते ४थी पर्यंत शिक्षण गावातच होई.. ४थी पास झालेले विद्यार्थी  शिक्षक म्हणुण नोकरीस लागत असत.गुरुजी ज्या गावात नोकरीस असत तिथेच वास्तव्यास असत.त्यामुळे गावक-यांच्या सुख-दुःखात समरस होत.गावातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.गुरुजीनां राहायला घर फुकट,भाजीपाला, दुध इ.बाबी फुकट.गुरुजींचा पोशाख एकदम साधा , पांढरे शुभ्र धोतर,पांढरा नेहरु, डोक्यावर टोपी.गावात गुरुजीना मान असे लग्न जमवण्यापासुन ते चावडीवरील भांडण मिटवण्या पर्यंत गुरीजींना मान दिला जाई,गुरुजी जे सांगतील ती पुर्वदिशा. गुरुजींच्या शाळेत जायच्य वेळेवर लोक किती वाजले ते सांगत. म्हणजेच वक्तशीरपणा हा गुण पुर्वीच्या गुरुजीकडुन घेण्यासारखा होता.शिस्त तर वाखाणण्या जोगी होती गुरुजी रस्त्यात दिसले तरी मुले घाबरायची म्हणजेच गुरुजीविषयी आदरयुक्त भीती होती.भीतीयुक्त आदर काही कामाचा नाही.गुरुजी तन मन लावुन शिकवायचे .स्पर्धा एवढ्या वाढलेल्या नव्हत्या पाठांतरावर भर होता .अभ्यास नाही केला तर हातावर छड्या भेटायच्या उठाबशा काढायला लागत पण तरी ही पालक भांडायला येत नसत.काँपी हा प्रकार नव्हता त्यामुळे यशस्वी जीवन कसं जगावं याचे धडे शाळेत मिळत.
काळाच्या प्रवाहामध्ये गुरुजी हे नाव बदलुन मास्तर , शिक्षक, आणि आता सर.नावाप्रमाणे भूमिकेतही बदल झाला.पिंजरा सिनेमातील मास्तर पाहून समाजाची शिक्षकाकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदलली.परंतु आज आपण पाहतो की माझे काही शिक्षक बांधव समाजाच्या रोषाला कारणीभूत होत आहेत.कुंपणानीच जर शेत खाल्लं तर दाद कोणाकडे मागायची अरे आपण समाजाचा आरसा आहोत.हा आरसा कसा स्वच्छ असायला नको ? डागाळलेल्या आरशात समाजाचे प्रतिबिंब दोषयुक्त दिसेल.आपणाला ठाऊक आहे चांगल्या चारिञ्याच्या अभावी असलेले बौध्दिक ज्ञान म्हणजे अत्तर चोपडून सुगंधित केलेले निर्जीव शरीर होय.आज तुमचा आदर्श तुम्हांपुढे बसलेले चिमुकले जीव घेणार आहेत.शिक्षक म्हणजे--शि-शिलवंत., क्ष-क्षमाशिल, क-कर्तव्यदक्ष इतके सुंदर जर आपले नामकरण असेल तर जागा ना त्या नावाला, मला येथे आवर्जुन सांगावे वाटते कि सर्वच शिक्षक आसे नाहीत फक्त बोटावर मोजण्या इतकेच शिक्षक आपल्या कर्तव्यात कसुर करताना दिसतात.परंतु आपणाला माहित आहे एक आंबा नासला तर शेतकरी म्हणतो सगळे आंबे नासतील.म्हणुण माझ्या बांधवाना नम्रतेची विनंती आपल्या कर्तव्यापासुन यत्किंचितही ढळू नका.गुरु या प्रतीचा असावा की, ज्याच्या केवळ काल्पनिक अस्तित्वानेही अर्जुनाच्या तोडीचा एकलव्य तयार व्हावा.
पोटार्थी विद्या व्यापारी म्हणजे गुरु किंवा शिक्षक नव्हे.अशी आपली प्रतिमा असायला हवी.
सद्याच्या काळात त्याच चाकोरीबद्ध पद्धतीने शिकवणे कालबाह्य झाले आहे .त्यातुन नव्या ज्ञानरचना वादाच्या निमित्ताने शिक्षकांच्या अंगभूत गुणांना व कौशल्यानाही नवनवे पैलु पडू लागले आहेत त्यातुन आजचा  शिक्षक वेगळ्या वाटा , वेगळा मार्ग चोखाळू लागले आहेत.नुसता काळ बदलतोय असं नाही तर काळानुरुप तंत्रज्ञानही बदलतय, ही बदलाची पावलं ओळखून आजचा शिक्षक तंत्रज्ञानाची कास धरुन पूढील वाटचाल करीत आहे.आदर्श शिक्षक किंवा गुरु समाजाचूया विकासाच रहस्य आहे . हे मानवतेचं मूलस्थान आहे मात्र गरज आहे ते जपण्याची.
थोड लक्षात घ्या, समजा कमरेला धोतर, अंगात कुडता, डोकीला पागोटे, खांद्यावर घोंगडे,हातात एक काठी घेऊन एखादा माणुस रस्त्याने निघाला तर त्याला आपण महात्मा म्हणू ? शक्य नाही.
महात्म्याचे महात्म्य हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबुन असते.असे थोर कर्तृत्व फुल्यांच्या ठाई होते. आणि म्हणुण प्रवाहाच्या विरोधात जाऊन शिक्षकाचे पवित्र कार्य केले. म्हणुण शिक्षकांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले पाहिजे.आणि खरच काही शि क्षक उदात्त भावनेने हे कार्य करीत आहेत .कारण तत्वाने भारलेली माणसे तपशिलाच्या विचारात पडत नाहीत.सर्व कामे आँनलाईन असली तरी शाळेतील शिक्षकांना फक्त  शिकवू द्यायचच काम करु द्याव .
पन्नास कामं शिक्षकांच्या  मागे लावता उदा. खिचडी ,बांधकाम,गावात किती शौचालय आहेत.इ. आणि विचारता गुणवत्ता कशी नाही
या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा .आणि बांकाम अजीबात शिक्षका कडे देऊ नका .किती त्रास देतात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
       उत्तम तयारीचे विद्यार्थी  देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालतात हे आमच्या  शिक्षकांनी जाणले आहे त्या दृष्टीने ते काम करीतही आहेत.
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
या दृष्टीने माझ शिक्षक बांधव  तळागाळातील विद्यार्थ्यांना  ज्ञान देण्यासाठी ज्ञान रचनावादी दृष्टीकोन घेऊन पुढे चालला आहे,निश्चितच तो आपला विद्यार्थी  21 व्या शतकाच्या स्पर्धेत समर्थपणे तोंड देण्यास तयार यात शंका नाही

सौ.मीना सानप
व्दारका निवास ,
ग्रामसेवक काँलनी,
नगर रोड , बीड
9423715865
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक 07


**************************************
द्वितीय क्रमांक विभागून : लेख

हायटेक शिक्षका ची गरज

  जो मा म्हणजे आईच्या स्तरावर जाऊन शिक्षण देतो तो म्हणजे मास्तर .आज मास्तर ते सर असा प्रवास कसा व कधी झाला हे शिक्षकाला कळलेच नाही. गुरुपौर्णिमा, आणि शिक्षक दिनी शिक्षकाचा गौरव केला जातो. गुरु: साक्षात् परब्रह्म म्हणून शिक्षकांचा स्तुती सुमनांनी सत्कार केला जातो आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे आणि असंख्य अपेक्षाचे ओझे घेऊन त्या शिक्षकाला सतत उपेक्षेला आणि टीकेला सामोरे जावे लागते .
हे कटु सत्य वास्तव जरी असले तरी हा शिक्षक खरेच शिक्षणव्यवस्थेतील   इतका बेजबाबदार आणि निष्क्रिय घटक आहे का? याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे .
    फार पूर्वी गुरुकुल पद्धती होती. मुलं बारा वर्षे गुरुगृही राहून
"जीवनशिक्षण" घेत ,सर्व विद्या आणि कला यांचा ज्याच्या त्याच्या कुवतीनं अभ्यास करुन हे सारं त्यांना प्राप्त  करुन देण्यात गुरूंचे मोठे योगदान असे. गुरु कर्तव्यात तसूभरही कमतरता न येता सारं भरभरून देत.  या सर्वांबद्दल समाजातही  असाधारण आदर होता ; शाळा आस्तित्वात आल्यावर नियमित वेतन होऊनही १९८५ ते १९९०पर्यंत शिक्षकांना वेतन अल्प होते ;  परंतु तरीही काही अपवाद वगळता शिक्षक कर्तव्यदक्ष होते .समाजानेही या वर्गास सतत एक वेगळा दर्जा दिला होता .आता शिक्षकाला त्याची नोकरी  आणि स्थैर्य याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच शिक्षकांकडून किमान गुणवत्तेची अपेक्षा असणे यात काही गैर नाही .
    शिक्षकाने काळाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत hitek होणाऱ्या या संगणक युगात आपल्याला मिळालेल्या सोईचा आपल्या अध्यापनात उपयोग करुन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ केली पाहिजे आता अध्यापनात सी .डी .एल .सी डी .अशांचा उपयोग करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढते आहे . एखादी शंका विद्यार्थ्याने विचारली तर कमीपणा न मानता ,उद्या सांगतो असे सांगून संदर्भ बघणारे शिक्षकही आहेत .
त्याचबरोबर तक्रारी करणारे शिक्षकही यात आहेत .वर्गात विद्यार्थी संख्या खूप असते ,नोंदी ठेवण्याचा त्रास होतो ,कारकुनी करावी लागते. शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही ,आजचे विद्यार्थी बेशिस्त  आहेत ,त्यांना अभ्यास न करता पुढच्या वर्गात ढकलने म्हणजे मोठी कसरत असते अशा अनेक तक्रारी सांगून पाट्या टाकणारा मोठा शिक्षक वर्गही आहे .
शिक्षकाने आजच्या पिढीला घडवताना स्वतः ला update ठेवलेच पाहिजे .वाचनावर भर दिला पाहिजे .कारण आजचा शिक्षक उद्याचा नागरिक घडवत असतो . तो कर्तव्यनिष्ठ पारदर्शक विचारांचा असला पाहिजे .मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत .बाहेरच्या बेहिशेबी जगाचे तडाखे पचवण्यची, धैर्याने मुकाबला करण्याची ताकत त्याच्यात निर्माण झाली पाहिजे
 शिक्षक साधारण नाही .शिक्षक हा देशाची सामर्थ्यता जाग्रुत करण्यास असमर्थ झाला आणि शिक्षकाने  पराजय स्वीकारला तर तो पराजय देशाला नष्ट करणारा असेल ; कारण
 व्यक्तिकडून समाज आणि
समाजाकडून राष्ट्राचे एकत्रीकरण होत असते .शिक्षकाने हे आव्हान स्वीकारले पाहिजेच. त्याला अनेक अडचणींवर मात करुन घेतले व्रत पूर्णत्वास नेलेच पाहिजे .
सौ .आशा मदन तेलंगे
वरिष्ठ शिक्षिका , ठाणे महानगरपालिका

302,मोहनदीप ,
चंदनवाडी ,ठाणे पश्चिम 400602
ठाणे जिल्हा समन्वयक
साद माणुसकिची
90117 42342‬:
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक


**************************************
द्वितीय क्रमांक विभागून : लेख

आचार्य देवो भवं

आचार्य देवो भवं असा वेदांचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदाचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असा भगवद् गीतेचा संदेश. भारतीय संस्कृतिचा वसा आणि वारसा जपत जपत पुढे पुढे जात असताना सतत होणारे बदल आपण अंगिकारलेले आहेत.गुरु शिष्याचा वारसा आम्हाला सदैव प्रेरणादायी असाच ठरलेला आहे.शिक्षण म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे ताकद,बळ.या बळाला ओळखूनच
गौतम बुद्धाने सर्वसामान्य जनतेला ज्ञानाचा दीप
प्रज्वलित करण्याचे आवाहन केले.महात्मा फुलेंनी
अविद्येचे अनर्थ सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा,संघर्ष करा हा मुलमंत्र दिला.शिक्षण महर्षि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्ञानगंगा सामान्याच्या घरापर्यंत पोहचवली,कर्मयोगी संत गाडगेबाबांनी ,एक वेळ
उपाशी राहा पण मुलं शिकवा असा आग्रह धरला.
जीवन शिक्षण सांगणारे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून उपदेश केला.आगदीच पुराण कालात डोकावले तरी अनेक गुरुशिष्यांच्या जोड्या आपणास दिसतील.आणि त्यांची कतृत्वहीआपणास पहावयास मिळतील.आश्रमात
राहून शिक्षण घेणे आणि तेथेच आपली जडण घडन होणे यात धन्यता असायची. गुरुची आणि शिष्याचीपण..संस्कार शिदोरी उलघडण्याचं कार्य
तेव्हा करावे लागत होते..दाम्यत,ददत आणि दयध्वम अर्थात दमन किंवा मनोनिग्रह,दान,आणि दया याची शिकवण त्याकाळी दिली जायची. खरंतर आजही त्या गोष्टी अंगीकारल्या तर अनेक अनर्थ टळतील.माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे आहे.आणि हेच रुजवण्याचं आणि बिंबवण्याचं कार्य त्यावेळी गुरुनां करावे लागायचे.धर्म समजून देताना गुरुना
सांगावे लागे की धर्मांचे अंतरंग प्रेम आहे,तर बहिरंग परोपकार आहे.याचे पालन म्हणजेच तर धर्मपालन होय.यातूनच चारित्र्य आणि चरित्र घडत असतात,किर्ती ही वाफेसारखी आहे, लोकप्रियता हा अपघात आहे,श्रीमंती वा-यावर
उडून जाते;कायम टिकणारी गोष्ट एकच,ती म्हणजे चारित्र्य..! हे जाणिव पर्वक शिक्षण देण्याचं कार्य त्या गुरुनां करावे लागत असे.खरं तर शिक्षक काल आणि आज असा शोध घेताना,शिक्षक परवा,काल आणि आज असा शोध घेतला तर खरा बोध होईल.कारण पुराणातून
पुढं आल्या नंतरच्या कालखंडात गुरुचीं वा शिक्षकांची भुमिका आपण अनुभवलेली आहे. तिचा ऊहापोह किंवा विवेचन होणं गरजेचे आहे. "आमच्या लहानपणी" असा शब्दप्रयोग कानावर पडतो तोही काळ गुरुजीच्या वा शिक्षकांच्या कसोटीचाच होता असं म्हणता येईल.शाळा करता करता सरकारी अनेक कामं करुन मुलांच्या आभ्यासाकडे लक्ष देणारे शिक्षक साध्या
राहणीमानातूनही उठून दिसायचे.डोक्यावर गांधी टोपी, तीनगुंड्याचा शर्ट आणि पायघोळ पायजमा
असा स्वच्छ पांढ-या रंगातील पोशाख एक वेगळी
अशी छाप पाडून जायचा.गावोगावी रस्त्यांची
दुर्दशा तशी शिक्षकांच्या प्रवासाचीही दुर्दशा. सायकलवरुन प्रवास करत असताना मटगार्ड आणि चैनकव्हर नसणा-या सायकलचा वापर करत पायजमा दुमडून चिखलातून वाट काढत शाळेत पोहचलेले कालचे गुरुजी मी पाहिले आहेत.हवं तर शाळेतच मुक्काम करुन लोकांत बसून भजन करणारे कालचे शिक्षक मी पाहिले आहेत.गावात पोष्टमास्तरही हेच शाळा शिकवणारे गुरुजी असायचे.दोन दोन कधी चार चार वर्ग एकत्र करुन सर्वच वर्ग सांभाळणारे शिक्षक कालचे म्हणून ओळखले जातात.कालच्या
शिक्षकांना समाजात आणि विद्यार्थ्यात असणारा सन्मान आजच्या आम्हा शिक्षकांना डोळे उघडायला लावणारा आहे.भारताचे भावी आधारस्तंभ निर्माण करणारा शिक्षक,ज्यांच्या डोळयात कांहीतरी स्वप्न,आशा-आकांक्षा आहेत त्या बालकांचा सर्वांगीन विकास करणे हे आद्य कर्तव्य आहे. तो म्हणजे शिक्षक होय.हे कर्तव्य
पार पाडण्याचा मनापासून प्रयत्न करणारे कालचे
शिक्षक होते.गुरुच्या ठायी ज्या गुणांचा संचय हवा
तो या सुभाषितात सांगितला आहे,"सद्वर्तनंच विद्वत्ताच तथाध्यापनकौशलम् | शिष्य प्रियत्वमेतद्वि गुरोर्गुणचतुष्टयम ||"चांगले आचरण
विद्वत्ता,शिकवण्यातील कुशलता आणि शिष्यामध्ये प्रिय असणे या चार गोष्टी गुरुच्या गुणांचा समुदाय आहे.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
म्हणायचे विद्यार्थी घडवणं फक्त हेच काम शिक्षकाचं नाही तर त्यांची मनं चेतवणं,त्यांना प्रेरणा देणं हेही त्यांचंच काम आहे.ही जबाबदारी कायम शिक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे.आजच्या शिक्षकांबद्दल अनेक बाजूनी बोलणारे अनेक आहेत.मी पण शिक्षक असताना मला आलेले कांही अनुभव इथं सांगताना लाज वाटणार नाही.कारण कांही बाबी या केवळ मी बोललो नाही किंवा बोललो तरी टळणा-या नाहीत.कारण
वास्तव हे कधी झाकत नाही किंवा नाकारता येत नाही.आजचा शिक्षक हा परिस्थितीनुरुप बदललेला आहे.या सर्व बाबी समाजाबरोबर त्यानेही स्विकारलेल्या आहेत.आज हवा तसा नि तेवढा सन्मान शिक्षकांना मिळत नाही यासाठी केवळ शिक्षकांना दोष देत राहाण्यापेक्षा सर्वाचींच
बदललेली जीवनशैली कारणेभूत नाही का..तसेच
शिक्षण पद्धतीत होत असणारे सततचे बदलही कारणेभूत आहेत.बदलही व्हावेच लागतात पण ते
खरोखरच योग्य आहेत का..?याचा खोल विचार होताना दिसत नाही,सवंग गोष्टीचा भरणा अधिक
असल्याचे दिसते.मग शिक्षक म्हणून घेणारा प्राणी
अधीक संभ्रमावस्थेत जातो आणि फक्त आर्थकारणाशी नोकरीची सांगड जुळवली जाते.व त्यातूनच दोघंही नोकरीत असतील तर असा विचार मनात घर करतो आणि मग चालू होतो लोकांच्या टिका आणि टिप्पणीचा वर्षाव.पाचव्या वेतन आयोगा नंतर ख-या आर्थाने शिक्षक आर्थीक समृद्ध झाला.त्याला सुबद्धता प्राप्त झाली.पैसा शहण्याला वेडं आणि वेड्याला शहाणं करतो.याबाबत जास्त बोलनं वा लिहनं योग्य नाही.पण या मार्गावर वावरणारे सर्वच असत नाहीत हेही नमुद करणे आवश्यक आहे.कांहीच्या
आशा वागण्याने सर्व शिक्षक जात बदनाम होते.
तरीही आगदी अलीकडील शिक्षक आणि त्यांच्या
कतृत्वाकडे डोळेझाकही करुन चालणार नाही.भाकरी दोन्ही बाजूने भाजली तर खाण्यायोग्य होते.हेच तत्व लक्षात घेऊन घरातूनही संस्काराचे ढोस आई बाबाकडून देणे
आवश्यक आहेत.काय करतील ते शिक्षकच आशी भावना ठेऊन आणि आपल्या पाल्यानां सैराट सोडून पुन्हा शिक्षकांना दोष देणारेही समाजात कमी नाहीत.पण आता लक्षणीय बदल
घडतोय,दिसतोय शाळा डिजिटल होतायेत,प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी कार्यक्रमातून
खरोखरच प्रगती साधताना दिसते आहे. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या हरेकाला कांही लोकांमुळे समाजाच्या टेकेला तोंड द्यावं लागतं.अशी हेटाळणी जीव्हारी लागते.मला ठाऊक आहे आजच्या शिक्षकांपुढं नवनविन आणि मोठी आव्हानं आहेत.आणि ती पेलण्याची
हिंमतही आजच्या शिक्षकात आहे,फक्त सहकार्य
हवं आहे ते समाज्याच्या पाठबळाचं.आणि शिक्षकांबरोबरच आपलंही कर्तव्य आहे मुलांपुढं
संस्कारीत वागण्याचं.कित्येक घरात मुलांना आभ्यासाच्या नावाखली टीव्ही पाहू दिला जात नाही.आणि अगदी त्याच वेळेत पालक टीव्ही पाहण्यात गुंग असतात.हीच सुरवात असते बिघडण्याची आणि शिक्षकांना नावं ठेवण्याची.पण आज अपण इथं तुलनात्मक विचार मांडत असताना कांही अपवाद वगळता आजचा शिक्षक जबाबदारीची जाणीव ठेवणारा तसेच प्रयत्नवादी आणि तंत्रस्नेही झालेला आहे.उज्वल भारतासाठी कांही दोषयुक्त लोकांमुळं सारी जात बदनाम करणं योग्य होणार नाही.चला हातात हात गुंफू आणि नवा भारत घडवूया..!!

                    श्री.हणमंत पडवळ
          मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
                     8698067566.
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक


**************************************

स्पर्धेतील लक्षवेधी लेख

आपल्या देशात प्राचीन रामायण-महाभारतामधील गुरूपासूनचा  प्रवास आज 'टिचर' पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्याकाळी राजघराण्यातील मुले गुरूगृही  जाऊन वेगवेगळ्या विद्या,ज्ञान संपादन करीत असत. गुरू आणि शिष्याच्या नात्यात कुठलाही किंतु नसायचा. जीवनाला  योग्य वळण देण्याचे काम गुरू करीत असत,किंबहुना तेच आपले जीवनकार्य मानत असत .राजानी दिलेली गुरुदक्षिणा ही ऐच्छिक  असायची. गुरू गरीबच असत. तरी त्यांच्याघरी राजपुत्रानी दैनंदिन कामे करणे ही गुरूसेवा समजली जायची. आणि ही गुरुसेवा राजपुत्र अगदी निष्ठेने करीत असत. गुरू आपल्या कुवतीनुसार राजपुत्राना निसर्गाच्या सहवासात शिक्षण देऊन कर्तव्य पूर्ण करीत असत.म्हणूनच -
"गुरुर ब्रम्हा,गुरुर विष्णू,गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरुवर्ये नम:||"
एवढा गुरुप्रति आदरभाव त्या  शिष्यालाच  नाहीतर समाजाला सुध्दा होता.द्रोणाचार्यासारखा गुरू,एकलव्यासारख्या  शिष्याला विद्या न देताही गुरुदक्षिणेचा मात्र दावेदार ठरायचा! त्यात पीडित एकलव्याला किंवा समाजालाही ते गैर वाटत नसे.
        त्यानंतरच्या काळात या गुरूचे स्थान व्यावसायिक 'गुरूजी'नी घेतले. गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते घनिष्ठ असायचे. हे  गुरुजी फक्त शाळेतील विद्यार्थ्यांचाच मार्गदर्शक नसायचे;तर त्या गावातील सर्व कारभार,लग्ने,महत्वाची कामे यात मार्गदर्शन करण्याचे कामही गुरूजीनाच करावे लागायचे. कोणत्याही कामात त्यांचाच सल्ला महत्वाचा ठरायचा.म्हणूनच शेतातली नवाळी असो,घरातील शिजलेला नवा पदार्थ असो,आधी गुरुजीच्या घरी अगदी नित्यनेमाने, सेवाभावाने आणि व्रतस्थपणे जात असे.शिक्षक हे शाळेपुरते मर्यादित नसून त्यांची बांधिलकी समाजाशी असायची.मिळणाऱ्या  तुटपुंज्या पगारात संसार चालवून ते समाधानी असायचे. निर्व्यसनी,सालस,कर्तव्यनिष्ठ,कर्तव्यतत्पर असायचे. विद्यार्थ्याशी भावनिक नाळ चांगली जोडलेली असायची. विद्यार्थ्याला घरची अडचण असो अथवा शाळेची,शिक्षक हे  भावनिक,मानसिक,सामाजिक  आधारस्तंभ  वाटायचे. शिक्षक असूनही गावाशी,शेतीशी नाळ जोडलेली असायची.म्हणूनच समाज व विद्यार्थी त्या शिक्षकाकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आदराने पाहायचे. विद्यार्थी सुध्दा आपले आदर्शस्थान,श्रध्दास्थान म्हणून आपल्या शिक्षकाकडे पहायचे. आणि त्याकाळी आदर्श मानावा असे जीवनमान सर्वच शिक्षकाचे असायचे. शिकवण्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा विद्यार्थी घडविण्यात जास्त आनंद असायचा.
          हे झाले कालपर्यंतचे शिक्षक! आपण आपल्या वडिलाना,आजोबाना त्यांच्या शिक्षकाबद्दल बोललो तर आजचा शिक्षक आणि कालचा शिक्षक यांच्यातील बदलते स्वरुप आपल्या लक्षात येईल. कारण  आजचा शिक्षक हा आज आपणासमोरच आहे. आज सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि गुरूपासून गुरुजी,आणि गुरुजीपासून टिचर असे स्वरुप बदलत गेले.इंग्रजीपुढे  मायबोलीतला गोडवा जसा सपक झाला तसा गुरुजीमधला आदर कमी होऊन विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्याही नजरेत आजचा शिक्षक हा "आधर"झाला. काळ बदलतो तशा सर्वच बाबी बदलत जातात. तसे शिक्षणक्षेत्रात फारमोठे संक्रमण झालेले आहे.आजच्या शिक्षकाची गावाची नाळ तुटली. त्यांच्या मनाला आणि पायालाही ओढ ही शहराची लागली. मातीच्या सहवासातून येणारा मनाचा ओलावा कमी झाला आणि शहरातील फ्लॅटमध्ये राहून भावनाही फ्लॅट व्हायला लागल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापुरताच संबंध उरला. त्याहीपलीकडे आजच्या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकापेक्षा बाहेरच्या खासगी शिकवणी घेणारा पोटभरू ( गल्लाभरू )शिक्षक हा जवळचा वाटू लागला.आजच्या पालकांचाही विश्वास हा शाळेतील शिक्षकापेक्षा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावरच अधिक दिसून येतो.आजच्या शिक्षकांचाही  शाळेत विद्यार्थ्याना शिकवण्यापेक्षा त्याच विद्यार्थ्याना खासगी शिकवणी घेऊन शिकवण्याकडे कल वाढला आहे.पूर्वीसारखे आजही आधुनिक  द्रोणाचार्य पुन्हा दिसू लागले. त्या द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता त्याचे श्रेय घेतले होते,त्यानी अगंठा मागितला होता. आजचे खासगी शिकवण्या घेणारे द्रोणाचार्य हे असेच आपण न शिकवलेल्या पण  यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव  आपल्या फ्लेक्सवर लावून त्याचे श्रेय घेताना दिसून येतात. म्हणूनच एक यशस्वी विद्यार्थी एकाचवेळी  अनेक फ्लेक्सवर झळकताना दिसतो. वेतनातून मिळणारा पैसा कमी वाटू लागल्याने की काय,शिक्षकी नोकरीसोबतच अजून एखादा जोडधंदा स्वीकारण्याकडे कल वाढला. त्यामुळे आपोआपच शिक्षकी पेशावरची निष्ठाही ढळली. हे सांगण्याचे वैषम्यही वाटते की,आजच्या शिक्षकाजवळ पहिल्यापेक्षा अधिक पैसा जवळ खुळखुळु लागल्याने आजचा शिक्षक व्यसनाधिन  बनला आहे. संध्याकाळी गावातील लोकांसोबत गावच्या  पारावर बसून लोकांशी नाळ जोडणारा  शिक्षक आज संध्याकाळी नित्यनियमाने  बारमध्ये बसताना दिसतो.आजचे सर्वच शिक्षक असे  आहेत असे मी म्हणणार नाही,याला काही सन्माननीय अपवादही आहेत,जे की आजही अनेक विद्यार्थ्याना ते दिपस्तंभच  वाटतात. आजचेही अनेक शिक्षक समाजोपयोगी कार्य करताना,समाजाशी नाळ जोडलेले दिसून येतात.पण खेदाने सांगावे लागते की,हे प्रमाण फार कमी आहे. आज जिल्हा परीषदेच्या शाळा ह्या फार मोठ्या संक्रमणातून जात आहेत. त्या अनेक शाळानी आज कात टाकलेली आहे.अनेक शाळातील शिक्षक फार मोठ्या जिद्दीने या बदलासाठी पेटून उठलेले दिसून येत आहेत.आणि हा बदल गरीब,ग्रामीण विद्यार्थ्यासाठी खूप मोठी पर्वणी ठरणार आहे. स्वामी विवेकानंद यानी  म्हणाले होते की ,If a poor student can not come to education,education itself must go at his doorsteps .आजचा शिक्षक हा गरजूपर्यंत ज्ञान घेऊन पोहोचला आहे.यातून अनेक संवेदनशील लोकांच्या मनाला कुठूनतरी एक आशेचा किरण दिसू लागला आहे,पुन्हा एकदा खूप मोठ्या काळानंतर गरीबांसाठी शिक्षण येवू पहाते आहे. हा आशादायी बदल चिरकाल टिकावा एवढेच! त्यासोबतच आज शिक्षकावर आलेल्या शिक्षणेत्तर कामाचा बोजा कमी झाला तर,शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक वेळ देईल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.असे घडले तर पुन्हा एकदा समाज- विद्यार्थी-शिक्षक यांचे नाते दृढ होईल. साने गुरुजी म्हणतात,
"तुम्ही आदर्श असाल की नाही माहीत नाही,पण तुमच्यापुढे बसलेले १५०-२००विद्यार्थी मात्र तुम्हाला आदर्श मानतात. त्याप्रमाणे आपले आचरण असावे!" एवढे जरी आजच्या शिक्षकाने मनावर बिंबवले तर  आजचा शिक्षक स्वत:च्याही मनात आदर्श बनू शकतो.

संगीता किशनराव देशमुख
"प्राज्वल्य" चौधरी नगर,
वसमत जि. हिंगोली
साहित्य दर्पण पुरोगामी संघ
समूह क्रमांक 14


============================

धन्यवाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...