Thursday, 25 June 2020

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

प्रदीर्घ उन्हाळी सुट्यानंतर 
उजाडला हा खास दिवस
ज्याची आतुरता होती तो
शाळेचा पहिला दिवस

नवे वर्ग नवीन शिक्षक
नवीन पुस्तक नवे मित्र
खूप मजा येईल पाहून
पुस्तकातील नवे नवे चित्र

शाळेची ओढ लागली मला
गेल्या काही दिवसांपासून
कधी सुरू होईल शाळा याची
आस लागली मनापासून

भल्या पहाटे उठलो तरी
शीण आला नाही कामाने
पाठीवर दप्तर टाकली अन
पळालो शाळेच्या दिशेने

घंटा वाजली, मुले जमली
राष्ट्रगीताचे गायन झाले
जुन्या नव्या मित्रांना भेटून
मनोमनी खूप आनंद वाटले

- नासा येवतीकर, धर्माबाद

महाराजांचे महाराज

आयुष्य

आयुष्य

विधिलिखित लिहिलेलं
असते प्रत्येकाचे आयुष्य
किती जगेल केंव्हा मरेल
कोण करील यावर भाष्य

हसत खेळत जगत राहावे
मिळाले आहे जेवढे आयुष्य
कशाचीच चिंता केली नाही
तरच होईल जीवन दीर्घायुष्य

आज आहे तर उद्या नाही
अशी परिभाषा आयुष्याची
जिवंतपणी सत्कर्म केलो तर
काळजी नसते भविष्याची

कोरोना रोगाने दिली सर्वाना
ओळख करून आयुष्याची
महामारीच्या साथ आजाराने
खात्री वाटत नाही जीवनाची

मृत्यूनंतर सर्व चांगले म्हणावे
हीच कमाई आहे आयुष्यात
सोबतीला नसतात कोणीही
सारेच रिकाम्या हाताने जातात

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

राजर्षी शाहू महाराज कविता

महाराजांचे महाराज

महाराष्ट्राच्या करवीर नगरी राज्यात
कागलच्या घाटगे घराण्यात
आप्पासाहेब राधाबाईच्या पदरात
जन्मास आले यशवंत कोल्हापुरात

शिवरायांचा वारसा ठेवले चालू
प्रेम मिळविले जनसामन्यात
राधानगरी धरण उभारून
समृद्धी आणली शेतकऱ्यांत

सक्तीचे व मोफत केले शिक्षण
मागासलेल्याना दिले आरक्षण
जातीभेद दूर करण्यासाठी
आंतरजातीय लाविले लग्न

संकटात मदत केली अनेकांना
राजाश्रय मिळवून दिले कलाकारांना
स्त्री शिक्षणाचा प्रसार करुनी
बंधनातून मुक्त केले महिलांना

अडल्या नडलेल्याना देऊन साथ
मानवतावादी राजाची चर्चा सर्वत्र
डॉ. आंबेडकरांना देऊनी मदत
चालू करविले मूकनायक वर्तमानपत्र

लोकांना दिली समानतेची वागणूक
त्यांचा होतो सर्वत्र जय जयकारा
सामाजिक न्याय दिवस म्हणुनी
त्यांचा जन्म दिन होतो साजरा

महाराजांचे महाराज राजर्षी शाहूनी
लोकोपयोगी कामे केली राज्यात
अनेकांची स्वपने झाली साकार
कोल्हापूर प्रसिद्ध झाले जगात

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Wednesday, 24 June 2020

समजदार नागरिक

समजदार नागरिक होऊ या

#nasayeotikar

माणूस एकटा किती काळ जिवंत राहू शकतो ? याचे उत्तर फार काळ जिवंत राहू शकत नाही, समुहात राहिला तर जास्त काळ जिवंत राहू शकतो. म्हणूनच फार पूर्वीपासून मनुष्य वस्ती करून समुहात राहत होता, असे दिसून येते. समुहात राहायचे असेल तर समूहाचे काही नियम ठरवले जातात आणि त्याचे पालन करावे लागते. नियमाचे पालन केले नाही की वाळीत टाकले जाते, त्या व्यक्तींना कोणी काही मदत करत नसे असे चित्र पूर्वीच्या काळात होते. आज असे चित्र कुठे ही दिसत नाही म्हणजे समूहाचे काही नियम नाहीत, असे नाही. तर आज व्यक्तीला स्वनियम तयार करून समुहात आपली नाचक्की होणार नाही असे वर्तन करत असतो. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागते त्याला समूहाकडून वेळीच ताकीद दिली जाते किंवा शिक्षा केली जाते. आपला कुटुंब आणि परिवार याची समाजात प्रतिष्ठा राहावी, मानसन्मान राहावा आणि पत राहावी म्हणून माणूस जागरूकपणे वागत असतो. देशाला अश्याच समजदार नागरिकांची खरी गरज असते. जपान देशातील लोकं खूप कष्टाळू आहेत अशी त्यांची ख्याती तेथील समजदार नागरिकांच्या वर्तनावरून सांगितली जाते. भारत देशातील लोकं जबाबदारीने वागत नाहीत अशी आपल्या लोकांची प्रतिमा बाहेरच्या देशात का निर्माण झाली असेल तर ते ही आपल्या वागण्यावरून. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाहीने काही हक्क आणि कर्तव्य दिले आहेत. आपण आपल्या हक्कावर नेहमीच दावा सांगतो त्याचवेळी आपले कर्तव्य मात्र साफ विसरतो. देशाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेल्या अनेक नियमांची आपल्या हातून पायमल्ली होते. कधी कधी आपण सरकारने तयार केलेले कायदे कलम लक्षात न घेता वर्तन करत असतो त्यामुळे समजदार नागरिक ठरू शकत नाही. घरात शांती आणि समृद्धी राहावी म्हणून कुटुंबप्रमुखांच्या नियमाचे पालन आपण करतो म्हणून तर घरात वातावरण सुरक्षित आणि आनंदी असते. त्याच पद्धतीने देशाचे काही नियम असतात आणि त्याचे पालन केल्यास देशात देखील आनंदी व समृद्धीचे वातावरण दिसू शकते. शालेय जीवनात सर्वाना नागरिकशास्त्र विषयातून बरीच बारीकसारीक माहिती दिली जाते. ती सर्व माहिती परीक्षेतील मार्कापुरते मर्यादित ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. आपण किती नियमाचे पालन करतो हे कोरोना संकटाने दाखवून दिले आहे. मी माझ्या मनाचा राजा आहे, माझे जीवन मी कसे ही जगतो अशी विचारधारा देशाला तर कधीच पुढे नेणार नाही. ते तर सोडा, या वृत्तीमुळे व्यक्तीचा देखील विकास होत नाही. आपण टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या सकारात्मक विचाराने देशातील प्रत्येक नागरिक वागला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपणाला यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचे असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे काही नियमावली तयार केली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. तेंव्हाच खरे आपण समजदार नागरिक बनून आपल्या सोबत इतरांना जिवंत ठेवू शकू. म्हणून आता तरी जागे होऊ या आणि समजदार नागरिक बनू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पावसाळा आणि शेतकरी

पावसाळा आणि शेतकरी
- नागोराव येवतीकर
भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नागोराव सा. येवतीकर

नपा हद्दीतील सरकारी शाळांची अवस्था

नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा

सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचेच अनुदान मिळते. ज्याप्रकारे ग्रामीण भागात 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगातून शिक्षणावर 20 टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे नगरपालिकामध्ये शाळांसाठी कोणतीच तरतूद का करण्यात आली नसेल ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नगरपालिका ह्या शाळेला आर्थिक मदत तर सोडाच त्यांचे इमारत भाडे भरले नाही म्हणून त्यांचे अधिकारी येऊन सिल ठोकतात. यावर चिंतन होणे आवश्यक आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. ह्या शाळा नगरपलिका हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेचा कोणताच निधी मिळत नाही. ग्रामीण भागात जसे खासदार निधी, आमदार निधीमधून शाळेला सहकार्य मिळते तसे सहकार्य येथील शाळांना दिल्या जात नाही त्यामुळे ह्या शाळा कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहेत. नगरपालिका क्षेत्र म्हटल्यावर सरकारी शाळेसोबत इतर ही अनेक अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यच्या शाळा येथे अस्तित्वात असतात. त्यांच्या मानाने सरकारी शाळा कोणत्याच पालकांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे अर्थातच तेथील पटसंख्या रोडावली जाते. पूर्वीच्या काळी सरकारी शाळेशिवाय पर्याय नव्हता तेंव्हा याच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नव्हती आणि आज यांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. कारण खाजगी आणि इंग्रजी शाळेचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, सरकारी शाळेकडे आता मजुरीवर काम करणारे पालक देखील ढुंकून पाहत नाहीत. येथील सरकारी शाळेत कोणता विद्यार्थी प्रवेश घेतो तर जो पालक आपल्या पाल्याना साधी वही पेन घेऊन देऊ शकत नाहीत असे दारिद्र्याच्या खाईत असलेली गरीब मुलेच प्रवेश घेतात. त्यांची शाळा शिकण्याची मानसिकता नसल्यात जमा असते. आई-वडील मजुरीला निघून गेले की आपला पाल्य शाळेत गेला किंवा नाही याची साधी चौकशी देखील करत नाही. शिकला तर शिकला नाही तर नाही या मानसिक अवस्थेत असणारी पालकांसाठी ह्या शाळा एक आधार केंद्र असते.  मुलांच्या दुपारच्या जेवण्याची सोय आणि दिवसभर सांभाळ करणारे केंद्र. हाताच्या बोटावर मोजता येतील असे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्याच सोबत शासनाच्या काही धोरणाचा फटका देखील या शाळांना बसतो. प्रत्येक शिक्षकांना शहरात नोकरी करावी वाटते विशेष करून महिलांना. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीने या शहरातील शाळेचा पूर्ण वाटोळं करून टाकलं आहे. पालकांचे असे मत झाले आहे की, आता या शाळेत सेवानिवृत्तीला जवळ आलेले, बिमार असलेले, अश्या शिक्षकांना संधी देऊन शहरातल्या शाळेत भरती केल्यावर ते स्वतःला पाहतील की आमच्या मुलांना. तरुण वयोगटातील शिक्षक ज्या उत्साहाने शिकवितात त्या उत्साहात हे शिकवतील का ? असा प्रश्न अनेक पालकांनी व्यक्त केला तेंव्हा हे ही योग्य आहे असे वाटते. अजून एक निर्णय चुकीचा वाटतो. सरकारी शाळा वाचवायचे असतील तर सरकारी योजना ह्या सरकारी शाळा सोडून अन्य कोणत्याच शाळांना देण्यात येऊ नये. मोफत पाठ्यपुस्तक योजना किंवा शालेय पोषण आहार योजना फक्त सरकारी शाळेतुनच दिल्या गेलं तर येथील शिक्षकांना म्हणता येईल की, आपल्या मुलांना फुकट पुस्तकं देऊ, दुपारचं जेवण देऊ, मोफत गणवेश देऊ आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. पण मोफत गणवेश वगळता पाठ्यपुस्तक आणि दुपारचे जेवण अनुदानित शाळेत देखील दिल्या जाते म्हणून काही पालक जे की या कारणांसाठी सरकारी शाळेत कदाचित येण्याची शक्यता राहिली असती ते ही धूसर झाली. शहरातल्या खाजगी शाळेत सर्व सोयी सुविधा पूर्ण असतात आणि त्याच शहरातल्या सरकारी शाळेत वर्गखोल्या झाडायला साधा चपराशी नसतो. याची देखभाल करण्यासाठी चौकीदार नसतो त्यामुळे या सार्वजनिक मालमत्तेचे रोजच्या रोज अतोनात नुकसान होत राहते. शासनाच्या सर्वच योजना राबविणे अत्यंत कष्टप्रद होऊन बसते. शालेय व्यवस्थापन समिती ही प्रत्येक शाळेला असते त्यात एक नगरपालिकेचा प्रतिनिधी देखील असतो पण नावापुरताच. त्यांच्या स्थायी समितीत शिक्षण नावाचा विषयच राहत नाही तर ते काय तरतूद करतील. पण खरोखरच नगरपलिका हद्दीतील सरकारी शाळांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शाळेकडे लक्ष दिल्यास आपल्या आजूबाजूच्या शाळेचा नक्की विकास होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त नि फक्त आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. आज ग्रामीण भागातील सरकारी शाळा जसे कात टाकून आपल्यात बदल करत आहेत तोच बदल नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळेत होऊ शकतो, चला तर मग या शाळांना हातभार लावू या आणि गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...