Thursday 31 October 2019

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.
अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा माणसाच्या स्वभावाच्या जीवनाचे दोन पैलू आहेत. सुरुवातीस श्रद्धा वाटत असलेली बाब हळूहळू अंधश्रद्धेत कधी परावर्तित होते, याची कल्पनासुद्धा येत नाही. भारत देश हा दैववादी देश आहे. याठिकाणी ईश्वराला मानणाऱ्याची संख्या जेवढ्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात भूतदयेला मानणारे ही आहेत. जे लोक ईश्वर आहे म्हणतात तेच लोक भूत सुद्धा आहे म्हणतात आणि सुरू होतो श्रध्दा आणि अंधश्रद्धा याचा खेळ. लोकांच्या मनात ईश्वरविषयी ओढ असते आणि भूताविषयी भीती. हे सर्व अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर प्रतिबिंबित होत असते. प्रत्येकाच्या घरातून बालपणी मुलांवर याविषयी नकळत संस्कार होत जाते. त्यामुळे ते त्या रिंगणाच्या बाहेर जाऊच शकत नाही. काही ढोंगी लोकांमुळे अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते. समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संंक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकरशाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. भारत सरकारला जादूटोणा विधेयक तयार करण्याची पाळी आली, हीच फार मोठी नामुष्की मानावे लागेल. या विधेयकामुळे गैर प्रकारावर आळा घालविता येईल अशी आशा सरकारला व या विधेयकाच्या अनुयायी लोकांना वाटत असेल मात्र लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा यामुळे घालविता येईल काय ? याविषयी ठामपणे सांगता येत नाही. कारण लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा या विधेयकामुळे मनात दाबली जाईल, पण कायमचे नष्ट होणार नाही.
आमच्या शेजारी राहणाऱ्या एकाने नवीन दुचाकी गाडी विकत घेतली. त्यानंतर सर्वाप्रमाणे त्यांनी सुद्धा या गाडीची यथायोग्य पूजा करून त्यास गंध लावून, त्याच्या समोर नारळ फोडून, त्या गाडीस मिरच्या, लिंबू, बिब्या, काळे केस असे पदार्थ एकत्र करून बांधले. त्याठिकाणी एक मुलगा हे सर्व पाहत उभा होता. जेमतेम सहा-सात वर्षाचा असेल तो, त्याने त्याच्या वडिलांना विचारले की, हे असे का करतात ? त्या निरागस मुलाने निष्पाप भावनेने प्रश्न विचारला मात्र त्या वडिलांना त्याचे नेमके उत्तर देता आले नाही. थातुरमातुर उत्तर देऊन वडिलांनी वेळ काढून नेली. त्यामुळे त्या मुलांच्या मनातील प्रश्नांची उकल काही होऊ शकले नाही. हे असेच चालत आले. लोकं करतात म्हणून आपण ही करावे, या अंधनुकरणाचे वागणे दिवसेंदिवस वाढतच आहे. असे केले नाही तर आपणाला व आपल्या गाडीला अपघात होण्याची शक्यता असते आणि खरोखरच असे केले तर गाडीचा अपघात होणारच नाही का ? ज्यांचे अपघात झाले त्यांनी असे केले नाही म्हणून झाले काय ? मोबाईलचे हेडफोन कानात टाकून गाडी चालविल्यास अपघात होणारच. त्यासाठी गाडीला मिरची किंवा लिंबू बांधणे किंवा न बांधणे हा भाग येत नाही. अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनातून हे विधेयक संपविणार आहे काय ? लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून काही महाभाग लोकं जे स्वतः स्वयंघोषित स्वामी किंवा संत जाहीर करतात ही मंडळी त्यांना अंधश्रद्धा च्या खाईत ढकलतात. या विधेयकाने त्यांच्यावर अंकुश ठेवता येईल. परंतु त्यांच्याविषयी बोलण्यास कोणी तयारच होत नसतील तर त्यांचे कोण वाकडे करणार आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनातून सर्वप्रथम अंधश्रद्धा दूर करावी लागेल. त्याशिवाय असे किती ही विधेयक जरी तयार झाले तरी काही फरक पडणार नाही.
लहानपणच्या वयात मुलांवर चांगल्या प्रकारची संस्कार टाकण्यात आली तर त्याचा मोठेपणी नक्कीच फायदा होऊ शकतो. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे बऱ्याच अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे मुलांच्या प्राथमिक शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा फायदा निश्चितपणे होतो. तसा प्रयत्न शासनापासून घरापर्यंत सर्वांचा होणे आवश्यक आहे. तसे झाल्यासच विद्यार्थ्यांच्या मनात अंधश्रद्धा डोकावणार नाही. याविषयी संबंधित एखादा पाठ्य घटक प्रत्येक वर्गात समाविष्ट केल्यास अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत त्याचा उलगडा निश्चितपणे करता येईल.
भारतात धर्म परंपरेनुसार काही शाळा स्थापना होतात आणि चालविल्या जातात. त्या शाळेतून त्या त्या धर्माच्या चाली रीती परंपरा त्यानुसार मुलांना शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे त्या मुलांच्या मनातून अंधश्रद्धा संपविता येईल काय ? वास्तविक पाहता मुलांना जे प्राथमिक शिक्षण दिल्या जाते ते मुळात धार्मिक बाबीवर नसावेच. मुलांना राष्ट्रीय शिक्षण द्यावे. त्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्राविषयी व येथील विविध पंथाच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होईल. एका शाळेत रुजू झालेले विज्ञान निष्ठ शिक्षक त्या शाळेतील दर शुक्रवारी होणारी सरस्वती मातेची पूजा-अर्चा ही प्रथा बंद पाडली. त्यांचे म्हणणे होते की, शाळेतून अशी पूजा-अर्चा करणे म्हणजे अंधश्रद्धा ला खतपाणी घातल्या सारखे होय. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा यास विरोध दर्शविला. ते शिक्षक स्वतः हिंदू धर्माचे होते. मग त्यांनी ही प्रथा बंद करविली ते योग्य की अयोग्य ? या विषयी खूप चर्चा झाली. योगायोगाने एके दिवशी ते शिक्षक अचानक आजारी पडले तो दिवस ही शुक्रवारचा आणि लगेच शाळेत चर्चा होऊ लागली. " पहा, सरस्वतीची पूजा बंद करविली म्हणून ते आजारी पडले. माता सरस्वतीने त्यांना धडा शिकविला." ही चर्चा त्यांच्या कानापर्यंत पोहोचली, तसे ते मनातून हादरले. दहा-पंधरा दिवसानंतर त्यांनी शुक्रवारचा दिवस ठरवूनच शाळेत रुजू झाले. सदरील शिक्षक येणार नाहीत या विचाराने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वर्गात विद्यार्थी सरस्वती माताच्या प्रतिमेचे पूजन केले आणि प्रसाद वाटत असताना ते आले आणि त्यांनी ब्र देखील काढले नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण केली ते सहकाऱ्यांच्या चर्चेतून. त्यास्तव देवा विषयी स्वतः च्या मनात असलेली श्रद्धा व भीती इतरांना सांगून आपण त्यांना अंधश्रद्धेच्या वाटेकडे घेऊन जात नाही काय ? निदान लहान मुलांच्या मनात तरी याविषयी योग्य अशी भावना तयार करावी ज्यामुळे त्यांच्या मनात अंधश्रद्धेचे बीज पेरल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
शासकीय कर्मचारी तरी निदान अंधश्रद्धेला बळी पडू नये,  असे बोलल्या जाते. मात्र याच लोकांच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा फोफावली जात आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अर्थ विभागात काही कामानिमित्त जाणे झाले होते. कार्यालयात अजून कोणी ही आलेले नव्हते. म्हणून मी त्या विभागातील रिकाम्या खुर्चीवर बसलो. थोड्याच वेळांत तेथील कर्मचारी आला. आपल्या टेबलाखाली ड्राव्हर ओढली आणि त्यातून अगरबत्ती काढली. मला वाटले की एखादे फाईल काढेल पण त्यांनी त्यांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मीमाता आणि बालाजीच्या फोटोला अगरबत्ती ओवाळून नमस्कार केला. त्यानंतर माझ्याकडे मोर्चा वळला. मी हे सारे दृश्य पाहून अवाक झालो. मी ज्यांच्या सोबत या कार्यालयात गेलो होतो त्याचे त्याला काहीच वाटले नाही. मी त्यास प्रश्न विचारला हे काय आहे ? त्याने मला समजाविताना म्हणाला की, अर्थ विभाग आहे, लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून ते रोज सकाळी पूजा करतात आणि कामाला सुरुवात करतात. त्याच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही व त्याचा तेंव्हा अर्थ ही कळाले नाही. तेथे तर फक्त कागद देऊन कागदरूपी चेक द्यायचे काम असताना त्यांना लक्ष्मी कशी प्रसन्न होईल ? या प्रश्नाने मी हैराण होतो. परंतु जेमतेम एखादा महिना उलटला असेल नसेल त्याच अर्थ विभागातील त्याच कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची बातमी वाचण्यात आली. जिल्हा परिषदेने त्या कर्मचाऱ्यास निलंबित केले. तेंव्हा कळून चुकले की लोकं कशासाठी काय करतात ? वास्तविक पाहता शासकीय कार्यालयात देव-देवतांची पूजा अर्चा करणे योग्य आहे का ? याची उकल अजून ही झाले नाही. गल्लो गल्लीत, गावागावात, शहरात, नगरमध्ये गणपती मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा करणे एकवेळ समजू शकतो परंतु शासकीय कार्यालयात गणपतीची स्थापना व त्याची पूजा अर्चा मोठं मोठ्या अधिकारी वर्गाकडून करण्यात आले तर ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा , अश्या प्रसंगातून समाजात काय संदेश जातो ? याचा विचार मात्र कोणीच करत नाही. घटना तश्या फारच छोट्या आहेत परंतु त्यावर विचारविनिमय केल्यास बऱ्याच काही बाबीवर याचा परिणाम होताना दिसून येतो. या व अश्या अनेक घटना समाजात नेहमीच घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी निर्माण झाल्यास अंधश्रद्धा विधेयकाची आपणास गरज भासणार नाही. आपण अंधश्रद्धाळू लोकच बुवाबाजीला प्रोत्साहन देत असतो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे आपण अंधश्रद्धा च्या विळख्यात सापडलोच नाही तर आपणाला कोणी फसविणार नाही.

( वरील सर्व घटना अनुभवातल्या आहेत मात्र त्यात थोडी काल्पनिक झालर देऊन अंधश्रद्धा कशी फोफावत जात आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाला मानू नका, पूजा-अर्चा करू नका असे माझे मुळीच म्हणणे नसून त्यातून योग्य असा संदेश जाईल असे कार्य करावं एवढंच सुचवावे वाटते. )

- नागोराव सा. येवतीकर
अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धर्माबाद

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...