Friday 29 June 2018

पालकांचे मुख्याध्यापकांस पत्र

पालकांचे मुख्याध्यापकास पत्र

प्रिय मुख्याध्यापक,
सर्व प्रकारच्या शाळा.

बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलावे म्हणून मनाशी ठरवलं होतं पण बोलायला वेळ मिळाला नाही किंवा बोलणे टाळलो. पण आज राहवलं नाही कारण माझे पाल्य शाळेतून येताना खूप।अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. भरपूर काम करून एखादा व्यक्ती जेंव्हा थकून भागून घराकडे येतो, तेंव्हा त्यांची स्थिती जशी असते अगदी त्याच अवस्थेत दिसलं. त्याला पाहून माझे मलाच कसं तरी वाटलं ? घरात प्रवेश केल्याबरोबर खांद्यावर असलेलं प्रचंड जड दप्तर बाजूला सारत हाश हुश्श केलं आणि पलंगावर आडवं झालं. आज खरोखर मला माझ्या पाल्याची काळजी वाटायला लागली की, एखाद्या हमाला सारखे दप्तर वाहण्याचे काम माझे पाल्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावर काही करता येईल काय ? याचा विचार डोक्यात आला आणि पत्र लिहायला बसलो. 
खरंच मुलांच्या दप्तरांचे ओझे कमी करता येईल काय ? कसे करता येईल ? शासनाने देखील मुलांच्या वजनाच्या 10 टक्के दप्तरांचे वजन असावे असे निर्देश दिले पण त्याची कोठे ही रीतसर अंमलबजावणी होत नाही. मुख्याध्यापकांने जर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले तर ही समस्या सुटू शकते. मात्र त्यासाठी मुख्याध्यापक मंडळी दक्ष असणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या नियोजनामुळे सर्व काही शक्य होते. म्हणून मुख्याध्यापक मंडळींना काही उपाय सुचवावेसे वाटतात. ज्यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी होण्यास मदत मिळेल. 

पुस्तकांचे वजन कमी करणे - 
उच्च प्राथमिक वर्गात विषयांची संख्या जवळपास सहा ते सात असते, रोज सर्वच विषयाच्या तासिका असतात त्यामुळे मुलांना ते सर्व पुस्तक घेऊन शाळेत जावे लागते. हीच फार मोठी समस्या दप्तराच्या वजनाच्या बाबतीत दिसून येते. यासाठी उपाय म्हणून शाळेत प्रत्येक मुलांसाठी एक संपूर्ण पुस्तकांचा सेट ठेवणे अत्यंत उपयोगी पडू शकते. असा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आल्याचे वाचण्यात आले होते. कारण त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या कमी असते आणि मोफत पुस्तक योजने अंतर्गत दरवर्षी नवीन पुस्तक प्राप्त होतात. म्हणून अश्या शाळेत सहज शक्य आहे. असे वाटते. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी संख्या चाळीसच्या वर असते त्याठिकाणी अन्य उपाययोजना करावी लागते. 

दोन मुलांमध्ये एक पुस्तक - शाळेत शिकतांना अनेक मुले एकमेकांचे मित्र बनतात. मैत्रीच्या नात्यातून ते अनेक गोष्टी शेअर देखील करतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन दोन मित्रांना अर्धे अर्धे पुस्तक घेऊन येण्यास सांगितले आणि दोघांना एकत्र एकाच बेंच वर बसण्याची सुविधा निर्माण केल्यास दप्तरांचे ओझे नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल. असा प्रयत्न नांदेड जिल्ह्यात गत वर्षात झाल्याचे वाचण्यात आले होते. शासनाने कायदा केला म्हणून आपण हे पाऊल उचलावे अशातला भाग नाही. मात्र आपल्या लेकरांना एवढ्या लहान वयात त्यांच्या खांद्यावर एवढं ओझं म्हणजे त्याचं विकास आहे की भकास हेच कळत नाही. कॉलेजात जाणारी पोरं एकच वही फिरवीत जातात आणि इथे पहिल्या वर्गात जाणारा विदयार्थी 5 किलो वजनाचे दप्तर घेऊन जातो. किती विसंगती दिसून येते. शाळेत येणारी मुले हसत यावीत आणि हसत जावीत असे वाटत असेल तर काही बदल करणे आणि नवोपक्रम राबविणे आवश्यक आहे असे वाटते. 

गृहपाठ - गृहपाठच्या कामात तर मुले कारकून व्हायचे तेवढे बाकी राहते की काय असे वाटते. एवढं स्वाध्याय किंवा गृहपाठ एकदाच दिल्या जातो. बहुतांश वेळा सर्वच शिक्षकांचे गृहापाठच्या वह्या एकाच दिवशी बोलाविले जाते. त्यामुळे मुलांच्या दप्तरांचे वजन पुस्तक आणि वह्या यामुळे आणखी वाढते. त्यामुळे गृहपाठच्या बाबतीत एखादे उपक्रम राबविले तर मुलांचा त्रास कमी होऊ शकतो. वारनिहाय विषय ठरवून त्या त्या विषयाच्या गृहपाठच्या वह्या त्याचदिवशी सोबत नेल्यास दप्तरांमध्ये अन्य वह्या दिसणार नाहीत. त्या दिवशी एकच शिक्षक त्या वर्गावर वही तपासण्याचे काम करतील. सुटसुटीतपणा आणि व्यवस्थितपणे हे कार्य चालल्यास त्याचा आनंद मुलांना तर होईलच शिवाय शिक्षकांना देखील या बाबीचा आनंद मिळणार ते वेगळं. 
म्हणून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकानी याविषयी गांभीर्याने, विद्यार्थी हित लक्षात घेऊन एक चांगला निर्णय घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी देखील पूर्ण करावे. 

दप्तरमुक्त शाळा - दप्तर शिवाय शाळेत जाणे ही कल्पनाच मुलांना लई भारी वाटते. यात मुख्याध्यापकांचे नियोजन आणि शिक्षकांचे सहकार्य मिळाल्यास दप्तरमुक्त शाळा मुलांचे एक आकर्षण बनू शकते. त्यासाठी सहसा शनिवारचा दिवस निवडावा कारण या दिवशी सहसा प्रत्येक शाळेला दुपारची सुट्टी असते. म्हणून या दिवशी सुमारे तीन साडेतीन तास मुलांना शाळेत खिळवून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम तयार असावे लागतात. दप्तर सोबत नाही म्हणजे पुस्तक नाही. मग या दिवशी काय करावे ? असा प्रश्न पडतो. मुलांना खेळ फार आवडतात. म्हणून या दिवशी विविध मैदानी खेळांची माहिती मुलांना देता येईल. तसे तर रोज खेळाचा तास असतो मात्र खरंच प्रत्येकजण या तासिकेत मुलांसोबत असतात काय ? तर त्याचे उत्तर नाही असे येते. मुलांना चित्रपट पाहायला आवडते. एखाद्या शनिवारी बाल चित्रपट पाहण्याचे नियोजन केल्यास याबाबीची देखील अनुभूती मिळेल. मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन करून घेणे देखील जमू शकते. निसर्गाची ओळख व्हावी आणि मुलांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी एक शनिवार निसर्ग सहलीचे आयोजन. या पध्दतीने महिन्यातील प्रत्येक शनिवार दप्तरमुक्त शाळा घेऊन त्याचे नियोजन आणि आयोजन शिक्षकांसह पालकांना काळविल्यास या शनिवारची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतील. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत इतर ज्ञान देखील मिळत राहिले तर मुले आनंदाने शाळेत टिकून राहतील. मुलांना शाळा हे तुरुंग आहे असे वाटायला नको याची काळजी शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांनी घेणे आवश्यक आहे. 
शेतात सरकी लावल्याबरोबर कापूस वेचायला मिळत नाही. त्यासाठी खूप कष्ट आणि परिश्रम करावा लागतो. अशीच काही तंत्र या शिक्षणाच्या बाबतीत घडते. म्हणून मुख्याध्यापक या नात्याने शाळेतील प्रत्येक मुलांच्या दप्तरांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमच्या नियोजनाच्या द्वारे करावा, अशी एक पालक म्हणून आग्रहाची नम्र विनंती. 

आपला विश्वासू

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...