Friday 3 June 2016

जागतिक पर्यावरण दिन - 05 जून लेख
पर्यावरण आणि मानवी जीवन

पृथ्वीवर सर्वात बुद्धीमान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून वा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळे आज ''पर्यावरण वाचवा' यासारखे वाक्ये कानी पडत आहेत. 

जगातील लोकांच्या मनात पर्यावरणविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी. पर्यावरणाचा र्‍हास थांबावा या उद्देशाने दि.५ जून हा दिवस जगात ''पर्यावरण दिन'' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाविषयी खुप काही जागृती केल्यावर सुद्धा मानवाच्या वर्तनात किंचीतसुद्धा परिवर्तन झाले नाही, बदल झाला नाही. ही फारच काळजी करण्यासारखी आणि भविष्यात चिंतेची बाब आहे. जगप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रास पर्यावरण बद्दल म्हणतात की, 'मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्यशक्ती म्हणजे पर्यावरण होय.' वनस्पतीपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांच्याच जीवनावर या पर्यावरणाचा प्रभाव आढळून येतो. पर्यावरणाशी जो योग्य प्रकारे समन्वय साधतो तोच या पर्यावरणात जिवंत राहू शकतो. मानवी जीवन सुद्धा याला अपवाद नाही. पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत सोयीसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, बेदरकारी, अडाणी, बेफिकीर, निर्धास्त आणि अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा र्‍हास केल्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन प्राणीमात्रास धोका उत्पन्न होत आहे. मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल, हवा, ध्वनी, भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दुषितीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. ओझोन वायूचा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थेचा असमतोल, प्राणी व पक्षी यांचे नामशेष, नागरीकरण, वाळवंटीकरण इत्यादी समस्येसोबत वातावरणात आकस्मिक बदल हे नित्याचेच झाले. त्यामुळे रोज नवे संकट आपणांसमोर तोंड वासून उभे होत आहे. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकांनी सावधरित्या पाऊल उचलणे गरजेचे आहे. 
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुंटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेऊन वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हे ही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा र्‍हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुंटुंबातील संख्या वाढ लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमिन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुंटुंब नियोजन सारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घा तल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती शक्य नाही व आपला देश महासत्ता होणार नाही.

पर्यावरणातून आपणांस हवा, पाणी आणि नैसर्गिक समृद्धी मिळते ज्याद्वारे आपण चांगले जीवन व्यतीत करू शकातो. अन्नाशिवाय मनुष्य एखादा दिवस जगू शकतो परंतु पाण्यावाचून तो जगू शकत नाही. मात्र मानवाने पाण्याचा उपसा करीत त्याचा गैरवापर केल्यामुळे आज देशात पाण्याची समस्या खुपच गंभीर बनत चालले आहे. देशातल्या एका भागात पाण्याने लोकं मरतात तर दुसर्‍या भागात पाण्यावाचून लोक तडफडून मरतात. काही लोक पाण्याचा पैसा करतात तर काही लोक पाण्यासाठी पैसे मोजतात. तीस एक वर्षापुर्वी जर असे म्हटले गेले की, लोक पाणी विकून पैसा करतात. या वक्तव्यावर ते लोक हसत होते आणि पाणी कोण विकत घेणार? असा सवाल करीत. पंरतू आज तेच लोक पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत. खरोखरच पाण्याच्या या व्यवहाराने पर्यावरणाचा पूर्णत: समतोलपणा बिघडविला आहे. या बाबीकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याची बचत व त्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय प्रत्येकांनी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे उपक्रमाची प्रत्येकांना जाणीव करून देणे व ज्या ठिकाणी सदरील उपक्रम यशस्वी झाले आहे अशा राळेगण सिद्धी किंवा हिवरे बाजार याठिकाणी भेटीचे प्रत्येकांनी करावे.

आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य पसरणातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायक्साईड म्हणजे खराब हवा वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होतांना जंगल वाचविण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ''चिपको आंदोलन'' चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. वृक्षांचे महत्व अपरंपार आहे, हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ''वृक्षवल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.'' खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे कां? वृक्षांच्या महत्वाविषयी आपले पुर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे. 
जंगलतोड वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे जंगलात वास्तव करून राहणारे पशू - पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांनी फक्त झू पार्क मध्येच एखादा प्राणी - पक्षी बघायला मिळेल की काय अशी शंका मनात येते. पूर्वी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिव - किलबिल आवाजाने जाग यायची. आजही त्याच आवाजाने जाग येते. मात्र आजचा आवाज नैसर्गिक नसून ती मोबाईलची रिंगटोन असते. मोबाईलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्याजवळ असल्यासारखा भास होत आहे आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेले आहे. त्यास्तव निदान वनाचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पशू-पक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशू-पक्ष्यांचे जीवनसुध्दा महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एक तृतियांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्याच्या स्वार्थासाठी शेतकरी आपल्या शेतीची जुनी पध्दत बंद केली असून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर करीत आहेत. त्यामूळे दिवसेंदिवस जमिनीचा कस तर नष्ट होतच आहे. शिवाय त्या रासायनिक घटकांचा प्रतिकूल परिणाम मानवाच्या आरोग्यावर होऊन हानी पोहोचत आहे. डीडीटी या किटकनाशक औषधाचा अति वापर केल्यामुळे किटकनाशक मानवाच्या शरीरात कशी पोहोचली जातात आणि ते पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सने सन 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडले होते. उत्पादन कमी निघाले तरी चालेल परंतु रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रीय खताचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सर्वच शेतकऱ्यांनी आपली संघटन तयार करून सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे ठरविले तरच सर्वांना त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यावे. 
नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अश्या सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्वरूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनाच्या मदतीने वापर करता येऊ शकते आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरण यांचा जनतेनी जास्तीत जास्त वापर कसे करू शकतील ? यांविषयी शासनाने महत्वाचे फायदेशीर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती जि. नांदेड
  ९४२३६२५७६९





No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...