Monday 7 March 2016

जागतिक महिला दिन विशेष 



* मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण *

शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत सध्या समाजात, मि‍डियामध्‍ये जोरदार चर्चा चालू आहे. खरोखरच शनि मंदिराच्‍या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्‍यांचे सारेच प्रश्‍न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजा सहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्‍या जाते. त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडल्‍या जात नाही त्‍यांमूळे त्‍यांच्‍या वरील अन्‍याय काही केल्‍या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्‍ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्‍याय महिलांनीच सक्षमरित्‍या सामना करून सोडविले पाहिजे, त्‍याशिवाय महिलांची प्रगती अशक्‍य आहे आणि ही शक्‍ती महिलांमध्ये फक्‍त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्‍त्रोत आहे. शिक्षण घेतल्‍यामुळे आपल्‍या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते.  यांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणून आपण महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि त्‍यांची पत्‍नी सावित्राबाई फुले यांच्‍या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्‍नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्‍वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्‍नी सावित्रीबाईला साक्षर  करण्‍याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्‍यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्‍या घरात शिक्षण दिले. त्‍याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्‍याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्‍याच्‍या क्षेत्रात त्‍यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्‍मा फुले यांना शिक्षणाचे महत्‍व कळाले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सन १८४८ मध्‍ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्‍त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्‍यांची धारणा होती त्‍यातूनच मग त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीला शिकवले. असे महत्‍व प्रत्‍येक पालकांना,  नव-यांना म्‍हणजेच  पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे  म्‍हणण्‍यापेक्षा मुलांच्‍या व मुलींच्‍या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची  भावना  अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्‍या गुलामीगिरीच्‍या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्‍छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्‍ट. भारत स्‍वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्‍या होती. त्‍यातल्‍या त्‍यात महिलांची निरक्षरता तर देशाच्‍या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्‍यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्‍या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्‍या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्‍या बाबतीत भारताची प्रगती उल्‍लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार  नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्‍या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.  शासनाने मुलींच्‍या  शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्‍हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्‍ता,  सावित्रीबाई फुले दत्‍तक पालक योजना, मोफत  गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने  मोफत  प्रवास  करण्‍यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्‍या अनेक योजनाच्‍या माध्‍यमातून मुलींच्‍या शिक्षणासाठी शासन  प्रयत्‍न करीत होते आणि करीत आहे. त्‍यांना त्‍यात काही अंशी यश  मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्‍यांची अनेक कारणे आहेत. त्‍या कारणाचा  विचार करून त्‍यावर उपाय योजना  करणे आवश्‍यक  आहे.
* पालकांची शिक्षणाबात अनास्‍था -
मुलींच्‍या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील  पालकामध्‍ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी  भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्‍वत: शिक्षणाच्‍या  बाबतीत अनभिज्ञ असतात,  त्‍यामुळे त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व पटत नाही. बरं  शिक्षणाचे महत्‍व पटत नाही असे जर म्‍हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्‍या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू  देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्‍या वर्गापर्यंत शाळा त्‍याच  वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्‍याची मुभा  दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्‍या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्‍याठिकाणी जाण्‍यासाठी मुलींना परवानगी दिली  जात नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे आज प्राथमिक  वर्गातील मुलींची  संख्‍या माध्‍यमिक वर्गात गेल्‍यावर ५० % पेक्षा कमी  होते ही गळती मुलीच्‍या विकासास नक्‍कीच बाधक ठरत आहे.
* अनिष्‍ठ रूढी व परंपरा -
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्‍ठ रुढी व परंपरेच्‍या खोल गर्तेतुन बाहेर येण्‍यास तयार नाहीत. मुलींच्‍या शिक्षणा विषयी त्‍यांच्‍या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्‍यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्‍या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्‍न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे  पुढील शिक्षण बंद करण्‍यात आल्‍याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्‍या साठी एखादे चांगले स्‍थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून मुलीं विषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्‍पष्‍टपणे दिसून येते. सध्‍या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्‍या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्‍या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्‍याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्‍हणजे हुंडा. यामुळेसुध्‍दा मुलींच्‍या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्‍या मुलींना खुप शिकविले, तिच्‍या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्‍या लग्‍नाच्‍या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्‍या शिक्षणास घातक ठरत आहे. त्‍यामुळे अश्‍या अनिष्‍ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्‍यावश्‍यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्‍हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्‍या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्व सामान्‍य विचार पालक करतोच, यात त्‍याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्‍वत:च्‍या बुध्‍दीमत्‍तेच्‍या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान या सर्वच गोष्‍टी वाढीस लागतात. महिलांच्‍या हातात स्‍वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्‍याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्‍वाभिमानाने जीवन जगता येते. स्‍वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्‍ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्‍याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्‍यात यश सुध्‍दा मिळवू शकतात. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण अत्‍यंत महत्‍चाचे आहे.
* हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण -
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत. ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्‍या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार  समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्‍हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्‍तव नाकारून चालणार नाही. देशाच्‍या राजकारणात आणि इतर महत्‍चाच्‍या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्‍यांच्‍यात धाडस, साहस, प्रगती व्‍हावी यासाठी सरकारने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्‍यांनी निवडणूक जिंकून सत्‍ता व पद मिळविले आहेत. त्‍या पदावर खरोखरच महिलाच राज्‍य करीत आहेत काय ? याचे वास्‍तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्‍याचे सभापती, शहराचे नगराध्‍यक्ष किवा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे.  त्‍यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्‍या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्‍हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्‍या नसल्‍यामूळे ते आपल्‍या पतीच्‍या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्‍या हेतूने किंवा उदेश्‍याने नियमावली तयार केली त्‍याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो.  आपणाला आपले हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्‍या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्‍या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल.
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्‍या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्‍याची गरज घरातील मुलीं कडून पूर्ण केल्‍या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्‍यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलीं विषयी वेगळाच. एवढं असून सुध्‍दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्‍यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्‍त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्‍यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्‍या दहा मध्‍ये सर्व श्रेष्‍ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्‍ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतिल परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? या बाबत प्रश्‍न चिन्‍हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्‍न करतो. ही प्रथा कुठे तरी बंद व्‍हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्‍या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्‍यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्‍वत:बद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्‍या सुरक्षित आयुष्‍यासाठी तिला वयाच्‍या आठराव्‍या वर्षा पर्यंत शिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्‍यक आहे. पराया धन किेंवा परक्‍या घरची सून म्‍हणून जाणारी, आपल्‍या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्‍या गोष्‍टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्‍या विरूध्‍द आवाज उठविण्‍यासाठी  मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण म्‍हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक व स्तंभलेखक
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...