Thursday, 18 December 2025

चला, मतदान करू या..! ( Vote For Nation )

         चला, मतदान करू या

भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही ही शासनपद्धती जनतेच्या इच्छेवर आधारलेली असते. लोकशाहीत जनतेला आपल्या प्रतिनिधींची निवड करण्याचा अधिकार असतो आणि हा अधिकार वापरण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मतदान. “चला, मतदान करू या” हा केवळ घोषवाक्य नसून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन आहे. मतदानामुळे प्रत्येक नागरिकाला देशाच्या कारभारात सहभागी होता येते.
“राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असणे अत्यंत आवश्यक आहे.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. यातून हे स्पष्ट केले की मतदान हा केवळ अधिकार नसून समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्याचे साधन आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मताधिकार देण्यासाठी कठोर संघर्ष केला. त्यांच्यामते, मतदानाद्वारेच दुर्बल आणि वंचित घटक आपला आवाज सत्तेपर्यंत पोहोचवू शकतात.
मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तसाच तो एक महत्त्वाचा कर्तव्यही आहे. आपल्या घटनेने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून आपण देशाच्या विकासासाठी योग्य, प्रामाणिक आणि सक्षम प्रतिनिधी निवडू शकतो. जर आपण मतदान केले नाही, तर चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मतदान न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे चुकीला प्रोत्साहन देणे होय.
“खरा लोकशाहीचा अर्थ असा की जनतेची सेवा करणारे प्रतिनिधी निवडले जातील.” असे महात्मा गांधींजी यांनी म्हटले आहे. मतदान करताना प्रामाणिक, सेवाभावी आणि नैतिक उमेदवाराची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे केवळ अधिकार न राहता नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांचे मत होते.
आज अनेक लोक “माझ्या एका मताने काय फरक पडणार ?” असे म्हणून मतदान टाळतात. परंतु हे विचार चुकीचे आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताला समान मूल्य असते. अनेक वेळा निवडणुकांचे निकाल अत्यंत कमी मतांच्या फरकाने लागतात. अशा वेळी एका मताचेही महत्त्व प्रचंड असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मताची ताकद ओळखली पाहिजे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू म्हणतात की,  “लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून ती जीवनपद्धती आहे.” पंडीत नेहरूंनी मतदानाला लोकशाही जीवनाचा अविभाज्य भाग मानले. त्यांच्या मते, नागरिकांनी जागरूक राहून मतदान केल्यासच लोकशाही मजबूत होते.
मतदानामुळे समाजात जागरूकता निर्माण होते. निवडणुकांच्या काळात विविध प्रश्नांवर चर्चा होते, जसे की, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरण संरक्षण इत्यादी. मतदार जेव्हा जागरूक होतो, तेव्हा तो केवळ उमेदवार नव्हे तर धोरणे, विचारधारा आणि कामगिरी पाहून मतदान करतो. अशा सुजाण मतदानातूनच चांगले नेतृत्व पुढे येते. 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते, देश घडवण्यासाठी नागरिकांनी निष्क्रिय न राहता मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. तरुण पिढीची भूमिका मतदानात अत्यंत महत्त्वाची आहे. तरुणांमध्ये ऊर्जा, नवे विचार आणि बदल घडवण्याची क्षमता असते. जर तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले, तर देशाच्या राजकारणात सकारात्मक बदल घडू शकतात. सोशल मीडियावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे अधिक परिणामकारक ठरते.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयता राखली जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदान सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. त्यामुळे मतदान करणे आता अधिक सुलभ झाले असून कोणतेही कारण देऊन मतदान टाळणे योग्य नाही. सरकारी कर्मचारी आणि कामगार मंडळीना मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जाते. त्या सुट्टीचा सदुपयोग करावे. सुट्टी मिळाली म्हणून मतदान न करता कुठे ही अन्य ठिकाणी फिरण्यास जाऊ नये. आपले कर्तव्य पूर्ण करावे. 
शेवटी असे म्हणता येईल की, मतदान हे लोकशाहीचे प्राण आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. चला तर मग, उदासीनता बाजूला ठेवूया, जागरूक नागरिक बनूया आणि अभिमानाने म्हणूया, चला, मतदान करू या !

नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769

2 comments:

सवय (Habit)

  सवय जीवन घडवणारा अदृश्य घटक मानवाचे आयुष्य आकार घेते ते त्याच्या विचारांमधून आणि कृतीमधून; आणि या दोन्हींच्या मागे असतो तो एक ...