Friday 22 March 2024

पुस्तक परीक्षण - सुश्री द्रौपदी मुर्मु ( Susri Droupadi Murmu )

आदिवासींची नायिका : सुश्री द्रौपदी मुर्मु

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. भारतातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती. अश्या या पदावर आजपर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती या देशाने पाहिले आणि अनुभवले. पंधरावे राष्ट्रपती म्हणून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी जुलै 2023 मध्ये शपथ घेतल्या. ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याश्या गावात आदिवासी जमातीत जन्मलेल्या सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतांना प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटत होता. सोशल मीडियात चर्चेत नसलेले, प्रसिद्धी ज्योतात नसलेले, शांत व्यक्तिमत्त्व अचानक लोकांच्या समोर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाने केले. तेव्हा सुश्री द्रौपदी मुर्मु कोण आहेत ? त्यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे शिक्षण कुठपर्यंत झाले ? त्यांचे जीवन कसे आहे ? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणार यात शंकाच नाही. सामान्य नागरिकांच्या याच प्रश्नांना उत्तर मिळावे आणि भारताचे पहिले आदिवासी नायिका महिला राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांची माहिती सर्वांना व्हावी या निर्मळ हेतूने लेखक विनोद पंचभाई यांनी सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे चरित्र पुस्तक वाचकांसमक्ष ठेवले आहे.
 मराठी साहित्य क्षेत्रात विनोद पंचभाई यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या लेखनशैलीमुळे. समाजातील सर्वच स्तरावरील वाचकांसाठी ते लिहितात. चरित्र लेखन आणि रहस्यमय कथा लिहिण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. हॉटेल हवेली ही त्यांची रहस्यमय कादंबरी खूप गाजलेली आहे. त्याचसोबत त्यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. भारताचे आजपर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यावर देखील त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. विनोद पंचभाई हे अभ्यासपूर्ण लेखन करतात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकांचे वाचन, खूप भटकंती आणि टिप्पणी लिहून ठेवावे लागतात. त्यांच्या पुस्तकावरून त्यांनी केलेले अभ्यास, चिंतन आणि मनन हे सारं लक्षात येते.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी सोशल मीडियात कुठेच काही माहिती उपलब्ध नव्हती. कारण त्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत होत्या. त्यांचा स्वभाव म्हणजे नेकी कर दर्या में डाल. कधी त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असे वाटले नाही की त्यांनी आपल्या कामाचा गवगवा केला नाही. अगदी शांत चित्ताने, मन लावून आणि पक्षप्रमुखाने दिलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत राहिल्या. सन 1999 मध्ये पहिल्यांदा ते राजकारणात उतरल्या आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय सेवेला प्रारंभ केल्या आणि अवघ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्वोच्च अश्या पदावर विराजमान झाल्या. अर्थातच हे सहजासहजी घडले असे नाही किंवा कोणती जादू देखील झाली नाही. तर यामागे सुश्री द्रौपदी मुर्मु यांची पक्षश्रेष्ठीशी असलेली निष्ठा, जनतेसोबत असलेले प्रेमपूर्वक संबंध आणि समाजातील तळागाळातील आपल्या जमातीच्या आदिवासी लोकांच्या समस्येची जाण ठेवून त्यांनी केलेले निस्वार्थ काम या साऱ्याचे एकत्रित फळ म्हणजे राष्ट्रपती पद होय. लेखकांनी याविषयी आपल्या पुस्तकात संदर्भासहित सुंदर अशी माहिती दिलेली आहे. ते वाचतांना सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या अजून महान ठरतात.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी बोलतांना म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला ज्ञान मिळते, ज्ञानामुळे माणूस विचार करू लागतो आणि त्याला जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून थांबले नाही तर तळागाळातील गरीब लोकांच्या मुलां-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मते घरातील एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो आणि घरातील एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला ती शिकविते. समाजातील मुलींना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अगोदर शिकविले आणि इतरांना शिकविण्यासाठी तयार केले. याचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी आपले कार्य केले. त्यांच्या गावात फक्त सातव्या वर्गापर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा होती. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडणे गरजेचे होते. घरची परिस्थिती आणि सामाजिक स्थिती या दोन्ही संकटाशी दोन हात करून त्यांनी गाव सोडून आपले शिक्षण पूर्ण केले. त्या गावातून शिक्षण घेणारी सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या पहिल्या होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, त्यामुळे त्यांनी संघर्ष केला पण शिक्षण सोडले नाही. आपण जसे शिकलो तसे समाजातील इतर मुली देखील शिकल्या पाहिजे यासाठी त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकविण्याचे कार्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांना देखील आले पण त्यांनी समाजासाठी व देशासाठी उंबरठा ओलांडून शिकविण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले धाडसी पाऊल होते जे की, राष्ट्रपती होण्यासाठी कारणीभूत ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात सुख आणि दुःखांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. सुख मिळाले म्हणून हरखून जाऊ नये आणि दुःख मिळाले म्हणून स्वतःला संपवून टाकू नये. प्रत्येक गोष्टीचा सामना करीत, त्या प्रसंगाशी दोन करीत जीवन जगण्यात खरा आनंद आहे, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. सुश्री द्रौपदी मुर्मु या आज राष्ट्रपती पदावर दिसत आहेत, ही खरोखरच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या संकटाला तोंड दिले आणि कोणते दुःख पचविले ? त्यांना संकट काळात कोणी धीर दिला ? हे जर एकदा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर ते किती महान आहेत ? याची प्रचिती येते. शालेय शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना खूप कष्ट सोसावे लागले, लग्न झाल्यानंतर ही त्यांनी निस्वार्थपणे एक ही रुपया पगार न घेता शिकविण्याचे काम केले. ऐन उमेदीच्या काळात, घरात सुख आणि आनंद नुकतेच प्रविष्ठ झालेले असताना पाच वर्षात चार मोठे धक्के त्यांना बसले. पहिल्यांदा मोठ्या मुलांचा मृत्यू, नंतर लहान मुलांचा मृत्यू त्यानंतर पती देखील सोडून गेले. याच दुःखाच्या काळात लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जवळजवळ सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या ढासळल्या होत्या. पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांना सावरले, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी आध्यात्मिकची जोड देऊन त्यांना ध्यानधारणा करण्यास प्रवृत्त केले. असे म्हणतात की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या सर्व गोष्टीचा अनुभव सुश्री द्रौपदी मुर्मु यांना अनुभवावे लागले.
लेखक विनोद पंचभाई यांनी अति परिश्रम घेऊन, अनेक संदर्भ पुस्तक वाचून, सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या संपर्कात व सहवासात आलेल्या लोकांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या जन्मगावी उपरबेडा येथे भेट देऊन हे अप्रतिम असे पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. रमेश भारताल यांनी सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे सुंदर चित्र पुस्तकावर रेखाटले आहे. पुणे येथील दुर्वा एजन्सीजने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत फक्त 250 रु. आहे. भारतातील आजपर्यंतचे राष्ट्रपती कोण कोण होते आणि त्यांचा स्वभाव कसा होता ? सुश्री द्रौपदी मुर्मु यांची निवड कशी झाली ? इतर सर्व राष्ट्रपतीपेक्षा सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे जीवन कसे वेगळे आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने विशेष करून महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते. त्यासाठी आपण लेखक विनोद पंचभाई यांच्या 9923797725 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुस्तकाची प्रत मागवून घ्यावे. भविष्यात लेखकांच्या हातून असेच अप्रतिम पुस्तक वाचकांस वाचण्यास मिळत राहो ही सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769.

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...