आईची महती सांगणारा मातृवेद कथासंग्रह
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी लिखित मातृवेद हे दुसरे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. यापूर्वी 2017 मध्ये याच ई साहित्य प्रतिष्ठानने त्यांचा जननी हा कथासंग्रह प्रकाशित केला असून ऑनलाईन वर अनेक वाचकांनी यास पसंती दर्शविलेली आहे. लेखिका ह्या मूळच्या मुंबई येथील रहिवाशी असून त्यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना पुल देशपांडे, व. पू. काळे, विजया वाड, विजया राजाध्यक्ष, जयवंत दळवी, विजय तेंडूलकर, इंद्रायणी सावकार यांच्या लेखणीत खास रुची आहे. मनातल्या मनात गोष्टी गुंफत राहणे ही लेखिकेची खासियत कथा लिहिण्यास नेहमी प्रेरित करत असते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते नियमित लेखन करत आहेत. त्यांच्या कथा विविध मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. मातृत्व या विषयावर ते सभोवती सूक्ष्म नजरेतून पाहतात आणि तेथेच त्यांना कथेचे बीज सापडत राहते. आई या दोन अक्षरी शब्दांत काय ताकद आहे ? हे यांच्या कथा वाचतांना वारंवार लक्षात येत राहते. आपल्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस बाळाचे संगोपन करणारी आई आणि तिचे मन या विषयी प्रत्येक कथेत एक ओलावा दिसून येतो. आई म्हणजे काय असते ? हे आई झाल्याशिवाय कळणार नाही ही गोष्ट देखील नकळतपणे जाणवते. हिंदू संस्कृतीत चार वेद सांगितले आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. पण लेखिकेने पाचवा अत्यंत महत्वाचा वेद सांगितला आहे, तो म्हणजे मातृवेद. खरोखरच संतांनी म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. राजमाता जिजाऊ नसत्या तर महाराष्ट्राला राजे छत्रपती शिवाजी महाराजासारखा लढवय्या शूर वीर मिळाला नसता. यशोदा राहिली नसती तर हळव्या मनाचे श्याम म्हणजे साने गुरुजी आपणाला लाभले नसते, आशियाम्मा नसती तर भारताची जगात ज्यांनी क्षेपणास्त्रात विशेष ओळख करून दिली असे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सारखे शास्त्रज्ञ मिळाले नसते. हे सारं त्या आईच्या प्रेमामुळे, संस्कारामुळे शक्य झाले हे विसरून चालणार नाही.
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांचे मातृवेद हा कथासंग्रह खूपच छान आहे. यात चार कथा लिहिल्या आहेत आणि चार ही कथेत आईच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या पहिल्याच व्यर्थ या कथेत एका गुन्हेगार असलेल्या आपल्या मुलाच्या प्रति आईचे असलेले प्रेम सांगणारी कथा आहे. मुलगा चांगला असो वा वाईट, सुंदर असो कुरूप ते आपल्या आईसाठी चांगलेच वाटते. त्याच वेळी गुंड मुलाचा पाठलाग करताना पोलिसांच्या घरातील वातावरण वाचकांचे मन हेलावून टाकते. तुझ्यासाठी या दुसऱ्या कथेत दत्तक घेतलेली मुलगी आपल्या घराला कशी सावरते. त्याच वेळी दत्तक घेणारे आई-वडील खरेखुरे आई-बाबा बनणार असतात त्यावेळी त्यांच्या मनात विशेष करून आईच्या मनात काय चाललंय हे खूप छान मांडले आहे. शेवटी ती दत्तकपुत्र मुलगी आपल्या घरासाठी काय काय महत्वाचे काम करते ते कथा वाचल्यावरच कळेल.
कशासाठी एवढा आटापिटा ? या तिसऱ्या कथेत लेखिकेने घटस्फोट झालेल्या कुटुंबात मुलाची आणि आईची घालमेल खूप सुंदररित्या गुंफले आहे. त्याचवेळी आजी असलेली मुलाची आई, शेवटी ती देखील एक आईच आहे, म्हणून ती लेकराची व आईची गाठभेट व्हावी म्हणून काय काय करते ? हे सर्व वाचनीय आहे. वंश परंपरागत ठेवा ह्या शेवटच्या कथेत लेखिकेने स्त्री मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. घरात स्त्रीवर होणारे अत्याचार ती कशी गुमान सोसते हे या कथेतून स्पष्ट केले आहे. स्वतः स्वातंत्र्य सैनिकांची शूर मुलगी असून देखील नवऱ्याच्या अत्याचाराला विरोध करत नाही हे तिच्या मुलीला आश्चर्य वाटते पण शेवटी तीच आई त्या मुलीला बंड करण्यासाठी ताकद ही देते.
पुस्तक वाचतांना वाचतच राहावे असे वाटते. प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी काय काय करते किंवा डोक्यावर कोणते संकट घेते प्रसंगी आपल्याच नवऱ्यावर गोळ्या झाडते, खरंच खूप छान पुस्तक आहे. लेखिका स्वतः एक आई असल्याने त्यांनी आईची भूमिका सक्षमपणे मांडले आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण जगातील मराठी वाचकांसाठी ऑनलाईनवर अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. तेव्हा कथा वाचकांनी या कथासंग्रह वाचनाचा जरूर आनंद घ्यावा. लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा .....!
पुस्तक परिचय -
- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment