Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - लाल दिनांक ( Lal Dinank )

मुलांचा आवडता लाल दिनांक कथासंग्रह
राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंगोली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश सु. शेवाळकर. शालेय जीवनासोबत आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी व्यतीत केले आहे म्हणूनच त्यांच्या हातून एकापेक्षा एक सरस अश्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. आजपर्यंत त्यांची 30 हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून बारा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून दरवर्षी पन्नासहुन अधिक दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित होते. म्हणूनच डॉ. सुनील पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक लेखक पुरस्कार या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहा सर्वोत्कृष्ट लेखकामध्ये नागेश सु. शेवाळकर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आणि प्रत्येक शाळेत पोहोचविले आहे. साठी बुद्धी नाठी असे म्हणतात परंतु लेखकांनी साठी पार केल्यानंतर ही त्यांची लिहिण्याची उर्मी आणि धमक अजूनही कायम आहे. आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग, चढ-उतार या सर्व अनुभवाच्या बळावर ते आपले साहित्य लेखन करतात म्हणून तर वाचकांच्या गळी सहज उतरते. अवघड आणि क्लिष्ट वाटणारे शब्द शक्यतो टाळून सहज सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचे साहित्य मनापासून आवडतात. किशोरवयीन मुलांची वाचनाची भूक भागवावी या उद्देशाने पुण्यातील सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशनने ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी नागेश शेवाळकर लिखित " लाल दिनांक " नावाचे बालकथासंग्रह प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून घरोघरी भिंतीवर टांगलेले जे कॅलेंडर असते तेच कॅलेंडर घेण्यात आले आणि त्यातील लाला दिनांक म्हणजे सुट्टीचा वार रविवार तसेच इतर सुट्या देखील लाल रंगाने दर्शविले जातात. ते ठळकपणे लक्षात येते. शाळेत जाणाऱ्या मुलांना कॅलेंडरवरील लाल दिनांक खूप आवडतात कारण त्यादिवशी शाळेला सुट्टी असते. तसे तर लाल रंग म्हणजे धोक्याची खूण आहे मात्र कॅलेंडरवरील लाल रंग मुलांना खूप आनंद देतो. महिन्याचा कागद उलटला की, पहिले लक्ष या महिन्यात किती लाल दिनांक आहेत यावरच जाते. याच मुलांच्या भावनेला हेरून लेखकांनी लाल दिनांक पुस्तकाचे शीर्षक असणारी कथा खूप छान पद्धतीने लिहिली आहे. युवराज सारखे शाळेत जाणारे अनेक मुलं याच पद्धतीने वागतात. कॅलेंडर जरी आपण छापत असू तरी त्यातील सुट्याचे लाल दिनांक छापण्याचे अधिकार आपणांस नसतात याची जाणीव या कथेतून करण्यात लेखक यशस्वी ठरतात. या बालकथासंग्रहात एकूण पंधरा कथा आहेत. सर्वच कथा मुलांना त्यांच्या भावविश्वात नेऊन नकळत काही ना काही शिकवण देऊन जातात. पहिली कथा वाचायला घेतली की सर्व कथा वाचन करेपर्यंत वाचक पुस्तक सोडत नाही असे कथानक या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांची अचूक नाडी ओळखण्यात लेखक वाकबगार आहेत म्हणून आई, बाबा, आजी, आजोबा, शाळा, घर, खेळ, वाढदिवस या सर्व बाबी आणि जीवनात घडणाऱ्या अनेक बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून त्याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या कथा या संग्रहात लिहिल्या आहेत. 
अमराठी शाळेत मुलांना फक्त बौद्धिक ज्ञान दिल्या जाते पण शरीराने ते फार कमकुवत राहतात कारण त्या शाळेला एक तर मैदान उपलब्ध नसते किंवा त्यांच्याकडे असे देशी खेळांची माहिती नसते. ज्यामुळे या शाळेतील विद्यार्थी खेळाच्या बाबतीत कमनशिबी ठरतात हे प्रत्येक पालकांचे अनुभव आहेत. याच बाबी लक्षात घेऊन आमच्या मिस ..... आजी ही कथा समीर आणि त्याच्या आजीभोवती फिरत असते. जुन्या काळी खेळले जाणारे अनेक खेळ आता लुप्त होत आहेत, त्या सर्व खेळांना उजागर करण्याची आणि मुलांना ते खेळ खेळविण्याची खरी गरज आहे. शालेय जीवनात मुले मैदानावर उड्या नाही मारले तर काय नोकरी लागल्यावर कार्यालयात उड्या मारणार का ? खेळाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. जी मुले लहान असताना खूप खेळतात, उड्या मारतात त्यांना भावी आयुष्यात आरोग्याच्या बाबतीत कमी तक्रारी जाणवतात. शरीर चांगले असेल तर आपल्या सर्व बाबी चांगले घडतात. शरीर निरोगी तर मुलांचा अभ्यास उत्तम असू शकतो हीच शिकवण या कथेतून लेखकांनी अगदी भक्कमपणे मांडली आहे. 
आजीची माया वेगळीच असते. माधवला आजीला त्रास द्यायला आवडते. त्याच्या मनात नेहमी आजीला त्रास देण्याच्या कल्पना रेंगाळत असतात. त्याला त्यात आनंद मिळतो. आजीला त्रास देणे हे चूक आहे याची जाणीव माधवला करून देणे आवश्यक आहे. म्हणून आजीने लढविलेली शक्कल कामी येते आणि माधव आजीला त्रास न देण्याचा वचन देतो. काही गोष्टी मुलांना अनुभवातून शिकवावे लागते. तोंडी कितीवेळा सांगितले तरी नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे वाहे वारे या म्हणीप्रमाणे ते वागत असतात. त्यांच्यात काही बदल किंवा परिवर्तन घडवायचे असेल तर तसा एखादं प्रसंग किंवा अनुभव त्याच्यासोबत घडवावे लागते. आई-बाबा यांच्या प्रेमासोबत मुलांना आजी-आजोबांचे प्रेम देखील मिळायला हवे, जे की आजकाल हम दो हमारे दो या प्लॅट संस्कृतीच्या विचारामध्ये मुलांना ते मिळत नाही, ते मिळाले तर काय होऊ शकते ? ही बाब त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये प्रकर्षाने दिसून येते. 
लहान मुलांना सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचा. वर्षातून एकदा येणारा त्यांचा वाढदिवस त्यांच्या जीवनात आनंद देऊन जातो. वाढदिवसाचा केक, त्यानिमित्ताने जमा होणारी मित्रमंडळी, मित्रांकडून मिळणारे गिप्ट आणि आई-बाबाकडून मिळणारे सरप्राईझ गिप्ट ह्या साऱ्या गोष्टीची उत्सुकता एका वाढदिवसाच्या निमित्ताने असते. पण तोच वाढदिवस एका वर्षाच्या ऐवजी चार वर्षांनी येत असेल तर तेव्हा त्या मुलाच्या मनाची घालमेल काय होते ? वाढदिवस सचिनचा या कथेतून लेखकांनी अनेक गोष्टी साध्य केले आहेत. एक तर मुलांना कथेतून लीप वर्ष म्हणजे काय याची ओळख होते. 29 फेब्रुवारी हा दिवस प्रत्येक वर्षी नसतो तर फक्त चार वर्षांनी एकदा येतो आणि त्यामुळे वर्षाच्या दिवसात एका दिवसाने वाढ होते. ही सारी माहिती मुलांना  नकळत कळून जाते. त्याचसोबत त्याच तारखेला वाढदिवस साजरा करावा असे काही नाही जर रविवारी आपला वाढदिवस असेल तर शाळेत तोच वाढदिवस आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तसा 29 फेब्रुवारीला असलेला सचिनचा वाढदिवस 28 तारखेला साजरा करण्याविषयीची कल्पना खूप छान रंगविण्यात आली. हुशार आई-वडील, आजी-आजोबा आणि कल्पक शिक्षक असतील तर कोणताच मुलगा आणि विद्यार्थी उदास राहणार नाही याची जाणीव सचिनचा वाढदिवस आणि एक वाढदिवस असाही ... या दोन्ही कथेतून प्रकर्षाने जाणवते. 
साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक न वाचणारा वाचक तसा विरळच. श्यामची आई या पुस्तकाने अनेकांवर संस्कार केले तसे लेखकांवर देखील केले आहे. त्यांच्या लेखनात सानेगुरुजीची छटा दिसून येते. श्यामची आई श्यामला पत्रावळ शिवल्याशिवाय जेवायला देत नाही ही गोष्ट कथेतला श्याम त्याला मिळालेल्या बक्षीसरुपी पुस्तकातून वाचतो. तशीच पत्रावळ पाहिजे म्हणून हट्ट करतो मात्र त्याला पानांची पत्रावळ काही मिळत नाही. पण जेव्हा त्याला समजते की झाडाची सजीव पाने तोडून पत्रावळ करावी लागते त्यावेळी तो तशी पत्रावळ करण्याचा हट्ट सोडतो. यातून लेखकांनी पर्यावरणावरील मुलांचे प्रेम दर्शविले आहे. त्याचसोबत कामात सातत्यपणा ठेवल्यास त्याचे चांगलेच परिणाम पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे दिसमाजी काही तरी लिहावे तसे श्यामची आई  श्यामकडून रोज पंधरा ओळी लिहून घेत असत. ज्यामुळे त्याचे अक्षर सुंदर आणि वळणदार झाले होते. त्यामुळे या बक्षिसाचे सारे श्रेय तो आपल्या आईला देतो. प्रत्येक आईला मार्गदर्शन ठरणारी ही कथा आहे. 
लहान मुले अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवतात फक्त त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त जोशी काका आपल्या प्लॅट मधील मुलांना नेहमी प्रोत्साहित करतात ज्यामुळे पैकीच्या पैकी गुण न घेणारी मुले कठीण परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेतात आणि शाबासकी मिळवतात. मुले एकमेकांचे बघत बघत शिकत असतात. संस्कार ही कोणत्या दुकानात विकत घेण्यासारखी वस्तू नाही तर ती कुटुंबातून, परिवारातून आणि समाजातून नकळत प्राप्त होते. तसेच लहानपणी मिळालेले संस्कार चिरकाल टिकून राहतात. म्हणून लहान मुलांवर खास लक्ष देऊन संस्कार टाकावे असा संदेश ते प्रोत्साहन या कथेतून देतात. लेखकांची विनोदबुद्धी ' आठवण एका करामतीची ' या कथेत दिसून येते. दुकानातील गोळ्या आणि दवाखान्यातील औषधाच्या गोळ्या वेगळ्या असतात याची जाणीव मुलांना या कथेच्या माध्यमातून करून देतात. लहानपणी मुलांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबतात ते मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहतात. लहान मुलांना आवडणारी कथेतील परी, प्रत्यक्षात कधीच दिसत नाही. पण मुलांना कथेतील विश्व प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा होते, वाड वडिलांच्या प्रत्येक शब्दांवर, बोलण्यावर त्याचा गाढ विश्वास असतो. म्हणून मुलांच्या कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तर देणे आवश्यक आहे. त्याच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर देऊन त्यांना एकप्रकारे आपण कमकुवत करत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक घटनेमागील खरे कारण सांगून त्यांना सजग करणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असल्याची जाणीव परीकथा मधून करून देतात. आपल्या मुलांवर आई-बाबा हेच चांगले संस्कार टाकू शकतात याची प्रचिती विश्वास जिंकला या कथेत प्रकर्षाने जाणवते. कुणाची परवानगी घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचे नाही ही शिकवण आपल्या मुलांमध्ये आणण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूकपणे वागले पाहिजे. वाचताना सुंदर वाटणारी ही कथा मुलांवर खूप चांगला परिणाम करून जाते. जीवनात आई-वडील यांच्याशिवाय दुसरा कोणी श्रेष्ठ नाही म्हणून त्यांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. मातृदेवो भव आणि पितृ देवो भव याची महती सांगणारी कथा म्हणजे श्रावणबाळ. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात आणि प्रेरणेमुळे अनेक गोष्टी घडतात. लहान मुलांना बक्षीस देतो म्हटलं की अनेक काम ते पटापट करतात. बक्षिसाची किमया या कथेत अमितला त्याची आवडती बॅट बक्षीस म्हणून भेटल्यानंतर शाळेत मारून मुटकून येणारा अमित नियमितपणामध्ये प्रथम क्रमांकाची उपस्थिती राखतो. हे सर्व शक्य झाले ते बक्षीसामुळे. म्हणून नेहमी मुलांना शिव्याशाप, मारझोड करण्यापेक्षा कधी कधी मुलांना बक्षीस देत जावे त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात. शाळेच्या ओळखपत्राचा वापर आपण कसा करावा याची ओळख देणारी कथा म्हणजे ओळखपत्र. जसे मोठी माणसं आपापले कार्ड जवळ बाळगतात तसे शाळेत शिकणाऱ्या मुलांनी शाळेचे ओळखपत्र जवळ बाळगावे आणि त्याचा वापर देखील करावा. असा चांगला संदेश ओळखपत्र या कथेतून ते देतात. लहान मुलांचा सर्वात आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. याच बाप्पाने लहान मुलांना लिहिलेले पत्र म्हणजे मुलांना दाखविलेली एक योग्य दिशाच आहे. पत्राच्या माध्यमातून लेखकांनी मुलांची कान उघाडणी करून त्यांना पुढे कसे वागायचे आहे याची माहिती दिली आहे. शेवटची कथा म्हणजे नातू माझा  भला या कथेतून संकटकाळात मुलांनीगोंधळून न जाता प्रसंगावधान ठेवून काय केले पाहिजे याची माहिती मुलांना मिळते. पाच मिनिटे उशीर झाला असता तर काय झाले असते मी सांगू शकलो नसतो हे डॉक्टरांचे बोलणे ओंकार किती महत्वाचे काम केला याची प्रचिती देऊन जातो. 
आपल्या घरातील किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच पाहिजे अशी आहे. प्रत्येक गोष्ट मुलांच्या मनाला नक्की स्पर्श करतो, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकातून पालकांना देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आई-बाबांनी हे पुस्तक वाचावे आणि आपल्या मुलांना वाचण्यासाठी द्यावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा असे संस्कारक्षम पुस्तक भेट देणे योग्य राहील, असे वाटते. जेष्ठ साहित्यिक नागेश सु. शेवाळकर यांच्या हातून भविष्यात अजून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होऊन आम्हा वाचकांना अजून साहित्य वाचण्यास मिळो हीच मनस्वी सदिच्छा ...!

पुस्तकाचे नाव :- लाल दिनांक
लेखकाचे नाव :- नागेश सु. शेवाळकर
प्रकाशन :- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 120
किंमत :- 150 रु. 

पुस्तक परिचय
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...