Thursday 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 04


पाणी म्हणजे जीवन आहे

मुलांनो, पाण्याचे दुसरे नाव म्हणजे जीवन. पृथ्वीवर पाणी राहिले नसते तर जीवसृष्टी राहिली नसती आणि आपणही राहिलो नसतो. पृथ्वीवरील सर्वच सजीवांना त्यांचा वाढ आणि विकास होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पृथ्वीचा 71 टक्के भाग हा जरी पाण्याने व्यापलेला असला तरी फक्त 3 टक्के एवढेच पाणी फक्त वापरण्यास योग्य आहे. दरवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे आपणावर वारंवार जलसंकटे निर्माण होत असतात. आपण वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा अपव्यय करतो. मुबलक पाणी उपलब्ध असताना उधळपट्टी करतो आणि पाणी टंचाईच्या काळात डोळ्यात पाणी आणून पाणी कोठे मिळते काय ? याचा शोध घेतो. असेल तर दिवाळी नाही तर होळी या उक्तीप्रमाणे आपले वागणे आहे. आपण आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये बदल केला तरी खुप काही होऊ शकते. घरातील पिण्याचे पाणी असो वा सांडपाणी त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण आजपासून घेतली तर भविष्यात आपणाला त्याचा त्रास जाणवणार नाही. तशी सवय आपणास लहानपणापासून म्हणजे शालेय जीवनात असणे आवश्यक आहे. हीच सवय पुढे पाणी बचत करण्यास कामी येऊ शकते. पाणी हे कधी ही शिळे होत नाही याची माहिती शालेय मुलांच्याद्वारे आईपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सांडपाण्याचा निचरा करताना त्यावर काही फुलझाडे आणि फळझाडे जगविण्याचा प्रयत्न जरूर करावा. त्यामुळे आपणास रोज चांगली चांगली फुले आणि फळे मिळू शकतात. शाळेतून परत घरी जाताना वॉटरबैगमध्ये शिल्लक असलेले पाणी रस्त्यावर न फेकता एखाद्या झाडाला टाकावे म्हणजे झाडांची निगा राखली जाते. घरात आलेल्या पाहुण्याना ग्लास भरून पाणी देण्यापेक्षा अर्धा ग्लास पाणी द्यावे. म्हणजे त्यांना गरज असेल तर पुन्हा मागतील. पण ग्लास भरून पाणी दिलोत आणि त्यांनी थोडेसे पाणी प्याले तर बाकीचे पाणी फेकावे लागते. आपण स्नान करताना एका बकिटमध्ये मावेल एवढ्या पाण्यातच स्नान करावे. बहुतांश मुले दोन-तीन बकिट पाणी भरून स्नान करतात, ही सवय मोडित काढणे आवश्यक आहे. शॉवरखाली स्नान करताना वेळेचे बंधन पाळल्यास पाण्याची बचत होईल. नळाखाली हात-पाय आणि तोंड धुण्याऐवजी मग किंवा जगाचा वापर केल्यास कमी पाण्यात हे काम होऊ शकते. अश्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लहानपणी गांभीर्याने लक्ष दिल्यास त्याचा भविष्यात नक्की फायदा होतो. त्यामुळे तहान लागली म्हणून विहीर खणत बसण्यापेक्षा त्याची तयारी आधी पासून करू या

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...