Sunday 18 February 2018

आयुष्यातील महत्वाचे वळण

..... Motivational Article .....

*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*

आज आपण आयुष्याच्या अशा वळणावर आहोत. वळण जसे घ्याल तसे आपले जीवन वळणार आहे. आपण वळणच घ्यायचे नाही असे ठरविले तर आपण यश मिळवू शकणार नाही.  शिक्षण हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला अनेक वळण घेता येऊ शकतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. महात्मा गांधीजी जीवन शिक्षणावर भर देत असत. भारतात सर्वच जण शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. कारण भारत देशाला प्रगतीपथावर जर न्यायचे असेल तर देशातील सर्व लोक शिकले पाहिजेत.
आपण आज एका महत्त्वपूर्ण अशा वळणावर आलो आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजन न करता काम करू लागलो तर त्यात यश मिळेल ही कदाचित परंतु ते यश जीवन सुधारणा करण्यात बदल करता येणार नाही. महात्मा फुले असो वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येकजण का घेतात ? याचा आपण कधी विचार केला आहे काय ? महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची घटना लिहीली. म्हणून प्रत्येकजण त्यांचे आज स्मरण करतात, हे तर सत्य आहेच. त्याचबरोबर त्यांनी केलेले वाचन चिंतन आणि लेखन यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. रात्रंदिवस पुस्तकाचे वाचन करणे, त्यावर चिंतन करणे आणि लोकांचा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा यासाठी लेखन करणे असे फार मोठे कार्य त्यांनी केले.
आपणाला सुद्धा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन चिंतन आणि लेखन या तीन गोष्टी वर जास्त भर दिला पाहिजे. वरील तीन गोष्टी जीवनात मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याजवळ हवी कठोर मेहनत आणि अविरत काम करण्याची इच्छा. याशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही.  यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. म्युनिसिपाल्टिच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी अभ्यास केला. ग्रंथालयातील वेळ वाचविण्यासाठी आणि जास्तीचा वेळ वाचन करता यावे यासाठी ग्रंथपालांचे डोळे चुकवून पाव खायचे पण पुस्तक वाचायचे. वाचाल तर वाचाल या उक्तीची ओळख त्यांच्या जीवनचरित्रातून दिसून येते. आठरा तास अभ्यास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती म्हणूनच ते भारताची घटना रात्रंदिवस कष्ट करून लिहू शकले.
दहावी आणि बारावीचे वर्ग म्हणजे अत्यंत महत्वाचे वर्ष असते. दिवस-रात्र एक करून अभ्यास केल्याने यश मिळते का ?  तर याचे नाही असे उत्तर मिळते.  कामात अविरतपणा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे आधी कष्ट मग फळ । कष्टाविना सर्व निष्फळ ।। त्यामुळे देरे हरी पलंगावरी ही वृत्ती आपण सोडून द्यायला हवे. कष्ट केल्यावर यश मिळणारच जर यदा कदाचित यश मिळाले नाही तर नाउमेद न होता,  पुन्हा जोमाने काम करावे. सचिन तेंडुलकर जेव्हा शून्यावर बाद होत असे तेही पहिल्याच चेंडूवर, तेव्हा स्वतः आत्मपरीक्षण करून सरावावर भर देऊन पुढील सामन्यात शतक ठोकत असे. असेच काही काम आपल्याला करायचे आहे. नाउमेद व्हायचे नाही, खचून जायचे नाही, भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यायचे आहे, त्याची ही पूर्वतयारी समजून कार्य करावे.
*आरोग्याची काळजी -
परीक्षेच्या काळात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येतीची काळजी नाही घेतली तर वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा तोंडावर असताना जास्त काळजी, चिंता, किंवा अस्वस्थ न राहता, हसत-खेळत राहावे. कुटुंबातील सर्वांशी वार्तालाप करावे. मन प्रसन्न ठेवल्याने आपल्या बुद्धिमत्तेची कार्यक्षमता वाढू लागते तर गांगरून किंवा गोंधळून गेल्यामुळे आपण विस्मृतीत जातो आणि प्रश्नाचे उत्तर सोपे असूनसुद्धा सोडविले जात नाही.  मनाची घालमेल आणि भीती घालवण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. परीक्षेच्या काळापुरतेच नाही तर जीवनात सुद्धा या वागण्याचा फायदा होतो. शालेय जीवनातल्या प्रत्येक बाबींचा परिणाम जीवनात बघायला मिळतो. त्यासाठी काही गोष्टी आणि बाबींचा सराव आवश्यक आहे.
आज आपणाला उशीर झाला आहे असे मुळीच समजू नका. कल करे सो आज कर या उक्तीनुसार आतापासून आपण अभ्यासाला लागू या. जे पूर्वीपासून अभ्यास करीतच आहेत ते थोड्या जोमाने कामाला लागा. सर्व परीक्षार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...