नवीन वर्ष सुखाचे जावो
मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता जाता त्यांच्या संस्कृतीमधील काही गोष्टी भारतात सोडून गेले. एक जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम हा पाश्चिमात्य पद्धतीचा असल्यामुळे बहुतांश जण यास विरोध दर्शवितात, ते खरेही आहे. कारण भारतातील हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होतो. त्यास आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच दिवसापासून ते आपल्या शेतातील जमा-खर्चाचा हिशोब मांडतात. व्यापारी मंडळी आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून त्यानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला आपल्या नवीन व्यवहाराला सुरुवात करतात. दिवाळीच्या पाडव्याला व्यापारी नववर्ष मानतात. शासन किंवा सरकारी कार्यालयात आर्थिक लेखाजोखा व्यवस्थित राहण्यासाठी एक एप्रिल हा दिवस त्यांच्यासाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात असते. बालगोपाळांची शाळा जून महिन्यात प्रारंभ होतो. या महिन्यात नव्या वर्गात, नव्या मित्रांसोबत आणि नव्या करकरीत पुस्तकांच्या भेटीसाठी उत्सुक असतो. त्यास्तव आपल्यासाठी जून महिना हा नववर्षाचा भासतो. असो, आपण सुद्धा या सर्वांसोबत नवीन वर्ष साजरा करीत असतो. नवीन वर्ष साजरा करताना केशव नाईक यांचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे, जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. तेव्हा आपणा सर्वांचे जीवन सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे सुंदर घडत जावो, परमेश्वर चांगली विचार करणारी बुद्धी आणि उत्तम पाहण्याची दृष्टी प्रदान करो हिच या नववर्षानिमित्त शुभेच्छा.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment